डिलिव्हरी बॉय ते कंपनीचा डायरेक्टर! ‘नोकरी गेल्यामुळे’ त्याचं आयुष्यच बदलून गेलं…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
कितीही संकटं आली तरी, माणसाने प्रयत्न करणं सोडू नये, कारण कधी न कधी त्याला यश मिळणारच असतं…
हा संदेश खरंच लाखमोलाचा आहे. आपल्यापैकी अनेक जण प्रयत्न करतात, पण त्याचं फळ काही मिळताना दिसत नाही म्हणून अर्ध्यातच निराश, हताश होऊन आपलं ध्येय सोडून देतात आणि पुन्हा सामान्य जीवनाच्या दिशेने चालू लागतात, पण दुसरीकडे अशीही माणसं असतात, जी एखाद्या मुंगीप्रमाणे धडपडत पुन्हा उभी राहून आपलं ध्येय गाठण्यासाठी सज्ज होतात आणि अखेर त्यांच अपयश देखील त्यांच्या जिद्दीपुढे हार मानतं.
त्यांचं नशीबदेखील त्यांना साथ देतं आणि ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन विराजमान होतात. असाच एक मेहनती आणि नशीबवान माणूस आहे अम्बुर इयाप्पा! चला जाणून घेऊया त्याची प्रेरणादायी गोष्ट!
२००९ सालापर्यंत अम्बुर एक सामान्य व्यक्ती होते. बंगळूरूच्या फर्स्ट फ्लाईट कुरियरमध्ये कुरियर बॉय म्हणून ते काम करत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी नवीन काहीतरी करावं म्हणून कामामधून ३ महिन्यांचा ब्रेक घेतला आणि जेव्हा ते पुन्हा कामावर परत आले तेव्हा त्याला कळलं की त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.
फ्लिपकार्ट हे फर्स्ट फ्लाईट कुरियरचे पार्टनर होते. त्यामुळेच त्यांना फ्लिपकार्ट काम करण्याची संधी मिळाली.
फर्स्ट फ्लाईट कुरियरमध्ये अम्बुर यांनी लॉजीस्टिकचे सर्व काम शिकून घेतले होते. फ्लिपकार्टलादेखील असाच माणूस हवा होता जो इन-हाउस लॉजिस्टिक सांभाळेल. मग काय? अम्बुरने फ्लिपकार्ट सोबत कामाला सुरुवात केली. तेव्हा फ्लिपकार्टदेखील नवीनच कंपनी होती आणि अम्बुर हे फ्लिपकार्टमधील पहिले कर्मचारी ठरले.
फ्लिपकार्टचे फाउंडर सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी ८००० रुपये महिना या पगारावर अम्बुर यांना कामावर ठेवून घेतले. मध्यंतरीच्या काळात अम्बुर यांना अनेकदा गंभीर आर्थिक स्थितीचा सामना करावा लागला, पण त्यांनी न डगमगता फ्लिपकार्ट सोबत आपली कारकीर्द सुरु ठेवली आणि आता ते फ्लिपकार्टचा असोसीएट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
फ्लिपकार्टचे पहिले कर्मचारी असल्याने त्यांना कंपनीने काही शेअर्स देखील दिले आहेत. कुठेही जॉब नसलेला माणूस आणि आज भारतातील नावाजलेल्या ऑनलाईन कंपनीचा असोसीएट डायरेक्टर असा हा अम्बुर इयाप्पा यांचा प्रवास खरंच थक्क करण्यासारखा आहे.
डिलिव्हरी बॉय असताना आणि फ्लिपकार्टमध्ये इन-हाउस लॉजिस्टिक कर्मचारी म्हणून रुजू झाल्यावर त्यांना केवळ ८००० पगार होता, पण आज त्यांच्या मेहनतीने त्यांना या पदावर आणून ठेवलं आहे जेथे त्यांना महिन्याला ६ लाखांहुनही अधिक पगार आहे.
३ महिने ब्रेक घेतल्यानंतर जेव्हा अम्बुर इयाप्पा कळलं की आपली नोकरी गेली आहे, तेव्हा जर त्यांनी आशा सोडली असती आणि नवख्या कंपनी मध्ये, जिथे काही भविष्य नाही, अश्या कंपनीमध्ये काम करायचं नाही म्हणून फ्लिपकार्टला लाथाडल असतं तर आज त्यांच नशीब बदललं नसतं.
त्यांनी येथे पगाराला नाही तर मेहनतीला महत्त्व दिलं आणि आज त्याच मेहनतीच फळ ते उपभोगत आहेत.
जास्त शिक्षण नाही, तंत्रज्ञानाची माहिती नाही, पण त्यांनी ते सारं शिकून घेतलं आणि स्वत:ला फ्लिपकार्ट सारख्या प्रतिष्ठीत कंपनीमध्ये उच्च दर्जाचं खातं सांभाळता येईल या लायक बनवलं. खरंच त्यांच्या या जिद्दीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.