आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोना युद्धात स्वतःचा जीव धोक्यात टाकून नोकरी करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस, डॉक्टर्स यांचे आपण सगळे नेहमीच ऋणी राहणार आहोत. लोकांना सतत घरातच रहा असं सांगणारे डॉक्टर्स मात्र सध्या लोकांना सेवा देण्यासाठी सदैव उपलब्ध आहेत. कामाबद्दल इतकी निष्ठा कुठून येत असेल ? आणि ही प्रत्येक व्यक्तीमध्ये का दिसत नसेल ? हे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
कारगिल युद्ध सुरू असतांना तिथल्या ऑल इंडिया रेडिओमध्ये करणाऱ्या ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ या महिलेच्या कामाचं सुद्धा असंच कौतुक करता येईल.
जून १९९९ ची ही गोष्ट आहे. प्रत्येक कर्मचारी आपलं काम करत होता. संध्याकाळी ५ वाजता ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांचा एक शो रेडिओवर सुरू होणार होता. त्याच वेळी आकाशवाणी केंद्रात बसलेल्या सर्वांना फायरिंगचे आवाज यायला सुरुवात झाली. प्रत्येकाला साहजिकच भीती वाटली आणि त्यांनी ऑफिसमधून बाहेर पळायला सुरुवात केली.
लेह आणि कारगिल आकाशवाणी केंद्राच्या संचालक म्हणून काम बघणाऱ्या ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी मात्र त्यांचं ऑफिस सोडलं नाही. आकाशवाणी केंद्राचे लाईटही गेले होते.
–
हे ही वाचा – कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या पराक्रमी “शेर शाह” कोण होता?
–
पूर्ण ऑफिसमध्ये ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ या एकट्याच होत्या. त्यांनी कारगिलच्या ब्रिगेड कमांडरला जनरेटर सुरू करून देण्यासाठी मदत मागितली. ब्रिगेड कमांडरने विनंती लगेच मान्य केली आणि काही सैनिकांना त्यांनी जनरेटर सुरू करून देण्यासाठी आकाशवाणी केंद्रावर पाठवलं.
सुरक्षा जवान वेळेत पोहोचले आणि ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांचा शो संध्याकाळी ५ वाजता बरोबर सुरू झाला. स्वतःच्या जीवाचा विचार न करता लोकांना आपल्या शो मधून चालू परिस्थतीची अचूक माहिती देत राहण्याचं काम ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी केलं आणि अफवा पसरल्या जाणार नाहीत याची त्यांनी काळजी घेतली.
रेडिओसारख्या सेवेकडे आपण बऱ्याच वेळेस फक्त एक मनोरंजनाचं साधन म्हणून बघत असतो. पण, निदान सीमालगतच्या भागांमध्ये आकाशवाणी केंद्राचं प्रचंड महत्त्व आहे.
कारगिल युद्ध सुरू असतांना एक अफवा पसरली होती की, “पाकिस्तानने भारतीय सैन्यदलाचं हेलिकॉप्टरला पाडलं आहे.” ही अफवा त्या भागातील लोकांचं मनोधैर्य खच्ची करणारी होती.
‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी अशा परिस्थितीत लोकांना खरी माहिती सांगितली. लोकांना ही अफवा आहे हे सांगितलं आणि त्यांनी प्रेक्षकांना आवाहन केलं की, “लोकांनी आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी रेडिओला काही संदेश पाठवावेत आणि आम्ही ते संदेश इथे वाचू.”
‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये ज्याप्रकारे मुन्नाभाई लोकांना माहिती देतो, गाणी ऐकवतो आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो, तेच काम
‘त्सेरिंग अंगमो शुनू’ या प्रत्यक्ष आयुष्यात कारगिल युद्धाच्या काळात सुद्धा अविरत करत होत्या.
कारगिल आकाशवाणी केंद्राने केलेल्या या आवाहनाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ या इतक्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी आपल्या १८ वर्षाच्या मुलाला सौनिकांच्या मदतीसाठी सीमेलगत पाठवलं.
१६ जून १९९९ रोजी ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी हिंदीमध्ये या अर्थाची घोषणा केली की, “आपल्या भारतीय सैनिकांना सध्या शस्त्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कुलीची आवश्यकता आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी मदतीसाठी समोर यावं.
आपल्या देशाला तुमची गरज आहे, समोर या आणि तुमचं कर्तव्य पार पाडा.” हे शब्द ऐकल्यानंतर कोणत्याही भारतीय व्यक्तीला स्वतःला थांबवणं शक्यच नव्हतं. भारतीय सैनिकांना अपेक्षित ती मदत मिळाली.
