Site icon InMarathi

…आणि मग जावेद मियाँदादला झापायला एक ‘भारतीय पठाण’ पाकिस्तानात पोचला…!!

javed miyandad inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

क्रिकेट हा हल्लीच्या काळात केवळ फलंदाज धार्जिणा खेळ होऊ लागला आहे. फलंदाजांच्या पथ्यावर पडतील असे नवनवीन नियम, अधिकाधिक लहान होऊ लागलेली सीमारेषा, बॅटचा सुधारलेला दर्जा इत्यादी अनेक बाबी याला कारणीभूत आहेत.

अर्थात, ज्यावेळी क्रिकेटमध्ये हा दुजाभाव नसलेला काळ होता, त्यावेळी सुद्धा हॅट्ट्रिक मिळवणं, ही बाब गोलंदाजासाठी कठीणच होती. त्यातही, कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम करणं म्हणजे तर महाकठीण काम!

कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी करून दाखवणाऱ्या गोलंदाजांची यादी पाहिलीत, तर या यादीत आजही केवळ ३ नावं बघायला मिळतात. ऑफस्पिनर हरभजन सिंग, डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि यॉर्करचा बादशहा जसप्रीत बुमराह…

 

 

या यादीत इरफान पठाण, हे नाव मोठ्या दिमाखात सामील झालं होतं. कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात, पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या संघाविरुद्ध इरफानने घेतलेली ती हॅट्ट्रिक आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील भाव, हे आजही डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट आहेत, अगदी अल्ट्रा एचडी विडिओसारखे!

 

 

या खेळाडूचा मी चाहता होतो. फार आवडायचा इरफान पठाण. इरफानवर असलेलं प्रेम आजही फार कमी झालेलं नाही. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड सेफ्टी सिरीजमधील मान्यवर भारतीयांच्या संघाचे सामने मी चुकवले नाहीत. कारण या संघामध्ये सचिन, सेहवाग, युवी तर खेळत होतेच, पण इरफान सुद्धा होता.

इरफान एक गोलंदाज म्हणून तर भारी होताच, पण त्याच्यात एक चांगला अष्टपैलू होण्याची क्षमता होती. त्याचं कसोटी सामन्यांमधील शतक, थोरला बंधू युसूफसह त्याने लंकेविरुद्ध मिळवून दिलेला विजय आणि इतरही काही खेळींमधून याची प्रचिती येते.

===

हे ही वाचा – इरफान पठाणच्या निवृत्तीची ‘दखल’ घेणं विसरलेल्या लोकांसाठी…

===

अष्टपैलू होण्याची धमक असलेला हा खेळाडू संघात हवा तेवढा काळ टिकू शकला नाही, याच कारण म्हणजे त्याच्यातल्या अष्टपैलूत्वावर केलेलं गेलेले प्रयोग! त्याच्यात फलंदाजीची क्षमता होती, पण म्हणून त्याला थेट सलामीला पाठवण्याचा अट्टाहास व्हायला नको होता. तो अनेकदा केला गेला.

 

 

कालांतराने झालं असं, की इरफान ना मुख्य गोलंदाज उरला ना महत्त्वाचा फलंदाज झाला. एक चांगला अष्टपैलू हिरा, पुरेशा पैलूंअभावी हवा तितका चकाकू शकलाच नाही.

असो, जे घडायचं ते घडून गेलं. या इरफानने तरुण असतानाच भल्याभल्यांच्या मनात धडकी भरवली होती, असं म्हणायला हरकत नाही. २००५-०६ साली जेव्हा त्याने पाकिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली तेव्हा तो होता विशीतला तरुण! पण, त्याही आधी एक किस्सा घडला होता, ज्यावेळी इरफान पठाणला कमी लेखण्याचा प्रयत्न जावेद मियांदादकडून करण्यात आला.

जावेद म्हणजे वादविवाद

जावेद मियांदाद आणि विवादात्मक गोष्टी नेहमीच हातात हात घालून चालतात हे अवघ्या क्रिकेट विश्वाला ठाऊक आहेच.

किरण मोरेसमोर माकडउड्या मारून त्यांना खिजवून दाखवण्याच्या प्रयत्नापासून ते त्यांच्या मातोश्री बंगल्यावरील उपस्थितीपर्यंत, अनेक वादांमध्ये त्यांचं नाव अगदी अलगदपणे शिरलं.

