' इंदिरा गांधींसमोर झुकलेले राष्ट्रपती : बस्स हीच आहे यांची आठवण…! – InMarathi

इंदिरा गांधींसमोर झुकलेले राष्ट्रपती : बस्स हीच आहे यांची आठवण…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आणीबाणी ही भारतीय राजकारणातील, कधीच विसरता न येणारी घटना आहे. एक अशी पिढी आहे जिला या दिवसाबद्दल फारच कमी माहिती आहे. आता आणीबाणीवर बोलून काय फायदा? असं बोललं जातं किंवा आणीबाणीवर बोलणारी व्यक्ती म्हणजे काँग्रेस विरोधक असं एक लेबलही आजकाल लावलं जातं. पण, असं अजिबात नाहीये.

आपल्या देशात घडून गेलेली इतकी मोठी गोष्ट आणि त्याबद्दल लोकांमध्ये असलेलं कुतूहल म्हणून हा विषय चर्चेत येत असतो.

आणीबाणीच्या काळातील म्हणजे २५ जुन १९७५ पासून पुढचे २१ महिन्याचा काळ भारतीयांनी कसा जगला असेल?, त्या काळात कोणत्या जाचक अटी भारतीयांवर लादल्या गेल्या? हे ज्यांना कळेल त्यांना हा सामान्य माणसाच्या स्वातंत्र्याचा अपमान होता हे लगेच मान्य होईल.

 

indian herald emergency inmarathi

 

भारताच्या प्रगतीसाठी आग्रही अशी प्रतिमा असणाऱ्या इंदिरा गांधी यांचा आणीबाणीचा निर्णय चुकलाच; आणि दुर्दैवाने या निर्णयाला तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली यांच्याकडून सुद्धा स्वाक्षरीच्या रूपाने समर्थन मिळालं आणि आपला भारत देश एका काळोखाने झाकोळला गेला.

आणीबाणीच्या काळात हे काही नियम लादण्यात आले होते:

१. कोणतीही बातमी छापण्या आधी ती भारत सरकारला पाठवली गेली पाहिजे आणि मगच छापली गेली पाहिजे.
२. आणीबाणीच्या विरोधात कोणतंही भाष्य करणाऱ्या वृत्तपत्र समूहाची मान्यता रद्द करण्यात येईल.
३. देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्र समूहांचं वीज कनेक्शन कट करण्यात आलं होतं.

ही बंधनं वाचल्यानंतर प्रत्येक भारतीय व्यक्तीला याबद्दल राग आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

भारताचे पाचवे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांची ओळख ही काँग्रेसचे ‘रबर स्टॅम्प’ म्हणून राजकीय वर्तुळात सर्वश्रुत होती. इंग्लंडमध्ये कॅम्ब्रिज महाविद्यालयात असतांना त्यांची जवाहरलाल नेहरू सोबत झालेली मैत्री त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन आली होती.

 

fakharuddin ali ahmed inmarathi

===

हे ही वाचा – “आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘ह्या’ चुका त्यांना प्रचंड महागात पडल्या!

===

बालपण, राजकीय कारकीर्द

फकरुद्दीन अली अहमद यांचा जन्म १३ मे १९०५ रोजी जुन्या दिल्लीच्या हौझ काझी या भागात झाला होता. त्यांचे वडील कर्नल झलनूर अली अहमद हे डॉक्टर होते आणि आसामधील पहिल्या डॉक्टर्स पैकी एक होते.

फकरुद्दीन यांनी पदवीचं शिक्षण दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमधून घेतलं आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून घेतलं. तिथे त्यांची जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत ओळख झाली होती.

१९२५ मध्ये फकरुद्दीन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्वातंत्र्य चळवळीत योगदान देतांना फकरुद्दीन यांना १९४२ मध्ये अटक करण्यात आली होती. आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य असतांना त्यांना आसामचे अर्थमंत्री होण्याचा मान मिळाला होता.

 

jawaharlal-nehru-inmarathi

 

१९५२ मध्ये राज्यसभा सदस्यत्व आणि १९५७, १९६२ या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून जनिया लोकसभा मतदार संघातून खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती.

१९६७, १९७१ मध्ये बारपेटा लोकसभा मतदार संघातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्यावर अन्न, कृषी, शिक्षण आणि औद्योगिक प्रगतीसारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फकरुद्दीन अली अहमद यांना १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपती पदाची जबाबदारी देण्याचं ठरवलं. २० ऑगस्ट १९७४ रोजी त्यांनी स्वतंत्र्य भारताचे पाचवे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली.

आणीबाणीची घोषणा आणि घटनाक्रम

२५ जून १९७५ रोजी मध्यरात्री इंदिरा गांधी यांच्या आदेशानंतर फकरुद्दीन अहमद यांनी आणीबाणीच्या कागदपत्रांवर लगेच सही केली अशी नोंद आहे. रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी राष्ट्रपती फकरुद्दीन यांच्यासाठी इंदिरा गांधींचे सेक्रेटरी के. बालचंद्रन हे, इंदिरा गांधी यांचं ‘टॉप सिक्रेट’ असं लिहिलेलं एक पत्र घेऊन आले.

देशातील सद्यपरिस्थिती बघता भारताच्या सुरक्षेला धोका असल्याचं आम्हाला गोपनीय सूत्रांकडून कळलं आहे. राष्ट्रपतींना हे मान्य असल्यास त्यांनी कलम ३५२ च्या ‘अंतर्गत सुरक्षेच्या’ सबबी खाली आणीबाणीची विनंती मान्य करावी. असं या पत्रात म्हटलं होतं.

===

हे ही वाचा – या घटना घडल्या…आणि इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली!

