Site icon InMarathi

अनिल माधुरीच्या ‘त्या’ सुपरहीट गाण्याचं शूटिंग चक्क किंग खानच्या ‘मन्नत’मध्ये झालं होतं!

anil madhuri song inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ऐंशीच्या दशकातली ही गोष्ट, श्रीदेवी नावाची सौंदर्य मोहिनी तमाम रसिकांवर असतानाच एका रात्रीत चित्र पालटून आणखीन एक “मोहिनी” श्री ची तगडी प्रतिस्पर्धी म्हणून स्पर्धेत आली. या मोहिनीचं खरं नाव होतं माधुरी दीक्षित.

अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर कधीकाळी ती हिंदी चित्रपटांवर राज्य करेल असं सांगून खरं वाटलं नसतं मात्र ही जादू झाली आणि ती करण्यामागचे कष्ट घेतलेल्या व्यक्तीचं स्थान माधुरीच्या आयुष्यात कायमच वरचं राहिलं. पुढे जाऊन ही व्यक्ती माधुरीच्या कुटुंबाचा हिस्सा बनली.

अख्ख्या जगानं अविश्र्वास दाखविला होता तेंव्हा ही एकमेव व्यक्ती होती जीला खात्री होती की, एक ना एक दिन ये लडकी बॉलिवुड पे छा जाने वाली है. या विश्र्वासापायी त्या व्यक्तीनं माधुरीवर प्रचंड मेहनत घेतली होती.

निर्माता दिग्दर्शकांकडे खेटे घालून घालून त्यानं माधुरीचं टॅलेण्ट उजेडात आणण्याचा प्रयत्न केला होता. या व्यक्तीचं नाव होतं राकेशनाथ उर्फ़ रिक्कू. म्हणायला माधुरीचा मॅनेजर अशी सुरवात केलेला रिंकू त्या काळातला दबदबा असणारा, कष्टाळू असा सेलिब्रेटी मॅनेजर होता.

 

 

रिक्कू तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्या करियरला कलाटणी मिळाली हे जरी खरं असल तरीही रिक्कू माधुरीच्या आयुष्यात येण्यासाठी कारणीभूत असणारी व्यक्ती पुन्हा वेगळीच आहे.

===

हे ही वाचा अख्ख्या देशाला आपल्या मोहक सौंदर्याने वेड लावणाऱ्या माधुरीबद्दल १५ खास गोष्टी

===

त्याचं झालं असं की, माधुरीची हेअरड्रेसर असणारी खातून ही त्या काळात बर्‍याच स्टार्सची हेअरड्रेसर होती. त्यापैकी एक नाव होतं त्या काळातली लोकप्रिय अभिनेत्री, सलमा आगा आणि सलमा आगाचा मॅनेजर होता रिक्कू.

या खातूननं रिक्कूला माधुरीचं नाव सुचवलं आणि दोघांची भेट घडवून आणली. रिक्कू त्या काळात अनिल कपूरचा मॅनेजर म्हणूनही काम पहात असे. अनिल कपूरनं नुकताच मिस्टर इंडिया नावाचा सुपरहिट सिनेमा दिलेला होता आणि त्याची डायरी शुटिंगच्या तारखांनी भरून वहात होती इतकं त्याच्याकडे काम होतं.

माधुरीला भेटल्यानंतर रिक्कूनं तिचा मॅनेजर बनण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत माधुरीचा पहिला चित्रपट अबोध अद्याप प्रदर्शित व्हायचा होता. अबोध प्रदर्शित झाल्यानंतर एक आठवड्यानं रिक्कूनं माधुरीचा मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळायला सुरवात केली.

अबोधची थोडीफार चर्चा झाली असली तरी तो चांगलाच फ्लॉप झाला. अबोध प्रदर्शित होण्यापुर्वीच माधुरीनं एक दोन नाही तर तब्बल पाच सिनेमे साईन केले होते ज्यात तिला बहुतेक करुन सहाय्यक भूमिकाच मिळाली होती.

 

 

रिक्कूचं काम आता आणखिनच कठीण बनलं होतं. टी रामाराव यांचा खतरों के खिलाडी हा मल्टीस्टारर सिनेमाही माधुरीनं साईन केला होता. याच्या पोस्टरवर मात्र ती गायब होती शिवाय तिचं नावही सर्वात शेवटी होतं.

