Site icon InMarathi

संत नामदेवांना या देवळात मनाई केली म्हणून मंदिराने चक्क दिशाच बदलली…!!

sant namdev aundha nagnath 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. ऐन तारुण्यात समाधी घेणारे ज्ञानेश्वर असोत, जातपात झुगारून त्यामधून समाजाला बाहेर काढू पाहणारे संत तुकाराम असोत, संत ज्ञानदेवांच्या भगिनी मुक्ताई असोत, तिथपासून ते अगदी आधुनिक संत मानले जाणारे गाडगे बाबा.

महाराष्ट्रात संतांची यादी फार मोठी आहे. प्रत्येक संताचं कार्य, त्याची शिकवण या गोष्टींचे महत्त्व वेगळे आहे. ही संतपरंपरा जशी माणसाला चार शहाणपणाच्या गोष्टी शिकवते, तशाच काही चमत्कार, अचाट गोष्टी घडल्या असल्याच्या निरनिराळ्या दंतकथा सुद्धा सांगते.

संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव असणारी भिंत चालवून दाखवणं, तुकारामांचे अभंग इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगत पुन्हा वर येणं अशा अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. ज्ञानेश्वर माउलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले, ही कथा तर आपण एवढ्यावेळा ऐकलेली असते, की ती आपल्याला अगदी तोंडपाठ असते.

 

 

अशीच एक कथा संत नामदेव यांच्या बाबतीत सुद्धा घडली होती असं मानलं जातं. पंढरपूरच्या विठूरायाचे भक्त असणारे संत नामदेव महाराज, हे केवळ आपल्या महाराष्ट्रातच नाही, तर कबीर पंथी आणि शीख धर्मीयांमध्ये सुद्धा फार महत्त्वाचे मानले जातात, हे तर आपल्याला ठाऊक आहेच.

अशा या महान संताला मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही, म्हणून चक्क त्या मंदिराची दिशा बदलली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते.

===

हे ही वाचा – या सामाजिक ‘संताच्या’ एका शब्दाखातर श्रीमंतांनी त्यांच्या जमिनी ‘दान’ केल्या!

===

कुठे आहे हे मंदिर?

महादेव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाणारे, ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंग. हे नेमके कुठे आहे याबद्दल दुमत आहे. काही भक्तांच्या मान्यतेनुसार गुजरातमधील द्वारकेजवळ नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तर काही भाविक असेही मानतात, की महाराष्ट्रातील मराठवाड्यात हे ज्योतिर्लिंग आहे.

हिंगोलीमधील औंध नागनाथ म्हणजेच १३ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर होय. हिंदू आणि शीख धर्मात हे मंदिर फारच महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण, या मंदिराचा संबंध संत नामदेव यांच्याशी जोडला गेला आहे.

 

 

संत नामदेव हे जसे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते, तसेच ते शंकराचे सुद्धा फार मोठे भक्त होते असं मानलं जातं.

मंदिराचा इतिहास आणि जन्मकथा

या मंदिराची स्थापना पांडवांनी केली आहे अशी आख्यायिका सांगण्यात येते. पांडव या परिसरात वास्तव्याला असताना, घडणारी चमत्कारिक घटना या मंदिराच्या निर्मितीस कारणीभूत ठरली.

पांडवांच्या गाई नदीवर पाणी पिण्यासाठी जात असत. मनसोक्त पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांच्या आचळातून आपोआप दूध स्रवू लागायचं. हे दूध नदीत अर्पण केलं जायचं. जणू काही या गाई एखादा अभिषेक करत असाव्यात.

ही गोष्ट लक्षात येताच भीमाने युधीष्ठीराला याविषयी सांगितलं. हा नक्कीच एक चमत्कार आहे आणि त्याचा शोध घ्यायला हवा असा पांडवांनी निश्चय केला. या शोधकार्यात पांडवांना यश आलं आणि तिथे असणारं महादेवाचं ज्योतिर्लिंग त्यांना सापडलं.