===

अंतर्गत सुरक्षा धोक्यात आहे असं सांगण्यात आलं होतं याचं कारण म्हणजे ‘जयप्रकाश’ यांचं आंदोलन आहे असं म्हटलं गेलं होतं. पोलीस आणि आर्मी हे जयप्रकाश यांच्या आंदोलनात सामील होणार आहेत अशी बातमी हाती आल्यानंतर इंदिरा गांधी यांनी जयप्रकाश यांना ‘शस्त्रधारी गुन्हेगार’ घोषित केलं होतं.

 

Indira Gandhi

 

विरोधकांचा वाढता दबाव ही त्या काळात इंदिरा सरकारची डोकेदुखी बनली होती. विरोधकांचे वाढते भ्रष्टाचाराचे आरोप, रस्त्यावरील निदर्शनं, जाळपोळ हे सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर चाललं होतं. हे सर्व थांबवण्यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात येत आहे हे प्रत्येक भारतीयाला कळत होतं.

राष्ट्रपती फकरुद्दीन यांनी घटना समिती सोबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितला होता. संबंधित तज्ञांशी चर्चा केल्यानंतरच मी या पत्रावर सही करेन असं के. बालचंद्रन यांना सांगण्यात आलं.

के. बालचंद्रन यांनी हे काम अतिशय गोपनीय आणि त्वरित करण्याचे आदेश असल्याचं सांगितलं. राष्ट्रपती फकरुद्दीन अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत संवाद साधला आणि मग रात्री त्या पत्रावर सही केली.

रात्री २ वाजता – सर्व विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट तयार करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण देशाला संबोधित करण्याच्या भाषणाची तयारी पंतप्रधान इंदिरा गांधी या रात्री ३ वाजेपर्यंत करत होत्या.

सकाळी ६ वाजता – कॅबिनेटमधील ८ मंत्र्यांसोबत इंदिरा गांधी यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाच्या हाती आणीबाणीच्या घोषणेची राष्ट्रपतीने सही केलेली प्रत देण्यात आली. मंत्र्यांसाठी हा मोठा धक्का होता. पण, त्यांच्या समोर हा निर्णय मान्य करण्याऐवजी दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

 

indira gandhi government emergency inmarathi

 

सकाळी ७ वाजता – भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाला उद्देशून रेडिओवर भाषण केलं. आपल्या भाषणात इंदिरा गांधी यांनी सांगितलं की, ‘परकीय शत्रूच्या धोक्यापासून सामान्य माणसाला वाचवण्यासाठी राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केली आहे.’

आणीबाणीमधील वातावरण

२६ जून १९७५ च्या सकाळी चौकाचौकात लोकांना उद्देशून ‘शांत राहण्याचे’ फलक लावण्यात आले. टीव्हीवर निवेदनाच्या माध्यमातून सरकारची आणीबाणीबद्दलची भूमिका स्पष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

मेंटेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी (MISA) या कायद्याचा वापर करून सामान्य जनतेला अटक आणि प्रसंगी मारहाण करण्याची अघोषित परवानगी पोलिसांना त्यादिवशी मिळाली होती.

एका दिवसात इतक्या लोकांना अटक करण्यात आली होती, की जेल तुडुंब भरून गेले होते आणि त्यामुळे काही लोकांना फक्त चेनने खांबाला बांधून ठेवण्यात आलं होतं.

सामान्य माणूस ज्याचा राजकारणाशी कोणताही संबंध सुद्धा नाही अशा लोकांनाही जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. त्यापैकी काही लोकांनी आपली बोलकी प्रतिक्रिया ‘जमीर कें बंदी’ या माहीतीपटात नोंदवलेली आहे. हा माहितीपट युट्युबवर उपलब्ध आहे.

 

     

 

सामान्य माणसांसोबतच राजमाता विजयराजे सिंधिया आणि महाराणी गायत्री देवी यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी आणण्यात आली होती.

भारताचे आजचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि डॉ. सुब्रह्मणीयम स्वामी यांनी त्यावेळी शीख लोकांचा वेष धारण केला होता आणि स्वतःला अटक होण्यापासून वाचवलं होतं.

 

narendra modi disguised inmarathi

===

हे ही वाचा – इंदिरा सरकारच्या काळात झालेल्या एका खटल्यामुळे आज भारतात हुकूमशाही नाहीये!

===

आणीबाणी नंतर

२१ महिने लादण्यात आलेल्या या आणीबाणीमुळे लोकशाहीचा अंत झाला होता. त्यानंतर इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांनी १९७७ मध्ये लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी ‘नसबंदी’चा कार्यक्रम हाती घेतला होता. अमानुष पद्धतीने लोकांना बळजबरी करून ‘नसबंदी’ ला सामोरं जाण्यासाठी भाग पाडलं जायचं.

समाजातील विशिष्ट वर्गाला होणारा त्रास बघून फकरुद्दीन अहमद यांनी काँग्रेसच्या कामाच्या पद्धतीला उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली होती.

इंदिरा गांधी आणि संजय गांधी या माता-पुत्रांनी देशाच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्याचं त्या काळात ठरवलं होतं. ही परिस्थिती राष्ट्रपती आणि पूर्ण भारताला अस्वस्थ करणारी होती.

 

sanjay and indira gandhi inmarathi

 

११ फेब्रुवारी १९७७ रोजी फकरुद्दीन अहमद यांचं राष्ट्रपती कार्यालयात नमाज पढत असतांना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.

आपल्या राजकीय कारकिर्दीत फकरुद्दीन अली अहमद यांनी नक्कीच चांगली कामे सुद्धा केली असतील. पण, आणीबाणीच्या एका कागदावर दबावाखाली येऊन सही करून त्यांनी त्या सर्व चांगल्या कामांवर पाणी फेरलं होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?