शेवटपर्यंत कलेची सेवा करण्यासाठी राष्ट्रपतीपद नाकारणाऱ्या घेणाऱ्या नृत्यांगनेची कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रुक्मिणीदेवी अरुंडेल ह्या एक प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना, भरतनाट्यम ह्या शास्त्रीय नृत्याच्या गुरु, पशु कल्याण व प्राणी हक्क ह्यासाठी कार्य करणाऱ्या एक कार्यकर्त्या होत्या. शिवाय त्या एक थीयोसोफिस्ट सुद्धा होत्या. भारतात भरतनाट्यम ह्या शास्त्रीय नृत्याला त्याच्या मूळ ‘साधीर’ शैलीतून त्यांनीच पुनरुज्जीवित केले.
पूर्वी भरतनाट्यम हे नृत्य देवदासी करत असल्यामुळे ह्या नृत्याला प्रतिष्ठा नव्हती. ह्या नृत्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम रुक्मिणीदेवी ह्यांनी केले.
त्यांचा जन्म एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता व त्या काळी भरतनाट्यमला समाजात अत्यंत खालच्या दर्जाचे व अश्लील असे समजत असत. असे असूनही ह्या नृत्य प्रकारातील सौंदर्य व ह्याचे अध्यात्मिक दृष्टीने असलेले महत्व त्यांनी जाणले आणि समाजाचा कट्टर विरोध असून सुद्धा त्यांनी भरतनाट्यम मध्ये प्राविण्य मिळवले व सर्वांसमोर ते मंचावर सादर सुद्धा करून दाखवले.
त्यांच्या ह्याच अतुलनीय कार्यासाठी गुगलने महिला दिन स्पेशल डूडलमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
ह्या लिस्टमध्ये रुक्मिणीदेवी अरुंडेल ह्या एकमेव भारतीय महिला होत्या ज्यांनी भरतनाट्यम साठी आपले आयुष्य वेचले आणि कलाक्षेत्राची स्थापना केली.
रुक्मिणीदेवी ह्यांचा जन्म २९ फेब्रुवारी १९०४ रोजी मदुराई येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील नीलकांत शास्त्री Public Works Department मध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या आई शेषाम्मल ह्यांना संगीतात रस होता.
नीलकांत शास्त्री ह्यांची फिरतीची नोकरी असल्याने त्यांचा परिवाराला अनेक शहरांत राहण्याची संधी मिळाली. १९०१ साली त्यांची एका थियोसोफिकल सोसायटीशी ओळख आली. ते डॉ. ऍनी बेझंट ह्यांचे अनुयायी असल्यामुळे त्यांच्यावर थियोसोफिकल मुव्हमेंटचा प्रभाव झाला.
रिटायर झाल्यानंतर ते चेन्नईला गेले आणि त्यांनी थियोसोफिकल सोसायटी अड्यारच्या मुख्यालयाजवळ घर बांधले. ह्याच ठिकाणी रुक्मिणी देवी लहान असताना त्यांना थियोसोफिकल विचार तसेच संस्कृती, रंगभूमी, संगीत आणि नृत्य ह्याबद्दल शिकायला मिळाले.
काही काळानंतर ह्याच ठिकाणी त्यांची भेट ब्रिटीश थियोसोफिस्ट डॉ. जॉर्ज अरुंडेल ह्यांच्याशी झाली. ते डॉ. ऍनी बेझंट ह्यांचे अतिशय जवळचे सहयोगी होते. त्यानंतर ते वाराणसी येथील सेन्ट्रल हिंदू कॉलेजचे मुख्याध्यापक झाले. ह्यांच्याशीच काही काळानंतर त्यांचा विवाह झाला.
१९२० साली रुक्मिणीदेवी आणि डॉ. अरुंडेल विवाहबद्ध झाले. त्या काळी समाजासाठी ते धक्कादायक होते. त्यांच्या विवाहानंतर ते जगभरात फिरले आणि बऱ्याच थियोसोफिस्ट लोकांची त्यांनी भेट घेतली. प्रसिद्ध शिक्षिका मारिया मॉंटेसरी ह्यांच्याशी व कवी जेम्स कझिन्स ह्यांच्याशी त्यांची मैत्री झाली.
१९२३ साली त्या All-India Federation of Young Theosophists च्या अध्यक्ष झाल्या आणि १९२५ साली त्यांची निवड World Federation of Young Theosophists च्या अध्यक्षपदी झाली.
