Site icon InMarathi

Whatsapp बंद होणार नाही, पण वापरताही येणार नाही… नव्या नियमांचा अजब कारभार

whatsapp privacy policy inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही म्हण आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. एखाद्या वस्तू, सेवेला आपण सुरुवातीला आपल्या आयुष्यात स्थान देतो, ती सेवा आपल्याला आवडते. कंपनीच्या लक्षात येतं, की आता या व्यक्तीला आपल्या वस्तू, सेवेची सवय लागली आहे. आपण काहीही नियम सांगितले तरीही आपला ग्राहक हा आता दुसरीकडे जाणार नाही.

एखादी मोहिनी विद्या केल्यासारखं आपण सुद्धा त्या अटी मान्य करत जातो आणि काय मिळवतोय? काय कमावतोय? याचा हिशोब करणं आपण नंतर सोडून देतो. तुमच्या लक्षात आलंच असेल, की आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या व्हॉट्सअॅपबद्दल बोलत आहोत.

 

 

एकमेकांना संदेश पाठवण्याचं सोपं आणि मोफत माध्यम म्हणून जगभरात मान्यता असलेल्या व्हाट्सअपने आता कात टाकली आहे. १ रुपयांच्या मेसेजपासून सुटका म्हणून काही वर्षांपूर्वी आपण सर्वांनी पटापट व्हॉट्सअॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केलं.

काही वर्षांनी फेसबुकने एक भली मोठी रक्कम देऊन ते विकत घेतलं आणि मग एका मेसेज अॅप्लिकेशनचा व्यवसायिक मोबदला देण्याकडे प्रवास सुरु झाला.

===

हे ही वाचा – WhatsApp, Telegram आणि Signal app? तुमच्या शंकांचं निरसन करणारा खुलासा!

===

‘तुमचा डेटा हा तुमचा राहिलेला नाहीये’ अगदी सत्य आहे. याचा अर्थ त्याचा गैरवापरच केला जाईल असं नाही. पण, तिथपर्यंत पोहोचण्याचा अधिकार आपण अॅप्लिकेशन इन्स्टॉल करतानाच त्या कंपनीला दिलेला असतो.

अँड्रॉईड आल्यापासून सुरू झालेली ही प्रथा आता फेसबुकने पुढे नेण्याचं ठरवलं आहे. आपल्या ‘प्रायव्हसी’वर घाला घालणाऱ्या या अमेरिकन कंपन्यांनी केवळ तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्टस्, इमेल आयडीमधील इमेल या जीवावर इतकं मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं आहे, की आज व्हॉट्सअॅप सारखं अॅप्लिकेशन कोणतीही गोष्ट आपल्याला विचारत नाही, तर करायला सांगत असतं.

‘आम्ही तुमचा डेटा फेसबुकला देणार, रहायचं तर रहा नाही तर चालते व्हा’ असे निर्देश व्हॉट्सअॅपने जानेवारी २०२१ मध्येच दिले होते. जगभरात गदारोळ झाला, वातावरण तापलं. व्हॉट्सअॅपला त्या काळात बऱ्याच लोकांनी बाहेरचा रस्ता दाखवला. पण, त्यांची एकूण ग्राहकसंख्या लक्षात घेता ही संख्या अगदीच नगण्य होती.

 

 

आपल्या विरुद्ध जाणाऱ्या जनमताचा मार्क झुकेरबर्गने अंदाज घेतला आणि ही मुदत १५ मे पर्यंत वाढवून देण्यात आली. सुधारित सूचना वजा धमकी अशी देण्यात आली आहे, की ‘अटी मान्य करा, नाही तर तुम्हाला व्हॉट्सअॅपचे काही फीचर्स वापरता येणार नाहीत.’

एखाद्या अॅप्लिकेशनचा त्रास होत असेल, तर आपण ते लगेच ‘अनइन्स्टॉल’ करतो. पण व्हॉट्सअॅपचं तसं नाहीये. मैत्री, व्यवसाय, नातीगोती या सगळ्यांना व्हॉट्सअॅपरुपी अजगराने आपल्या विळख्यात कधीच घेतलं आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच. कोणता तरी ठोस पर्याय उपलब्ध झाल्याशिवाय आज तरी आपण या विळख्यातून सुटू शकत नाहीत.

