आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
ह्या जगात तीन प्रकारची माणसं आहेत. एक ज्यांना प्राणी फक्त लांबून बघायला बरे वाटतात पण जवळ आलेले ,घरात आलेले चालत नाहीत. दुसरे ज्यांना प्राणी आवडतात, पण फक्त खायला आणि तिसरे लोक असे आहेत ज्याचं जग खूप मोठं आहे. त्यांची फक्त माणसांशीच दोस्ती नाही तर मुक्या जीवांशी पण “मैत्र जीवांचे” आहे. ह्या लोकांकडे हमखास एक किंवा अधिक पाळीव दोस्त असतात आणि त्यांचा ते एखाद्या लहान बाळाप्रमाणे सांभाळ करतात. खूप जीव लावतात, त्यांची खूप काळजी घेतात. अशा लोकांना प्राण्यांवर अत्याचार झालेले सहन होत नाहीत.
प्राण्यांना सुद्धा मन असतं आणि ते आपल्या मालकांवर इतका जीव लावतात की प्रसंगी त्यांच्यासाठी जीव देतात.
इतिहासात आपण अनेक स्वामिनिष्ठ प्राण्यांची उदाहरणे पहिली आहेत. त्यातीलच एक म्हणजे महाराणा प्रताप ह्यांचा घोडा चेतक किंवा पुराणामध्ये देव-शुनी सरमा हिचे उदाहरण सुद्धा अनेक वेळा दिले जाते.
कुत्रा हा माणसाचा बेस्ट फ्रेंड आहे असे मानतात आणि ज्यांच्याकडे खरंच तो असतो त्यांचा तो जीव कि प्राण असतो. ते त्यांच्या पाळीव श्वानाचे पोटच्या मुलाप्रमाणे लाड करतात. जगात माणुसकी हरवत चालली असताना प्राण्यांवर सुद्धा प्रेम करणाऱ्यांची खरंच धन्य आहे असेच म्हणावे लागेल.
पण ज्यांच्याकडे हे पाळीव दोस्त असतात त्यांचे त्यांच्या पाळीव दोस्तावर कितीही प्रेम असले तरीही ते त्यांना सगळीकडे सोबत नेऊ शकत नाहीत किंवा त्यांना काही कामासाठी जसे ग्रुमिंग साठी किंवा लसीकरणासाठी किंवा आजारी असताना डॉक्टरांकडे किंवा बाहेरगावी जाताना हॉस्टेलवर ठेवण्यासाठी इकडून तिकडे न्यायचे झाले तर स्वतःचे वाहन असणे आवश्यक असते. अशा वेळी ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन नसेल त्यांना मात्र प्रॉब्लेम येतो की ह्या पाळीव दोस्तांना कसे बरोबर न्यायचे?
सध्यातरी पुण्यातल्या लोकांचा हा प्रॉब्लेम सोडवला आहे प्रिया कैलाड आणि आदित्य मखारीया ह्या प्राणीप्रेमी जोडप्याने!
ह्या दोघांनी पाळीव प्राण्यांसाठी स्पेशल टॅक्सी सेवा पुण्यात सुरु केली आहे. ह्या सेवेचे नाव आहे Petxi (Pet Taxi) – जी तुमच्या पाळीव दोस्तांना अगदी सुरक्षितरित्या आणि कम्फर्टेबली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल. ह्यातील आदित्य ह्यांचा स्वत:चा टॅक्सीचा Makson Auto Hirers ह्या नावाचा व्यवसाय आहे तर प्रिया ह्यांनी पशुकल्याण विभागात काम केले आहे.
जानेवारी २०१६ पासून ते त्यांच्या Petxi टॅक्सी सर्विस द्वारे Pet Hostel Transfers, Vet Visits, Airport Transfers, Inter-City Transfers, Pet Park Visits, Grooming Visits, Emergency Calls, Pet Treks / Socializing, Cemetery Transport, Joy Rides इत्यादी सेवा देतात. पण त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी हि सेवा कुठल्याही आर्थिक फायद्यासाठी सुरु केली नाही. त्यांचा उद्देश फक्त जखमी निराधार प्राण्यांना योग्य ठिकाणी घेऊन जाणे आहे.
