' संजय लीला भन्साळीला देवदासची प्रेरणा चक्क वडिलांमुळे मिळाली होती – InMarathi

संजय लीला भन्साळीला देवदासची प्रेरणा चक्क वडिलांमुळे मिळाली होती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपल्या नावासह वडिलांचं नाव लावण्याच्या प्रथेचा जनक नेमका कोण? किंवा ही प्रथा कधी सुरु झाली? या प्रश्नाचा शोध न घेतलेला बरा. त्यामुळे या प्रश्नाची फारशी चिकित्सा न करता आपल्या नावापुढे वडिलांचे नाव जोडले जाते आणि कालांतराने आपल्या मुलांपुढे त्यांच्या वडिलांचं नाव… मात्र परंपरेची साखळी मोडण्याचं धारिष्ट्य काहीजण दाखवतात आणि चर्चेचा विषय ठरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या नावांच्या यादीचा विचार केला तर ‘संजय लिला भन्साळी’ यांचं नाव चटकन डोळ्यासमोर येतं, वरकरणी केवळ मातृप्रेमासाठी किंवा ‘ट्रेन्डसेटर’ म्हणून त्यांनी ही कृती केली असावी असा तुमचा कयास असेल तर पडद्यावर रंगणा-या बीग बजेट चित्रपटाहूनही रंजक असणारी ख-या आयुष्यातील गोष्ट तुम्हाला ठाऊकच नाही.

 

sanjay leela bhansali inmarathi

 

तर दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्याही कुटुंबातील वाद ही ‘घर घर की कहानी’, सगळ्याच कुटुंबात रंगणारे वाद हे कपातील वादळ वाटत असले तरी भन्साळी कुटुंबातील बापलेकाच्या या वादांनी मात्र घराच्या चार भिंती केंव्हाच ओलांडल्या आहेत, कारण भन्साळी परिवारातील हे वाद, नात्यांतील दुरावा, घरातील भयावह परिस्थिती ही आपण सर्वांनी पाहिलीय?

विश्वास बसत नाहीये? मग जरा बॉलिवुडच्या इतिहासात डोकावू.

गोष्ट २००२ सालची. चंदेरी दुनियेत ‘देवदास’ ची एन्ट्री झाली आणि ‘बीग बजेट’ सिनेमा या संकल्पनेची व्याख्याच बदलली. अर्थात देवदासची ही एन्ट्री नसून रिएन्ट्री अर्थात पुर्नरागमन होतं कारण त्यापुर्वी दिलीप कुमार, सेहगल यांच्या अभिनयाने नटलेली ही कलाकृती यापुर्वीही सादर झाली होती.

मात्र संजय लिला भन्साळी यांनी नव्या देवदासला जन्म दिल्यानंतर मात्र प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. किंग खानचा अभिनय, ऐश्वर्या-माधुरीचं सौंदर्य, एकाहून एक सरस ठरणारी गाणी आणि नेत्रदिपक भव्यता अशा अनेक आघाड्यांवर देवदास हिट ठरला तो आजपर्यंत…

 

devdas inmarathi

 

देवदासच्या यशाचा जनक संजय भन्साळी असला तरी त्यातील अनेक दृष्यांची कथा केवळ शरदचन्द्र चट्टोपाध्याय यांच्या पुस्तकांंवर अवलंबून नसून त्याला संजय यांच्या वडिलांची प्रेरणा होती. अर्थात याला प्रेरणा म्हणावं की दुर्भाग्य हे तुम्हीच ठरवा.

वडिलांच्या मृत्युमुळे देवदासचा जन्म

याचं स्पष्टीकर खुद्द संजय लिला भन्साळी यांनीच दिलं आहे. त्यांच्या अनेक मुलाखतीत त्यांनी वडिल आणि त्यांच्या नात्यातील विस्तवाची माहिती दिली होती. व्यसनांच्या आहारी गेलेल्या त्यांच्या वडिलांनी घराची, नात्यांची कधीच फिकीर केली नाही.