१९२८ साली प्रसिद्ध रशियन बॅले नृत्यांगना Anna Pavlova ह्यांनी मुंबईला भेट दिली आणि अरुंडेल दाम्पत्य त्यांचे नृत्य बघण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाला गेले. त्यांनतर योगायोगाने ते आणि Anna Pavlova प्रवासादरम्यान एकाच बोटीवर होते. ते ऑस्ट्रेलियाला जात होते जिकडे त्यांच्या नृत्याचा पुढचा कार्यक्रम होता.
प्रवासादरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि नंतर काही दिवसात रुक्मिणीदेवींनी Anna च्या सोलो नर्तकिंपैकी एक Cleo Nordi ह्यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर Anna ह्यांच्या विनंतीवरून रुक्मिणीदेवी ह्यांनी त्यांचे लक्ष भारतीय शास्त्रीय नृत्याबद्दल माहिती शोधण्यात केंद्रित केले.
या काळात भारतीय शास्त्रीय नृत्याकडे कोणीही गांभीर्याने बघत नव्हते. किंबहुना नृत्य ही चांगल्या घरातल्या व्यक्तींनी करायची गोष्ट नव्हे असेच समाजाचे मत होते. पण रुक्मिणीदेवी ह्यांनी समाजाचा विरोध पत्करून भरतनाट्यम ह्या शास्त्रीय नृत्यप्रकाराला पुनरुज्जीवित केले.
१९३३ साली Madras Music Academy च्या वार्षिक परिषदेत त्यांनी पहिल्यांदा ‘साधीर’ ह्या नृत्याचे सादरीकरण बघितले. त्यानंतर त्यांनी हे नृत्य Mylapore Gowri Amma ह्यांच्याकडून शिकून घेतले. ह्यात त्यांची मदत E Krishna Iyer ह्यांनी केली.
त्यांचा उद्देश फक्त भरतनाट्यमचे पुनरुज्जीवन करणे इतकाच नव्हता तर त्यांना ह्या नृत्यप्रकाराविषयी जे समाजाचे नकारात्मक विचार होते ते बदलून त्याचा लोकांना त्या नृत्याची म्हणजेच कलेची साधना करण्यास पटवून देणे हा होता.
त्याकाळी मुलींना भरतनाट्यम शिकू दिले जात नसे कारण समाजाची अशी धारणा होती की हे नृत्य फक्त देवदासींचे आहे. त्यांनी त्यांचे भरतनाट्यमचे काही शिक्षण प्रख्यात भरतनाट्यम गुरु व नर्तिका Pandanallur Meenakshi Sundaram Pillai ह्यांच्याकडे घेतले.
त्यानंतर त्यांनी त्यांच्या नृत्याविष्काराचे पहिले सादरीकरण १९३५ साली केले. त्यांनी हे सादरीकरण थिओसोफिकल सोसायटीच्या मंचावर त्या सोसायटीच्या हिरक महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान केले.
ह्याने भारतीय स्त्रियांसाठी नृत्याचे सादरीकरण करण्याचा पाया रचला गेला जे नृत्य फक्त देवदासींपुरते मर्यादित होते त्याची साधना करण्याचे द्वार भारतीय स्त्रीकरता खुले करण्याचे श्रेय रुक्मिणीदेविंकडे जाते.
हा नृत्यप्रकार जो आधी ‘साधीर’ ह्या नावाने ओळखल्या जात असे, त्याचे भरतनाट्यम असे नामकरण करण्याचे श्रेय E Krishna Iyer आणि रुक्मिणीदेवी ह्यांना जाते. त्यांनी ह्या भरतनाट्यमच्या Pandanallur Style काही बदल केले आणि ते जगासमोर आणले. त्यांनी ह्या नृत्यामधील शृंगाररस कमी केला, वैषयिक भाग कमी केला जो देवदासींच्या नृत्याचा महत्वाचा भाग होता.
त्यांनी ह्या नृत्यामध्ये व्हायोलीन सारख्या वाद्यांचा समावेश केला तसेच नाविन्यपूर्ण पोशाखांचा व आभूषणांचा समावेश केला. त्यांच्या नृत्य सादरीकरणासाठी त्यांनी अनेक विद्वानांची, शास्त्रीय संगीतकारांची, कलाकारांची मदत घेतली आणि त्यातून अप्रतिम नृत्याविष्कार तयार झाले!
