एका मारवाडी कुटुंबाने सुरु केला अस्सल मराठी मसाल्यांचा व्यवसाय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगातील आवडीनं जपली जाणारी संस्कृती म्हणजे खाद्य संस्कृती. कारण जे काही कष्ट करतो ते पोटासाठीच तर करतो. प्रत्येक प्रांताची आपली आपली एक वेगळी खाद्य संस्कृती असते.
प्रत्येक राज्यात दर मैलागणिक खाद्य पदार्थ करण्याची एक वेगळी पद्धत असते, वेगळी चव असते. तो तो चवीचा ठसका असतो..ती ती चवीची खुमारी असते. कधी कधी ती इतकी प्रसिद्ध होते की त्या चवीचा ब्रँड तयार होतो आणि काही वेळा तो इतका प्रसिद्ध होतो की जागतिक पातळीवर जाऊन पोहोचतो.
कोल्हापुरी मसाला, ठेचा, सातारी पेढा, सांगलीचं भडंग, चितळ्यांची बाकरवडी, नाशिकचा चिवडा हे पदार्थ आपल्याला सर्रास माहीत आहेत. नव्हे ते ब्रँडच आहेत. पण हाच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जेव्हा मिसळ किंवा इतर पदार्थात वापरला जातो तेव्हा त्याची खाण्याची मज्जा किती वाढते? आईच्या हातचं लोणचं, तिचे मसाले जीभेचे लाड करणाऱ्या पदार्थांपैकी..
पु.लं.नी केलेली जगप्रसिद्ध कोटी आठवते का? मसाल्याची बेटं कोणती? बेडेकर आणि कुबल..हे ऐकून मास्तरांनी त्याला कुबल कुबल कुबलला!!! म्हणजे लोणच्याच्या मसाल्याचे हे ब्रँड होते.
केप्रनं पण आपलं नांव सर्वदूर पोहोचवलं आहे. त्यानंतर प्रविण हा एक ब्रँड बाजारात आला.. बघता बघता सुहाना , अंबारी या ब्रँडनी आपला ठसाच उमटवला.
लोणचे, लोणचे मसाला, कांदा लसूण मसाला, पावभाजी, छोले, चाट मसाला काय मिळत नाही या ब्रँडमध्ये? सगळ्या प्रकारचे मसाले, लोणची, हळद पूड, तिखट, कांदा लसूण मसाला, मेहंदी कोन… आणि विशेष म्हणजे प्रविण लोणची मसाले २५ देशात पाठवले जातात. या उद्योगाची सुरुवात कशी आणि कुठे झाली याची ही प्रेरणादायी कहाणी!!!
–
हे ही वाचा – ‘गृहिणी बनून संसार करेल’ असं हिणवलं गेलं, पण ती आज आहे १२०० कोटींची मालकीण!
–
वेगवेगळ्या तऱ्हेचे मसाले बनवणारे प्रविण कुणी महाराष्ट्रीय कुटुंब नाही.. ते एक मारवाडी कुटुंब आहे. मारवाडी कुटुंब म्हणजे झकास मिठाया.. चिक्कार तूप ड्रायफ्रूट्स असलेले पदार्थ.. मेहंदी, रांगोळी, कलाकौशल्य यात पारंगत असलेल्या मुली.. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारात असलेले पुरुष असा या समाजाचा एक फाॅर्म आहे. आणि या समाजातील एक कुटुंब मसाले बनवायला लागतं आणि जगात भारी ठरतं.. कसं झालं हे सारं? हे उभं राहीलेले साम्राज्य उभं केलं ते हुकमीचंद चोरडिया आणि त्यांची पत्नी कमलाबाई चोरडिया यांनी.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावी राहणारे हे चोरडिया कुटुंब. सुरुवातीला धायरी येथे किराणा मालाचे दुकान होते. सोलापूर मध्ये कमलाबाई चोरडिया यांनी मसाला बनवून विकायची कल्पना सुचवली.
