आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“बाबा लगीन” अशी आरोळी देणारा बाब्या आठवतोय? केवळ वरातीच्या आवाजानेच ‘ढिन्चॅक ढिचॅंग’ असा ठेका धरणाऱ्या बाब्याला बोहल्यावर चढण्याची भारीच घाई! केवळ सिनेमातच नव्हे तर प्रत्यक्षातही लग्नाळू तरुणांची संख्या काही कमी नाही.
अंतरपाटाच्या पलिकडे असलेल्या ‘ति’ला कधी एकदा डोळेभरून पाहतो अशी गुलाबी स्वप्न रंगवणाऱ्या भावी नवरदेवांना लग्नाची घाई असतेच. उतावळा नवा आणि उघड्याला बाशिंग ही म्हण कदाचित असाच उत्सुक तरुणांना पाहून शोधली असावी.
लग्न, विधी, तयारी, जल्लोष अशी स्वप्न केवळ मुलीच रंगवतात असं नाही, तर नवऱ्यामुलाच्याही मनात शादीचे लड्डू खाण्याची उत्सुकता असते. प्रत्येक विधीला नवा पोषाख, त्याला साजेशी पादत्राणे, मुंडावळ्या असा हटके साजश्रुंगार करताना नवरदेव थकत नाही.
पण ज्या लग्नाची तुम्ही वर्षानुवर्ष वाटत पहात आहात, ज्यासाठी सगळा खटाटोप सुरु आहे, उत्सुकता शिगेला पोहोचलीय आणि तुमच्या लग्नाला तुम्हालाच हजर राहण्याची मनाई आहे असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर?…
थांबा, असं म्हणणा-यांवर टिका करण्यापुर्वी ही प्रथा वर्षानुवर्ष पाळणाऱ्या खऱ्याखुऱ्या नवरदेवांची कथा तुम्ही वाचायलाच हवी.
उदयपूर येथील सुरखेडा गावातून या प्रथेचा उगम झाला. आज, २१ व्या शतकातही ही प्रथा या पाळली जाते, इतकचं नव्हे तर सुरखेडाच्या आसापास असलेल्या तिन्ही गावांमध्ये याच परंपरेने विवाहसोहळा संपन्न होतो.
–
हे ही वाचा – सडलेले अन्न खाणे ते रोज एक तास रडणे – विविध देशांतील लग्नाच्या “१२ अचाट प्रथा.”
–
नेमकी प्रथा काय?
उदयपूरच्या या तिन्ही गावांमध्ये लग्नाचा उत्साह, थाटमाट, लगीनगाई इतरांप्रमाणेच. सजवलेला मंडप, वधुपित्याची धावपळ, हाती फुलांची माळ घेऊन उभी राहिलेली नवरी मुलगी सारं काही तुमच्याआमच्या प्रमाणेच…
बॅंन्डबाजाच्या तालावर थिरकणारी वरात मंडपात पोहोचते, विधी सुरु होतात, मात्र प्रत्यक्ष विधींवेळी वधुशेजारी एक स्त्री बसलेली असते. असा विवाहसोहळा पाहणाऱ्या एखाद्या नवख्याला भोवळही येऊ शकते, मात्र ही कोणतीही थट्टा नाही की कोणाताही अजब प्रकार नाही.
या तिन्ही गावांमध्ये नवरदेवाला आपल्या लग्नासाठी ‘नो एन्ट्री’ आहे.
तर या प्रथेनुसार लग्नाच्या दिवशी नवरदेव खास पोषाक परिधान करतो, पगडीही घालतो, हाती मानाची तलवार घेतो आणि घरातूनच आपल्या वरातीचा निरोप घेतो. प्रथेनुसार नवऱ्यामुलाची आई देखील त्याच्यासोबत घरी राहते.
