आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया हा सण हिंदू सणांपैकी महत्त्वाचा सण आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. कधीही नष्ट न होणारे म्हणजे ‘अक्षय’.
अक्षय तृतीयेच्या दिवशी अखंड सौभाग्य आणि शुभ फळाची प्राप्ती होते. या दिवशी केली जाणारी कार्य मनुष्याच्या जीवनात कधी न समाप्त होणारे फळ देतात.
अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करण्यामागे अनेक आख्यायिका आहेत. जाणून घेऊया या विविध आख्यायिकानी या दिवसाला मिळालेले महत्व.
१. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांनी देवी रेणुका यांच्या पोटी जन्म घेतला होता. म्हणूनच या दिवसाला ‘परशुराम तिथी’ असेही म्हणतात. या दिवशी दक्षिण भारतात परशुरामाची जयंती उत्साहात साजरी केली जाते.
२. अक्षय तृतीयेच्याच दिवशी आकाशगंगेत निवास करणारी पवित्र गंगा नदी राजा भगीरथांच्या तपामुळे भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठवली होती.
३. महर्षी वेद व्यास यांनी याच शुभ दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जाते. शिवाय युधिष्ठिराला अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘अक्षय पात्र’ वरदान म्हणून मिळाले. पांडवांच्या वनवासा दरम्यान द्रौपदीचे जेवण होत नाही तोपर्यंत या अक्षय पात्रातील अन्न संपत नसे.
४. अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वती मातेचे रुप आहे. आजच्याच दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला होता. म्हणूनच आजच्या दिवशी लोक अन्नपूर्णा देवीची पूजा करून गरिबांना अन्नदान करतात.
५. दक्षिण भारतातील एका मान्यतेनुसार आजच्याच दिवशी लक्ष्मी देवी कुबेराच्या तपाने प्रसन्न झाली आणि कुबेराला वरदान स्वरूप धनाचे देवता बनवले होते. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी यंत्र आणि भगवान कुबेराची देखील पूजा केली जाते.
६. एका पौराणिक कथेनुसार असे ही म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या याच शुभ दिवशी भगवान कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती.
७. बसवेश्वर यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे एका शैव ब्राह्मण कुळात झाला. काहींच्या मते तो विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्र्वर या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. याच दिवशी बसवजयंती साजरी केली जाते.
८. भविष्यपुराणानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाचा आरंभ झाला होता.
९. जैन धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केले नव्हते.
व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांसनामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले. त्यानंतर त्या राजाच्या राज्यात अन्नधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही. यामुळेच अक्षय्य तृतीयेस ‘इक्षु तृतीया’ असेही म्हणतात.
१०. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात स्त्रिया चैत्रगौरीची स्थापना करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ, भिजवलेले हरभरे आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा म्हणजेच गौरी सणाचा अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.
दानाचे महत्त्व
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दानाला खूप महत्व प्राप्त आहे. आजच्या दिवशी अनेक गोष्टींचे दान करून पुण्याची प्राप्ती केली जाते. पाहूया कोणकोणत्या गोष्टी आज दान केल्या जातात.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत.
आजच्या दिवशी फळांचा राजा असलेल्या आंब्यांचे देखील दान केले जाते.
या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत. वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावे. या दिवशी पाण्याने भरलेले भांडे, पंखे, छत्री, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, काकडी, साखर, हिरव्या भाज्या, सरबत आणि सत्तू इत्यादी उष्णतेपासून दिलासा देणाऱ्या गोष्टी सुद्धा दान केल्या जातात.
आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते, असे मानले जाते.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्यतृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी नवीन वस्तू, वास्तू, वाहन, व्यवसाय आरंभ, शुभकार्य, सामाजिक कार्य केल्यास त्यात यश मिळते असे म्हणतात.
अक्षय्य याचा अर्थ कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा आहे. म्हणूनच या दिवशी खरेदी वा शुभकार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते.
अक्षयतृतीयाच्या दिवशी अगदी १ ग्रॅम सोने जरी खरेदी केले तरी त्यात सातत्याने वाढ होते म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संपूर्ण देशात कित्येक शेकडो किलो सोने विकले जाते.
आजच्या दिवशी पुढील मंत्रांचा जप केल्याने पुण्याची प्राप्ती होते. असेही मानले जाते.
ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll
ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll
भृगुदेव कुलं भानुं, सहस्रबाहुर्मर्दनम्।
रेणुका नयनानंदं, परशुं वन्दे विप्रधनम्।।
ll ओम रां रां परशुरामाय सर्व सिद्धी प्रदाय नम: ll
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.