या लिंगाची स्थापना करून पांडवांनी त्याठिकाणी मंदिराची निर्मिती केली. आज हेच ठिकाण औंध नागनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

 

 

मंदिराचा जीर्णोद्धार

या मंदिराचा पाय आणि एकूण मंदिराची रचना यात भिन्नता आढळते. याचं कारण म्हणजे या मंदिराचा करण्यात आलेला जीर्णोद्धार… मुघल शासक औरंगजेब याने अनेक हिंदू देवस्थानं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकीच एक म्हणजे औंध नागनाथ..

त्यावेळी मंदिर संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. कालांतराने याचा जीर्णोद्धार करण्यात आला. म्हणूनच आज अस्तित्वात असलेलं मंदिर पाहायला मिळतं.

 

 

या मंदिराचा पाया आणि कळस यांच्यात दिसणारी तफावत, हे या जीर्णोद्धाराचे कारण आहे. मुळात अस्तित्वात असलेलं मंदिर उध्वस्त झाल्यामुळे त्याच्या वरील भाग पुन्हा नव्याने बांधण्यात आला आहे.

===

हे ही वाचा – मुस्लिम शासकांनी ‘देवळांची डागडुजी’ केल्याचा कसलाही पुरावा नाही…

===

नामदेवांची कथा

या मंदिरातील पुजारी जातीव्यवस्थेचे फार काटेकोरपणे पालन करत असत. शंकराचे भक्त असणारे नामदेव महाराज या मंदिरात गेले. त्यांनी महादेवाची भक्ती सुरु केली. मात्र ते खळवंग्या जातीचे असल्याचे कारण देत, पुजऱ्यांनी त्यांना मंदिरातून बाहेर काढलं.

उच्चजातीत जन्म झालेला नसल्याने, या मंदिरात येऊन भगवान शंकराची उपासना करण्याची परवानगी त्यांना नाही, असं पुजाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

एवढंच नाही, तर त्यांचा अपमान करण्यात आला. संत नामदेव मात्र शंकराचे फार मोठे भक्त होते. या घटनेनंतरही त्यांनी शंकराची उपासना थांबवली नाही. ते मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि त्यांनी त्यांची प्रार्थना, पूजाअर्चा सुरूच ठेवली.

 

 

त्यांनी भगवान शंकराचा धावा सुरु केला. जातीचं कारण देऊन त्यांना मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यांचा त्यांना राग आला नव्हता, मात्र ज्या भगवान शंकरानेच त्यांना या जातीत जन्माला घातलं, त्याच्यावरही हे इतर भक्त विश्वास ठेऊ शकत नाहीत, याबद्दल त्यांना वाईट वाटत होतं.

सर्वशक्तिमान भगवान शंकराने आता काहीतरी चमत्कार दाखवावा की त्याची शक्ती आणि नामदेवांची भक्ती यावर सगळ्यांचाच विश्वास बसेल, अशी त्यांची इच्छा होती. नामदेवांची श्रद्धा आणि भक्ती बघून भगवान शंकर प्रसन्न झाले.

भगवान शंकराने आपल्या दैवी शक्तीचा चमत्कार दाखवला आणि त्या मंदिराने थेट दिशाच बदलली. मंदिराचं द्वार विरुद्ध बाजूला फिरून संत नामदेवांच्या दिशेला आलं.

या भक्ताचा धावा ऐकून, त्याला कुठलाही त्रास होऊ नये, आणि आपले दर्शन व्हावे यासाठी शंकराने मंदिराचे प्रवेशद्वार नामदेवांच्या समोर आणून ठेवले.

भगवान शंकराच्या मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असते. औंध नागनाथ हे एकमेव असं ज्योतिर्लिंग मंदिर आहे, ज्याचं प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. याचं कारण हेच असल्याचं सांगितलं जातं. संत नामदेवांच्या भक्तीसाठी शंकराने हा चमत्कार करून दाखवला होता, अशी दंतकथा आजही सांगितली जाते.

 

===

हे ही वाचा – समुद्रमंथनातून प्राप्त झालेला अमृतकलश ‘या’ मंदिरात असल्याचा दावा…!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version