लोक वर्गणी मधून महाराष्ट्राच्या शाळांनी जमवले २१६ करोड रुपये!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
भारतामधील सरकारी शाळांची दयनीय अवस्था आपण नेहमीच ऐकत असतो. खाजगी शाळांच्या जमान्यात सरकारी शाळांना कुणी वाली उरला नाही हे चित्र सगळीकडे पाहायला मिळतं. कुठे पायाभूत सुविधा नाहीत, कुठे शाळांमध्ये शिषक नाहीत, कुठे तर चक्क विद्यार्थीच नाहीत!
पण या विरुद्ध अश्या अनेक सरकारी शाळा आहेत, ज्यांनी स्वत:च्या मेहनतीने अमुलाग्र बदल घडवून दाखवाला आहे. या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या, आपल्या महाराष्ट्रातल्या!
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, महाराष्ट्रातील अनेक शाळांनी स्वत: पुढाकर घेत लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत लोक वर्गणीमधून एकूण २१६ करोड रुपयांची रक्कम जमवली आहे आणि यामध्ये शाळेतील शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे महत्त्वपूर्ण योगदान होते हे विशेष!
या संबंधीतलं एक आदर्श उदाहरण आपण पाहू,
जळगावच्या अंबानेर तालुक्यामध्ये ढेकुसीम नावाचे एक गाव आहे तेथे हि जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेने सर्वप्रथम संपूर्ण गावातील नागरिकांना त्यांचे कार्य पटवून दिले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण गावकऱ्यांनी दिलेल्या वर्गणीमधून तब्बल ५.५ लाख रुपये जमा झाले.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल कि एवढ्या जमा केलेल्या रकमेतून नक्की काम झाले?
अगोदर सांगितल्याप्रमाणे इतर सरकारी शाळांप्रमाणे या शाळेची अवस्था वाईट होती. सुविधांच्या नावाने बोंबाबोंब होती. पण शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक हे मात्र शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. सुविधांअभावी मुलांच्या शिक्षणात येणारा अडसर त्यांना दिसत होता. यामुळे पालक देखील आपल्या पाल्याला सरकारी शाळेत शिकवण्यास धजावत नव्हते. याच भावनेतून त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला आणि लोक वर्गणीमधून पैसे जमा करून शाळेचा कायापालट करण्याचा चंग बांधला. जेणेकरून लोकांचा सरकारी शाळेवरचा विश्वास पुन्हा परतेल.
या जमा झालेल्या वर्गणीतील पैसा सर्वात प्रथम शाळेच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केला गेला. शाळेमध्ये ७८,००० रुपयांचा LCD projector बसवण्यात आला. सोबतच शाळेसाठी Lenovo laptops घेण्यात आले. क्लासरूम Wi-Fi मय करण्यात आले. शाळेभोवती २००० स्केअर फुटांची भिंत उभारण्यात आली. या सर्व बदलांमुळे शाळेच्या पटसंख्येत कमालीची वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील अशी अनेक सरकारी शाळांची उदाहरण आहेत, जेथील शिक्षकवर्गाने स्वत: च्या हिमतीने लोकांशी संवाद साधत लोकांच्याच पैश्यातून, त्यांच्याच भावी पिढीसाठी उभारलेली हि चळवळ खरंच वाखाणण्याजोगी आहे. मुख्य म्हणजे या कार्यात त्यांनी कोणत्याही सरकारी माध्यमापुढे हात पसरले नाहीत हे विशेष! जे काही धन जमा झालं ते सामन्य स्तरातून, निस्वार्थी लोकांच्या मनातून!
या परिवर्तनमय कार्यात सध्या अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. या जिल्ह्यातील सरकारी शाळांनी ३० करोड, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यातील सरकारी शाळांनी १९.८२ करोड, सोलापूर जिल्ह्यातील सरकारी शाळांनी १९.०३ करोड, औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी शाळांनी १५.५९ करोड आणि नाशिक जिल्ह्यातील सरकारी शाळांनी १४.८० करोड रुपये जमवले आहेत.
अश्या प्रकारे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधील सरकारी शाळा आता पुढे सरसावून स्वत:ची शाळा स्वत: घडवण्याचे कार्य करत आहेत.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढा मोठा निधी जमा करण्यात अजिबात हात आखडता घेतला नाही तो त्या दानशूर व्यक्तींनी ज्यांना खरंच समजामधील अमुलाग्र बदल पाहायचा आहे. यातील काही व्यक्ती कामानिमित्त परदेशात आहेत, तेथे असूनही आपल्याजवळ असलेला अतिरिक्त पैसा मातीतील कार्यासाठी अर्पण करण्याची भावना कौतुकास्पद आहे.
सरकारी शाळांच्या वाईट अवस्था केवळ शब्दांनी मांडण्यापेक्षा त्यावर काहीतरी उपाय करण्यासाठी स्वत: एक पाउल पुढे टाकले तर खरा बदल दिसू शकतो हेच या कार्यातून दिसते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.