Site icon InMarathi

पालकांनो! ही ६ सूत्रं पाळली नाहीत तर तुम्ही कधीही आदर्श पालक ठरू शकणार नाही!

parents yelling inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लॉकडाऊनचा काळ अनेकांसाठी हवीहवीशी वाटणारी विश्रांती ठरली तर अनेकांना घराच्या चार भिंतीत कैद झाल्याची शिक्षा वाटली. घरची कामं, वर्क फ्रॉम होमच्या वेळा, मुलांचं ऑनलाईन शिक्षण यांमुळे मागील वर्षी सुरु झालेली पालकवर्गाची तारेवरची कसरत आजही थांबलेली नाही.

जुन महिन्यातही लॉकडाऊन नेमका केव्हा संपणार? त्यानंतरही सगळी गाडी केव्हा रुळावर येणार याचे उत्तर आज सरकारकडेही नाही, त्यामुळे पुढील काही महिने परिस्थिती जैसे थे असणार यात शंका नाही.

लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच मोठ्या काळासाठी घरातील सगळे सदस्य एकत्र घरी वेळ घालवू लागले. गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर हा काळ अनेक कुटुंबियांनी एन्जॉय केला.

 

 

पत्ते, कॅरमसारखे खेळ, चविष्ट मेजवानी, एकत्र बसून पाहिले जाणारे सिनेमे अशा ठरलेल्या रुटीनाचाही नंतर कंटाळा येऊ लागला. जुननंतर मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरु झाल्याने तर पालकांच्या टेन्शनमध्ये अधिक भर पडली.

वेळेवर उठण्यापासून जेवण संपवण्यापर्यंत आणि ऑनलाईन क्लासच्या अभ्यासापासून अतिरिक्त वेळ गेम्स खेळण्यापर्यंत अनेक गोष्टीत पालक-मुलांचे खटके उडू लागले. एकीकडे कामाचे टेन्शन तर दुसरीकडे घरात धिंगाणा घालणारी मुलं यांमुळे घरातील वादाचा सुर थेट बाहेरपर्यंत ऐकू येऊ लागला.

आजही अनेक घरात डोकावून पाहिले तर मुलांवर डाफरणारे, ओरडत त्यांच्यामागे धावणारे हजारो पालक आपल्याला दिसतील.

मुलांना मारणे योग्य नाही असे म्हणणारे अनेकजण असले तरी “मारल्याशिवाय अन्य पर्याय नाही” असे ठाम मत असणारेही लाखो पालक देशात आहेत.

त्यामुळे या प्रश्नावर नेमका तोडगा काढायचा कसा? मुलांना न मारता, त्यांच्यावर न चिडता पालकांनी त्यांना घडवायचे कसे? अनेकदा आपल्या भलत्याच टेन्शनमुळे वड्याचं तेल वांग्यावर याची प्रचिती तुमच्या घरात येऊ नये यासाठी काय करावं? असे प्रश्न पडले असतील तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.

१. स्वतःचं डोकं शांत ठेवा

खोड्या, दंगामस्ती हा लहान मुलांचा स्थायीभाव आहे, खट्याळपणा, भांडणं हा त्यांचा स्वभाव आहे किंबहूना हे त्यांच्या वयाला साजेसे आहे या सगळ्या गोष्टी पालक म्हणून तुम्ही मान्य केलेल्या असता, मात्र तरीही मुलांनी दंगामस्ती केल्यावर तुम्ही त्यांच्यावर ओरडत असाल तर हा राग मुलांवरील नसून स्वतःवरील आहे.

सध्या आई-वडिल असे दोन्ही पालक नोकरदार असतात, काहीजण व्यवसायामध्ये गुंतलेले असतात, वाढती महागाई, घरखर्च, मुलांच्या अपेक्षा यांमुळे ‘पैसा’ हा चिंतेचा विषय ठरतो, पैसा कमावण्यासाठी स्पर्धेत धावताना ताण, टेन्शन नकळत वाढतात आणि या ताणाला तुमची मुलं बळी पडतात.

 

 

टेन्शनमध्ये असलेल्या पालकांचा राग अनवधानाने मुलांवर निघाल्याने मुलं मात्र यात होरपळली जातात. यासाठी तुम्ही स्वतःचं डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे.

त्यासाठी योगा, ध्यान, चिंतन अशा निरनिराळ्या उपायांची मदत घेता येईल. कितीही बिझी असाल तरी स्वतःसाठी, मुलांसाठी हा वेळ स्वतःला देणं गरजेचं आहे. केवळ काही काळासाठी केलेले ध्यान, योगा किंवा आवडत्या छंदात रमवलेले मन यांमुळे तुमचा ताण हलका होईल आणि विनाकारण मुलांवर राग काढला जाणार नाही.

२.  ताकीद द्या

मुलांना पालकांच्या नजरेचा धाक हवा हे वाक्य तुम्ही घरातील वडिलधा-यांकडून ऐकलं असेल. मुलांवर हात उगारून त्यांना इजा पोहचवण्यापेक्षा तशी वेळ येऊ नये, मुलांकडून एखादी चुकीची गोष्ट घडू नये यासाठी आधीच दक्षता घेणे गरजेचे आहे.

 

 

मुलांना धाक दाखवा मात्र त्यातही समजुदारपणा असावा. एखादी चुकीची कृती करण्यापासून मुलांना रोखताना त्या कृतीचे धोके समजावून सांगणे, ती कृती न करण्याबाबत ताकीद द्या. अनेकदा केवळ अशी ताकीद दिल्यानेही मुलं खोडकरवृत्तीपासून परावृत्त होतात.