घरखर्चासाठी सर्वतोपरी झुंजणा-या संजय यांच्या आईनेच घराचा गाडा आयुष्यभर ओढला, मात्र त्याकडेही वडिलांनी कानाडोळा केल्याचं ते सांगतात. चोविस तास दारुच्या नशेत गुंग असणाऱ्या वडिलांकडे पाहताना एकीकडे राग, दुसरीकडे खेद वाटत असतानाच यावेळी अशा एखाद्या मनमौजी माणसाचं चित्रण पडद्यावर करता यावं ही इच्छा त्यांच्यातील कलाकाराला स्वस्थ बसू देत नव्हती.

 

sanjay bhnsali inmarathi

 

संजय यांचे वडिल शेवटच्या घटका मोजत असताना अखेरिस त्यांनी पत्नी लिला यांच्या दिशेने प्रेमाने हात सरकवला. आयुष्यभर तणाव असलेल्या या नात्याला अखेरिस प्रेमाचा स्पर्श मिळाला, लिला यांनीही डोळ्यांतील अश्रुंसह पतीचा हात हाती घेतला आणि नेमक्या त्याचक्षणी वडिलांची प्राणज्योत मावळली.

अवघ्या काही सेकंदांची ही प्रेमकथा संपली मात्र या घटनेचे साक्षीदार असलेल्या संजय भन्साळी यांनी मात्र नेमके हेच दृश्य देवदासमध्ये चित्रित केलं.

 

devdas 2 inmarathi

 

आता तुम्हाला हा प्रसंग आठवला असेल. चित्रपटाच्या शेवटी पारोच्या दारावर येऊन केवळ तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असलेला देव आणि त्याच्या काळजीने वेडिपीशी झालेली पारो, आणि त्यानंतर देवबाबुचा शेवट हा सीन भन्साळी कुटुंबात सर्वात आधी घडला होता.

हे ही वाचा – “भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?” प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!

तो सीन म्हणजे एक दुर्दैवी आठवण

चित्रपटाचा केवळ शेवट नव्हे तर आणखी एक सीन म्हणजे संजय यांच्या वडिलांची एक दुर्दैवी आठवण होती. आपल्याच कुटुंबातील व्यक्तीच्या शोकसभेत दारु पिऊन जाणं ही कल्पनाही आपल्याला सहन होणार नाही, मात्र अशा भयावह प्रसंगाला संजय यांनी तोडं दिलं होतं.

त्यांच्या आजीचं निधन झालं तेंव्हा सगळा परिवार एकत्र जमला होता, अर्थात सवयीने त्यात संजय यांचे वडिल नव्हतेच. मात्र शोकसभा सुरु असतानाच नशेच्या झोकांड्या खात वडिल आले आणि नाततेवाईकांसमोर बरळू लागले. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग संजय कधीही विसरू शकले नाहीत आणि हीच आठवण जपत त्यांनी देवदासमधील ‘तो’ सीन रंगवला.

 

devdas scene inmarathi

 

आपल्याच वडिलांच्या शोकसभेत दारुच्या नशेत बरळणारा आणि एखाद्या परक्या व्यक्तीप्रमाणे आईचंं सांत्वन करणा-या देवदासने अर्थात शाहरुखने संजय यांच्या वडिलांचीच भुमिका निभावली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

वडिल आणि देवदास यांच्यात समान धागा गुंफण्याचा प्रयत्न देवदास वारंवार करत होते पण चित्रपट पाहताना आपल्याला याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

विश्वास बसणार नाही पण देवदासमध्ये तुम्ही सल्लूला पाहिलंय

तुम्हाला वाटेल की ही केवळ थट्टा आहे, पण थांबा टिका करण्यापुर्वी देवदासमधील ‘करे क्रिष्ण रास राधा के संग’ हे गाणं आठवा, एकीकडे आनंदाने नाचणा-या किरण खेर तर दुसरीकडे त्याचवेळी नदीच्या तीरावर, चंद्रप्रकाशात बहरलेला देवदास-पारोचा रोमान्स या दृश्यांनी आपल्या मनावर आजही गारुड घातलेलं आहे.

पण या सीनमध्ये बॉलिवुडच्या दबंगने ऐश्वर्यासमोर आपले प्रेम व्यक्त करणारी कृती केली आणि नेमकी तिच संजय भन्साळी यांनी कॅमेऱ्यात कैद केली.