व्हॉट्सअॅपची सवय लागलेल्या आपल्या सर्वांकडे दोन पर्याय आहेत. एक तर ते नियम मान्य करत Accept वर बोट ठेवून शांत रहा किंवा तसं न केल्यास काही महत्त्वाच्या फीचर्सवर पाणी सोडा. आधी या फीचर्सबद्दल जाणून घ्या आणि मगच आपला निर्णय ठरवा…

===

हे ही वाचा – होय! WhatsApp वरचे डिलीट केलेले मेसेज वाचणे सहज शक्य आहे ! कसे? समजून घ्या..

===

व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटसोबत नवीन अटी मान्य करायची विनंती करण्यात येणार आहे. आपण आडून राहिलो तर त्याचे खालीलपैकी कोणतेही परिणाम भोगावे लागतील असं कंपनीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हंटलं आहे.

१. तुम्ही ‘नोटिफिकेशन’ सुरू ठेवले असतील तर तुम्हाला मेन स्क्रीनवर मेसेज दिसतील. तिथूनच उत्तर देता येईल, फोन घेता येईल. पण, आता दिसते त्यानुसार चॅट लिस्ट बघता येणार नाही. तुमच्या ‘चॅट लिस्ट’ पर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही.

 

 

२. काही दिवसांनी तुम्हाला येणारे फोन कॉल्स म्हणजेच व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल्स बंद करण्यात येतील.

३. तुमचे चॅट्स तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर एक्स्पोर्ट करता येणार नाहीत. म्हणजेच कुठल्याही मार्गाने बॅकअप घेता येणार नाहीत.

‘एका ठराविक वेळेनंतर तुम्ही व्हाट्सअप व्हॉट्सअॅपच्या अटी मान्यच केल्या नाहीत, तर तुमचं अकाउंट डिलीट होऊ शकतं. त्यासोबतच तुमचे व्यक्तिगत, ग्रुप मेसेजेस सुद्धा डिलीट होऊ शकतात.’ ही अट आता रद्द झाली आहे.

सुरुवातीला या अटी फक्त बिझनेस अकाउंटसाठी लागू असतील असं सांगण्यात आलं होतं. ज्यांना बिझनेस अकाउंट फीचर्स वापरायचे आहेत त्यांनी व्हॉट्सअॅपच्या अटी मान्य कराव्यात असं सांगण्यात आलं होतं. पण, नंतर असं समोर आलं आहे, की आता सरसकट सर्वांना या अटी मान्य कराव्या लागतील.

व्हॉट्सअॅपचा दुटप्पीपणा त्यावेळी जास्त लक्षात येतो, जेव्हा हे कळतं की युरोपमधील ज्या देशांचे जनहित सुरक्षा कायदे आहेत तिथे या नवीन नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. 

या अटी मान्य करण्यासाठी त्यांचा ‘पॉप अप’ची वाट बघणं हा इतकाच पर्याय सध्या तरी उपलब्ध आहे. १६ मे नंतर कधीही तुमच्या होम स्क्रीन वर New Privacy policy असा मेसेज येईल. या अटी मान्य करण्यासाठी जर तुम्हाला मेसेज आलाच नाही तर शक्यता अशी आहे की, तुम्ही या अटी आधीच मान्य केल्या असतील.

 

 

तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असतांना एखादी जाहिरात, विडिओ किंवा माहिती स्वरूपात काही दिवसांनी दिसू शकते. एखाद्या ई-कॉमर्स वेबसाईटची खरेदी लिंक आल्यासही आश्चर्य वाटून घेऊ नका.

लोकांची माहिती गोळा करून त्याचा फायदा व्हॉट्सअॅप सर्व छोट्या, मोठ्या उद्योगांना करून देऊ इच्छिते असा डाव दिसतोय. व्हॉट्सअॅपची ही एक प्रकारची मुजोरी लोकांना मान्य होईल की नाही हे येणारा काळच सांगेल.

===

हे ही वाचा – आपल्या ‘लाडक्यांचे’ फोटो सोशल मीडियावर टाकताना या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version