Site icon InMarathi

बॉलिवूडचे ‘शो मॅन’ ठरलेले सुभाष घई रातोरात कुठे गायब झाले… ते आता करतात काय?

subhash ghai featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“आधी सारखे सिनेमे आता बनत नाहीत” हे वाक्य आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून नेहमीच ऐकत असतो. आता असं म्हणायची वेळ तरुण पिढीवरही आली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

आज कथा, पटकथा, तंत्रज्ञान, विषय या सर्व आघाड्यांवर बॉलीवूडचा सिनेमा बदलला आहे. पण, अचानक कुठेतरी ८०, ९० च्या दशकातील गाण्यांचा आवाज ऐकू आल्यावर लगेच वाटतं, की “नाही यार, आजच्या सिनेमामध्ये ‘वो बात’ नाहीये.”

सगळं व्यवस्थित आहे, पण बॉलीवूडच्या सिनेमाचा आत्मा कुठे तरी हरवत चालला आहे. आपण जेव्हा जॅकी श्रॉफ ‘हिरो’मधील बासरीची ट्युन ऐकतो किंवा ‘राम लखन’मधील माधुरी दीक्षितचं ‘बडा दुख दिना ओ रामजी’ हे गाणं बघतो किंवा तालची गाणी ऐकतो, तेव्हा आजच्या सिनेमात ‘काय घडत नाहीये’ हे प्रकर्षाने जाणवतं.

सौदागर मधील ‘इमली का बुटा, बेरी का पेड’ हे गाणं असो किंवा खलनायक मधील नायकाला खलनायक म्हणून दाखवणं असो, अथवा परदेसमधील ‘दो दिल मिल रहे है…’ हे गाणं… त्या काळात सिनेमात, कथा सांगण्यात, गाण्यांची शब्द कळतील इतका एक ‘ठेहराव’ होता.

 

 

पटकथा मोठ्या पडद्यावर गतिमान वाटणे आणि शांतही वाटणे यामध्ये त्या काळातील एका दिगदर्शकाचा हातखंडा होता. आपण बॉलीवूडचे ‘शो मॅन’ दिगदर्शक सुभाष घई यांच्याबद्दल बोलत आहोत हे वरील उदाहरणांवरून सर्वांच्या लक्षात आलंच असेल.

राज कपूर यांच्या नंतर ही पदवी भूषवणारे सुभाष घई हे बॉलीवूडमधील एकमेव व्यक्तिमत्व आहेत.

===

हे ही वाचा – …आणि त्यांनी राज कपूरसाठी आपले दागिने विकले

===

स्वतः दिग्दर्शित केलेल्या सिनेमात प्रत्येक वेळी दर्शन देणारे सुभाष घई यांचं दर्शन सध्या दुर्मिळ झालं आहे. सलग १३ सुपरहिट सिनेमांचं दिगदर्शन करणारे सुभाष घई…!! ‘सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना सुभाष घई हे बॉलीवूडमध्ये कसे आले? कशामुळे यशस्वी झाले? आणि ‘ते सध्या काय करत आहेत?’ जाणून घेऊयात.

 

 

सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ नागपूरमध्ये झाला होता. त्यांचे वडील हे दातांचे डॉक्टर होते आणि त्यांचं दिल्लीमध्ये क्लिनिक होतं. सुभाष घई यांनी हरियाणामधून पदवीचं शिक्षण घेतलं आणि नंतर आपला कल ओळखून त्यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (FTII) मधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं.

मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याच्या हेतुने मुंबईमध्ये आल्यावर त्यांना कोणताही अनुभव नसल्याने कोणत्याच स्टुडिओमध्ये जाण्याची, दिगदर्शकांना भेटण्याची परवानगी मिळत नव्हती.

मित्र कसे बनवावेत? लोकांना आपल्यात काही टॅलेंट आहे हे कसं सांगावं? या प्रश्नांवर सुभाष घई यांनी खूप विचार केला. वाचन केलं. स्वतःला इतरांसमोर प्रेझेंट करण्यासाठी आवश्यक ते बदल केले.

याचा फायदा हा झाला, की युनायटेड प्रोड्युसर्सच्या फिल्मफेअर टॅलेंट स्पर्धेत त्यांचं ५००० सहभागी स्पर्धकांमधून त्यांची इतर २ कलाकारांसोबत निवड झाली. सुभाष घई सोबत निवडले गेलेले इतर कलाकार होते राजेश खन्ना आणि धीरज कुमार.