झालं असं, की ‘हम दिल दे चुके सनम’पासून संजय- ऐश्वर्या आणि सल्लु हे त्रिकुट जमलं. त्यानंतर ऐश्वर्या आणि सल्लूची गाजलेली लव्हस्टोरी प्रेक्षकांनी चवीने चघळली मात्र दोन वर्षात या नात्याला पारोने पुर्णविराम दिल्याने दुःखात बुडलेल्या आणखी एका देवदासचा जन्म झाला.

 

salman aishwarya inmarathi

 

तर हा देवदास प्रत्यक्ष देवदास चित्रपटाच्या शूटिंगलाही उपस्थित होता. जेव्हा शाहरुख आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमगीताचे चित्रिकरण होत असताना, तेंव्हा काही सीन संजय यांच्या मनाप्रमाणे होत नव्हते.

डोक्यावर घागर घेतलेल्या पारोच्या पायातील काटा काढण्याचा प्रयत्न शाहरुखला काही जमेना. त्यावेळी जुन्या प्रेयसीच्या मदतीला अर्थातच दबंग धावला यात काही विशेष नाही. शाहरुखनेही त्याची ही मदत स्विकारली आणि शाहरुखला शिकवण्यासाठी सलमान पुढे झाला.

कदाचित काही जुन्या आठवणींना उजाळा देत त्याने पायातील काटा काढण्याचा सीन असा काही रंगवला की हाच सीन नंतर चित्रपटात दिसला.

आता तुम्हाला वाटेल की मग सल्लूचा चेहरा कसा दिसला नाही? तर ज्यावेळी हा सीन पडद्यावर दिसतो, त्यावेळी केवळ ऐश्वर्याचे सौंदर्य, हावभाव यांवर कॅमेरा कैद असतो, त्यामुळे जमिनीवर बसून काटा काढणारा सलमान नकळत झाकला जातो, आणि पुढच्याच सीनमध्ये पुन्हा खरा देवदास अर्थात शाहरुख आपली जागा पटकावतो.

 

devdas song inmarathi

हे ही वाचा – प्रेमळ स्वप्नं दाखवणाऱ्या पडद्यावरील या १० रोमँटिक जोड्यांची खऱ्या जीवनातील कहाणी अधुरीच राहिली

निर्मात्याला अटक झाली आणि देवदास थांबला

देवदास चित्रपटाची सर्वात मोठी बाजु म्हणजे त्यावर झालेला खर्च. त्यावेळी सांगण्यात आलं होतं की दरदविशी सात लाख रुपये खर्च करत चित्रपटाचं शुटिंग सुरु झालं. निर्माता भरत शहा यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली. मात्र शुटिंग सुरु होऊन अवघ्या काही दिवसात भरत शहा यांना अटक झाल्याची बातमी आली.

Maharashtra Control of Organized Crime Act या शाखेने अंडरवर्ल्डशी असलेलं नातं आणि त्यांच्याच पैशावर उभा राहणारा देवदास या आरोपांखाली शहा यांना अटक केली. 

 

bharat shah inmarathi

 

पैशाचा ओघ थांबल्याने शुटिंगही थांबलं. मात्र भरत शहा यांनी हार पत्करली नाही. शुटिंग इतकाच खर्च वकिलांवर करत त्यांनी बड्या वकिलांची फौज उभी केली त्यांची निर्दोष सुटका झाल्याने पुन्हा तितक्याच उत्साहात देवदास उभा राहिला.

भरजरी पोषाख, ६ सेट्स, लाखो कामगार, महागडे कलाकार यांच्यावर तब्बल ५० कोटी रुपयांहूनही अधिक खर्च केल्याने त्याकाळातील सर्वाधिक महाग फिल्म म्हणूनही देवदासने रेकॉर्ड नोंदवले.

 

chandramukhi inmarathi

 

टिव्हीचे चॅनल्स असो वा ओटीटी प्लॅटफॉर्म, देवदास पुन्हा पुन्हा आवडीने पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही, मात्र आता यापुढे केंव्हाही हा चित्रपट बघाल तेंव्हा पडद्यामागील या रंजक कथा आठवून त्याची अधिक मजा घेता येईल हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?