नवरदेवाच्या घरातून निघालेली वरात वधुच्या घरी पोहोचते, यावेळी नवरदेवाची अविवाहित बहिणी नवरदेवाची भुमिका बजावत असते. केवळ वरातीपुरतंच नव्हे तर लग्नाच्या प्रत्येक विधीत नवरदेवाच्या बहिणाबाई वधुसह हजर असतात.
प्रत्येक विधी हा नववधुसह नवरदेवाच्या बहिणीकडून पार पाडला जातो. एकमेकांना हार घालण्यापासून ते थेट सप्तपदीतही आपल्या नणंदेसह वधु हे सारे रितीरिवाज आनंदाने पार पाडते.
लग्नाचे सगळे विधी उरकल्यानंतर जेंव्हा विवाहसोहळा संपन्न झाला अशी औपचारिक घोषणा होते, आणि नववधुला घेऊन वरात पुन्हा एकदा नवरदेवाच्या घरी पोहोचते त्यानंतरच खऱ्याखुऱ्या वराची आणि वधूची भेट होत संसाराचा श्रीगणेशा होतो.
लग्नाची ही प्रथा अजब असली तरी गावक-यांकडून ती नित्यनियमानं पाळली जात आहे. या प्रथेत नवरदेवाचा लग्नात सहभाग नसला तरी इतरांचा उत्साह मात्र दांडगा असतो.
नेमकं कारण काय?
गावकऱ्यांकडून सांगितल्या जाणा-या आख्यायिकेनुसार उदयपुरच्या सुरखेडा गावाचे ग्रामदैवत हे अविवाहित पुरुष आहे. गावकऱ्यांच्या समजुतीनुसार गावातील ग्रामदैवताने कधीही विवाहसंस्कृती स्विकारली नाही. मग अशा गावातील पुरुषांनी लग्न करणं, सोहळ्याच्या आनंदात उपस्थित राहणं हा ग्रामदैवताचा अवमान आहे.
गावातील गावकरी हे सगळेच श्रद्धाळु असल्याने कुणाकडूनही या प्रथेचा विरोध केला जात नाही.
काही शतकांपुर्वी ही प्रथा अस्तित्वात नसताना गावांमध्ये विवाहसोहळे पार पाडले जायचे. त्यात नवरदेवाचा सहभागही असायचा. मात्र त्यानंतर नवरदेवाच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरु व्हायची.
अनेकांबाबत हीच उदाहरणं घडल्याने तत्कालीन गावकऱ्यांनी नवरदेवाने लग्नमंडपात हजर न राहण्याची पद्धत सुरु केली. या प्रथेचा नेमका जनक कोण हे आजपर्यंत न उकललेलं गूढ आहे.
–
हे ही वाचा – ऐकावं ते नवलंच : या गावात नवरदेवाला हुंडा म्हणून चक्क २१ विषारी साप दिले जातात
–
पुन्हा परिस्थिती जैसे थे
काही वर्षांपुर्वी स्थानिक प्रशासनासह अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी गावांतील ही प्रथा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गावातील काही शूर तरुणांनीही त्यांना साथ देत लग्नसोहळ्याला हजेरी लावली, मात्र त्यांच्या लग्नानंतर संकटांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही.
काहींना आजारपण तर काहींना नोकरीधंद्यात अपयश यांनी ग्रासले. यांमुळे पुन्हा एकदा तिन्ही गावांमध्ये जूनी प्रथा सुरु झाली.
या प्रथेला गावकऱ्यांचा पाठींबा असला तरी इतर गावं, जिल्हे इथून मोठ्या प्रमाणावर विरोध होतो, मात्र प्रत्यक्ष गावांमधील घराघरात असलेल्या ठाम श्रद्धेच्या बळावर प्रथा आजही सुरु आहे.
ही प्रथा, त्यामागील आख्यायिका खरी की खोटी हा वादाचा मुद्दा आहे, शिवाय हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या वादात न पडता प्रगतशील असलेल्या आपल्या भारत देशात आजही अनेक रुढी, परंपरा यांचा पगडा इतका घट्ट आहे ही बाब मान्य करायलाच हवी.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.