सुभाष घई यांच्या बॉलीवूड करिअरची सुरुवात १९६७ मध्ये रिलीज झालेल्या ‘तकदीर’ या सिनेमातून एक ‘अभिनेता’ म्हणून झाली होती.

त्यानंतर १९६९ च्या आराधनामध्ये छोटा रोल, १९७० मधील उमंग आणि १९७६ च्या गुमराहमध्ये त्यांनी नायक म्हणून काम केलं होतं. सिनेमा काय आहे? तो कसा तयार होतो? या सर्व कामांपैकी आपल्याला काय करायला जास्त आवडेल? असे प्रश्न त्यांना पडू लागले. उत्तर मिळालं, दिगदर्शन.

 

===

हे ही वाचा – घोड्यांच्या देखभालीपासून ऑस्करपर्यंत – वाचा या भारतीय दिग्दर्शकाचा अफाट प्रेरणादायी प्रवास

===

शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत झालेल्या मैत्रीने त्यांना १९७६ च्या ‘कालीचरण’चं दिगदर्शन करण्याची संधी मिळाली. सिनेमा सुपरहिट झाला. दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांनी काम करायचं ठरवलं.

१९८२ मध्ये ‘विधाता’, १९८६ मध्ये ‘कर्मा’ आणि १९९१ मध्ये ‘सौदागर’ या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर सुद्धा यश मिळवलं. प्रस्थापित कलाकारांसोबतच फक्त काम न करता सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ सारख्या नवोदित कलाकारांना सुद्धा १९८३ च्या ‘हिरो’ मधून संधी दिली.

नुकतंच करिअर सुरू केलेल्या अनिल कपूर यांच्या यशस्वी करिअरमध्ये सुभाष घई यांचा मोठा सहभाग होता. ‘मेरी जंग’मधून त्यांनी अनिल कपूरला वेगळ्या पद्धतीने सादर केलं.

जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांना एकत्र आणून सुभाष घई यांनी ‘कर्मा’, ‘राम-लखन’, ‘त्रिमूर्ती’ सारख्या सिनेमातून एकत्र मोठ्या पडद्यावर आणलं. लोकांना हे सगळेच प्रयोग खूप आवडले. प्रत्यक्ष आयुष्यात वयाने मोठ्या असलेल्या अनिल कपूरने प्रत्येक वेळी जॅकी श्रॉफला मोठा भाऊ म्हणून पडद्यावर दाखवण्यास कधीच संकोच केला नाही, याचं श्रेय सुद्धा दिगदर्शक सुभाष घई यांना दिलं जातं.

 

 

१९९३ मध्ये त्यांनी संजय दत्त कडून ‘खलनायक’मधून त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा दिली. जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांना एकत्र आणलेला हा सिनेमा त्यांच्या करिअरच्या महत्वाच्या सिनेमांपैकी एक ठरला.

१९९७ मध्ये सुभाष घई यांनी तेव्हा सुपरस्टार असलेल्या शाहरुख खानला त्याच्या वयाला साजेसा ‘परदेस’मधला रोल दिला आणि लोकांना आश्चर्यचकित केलं. परदेसची गाणी, संवाद लोकांना प्रचंड आवडले… आजही आवडतात.

‘आय लव्ह माय इंडिया’ हे गाणं भारतात आणि अनिवासी भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं. निसर्ग सौंदर्य दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी स्वित्झर्लंडला जाण्याची गरज नाही हे सुभाष घई यांनी परदेसमधून दाखवून दिलं.

१९९९ मध्ये आलेला ‘ताल’ हा म्युझिकल हिट ठरला. बॉक्स ऑफिसवर तालने कमाल केली. पण, या सिनेमाचा खरा हिरो ए आर रहमान होता हे सगळेच मान्य करतील.

अक्षय खन्ना ला या सिनेमात संधी देऊन त्यांनी पुन्हा एक वेगळा प्रयोग केला. जवळपास दर पंधरा मिनिटांनी गाणं असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरण्यास भाग पाडलं आणि सुभाष घई यांच्या नावावर आणखी एका सुपरहिटची नोंद झाली.

एखाद्या वस्तूला जशी एक ‘प्रॉडक्ट लाईफ सायकल’ असते, म्हणजे एका ठराविक वेळेनंतर ती वस्तू लोकांना तितकी आवडत नाही, २१ व्या शतकात तसंच काहीसं सुभाष घई यांच्यासोबत घडलं.