हे ही वाचा – ९० च्या दशकातल्या ‘या’ जाहिराती लागल्या की पालक लगेच टीव्हीचा रिमोट शोधायचे!

३. पालक नव्हे मित्र व्हा

वारंवार सक्ती करण्या-या किंवा हात उगारणा-या पालकांमुळे मुले कोडगी होतात. त्यांना पालकांच्या शिक्षेबद्दलही काही वाटेनासे होते. त्यामुळे मुलांना सुधारण्यासाठी शिक्षा हा पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

 

 

पालक म्हणून नव्हे तर मित्र म्हणून मुलांशी नातं निर्माण केलं तर कदाचित हा संवाद अधिक मनमोकळा होऊ शकतो. यांमुळे तुमच्या मनाविरुद्ध मुलं वागणार नाहीत त्यामुळे तुम्हालाही त्यांच्यावर हात उगारावा लागणार नाही.

४. जवळ घेऊन समजावून सांगा

शब्दांनी जे साध्य होत नाही ते स्पर्शातून साध्य होतं, ही बाब खरी आहे. लहान मुलांच्या बाबतीत तर हे तंतोतंत खरं ठरतं. म्हणूनच लहान मुल रडलं किंवा पडलं की आपण त्याला समजावून सांगण्यापेक्षा आधी मायेने जवळ घेतो, कुरवाळतो.

मुलांनी एखादी चूक केल्यानंतर त्याला मारण्यापेक्षा जवळ घेऊन समजून सांगा. सुरवातीला मुलांना तुमच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नसेल. आपण एखादी चूक केल्यानंतर आता आई-बाबा रागवणार, मारणार हा विचार करून मुलं घाबरतात, बावरतात मात्र अशावेळी त्यांना जवळ घेत, मायेने चूक सांगितली, तर मुलांची भिती कमी होतेच मात्र पालकांबाबत विश्वास, आधार या भावनाही निर्माण होतात.

 

 

आपल्यावर माया करणा-या पालकांचं ऐकावं, त्यांना दुखवू नये या भावनेने पुढच्या वेळी मुलं ती चूक करणार नाहीत हे नक्की.

५. स्तुती करा

मुलांच्या चुकीवर ओरडणारे किंवा पाठीत धपाटे घालणारे पालक, मुलांचं कौतुक करायला मात्र तितकेसे उत्सुक नसतात. एखाद्यावेळेस मुलांनी जाणीवपुर्वक चूक टाळली किंवा तुमच्या मताचा आदर केला तर अशावेळी मुलांची पाठ थोटपणे गरजेचे असते.

 

 

काही दिवसांपुर्वी तुम्ही दिलेला सल्ला लक्षात ठेवत मुलांनी एखादी चूक केली नाही किंवा त्यांच्या वर्तनात बदल झाल्याचे तुमच्या लक्षात आल्यानंतर मुलांचे कौतुक करणे गरजेचे आहे. यामुळे मुलांना पालकांबद्दल विश्वास निर्माण होतो, आदर वाढतो आणि आपल्या वागणूकीत अधिक बदल करण्यास उत्सुकता निर्माण होते.

६. चर्चा करा

मुलांनी एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध केली किंवा एखादा अनावश्यक हट्ट केला की त्रस्त पालकांचा हात उठतोच! मात्र मार खाणा-या मुलांना आपण नेमकी कशासाठी शिक्षा भोगतोय याचाच पत्ता नसतो, त्यामुळे अशा चुकांची पुनरावृत्ती होते.

मुलांनी केलेली चूक नक्की काय आहे? त्याचे काय परिणाम होऊ शकतात? हे वागणे यावेळी कसे योग्य नाही याबाबत मुलांशी चर्चा केल्यास मुलांनाच आपल्या कृतीचा पश्चाताप होऊ शकतो.

 

 

वादापेक्षा सुसंवाद हा मुलांसाठी नेहमीच फायदेशीर ठरतो.

हे ही वाचा – तरुणांनो नि लहानग्यांच्या मातांनो – ‘मॅगीचं’ हे भयंकर वास्तव तुम्हाला माहितीये का?

७. तुम्हीही समजूदार व्हा

मुलांकडून समजूदारपणाची अपेक्षा करताना पालक म्हणून तुम्हीही समजूदार असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा.

खोडकर, हट्टी मुलांना समजावताना पालकांनी संयम, धैर्य बाळगणे गरजेचे आहे. मुलांवर हात उगारून प्रश्न तेवढ्यापुरता सोडवला जातो किंबहूना तो अधिक बिकट होतो याची जाणीव ठेवावी.

मुलांवरील संस्कार योग्य व्हावेत, त्यांनी संवेदनशील नागरिक व्हावे असे वाटत असेल तर तुम्हीही वेळीच स्वतःवर संयम ठेवमं गरजेचं आहे.

मुलांना घडवणं म्हणजे केवळ दडपशाही नाही. आपली टेन्शन्स, ताण सांभाळताना यामध्ये मुलांची घुसमट होत नाही ना? याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

 

 

लहान मुलं हे त्यांच्या वयाप्रमाणेच वागतात, धडपडतात, चुकतात मात्र त्याकडे त्यांच्या वयाचेच होऊन पाहणे गरजेचे आहे. मुलांच्या चुकांसाठी हात उगारून किंवा त्यांना मारून प्रश्न सुटत नाही किंबहूना मुलांच्या मनावर त्यामुळे होणारा आघात हा त्या चुकांपेक्षाही भयंकर असतो.  त्यामुळे मुलांवर ओरडून स्वतःचा रक्तदाब वाढवणं आणि त्यांसह मुलांच्या मनावर आघात करण्यापेक्षा वेळीच सावध व्हा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version