 

 

===

हे ही वाचा – भारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से

===

अशा या व्यक्तीने २००३-०४ साली असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी ऐन तारुण्यात असलेला इरफान पठाण भारतीय संघासह पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. १९-२० वर्षांचा हा कोवळा मुलगा सुद्धा जावेद मियांदादच्या डोळ्यात खुपलं असावा बहुदा… म्हणूनच त्याने या पोरावर हल्ला चढवला होता.

नेमकं काय घडलं?

जावेद मियांदाद त्यावेळी पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक होता. या प्रशिक्षकाने भारताच्या इरफान पठाणला लक्ष्य केलं. ‘इरफानसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या गल्लीगल्लीत पाहायला मिळतात.’ असं कडवं विधान मियांदादने मांडलं.

त्याकाळात गोलंदाजीच्या बाबतीत पाकिस्तान नेहमीच भारतापेक्षा सरस राहिला होता, ही बाब मान्य करायलाच हवी. मात्र तरीही, इरफान सारख्या गोलंदाजांची तुलना थेट गल्ली क्रिकेटमधील गोलंदाजाशी करणं कुणालाही पटण्यासारखं नव्हतं. भारतीय चाहत्यांना ही गोष्ट अजिबातच आवडली नाही. याचे परिणाम जावेदला भोगावे लागले.

…मग ‘त्यांनी’ थेट पाकिस्तान गाठलं

आपल्या देशाच्या संघातील गोलंदाजाविषयी, पाकिस्तानी प्रशिक्षकांनी हे असं बोलणं कुणालाच पटणार नव्हतं, मग तो तरुण ज्या काळजाचा तुकडा होता, त्या बापाला तरी ही गोष्ट कशी सहन झाली असती. त्यांनी तडक पाकिस्तान गाठण्याचा निर्णय घेतला. मियांदादला चांगलं फैलावर घ्यायचं असा जणू त्यांनी निश्चयच केला होता.

भारताने त्या  दौऱ्यावर पाकिस्तानचा धुव्वा उडवला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ आणि वनडे मालिकेत ३-२ अशा फरकाने विजय मिळवला होता.

 

 

या मालिकेतील शेवटचा सामना पाहायला इरफानचे वडील उपस्थित होते. सामना संपल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी ड्रेसिंग रूममध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुढ्यात काय वाढून ठेवलंय, याचा अंदाज आल्यामुळे, इरफानने मात्र वडिलांना घडलेला प्रकार विसरून जाण्यास सांगितलं.

आपल्या पोराला कुणीतरी अयोग्य बोललंय, हे एखादा बाप कसं सहन करणार ना… ते हट्टालाच पेटले आणि पाकिस्तानी ड्रेसिंग रूममध्ये पोचले.

त्यांना पाहताच मियांदादचं धाबं दणाणलं. तो उठून उभा राहिला, त्याच्या चेहऱ्यावरून तो ओशाळला आहे, हे कुणीही सांगितलं असतं. इरफानच्या वडिलांच्या चेहऱ्यावर मात्र मंदस्मित होतं. ‘मला तुमच्या मुलाबद्दल काहीही बोलायचं नव्हतं’ असं म्हणणाऱ्या मियांदादकडे त्यांनी कटाक्ष टाकला आणि तेही बोलते झाले.

‘मी इथे तुला काहीही बोळ्याला आलेलो नाही. माझी केवळ तुला भेटण्याची इच्छा होती. तू एक अप्रतिम खेळाडू आहेस.’ इरफानच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली.

या घटनेननंतर मात्र, जावेद मियांदाद कधीही कुठल्याही भारतीयाच्या नादाला लागला नाही. त्याला जे कळायचं होतं ते कळलं. आपल्या मुलाचा अपमान केलेल्या व्यक्तीची मोठ्या मनाने प्रशंसा करून इरफानच्या वडिलांनी जावेदचा चांगलाच पाणउतारा केला होता.

गल्लीतल्या बॉलर्ससोबत तुलना करण्यात आलेला इरफान पठाण त्यानंतर बराच काळ भारतासाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरला. एवढंच नाही, तर पाकिस्तानी संघाविरुद्ध एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदवून त्याने त्याच्या गोलंदाजीची ताकद स्पष्ट केलीच होती. मियांदादला त्याने आपल्या कामगिरीतून जबरदस्त उत्तर दिलं.

 

 

कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिकच घेणारा तो आजवरचा एकमेव गोलंदाज आहे.

आजही तो पुन्हा मैदानावर उतरला, तर तो सामना पाहणं मी चुकवणार नाही हे नक्कीच…!!

===

हे ही वाचा – “कॉट कुंबळे, बोल्ड द्रविड” ही नेमकी काय ‘भानगड’ आहे, तुम्हाला ठाऊक आहे का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version