२००१ मध्ये रिलीज झालेला त्यांचा दिगदर्शीत ‘यादे’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सणकून आपटला. जॅकी श्रॉफ, नवा सुपरस्टार ह्रितीक रोशन, करीना कपूर कोणीही या सिनेमाला तारु शकलं नाही. सलग १३ सुपरहिट सिनेमांचं दिगदर्शन करणाऱ्या सुभाष घई साठी हे अपयश पचवणं अवघड होतं.

एक पिढी बदलली होती, त्यांच्या आवडीनिवडी बदलल्या होत्या. सुभाष घई त्यांच्यानुसार बदलले नव्हते असंच म्हणावं लागेल. चार वर्षांच्या अंतराने २००५ मध्ये त्यांनी विवेक ओबेरॉयला घेऊन ‘किसना’ सिनेमा तयार केला. प्रेक्षकांनी तो सुद्धा नाकारला.

 

===

हे ही वाचा – प्रचंड गरिबीशी झगडून अनाथांचा मसीहा बनलेल्या बॉलिवूडच्या ‘बिंदास भिडू’चा प्रवास!

===

फक्त दिगदर्शक म्हणून न राहता सुभाष घई यांनी सिनेमाच्या निर्मितीमध्ये जाण्याचं ठरवलं. ऐतराज, ३६ चायना टाऊन आणि अपना सपना मनी मनी सारख्या सिनेमांची त्यानी निर्मिती केली. मुक्ता आर्ट्स या बॅनरखाली त्यांनी या सिनेमाची निर्मिती केली. सुभाष घई यांनी निर्मिती केलेल्या ‘इकबाल’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यातील श्रेयस तळपदे आणि ‘आशाये..’ या गाण्याने लोकांची मनं जिंकली.

निर्माता म्हणून यशस्वी झाल्यानंतर सुभाष घई यांनी आपला मोर्चा त्यांनी सुरू केलेल्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ या अभिनय, दिगदर्शन देणाऱ्या संस्थेकडे वळवला. ३ वर्षांनी २००८ मध्ये त्यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सारख्या सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमाचं दिगदर्शन केलं. पण, हा सिनेमा सुद्धा लोकांनी नाकारला.

प्रेक्षकांना ते जुने सुभाष घई हवे होते, पण ते त्यांच्या सिनेमातून कुठेच दिसत नव्हते. त्याच वर्षी आलेल्या ‘युवराज’चा सुद्धा तोच निकाल लागला. २०१४ मध्ये त्यांनी परत एकदा ‘कांची: द अनब्रेकेबल’मधून कमबॅक करायचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत हिंदी सिनेमा वेगळ्याच वळणावर निघून गेला होता. सुभाष घई यांनी कांची नंतर सिनेमा दिगदर्शनाला कायमचा रामराम केला.

 

 

शो मॅनची उपाधी मिळालेले सुभाष घई हे नाव अचानक सिनेसृष्टीत कमी ऐकायला मिळू लागलं. ते फार कमी पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावू लागले.

२०१५ पासून त्यांना सर्व पुरस्कार सोहळ्यात ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. आयफा, स्क्रीन, अमर उजाला यांनी सुभाष घई यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सुभाष घई यांच्या कार्याचा गौरव केला. सुभाष घई यांच्या दिगदर्शनाचे चाहते असलेल्यांना लक्षात आलं, की इथून पुढे आपल्याला त्यांचे जुने सिनेमे बघूनच समाधान मानावं लागेल.

“अपयशाने खचून न जाता त्याच्याकडे एक प्रयत्न म्हणून बघा. फ्लॉप झालेल्या सिनेमासाठी तितकीच मेहनत करावी लागते. अपयशामुळे स्वप्न बघणं थांबवू नका. मनाला आवडेल तोच विषय सिनेमासाठी निवडा.” असा सल्ला सुभाष घई नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात.

आज सुभाष घई मुंबईमध्ये आपली पत्नी मुक्ता आणि दोन मुली – मेघना आणि मुस्कान सोबत सुखाचं आयुष्य जगत आहेत. मेघना घई या ‘व्हिसलिंग वूड्स’ च्या प्रेसिडेंट म्हणून कारभार सध्या सांभाळत आहेत.

सुभाष घई हे दिगदर्शक म्हणून कमबॅक करतील की नाही ते सांगता येणं कठीण आहे. पण, यांचा करिअर आलेख हा नवोदित दिगदर्शकांना प्रेरणा देणारा आहे हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version