साधारणपणे एक सैनिक आपल्या सोबत १० किलो वजन घेऊन जायचे. पण, लडाखचे कुली हे एकावेळी आपल्या सोबत ३० किलो वजन घेऊन जायचे.
कारगिल युद्ध सुरू असतांना एक वेळ अशी आली होती की, काही तुकड्यांमध्ये सैन्य कमी पडत होतं. सैन्याची मदत करण्यासाठी त्या आपात्कालीन परिस्थितीत काही मुलांना सैन्यात भरती करून घेण्याचं ठरलं. अचानक आलेल्या या परिस्थिती मुळे आपल्या सैनिकांना जाहिरात देणं शक्य नव्हतं.
‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी या कामासाठी सुद्धा आपलं योगदान दिलं. त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून अशी घोषणा केली की, “ज्या परिवारांमध्ये १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचे मुलं आहेत त्यांनी आपल्या मुलांना लेह पोलो मैदानावर सैन्यात भरती होण्यासाठी पाठवावं, तिथे सैन्यभरती सुरू आहे. कर्नल विनय दत्ता यांनी दिलेल्या माहिती द्वारे ही विनंती करण्यात येत आहे.”
कर्नल विनय दत्ता यांनी ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांना एक दिवस आधीच भेटून सैन्याला अधिक माणसांची गरज असल्याचं सांगितलं होतं. शत्रूवर आक्रमण करायची रणनीती ठरवताना हा अंदाज कर्नल विनय दत्ता यांना आला होता आणि त्यांनी योग्य व्यक्तीला ही माहिती दिली आहे हे ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं होतं.
‘कारगिल : द अनटोल्ड स्टोरीज’ या पुस्तकात रत्मा बीष्त रावत यांनी लिहिलं आहे की, कर्नल विनय दत्ता यांनी सांगितल्या प्रमाणे कारगिल लगत असलेल्या डोंगराळ प्रदेशांमध्ये त्या काळात रस्ते सुद्धा नव्हते. सैनिकांपर्यंत अन्न, शस्त्र घेऊन जाणं हे आमच्यासाठी मोठं आव्हान होतं. त्यावेळी कोणतंही वाहन पोहोचण्याआधी ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी पाठवलेले स्वयंसेवक हे सैन्यासाठी जेवण घेऊन हजर असायचे.
स्वतःच्या १८ वर्षाच्या मुलाला ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी भारतीय सैन्यासाठी स्वयंसेवक म्हणून नेमलं होतं. चार दिवसात स्वयंसेवकांची संख्या २०० वर पोहोचली होती. महिना संपेपर्यंत ही संख्या ८०० पर्यंत गेली होती.
‘त्सेरिंग अंगमो शुनू’ या प्रत्येक शोच्या सुरुवातीला आणि संपतांना हे न चुकता सांगायच्या की, “भारतीय आर्मीतील जवान हे आपल्यासाठी लढत आहे. आता त्यांना मदत करायची आपल्यावर जबाबदारी आहे.”
आकाशवाणी केंद्र दिल्ली कडून रेडिओ स्टेशन बंद ठेवायची सूचना आलेली असतांना सुद्धा ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी कारगिल रेडिओ स्टेशन सुरू ठेवलं होतं. २६ जुलै १९९९ जेव्हा कारगिल युद्ध संपलं तेव्हा ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांच्या या कार्याची दखल सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली होती.
–
हे ही वाचा – कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या एकमेव महिला पायलटची थरारक कथा!
–
भारतीय सैन्याला वेळोवेळी प्रत्यक्ष आणि रेडिओच्या माध्यमातून मदत करणाऱ्या ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ आणि हजारो स्वयंसेवकांच्या मदतीनेच आपण आज ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करू शकत आहोत असा उल्लेख सरकारी पत्रकात करण्यात आला होता.
भारतीय सैनिकांना इतकी मदत करणाऱ्या ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी सैन्य परिवारात जन्म घेतला आहे असंही नाहीये. त्यांचे वडील हे नायब तहसीलदार होते आणि त्यांचं पूर्ण कुटुंब लेह जिल्ह्यात शेती करायचे.
शालेय शिक्षण लेहमधून घेतल्यानंतर कला क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यायची इच्छा होती. पण, घरच्यांच्या इच्छेमुळे त्यांना लवकर लग्न करावं लागलं होतं. १९७५ मध्ये ‘त्सेरिंग अंगमो शुनू’ यांनी ऑल इंडिया रेडिओ लेह मध्ये प्रोग्राम ऑफिसर म्हणून नोकरी सुरू केली होती.
कोणत्याही युद्ध मध्ये संवादाच्या माध्यमाला प्रचंड महत्व असतं. ऑल इंडिया रेडिओ कारगिल यांनी युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांना केलेल्या मदतीचे आभार मानावेत तितके कमीच आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.