त्यांनी ह्या नृत्य नाटिका वाल्मिकी रामायण तसेच जयदेव ह्यांचे गीत गोविंद ह्या महाकाव्यांतून प्रेरणा घेऊन तयार केल्या होत्या. त्यांनी त्यांच्या नृत्य नाटिकांची सुरुवात ‘Sita Swayamvaram’, ‘Paduka Pattabhishekam’ , ‘Sri Rama Vanagamanam’, आणि ‘Sabari Moksham’, ह्यापासून केली. आणि नंतर ‘Kutrala Kuruvanji’, ‘Kumara Sambhavam’, ‘Ramayana’, ‘Gita Govindam’ आणि ‘Usha Parinayam’ ह्या नृत्य नाटिकांची निर्मिती केली.
जानेवारी १९३६ मध्ये त्यांनी व त्यांच्या पतीने मिळून ‘कलाक्षेत्र’ ही संगीत व नृत्य प्रशिक्षण संस्था अड्यार येथे (चेन्नई जवळ) सुरु केली. भारतीय गुरुकुल जसे असते तसेच त्यांनी शाळा सुरु केल्या तसेच एक कलेच्या उपासकांसाठी वेगळी संस्था सुरु केली ह्या संस्थेमध्ये संगीत व नृत्य मोकळ्या हवेत झाडांखाली शिकवले जाई.
त्यांनी भारतीय साड्या तयार करण्यासाठी हातमाग व नैसर्गिक डाय करण्याचे सेंटर सुद्धा सुरु केले जिथे पारंपारिक भारतीय डिझाईनच्या साड्या विणल्या जात असत.
त्यानंतरच्या काळात रुक्मिणीदेवी भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना म्हणून तसेच शास्त्रीय नृत्यासाठी महत्वाचे कार्य करणाऱ्या कलोपासक म्हणून जगभरात प्रसिद्ध झाल्या.
१९५६ साली त्यांना पद्म भूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच १९६७ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्या प्राणीप्रेमी असल्याने त्या पशु कल्याण समितीच्या पहिल्या चेअरपर्सन म्हणून निवडल्या गेल्या व त्यांनी १९५२ साली Prevention of Cruelty to Animals Act पास होण्यात महत्वाची भूमिका बजावली.
त्या कट्टर शाकाहारी होत्या व शाकाहाराचे महत्व लोकांमध्ये पसरवण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. १९५५ पासून ते त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे ३१ वर्ष त्या International Vegetarian Union च्या उपाध्यक्ष होत्या. १९७८ साली कलाक्षेत्र येथे पारंपारिक भारतीय कलेला चालना मिळण्यासाठी कलमकारी केंद्र उभारले गेले.
१९७७ साली राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद ह्यांचे निधन झाले. त्यांचा कार्यकाल पूर्ण झालेला नव्हता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई ह्यांनी त्यांना राष्ट्रपती होण्याविषयी विचारले, तेव्हा रुक्मिणीदेवी ह्यांनी मोरारजी देसाई ह्यांना नम्रपणे सांगितले, कि त्या राष्ट्रपती होऊ इच्छित नाही कारण त्यांना त्या कामात अडकून पडायचे नाही. त्यांना कलाक्षेत्र व भारतीय शास्त्रीय नृत्य व संगीत ह्याचीच सेवा व साधना करत आयुष्य कंठायचे आहे.
त्यांनी जर ही संधी स्वीकारून राष्ट्रपतीपद स्वीकारले असते तर भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती व पहिल्या महिला पंतप्रधान सोबत काम करताना दिसल्या असत्या, कारण मोरारजी देसाई ह्यांच्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या.
आपल्या नृत्य साधना व कलेच्या सेवे मध्ये कधीही खंड न पडू देणाऱ्या रुक्मिणी देवी ह्यांचे २४ फेब्रुवारी १९८६ साली चेन्नई येथे वयाच्या ८२व्या वर्षी देहावसान झाले व भारत देश एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला कायमचा मुकला. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्याच्या क्षेत्रात जे अतुलनीय कार्य केले आहे ते अनेकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.
त्यांच्यामुळेच आज अनेक स्त्रिया भरतनाट्यम व इतर शास्त्रीय नृत्याची साधना करू शकतात. त्यांचे कलाक्षेत्रातील योगदान महान आहे.
—
- उंच मुलींचा बांधा सुबक, व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
- पीटर इंग्लंड ते मॉन्टे कार्लो : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.