' वर्षभर परिश्रम घेऊन ह्यांनी तुम्हाला घरीच करोना टेस्टचा अभिनव पर्याय उपलब्ध करून दिलाय – InMarathi

वर्षभर परिश्रम घेऊन ह्यांनी तुम्हाला घरीच करोना टेस्टचा अभिनव पर्याय उपलब्ध करून दिलाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागील मार्च महिन्यात कोरोना चाचणी हे शब्द उच्चारले तरी भितीनं कापरं भरायचं. नाका, तोंडाव्दारे केली जाणारी चाचणी, त्यावेळी होणा-या असह्य वेदना आणि पुढील दोन तासाची जीवघेणी प्रतिक्षा हा कठीण काळ अनेकांनी अनुभवला आहे.

वर्षभरापासून घोंगावणारं हे संकट अधिक गडद झाल्याने कोरोनाची चाचणी अनेकांना सरावाची झाली. अनेक ऑफिसेसमध्ये रुजु होताना किंवा देश-विदेशाची वारी करताना ‘ कोरोना निगेटिव्ह’ असल्याचे बिरूद मिळवल्याशिवाय अनेकांना पर्याय नसतो, त्यामुळे सध्या कोरोना चाचण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

 

corona test inmarathi

 

सर्दी, खोकला, अंगदुःखी अशी सुक्ष्म लक्षणं आढळली तरी खबरदारीचे उपाय म्हणून तातडीने चाचण्यांकडे धाव घेणा-यांना अनेकदा रांगेत खोळंबून रहावे लागते.

उशीरा होणारी चाचणी, पर्यायाने रिपोर्ट्स मिळण्यात होणारी दिरंगाई, दरम्यानच्या काळात भेडसावणारी काळजी आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे उपचारांमध्ये होणारा उशीर यांमुळे अनेकांचा जीवही धोक्यात असल्याचे सिद्ध झाले आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना या चाचण्यांच्या पद्धतीत बदल व्हावा, चाचण्यांचे रिपोर्ट्स वेळेत मिळावे याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चांना यश मिळाल्याचे दिसते.

भारतासाठी गुडन्यूज घेऊन आजचा दिवस आला असून आता घरबसल्या कोरोनाची चाचणी करता येणार आहे. आयसीएमआरने या चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिली आहे. हे एक रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे.

भारतातील हा पहिलाच प्रयोग असून त्यासाठी मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड या कंपनीने या किटच्या संशोधनासह निर्मिती केली आहे.

 

test kit inmarathi

 

विशेष बाब म्हणजे भारतातील या पहिल्याच प्रयोगात एका मराठमोळ्या रणरागिणीचा सिंहाचा वाटा आहे. एकिकडे गरोदर महिला कोरोनाच्या भितीने घराबाहेरही पडत नसताना आठ महिन्यांच्या गरोदर असलेल्या मिनल दाखवे भोसले यांनी प्रयोगशाळेत अहोरात्र कष्ट करून या किटची निर्मिती केली आहे. 

मायलॅबमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रमुख असणाऱ्या मीनल दाखवे भोसले या गतवर्षी अर्थात मार्च २०२० मध्ये या किटच्या संशोधनात व्यग्र होत्या. यावेळी त्या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या.

हे ही वाचा – कोरोनाची चाचणी करा स्मार्टफोन वर! रिपोर्ट अवघ्या ५५ मिनिटात.. वाचा

 

corona minal inmarathi

 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुण्यातील मायलॅबने कोरोनाच्या चाचण्या करणारे किट संशोधन तसेच निर्मिती यांचे काम हाती घेतले, हे किट राज्यातील वेगवेगळ्या केंद्रांवर पोहोचवण्यात येणार होते, एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असल्याने या किटची निर्मिती अत्यंत जलद गतीने होणे आवश्यक होते.

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा या प्रकल्पावर मायलॅबने काम सुरु केले तेव्हा डॉ मीनल दाखवे यांची तब्बेत गरोदरपणामुळे नाजूक होती, तरीही अथक परिश्रम घेऊन त्यांच्या पथकाने हे काम ६ आठवड्यात पूर्ण केले ज्याला इतर वेळी कमीत कमी ६ महिने लागू शकतात.

या किटचा वापर राज्यातीलच नव्हे देशातील अनेक केंद्रांवर करण्यात येतो.

मात्र त्याचवेळी भविष्यातील धोका लक्षात घेत डॉ मीनल यांनी होम बेस्ड टेस्ट किटसाठी प्रयत्न सुरु केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्या कुशल टिमने हे शिवधनुष्य पेलले आणि अवघ्या एका महिन्यात होम बेस्ड टेस्ट किट या प्रकल्पाने आकार घेतला.

तिरीही त्या थकल्या नाहीत…

गर्भारपणातील काही समस्यांमुळे त्यांना फेब्रुवारीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, उपचारानंतर त्या पुन्हा एकदा उत्साहाने कामाला लागल्या. कोरोना टेस्ट किटवर काम करत असतानाच त्या १८ मार्च रोजी प्रसुतीसाठी भरती होत १९ तारखेला त्यांनी कन्यारत्नाला जन्म दिला.

प्रसुतीच्या विश्रांतीनंतर अवघ्या काही महिन्यातच त्या पुन्हा एकदा जोशाने उभ्या राहिल्या.

ज्याप्रमाणे कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी टेस्ट किटसाठी प्रयत्न केले आणि आता दुस-या लाटेत त्यांनी होम बेस्ड टेस्ट किटची निर्मिती केली आहे. आज त्यांनीच तयार केलेल्या होम बेस्ड किटमुळे लवकरच देशात घरातही कोरोना चाचणी करता आहे.

चाचणी कोण करू शकणार

कोरोनाची सौम्य लक्षण असणारी व्यक्ती किंवा कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेली व्यक्ती या किटचा वापर घरच्या घरी करू शकते. ही अॅंटिजन टेस्ट असून अत्यंत काळजीपुर्वक त्याचा वापर करावा लागणार आहे.

 

mylab test kit inmarathi

 

त्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेता येईल,

कशी करू शकता स्वतःची कोरोना टेस्ट?

होम टेस्टिंगसाठी COVISELF किट आणि मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आलं आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.

COVISELF किटमधील स्टिक वापरून नाकातील स्वॅब घ्यायचे आहेत. ते या किटमधील एका छोट्याशा बाटलीत ठेवायचं आहे.

त्यानंतर प्रेग्नन्सी किटमधील स्ट्रिपप्रमाणे एक स्ट्रिप देण्यात आली आहे, त्यावर या स्वॅबचे नमुने टाकावेत. ज्या मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड असेल त्याच मोबाईलवर टेस्ट स्ट्रिपचा फोटा काढायचा.

हा डेटा थेट आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टल स्टोअरवर जाईल. रुग्णाच्या गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल. मोबाईल अॅपमार्फत तुम्हाला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा रिपोर्ट मिळेल.

हे ही वाचा – कोरोनासोबत जगण्याची तयारी करायची आहे? मग या १२ सवयी आजपासूनच लावून घ्या!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?