मेहमूदचा पडद्यावरील पराभव मन्नाडेंनी पर्सनली घेतला…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही लोक दुर्लक्षित राहिलेले असतात. बॉलीवूडमध्ये याचं प्रमाण जरा जास्त असल्याचं बघायला मिळतं. कौतुक, पुरस्कार हे मोजक्या नावांभोवतीच फिरत असतं. सध्या आपण रिऍलिटी शोजमध्ये बघत असतो, की नवोदित कलाकारांचं प्रचंड कौतुक केलं जातं. पण, काही वर्षानी हे कलाकार आपल्याला कुठेच दिसत नाहीत. प्रगती न होण्याचं प्रत्येक कलाकाराचं वेगळं कारण असतं.
‘मन्ना डे’ सारख्या गायकसोबत असं झालं होतं की, त्यांना त्या काळात बॉलीवूडच्या काही वरिष्ठ मंडळींनी गव्हातून खडा काढून टाकल्यासारखं बाजूला करण्यात आलं होतं.
१९७० चं दशक हे मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्या मधुर गाण्यांचं होतं. एकीकडे देव आनंद, दिलीप कुमार यांच्या रोमँटिक सिनेमा, गाण्यांचा तो काळ होता. तर दुसरीकडे, कवी प्रदीप हे गीतकार भारतीयांना देशभक्तीच्या गीतांनी प्रेरित करत होते.
बलराज साहनी यांनी ‘वक्त’ सारखा एक ओतप्रोत देशभक्ती असलेला सिनेमा तयार केला होता, तर दुसरीकडे १९६१ च्या ‘काबुलीवाला’ या सिनेमातून “ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछडे चमन, तुझपे दिल कुर्बान” हे अजरामर गीत भारतीयांना मिळालं होतं.
शांत, गंभीर असलेला तो आवाज प्रत्येकाच्या मनात असलेल्या भारत देशाबद्दलच्या भावना सांगणारा होता. या गाण्याचे शब्द ‘सलील चौधरी’ यांनी लिहिले होते आणि गायक होते ‘मन्ना डे’.
त्यांनी हिंदी आणि इतर सर्व भाषांमध्ये मिळून एकूण ३००० गाणी गायली आहेत. हिंदीमध्ये इतर भाषेच्या तुलनेत त्यांनी कमी गाणी गायली आहेत. पण, त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं हे चाहत्यांच्या लक्षात आजही आहे.
१ मे १९१९ रोजी कोलकत्तामध्ये जन्म झालेल्या मन्ना डे यांचं खरं नाव प्रबोध चंद्रा डे असं आहे. त्यांचे काका कृष्णा चंद्रा डे एक संगीतकार होते. त्यांनी संगीताचे धडे त्यांचे काका आणि गझल गायक डबीर खान यांच्याकडून घेतले.
१९४२ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी मन्ना डे हे संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला आले. सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांना कृष्णा चंद्रा डे यांनी चित्रपटात गाण्याची आणि काही चित्रपटांसाठी ‘असिस्टंट म्युझिक डायरेक्टर’ म्हणून काम करण्याची संधी दिली.
चांगला आणि वेगळा आवाज, काम करण्याची इच्छा असूनही मन्ना डे हे कधी बॉलीवूडचे त्या काळातले ‘अरिजित सिंघ’ होऊ शकले नाहीत याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच खंत वाटते.
–
हे ही वाचा – हा गायक एकेकाळी फाटक्या चपलेने फिरायचा, एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.
–
आजच्या सारखंच ७० च्या दशकात संगीतकार हे नेहमी आपल्या आवडीच्याच गायकांकडून गाणं गाऊन घ्यायचे. मुकेश, मोहम्मद रफी, किशोर कुमार या तिघांनी गाजवलेल्या त्या काळात सर्व आघाडीच्या अभिनेत्यांना यांचेच आवाज दिले जायचे.
मन्ना डे यांच्या ‘ऐ मेरे प्यारे वतन…’ आणि त्यांनी गायलेल्या इतर गाण्यांचं हे वैशिष्ट्य हे आहे की, ते गाणे कोणत्याही लोकप्रिय अभिनेत्यावर चित्रित झालेले नसले तरीही ते केवळ गाण्यांमुळे आणि गायकीमुळे लोकप्रिय झाले होते. त्यांनी गायलेलं कोणतंही गाणं एखाद्या पर्यटन ठिकाणी चित्रित झालेलं नाहीये.
मोहम्मद रफी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ” सगळे लोक हे माझे गाणे ऐकतात आणि मी मात्र मन्ना डे यांचेच गाणे परत परत ऐकत असतो.”
त्यांनी जेव्हा “ऐ मेरे प्यारे वतन…” या गाण्याची रेकॉर्डिंग पूर्ण केली तेव्हा तिथला रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणाला की, “आज तुमची तब्येत खराब आहे का ?” तेव्हा निर्माता विमल रॉय ने त्या रेकॉर्डिंग आर्टिस्टला सांगितलं की, ” हे गाणं मोठ्या पडद्यावर असंच ऐकू येणं अपेक्षित आहे, म्हणून मन्ना डे आज असे वावरत आहेत.”