काही महिन्यांपूर्वी आदित्य आणि प्रिया ह्यांना त्यांच्या ऑफिसच्या बाहेर कुत्र्याची १२ पिल्लं सापडली. त्या पिल्लांना कुणीतरी निराधार अवस्थेत सोडून दिले होते. ती छोटीशी गोंडस पिल्लं पाहून प्रिया ह्यांचे मन द्रवले आणि त्यांनी त्या पिल्लांना दत्तक घेतले. त्या पिल्लांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना फार त्रास व्हायचा तेव्हा त्यांना कल्पना सुचली की प्राण्यांसाठी एखादी वाहतूक सेवा सुरु केल्यास अनेकांचा प्रॉब्लेम सुटेल. म्हणून त्यांच्या मनात हि सेवा सुरु करण्याविषयी विचार आला.
शिवाय त्या पिल्लांच्या चांगल्या संगोपनासाठी त्यांना आर्थिक गरज होती म्हणून त्यांनी ‘Petxi’ ह्या सेवेची सुरुवात केली ज्यात पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीची सोय केली जाते. प्रिया म्हणतात की,
ही पुण्यातील एकमेव प्राण्यांसाठी असलेली टॅक्सी सेवा आहे. त्यांच्या स्टाफ ला पाळीव प्राणी हाताळण्याचे संपूर्ण ट्रेनिंग दिले जाते. हे प्राणी खूप संवेदनशील असतात. म्हणूनच त्यांना गाडीतून नेताना ते घाबरून जाऊ नये म्हणून त्यांचे ड्रायवर सतत त्या प्राण्यांशी संवाद साधत असतात. ही टॅक्सी सेवा अनेक वेगवेगळ्या animal welfare groups शी जोडली गेली आहे. हे ग्रुप वेळोवेळी त्यांना जखमी प्राण्यांबद्दल सूचना देत असतात.
ही सर्विस दोन प्रकारच्या प्राण्यांसाठी आहे. एक म्हणजे पाळीव आणि दुसरे म्हणजे निराधार भटके प्राणी. निराधार भटक्या प्राण्यांसाठी १२ रुपये प्रती किलोमीटर असे भाडे आहे, कारण त्यांना पेट्रोल आणि ड्रायवरचा पगार असा खर्चाचा ताळमेळ सांभाळावा लागतो.
ते पाळीव प्राण्यांसाठी ५०० रुपये प्रती १० किमी एक तासासाठी , ८०० रुपये प्रती २० किमी २ तासांसाठी असे भाडे आकारतात. ते बाहेरगावी सुद्धा ने –आण करण्याची सेवा देतात. त्यासाठी ते १४ रुपये प्रती १ किमी असा दर आकारतात.
त्यांनी ही सेवा कुठल्याही फायद्यासाठी सुरु केली नाही. सध्या त्यांचे काम न नफा न तोटा ह्या धर्तीवर सुरु आहे. त्यांनी ह्या सेवेसाठी त्यांच्या गाड्यांमध्ये आवश्यक ते बदल करून घेतले आहेत. एकदा पुण्यात सेटल झाले की मुंबई, बंगळूरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा ही सेवा सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. कारण ह्या शहरांमध्ये सुद्धा प्राण्यांसाठी वाहतुकीची फारशी सोय नाही.
Petxi ची कार सर्विस बुक करण्यासाठी तुम्ही त्यांना फोन करू शकता, किंवा फेसबुक व WhatsApp वर सुद्धा बुक करू शकता. त्यांची एक गाडी भटक्या प्राण्यांसाठी आहे तर दुसरी गाडी पाळीव प्राण्यांच्या सेवेसाठी आहे.
आता तुमच्या पाळीव दोस्तांना कुठेही न्यायचे झाल्यास Petxi बद्दल नक्की लक्षात ठेवा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.