रिक्कूला ही गोष्ट धोकादायक वाटली कारण सुरवातच दुय्यम राहून केली तर पुढे जाऊन स्टार होणं कठीण होणार आहे हे त्याच्या अनुभवी मेंदूनं ताडलं होतं आणि माधुरीच्या बाबतीत हा धोका त्याला घ्यायचा नव्हता. तो चक्क टी रामाराव यांच्याशी यावरून भांडला.

माधुरी निलमला सिनियर आहे त्यामुळे तिचं नाव वर असायला हवंय असा रिक्कूचा दावा होता. रामाराव म्हणाले की हे सिध्द कर. गप्प बसेल तर तो रिक्कू कसला? तो थेट निलमचा पहिला सिनेमा जवानीचे दिग्दर्शक रमेश बहेल यांच्याकडे गेला आणि त्यानं चित्रपटाची रिलिज डेट मागितली. नुसतीच मागितली नाही तर त्यांच्याच हस्ताक्षरात ती कागदावर लिहून घेतली.

यानंतर तो माधुरीचा पहिल्या सिनेमाची निर्मिती करणार्‍या राजश्री प्रोडक्शन हाऊसमधे गेला आणि तिथून त्यानं माधुरीच्या पहिल्या चित्रपटाची रिलिज डेट घेतली.

वास्तवात दोन्हीही चित्रपट एकाच वर्षात प्रदर्शित झालेले होते मात्र अबोध थिएटर्समधे आधी झळकला होता. रिक्कूनं माधुरी निलमला सिनियर असल्याचं सिध्द केलं आणि तिची श्रेयनामावलीत योग्य ती जागा पटकावली. माधुरीचा मॅनेजर म्हणून त्याचं हे पहिलं यश होतं.

 

 

आपल्या कृतीनं त्यानं दाखवून दिलं की माधुरीला हलक्यात घेऊ नका. पुढे जाऊन हिच्या डेटस मिळवायला तुम्हाला महिनोनमहिने वाट बघावी लागणार आहे.

माधुरीचे ग्रह आता योग्य जागी वाटचाल करू लागल्याची चिन्हं दिसत होती कारण या तारखांच्या प्रकरणार रिक्कू राजश्रीच्या ऑफिसमध्ये होता तेंव्हाच त्याची आणि एन चंद्रा यांची भेट झाली.

त्यांना त्यांच्या अगामी चित्रपटात हिरो म्हणून अनिलच हवा होता त्यासाठी गळ घालायला ते रिक्कू भेटायला आले होते. बोलता बोलता रिक्कू कळलं की चित्रपटाचा नायक म्हणून अनिल फिक्स असला तरिही नायिकेसाठी एन चंद्रा नव्या मुलीच्या शोधात आहेत.

===

हे ही वाचा बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

===

हे ऐकल्याबरोबर रिक्कूनं बॅगेतून माधुरीचे फोटो काढून एन चंद्रांसमोर धरले. एन चंद्रांना दिसायला वगैरे ही मुलगी बरी वाटली मात्र त्यांच्या सिनेमात नुसतं सुंदर दिसून उपयोगाचं नसायचं तर अभिनय महत्वाचा असायचा.

 

 

त्यांनी रिक्कूला विचारलं की ही मुलगी अभिनय करू शकेल? अनिलपुढे टिकू शकेल? आता रिक्कूनं एका दगडात दोन पक्षी मारले.

राजश्रीच्याच ऑफिसमध्ये होता तर त्यानं विनंती केली की अबोधचे माधुरीचे सिन असणारा काही भाग द्यावा. राजश्रीनंही हे मान्य करत माधुरीचे सीन्स त्याला दिले. एन चंद्रांनी ते पाहिले आणि त्यांनाही या नवख्या मुलीतला स्पार्क जाणवला.

त्यावेळेस एन चंद्रा हे दबदबा असणारं आणि हिट सिनेमे देणारं नाव होतं. ते माधुरीला भेटले आणि त्यांनी तेजाबसाठी माधुरीला साईन केलं. माधुरीला उत्तम नृत्य येतं हे या मिटिंग दरम्यान त्यांना कळलं.

 

 

तेजाबची त्यांची मोहिनीदेखील क्लब डान्सरच असल्यानं तिचं एखादं नृत्य सिनेमात घ्यावं असा त्यांना विचार सुचला. योगायोगानं कथेच्या ओघात हे गाणं अगदी चपखल बसत होतं.