मन्ना डे यांना एका ठराविक वेळेनंतर गाणे कमी मिळू लागले याचं कारण त्यांच्यातील साधेपणा हे सांगितलं जातं. त्या काळातले इतर गायक हे गाणं कसं अवघड आहे हे संगीतकाराला सांगायचे आणि ते गाणं कसं सोपं करून गाता येईल हे सांगायचे.
‘बरसात की एक रात’ या सिनेमात ‘ये इश्क इश्क है’ ही एक कव्वाली आहे. ती गायला २-३ गायकांनी नकार दिला होता. त्यांनी ती कव्वाली सोपी करून गायली. सिनेसृष्टीत अशी बातमी पसरली की त्यांना फक्त अवघड गाणीच गायला आवडतात. सोपे गाणे घेऊन कोणता संगीत दिगदर्शक मन्ना डे कडे जातच नव्हता.
राज कपूर यांनी मन्ना डे यांच्याकडून “ए भाई, जरा देख के चलो…” हे ‘मेरा नाम जोकर’चं गाणं त्यांनी गायला सांगितलं. ते गाणंही खूप हिट झालं, पण सिनेमा हिट झाला नाही. सिनेमा चर्चेत राहिला तो केवळ राज कपूर आणि सिनेमाच्या लांबी मुळे. हे गाणं गाण्याचा कोणताही फायदा झाला नाही.
दुय्यम वागणूक मिळाल्याचं त्यांना परत एकदा वाटलं जेव्हा ‘पडोसन’ मधील ‘एक चतुर नार…’ हे गाणं आणि जुगलबंदी गाण्याची संधी मिळाली. संगीतकाराने किशोर कुमार यांना सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेला भाग गाण्याची संधी दिली.
या गाण्यातील तो भाग देण्यात आला जो की मेहमूदवर चित्रित झाला आहे. गाणं आठवलं तर लक्षात येईल की या गाण्याच्या जुगलबंदीत मेहमूदची हार होते. ही हार त्यांना स्वतःची वाटली होती.
किशोर कुमार यांच्या गाण्याला अधिक सुरेल आणि त्यांना बेसूर भाग गायला सांगून संगीतकार किशोर कुमार, आर डी बर्मन यांनी आपल्यावर अन्याय केला आहे असं मन्ना डे यांना सारखं वाटत होतं. कदाचित, हा फक्त त्यांचा समज असेल. पण, ते या भावनेतून बाहेर पडू शकत नव्हते.
मन्ना डे यांना एकीकडे बॉलीवूडमधून संघर्षाचा सामना करावा लागत होता. पण, दुसरीकडे शासन दरबारी त्यांचा सन्मान होत होता. त्यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये १९७१ चा पद्मश्री पुरस्कार आहे.
२००५ मध्ये मन्ना डे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यासोबतच २००७ मध्ये मन्ना डे यांना बॉलीवूड चा सर्वोच्च समजल्या जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मन्ना डे यांनी हिंदी, बांगला सोबतच भारतातील इतर सर्व प्रादेशिक भाषेत सुद्धा गायन केलं आहे. आपल्या मराठी भाषेत मन्ना डे यांनी तब्बल ५५ गाणी गायली आहेत.
–
हे ही वाचा – त्याचं अभिनयाचं स्वप्न पूर्ण झालं असतं, तर एका चांगल्या गायकाला आपण मुकलो असतो
–
आपल्या शेवटच्या काळात ‘मन्ना डे’ हे बँगलोरला आपल्या मुलीकडे रहायला लागले. काही छोटेखानी खासगी कार्यक्रमात फक्त ते गाणी गायचे. २००६ मध्ये ‘उमर’ या सिनेमासाठी त्यांनी शेवटचं हिंदी गाणं गायलं. मन्ना डे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ” १९९१ मध्ये ‘प्रहार’ साठी गायलेलं ‘हमारी मुठ्ठी मे आकाश सारा’ हेच गाणं मी नेहमी शेवटचं समजतो.” लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेलं हे गाणं आजही कित्येक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायलं जातं.
२४ ऑक्टोबर २०१३ रोजी मन्ना डे यांचं वृद्धपकाळाने निधन झालं. त्यांनी गायलेले “जिंदगी कैसी ये पहेली”, “कसमे वादे, प्यार वफा सब”, “तू प्यार का सागर है”, “लागा चुनरी मे दाग”, “ऐ मेरी जोहरा जबी” आणि “यारी है इमान मेरा, यार मेरी जिंदगी” हे गाणे आजही लोकांच्या आवडत्या गाण्यांच्या यादीत आहेत.
बॉलीवूडमध्ये कशीही वागणूक मिळालेली असली तरी कानसेन प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या मन्ना डे यांच्या आवाजाला, गाण्यांना नेहमीच दाद दिली, देत राहतील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.