हुकमचंद सायकलवरून मसाले विकायला जात. मसाला तयार करणं सोपं नसतं.. पण कमलाबाई दिवसाला पंचवीस किलो मसाला तयार करत. अतिशय कष्टाचं काम होतं हे. सोलापूर मध्ये त्यांचा हा मसाला खूप लोकप्रिय होऊ लागला. मागणी पण वाढली. पण त्यावेळी ते पुण्यात आले होते.
त्यांनी हाच व्यवसाय करायचं ठरवलं होतं. कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला बनवायला त्यांनी सुरू केले. त्या प्राॅडक्टना त्यांनी आपल्या मुलाचं नांव दिलं.. प्रविण!!! ती चव, तो स्वाद लोकांना खूप आवडली.
प्रविण मसाले लोकांच्या पसंतीस उतरले. त्या काळात लोणची घरातच बनवली जात असत. पण यांनी एक वेगळा प्रयोग म्हणून लोणची बनवली. आणि मसाल्यांचे इतर प्रकार पण बनवायला सुरुवात केली.
ग्राहकांकडून ते चवीबद्दल आवर्जून अभिप्राय घेत. आणि त्यानुसार ते बदलही करत होते. ते बाजारातील त्यांच्या स्पर्धक कंपन्यांपेक्षा वेगळं आणि चांगले काय काय देता येईल याचा नेहमी विचार करत. त्यामुळे त्यांचा ब्रँड हळूहळू लोकप्रिय झाला नसता तरच नवल!!!
उत्कृष्ट चव, उत्तम पॅकिंग आणि दर्जेदार कच्चा माल ही त्रिसूत्री ठेवूनच चोरडिया नेटाने काम करत होते. बदलत्या काळानुसार इन्स्टंट आणि रेडी टू कुक हा नवा फंडा घेऊन चोरडियांनी सुहाना हा नवा ब्रँड विकसित केला.
आज हाॅटेलपेक्षाही भारी चवीच्या पनीर टिक्का मसाला, पनीर मसाला वगैरे सारख्या भाज्या कुणीही घरी करु शकतो ते केवळ सुहाना ब्रँडमुळेच. १९८५ पर्यंत केवळ पुण्यापुरता असलेल्या प्रविण मसालेनं बघता बघता देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत.
आज हुकुमचंद चोरडियांची नातवंडं प्रविण, सुहाना आणि अंबारी या तिन्ही ब्रँडची धुरा सांभाळत पुढे नेत आहेत. उत्पादन, विपणन आणि वितरण यांचा समन्वय साधत एका गृहोद्योगाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड कसा बनला याचं प्रविण मसाले हे उत्तम उदाहरण आहे. इतक्या वर्षांनंतरही तीच चव तोच दर्जा राखल्यामुळे प्रविण महाराष्ट्रासह अन्य नऊ राज्यांमध्ये पण पोहोचला आहे.
काही वर्षांपूर्वी आलेला मसाला हा मराठी सिनेमा याच कुटुंबावर प्रेरित होऊन बनवला होता.
–
हे ही वाचा – मराठी भावांची ‘किमया’! आता आंबा, कोकमापासून बनवली जातीये झक्कास बिअर
–
सातत्याने प्रयत्न, नवे प्रयोग आणि लोकांच्या चवीचा अचूक अंदाज याबरोबरच कठोर मेहनत, प्रामाणिकपणा या गुणांमुळे प्रविण मसाले आज लोकप्रिय ब्रँड झाला आहे. पण आजही आपण नेमकं कुठं आहोत हे बघण्यासाठी मसाल्यांच्या देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रविण मसाले वाले भाग घेतात आणि त्यानुसार आपल्या उत्पादनांची निर्मिती करत असतात.
कारण व्यवसाय टिकून राहण्यासाठी दूरचा विचार, चुकांमधून शिकायची तयारी असेल तर यश हमखास मिळतंच यावर त्यांचा विश्वास आहे. आणि त्यामुळेच ते ब्रँड बनले आहेत..
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.