त्याकाळी आधी ट्युन बनवत आणि मग त्यावर शब्दांची रचना करण्याचा प्रघात होता त्यानुसार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी धून बनविली आणि ती गीतकार जावेद अख्तर यांच्याकडे पाठवून दिली.

ही जी धून होती त्यात त्यांनी संदर्भासाठी म्हणून एक दोन तीन असे अंक म्हणले होते. जावेद जेव्हा गाणं तयार करून घेऊन आले तेंव्हा त्यांनी ते शब्द तसेच ठेवलेले बघून एन चंद्रा आणि लक्ष्मीप्यारे दोघांना मोठा धक्का बसला.

जावेदजींनी शांतपणे सांगितलं की या अंकांसोबत हे गाणं हिट होईल. टेन्शन घेऊ नका. हे विचित्र गाणं लोकांना अजिबात आवडणार नाही याची एन चंद्रांना जवळपास खात्री होती मात्र जावेदजी आपल्या निर्णयावर ठाम होते.

 

 

त्यांच्या या ठाम असण्यानंच माधुरीला तिचं पहिलं सुपरडुपर हिट गाणं मिळालं, हिंदी चित्रपटसृष्टीला माईलस्टोल गाणं मिळालं आणि माधुरी नावाचा फेनोमिना या गाण्यानं चालू केला.

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एक दो तीन इतकं प्रचंड हिट झालं की एन चंद्रांनी याचं मेल व्हर्जनही चित्रपटात घेण्याचं ठरविलं. चित्रपट थिएटर्समधे लागल्यानंतर पंधरा आठवड्यांनी या गाण्याचं शूट केलं गेलं.

या शुटिंगसाठी लोकेशन निवडलं गेलं, शाहरुख खानचं घर, मन्नत. आश्चर्य वाटलं नं वाचून? कधी काळी शाहरुखच्या घरात अनिल माधुरी थिरकले आहेत ही गोष्टच कोणाला माहित नाही.

===

हे ही वाचा किंग खानला प्राणाहून प्रिय असलेल्या ‘मन्नत’ बद्दल ही खास माहिती तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल

===

 

मात्र जेव्हा हे शुटिंग झालं तेंव्हा शाहरुख अद्याप टेलिव्हिजनवर काम करणारा दिल्लीचा छोरा होता. मुंबापुरीत त्याचं आगमन झालेलं नव्हतं आणि आजच्या मन्नतचा तेंव्हा मालकही वेगळा होता.

त्याकाळी त्याचं नाव होतं, ’व्हिला व्हिएन्ना’. हा व्हिला व्हिएन्ना. एका पारसी माणसाच्या मालकीच्या या व्हिलामधे त्या काळात अनेक हिंदी चित्रपटांचं शुटिंग होत असत.

तेजाब बनण्याच्या प्रक्रियेत अशा अनेक योगायोगांची साखळी गुंतलेली आहे. या चित्रपटानं माधुरीचं करियर बनवलं तर आदित्य पांचोलिच्या तोंडून सोन्याचा घास पळवला. याचं कारण आधी या चित्रपटात नायक म्हणून त्याला साईन केलं होतं मात्र नंतर त्यानं हा सिनेमा सोडला आणि अनिलला मिळाला.

खलनायकाच्या भूमिकेत नाना पाटेकर असणार होता. आमंत्रण पत्रिकेवर तसं लिहिलेलं होतं मात्र मुहूर्तापर्यंत चित्र बदललं होतं. नाना या चित्रपटातून बाहेर गेला होता.

अनिल कपूरच्या अनेक सिनेमांचं चित्रीकरण चाललेलं असूनही त्यानं एका अटीवर हा सिनेमा स्विकारला होता आणि ती अट होती, एखादं चित्रीकरण रद्द झालं तर त्याजागी तेजाबचं शुटिंग तो करेल.

 

 

गंमत म्हणजे डायरीत असणर्‍या सर्व सिनेमांच्या आधी तेजाब प्रदर्शित झाला. माधुरीला घडवणारा हा सिनेमा आणि तो सिनेमा माधुरीला मिळवून देणारा रिक्कू हा सगळंच सुखद योगायोगाच्या तीन टोकांनी सांधलेला त्रिकोण आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version