आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
फिटनेस हा आता सर्वांच्या आवडीचा आणि आवश्यक विषय झालेला आहे. फिटनेससाठी काही लोक जिमला जातात, काही सकाळी चालायला जातात तर काही झुंबा क्लास करतात. ऑनलाईन फिटनेस क्लासेसची सुरुवात झाल्यापासून तर फिट रहाण्यासाठी फक्त योगा मॅट आणि फास्ट इंटरनेट कनेक्शनची गरज आहे.
मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी तर फिट रहाणं ही हौस नसून त्यांच्या व्यवसायिक आयुष्याची ती आवश्यकता असते. काही वर्षांपासून ‘फिटनेस ट्रेनर’ हा नोकरी, व्यवसायाचा एक नवीन पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे.
शिल्पा शेट्टी या अभिनेत्रीने काही वर्षांपासून अभिनयापेक्षा योगा व्हिडिओवर अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे याचं कारण सुद्धा लोकांचा मिळणारा प्रतिसाद हेच म्हणावं लागेल.
‘रमोना ब्रेगेन्झा’ या भारतीय वंशाच्या, हॉलीवूडमधील फिटनेस ट्रेनर आहेत ज्यांच्या ‘३-२-१’ या फिटनेस प्रोग्रामची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
===
हे ही वाचा – लॉकडाऊनमधे या वकिलाने आलिया भट, रणबीर कपूर सारख्याना फिटनेस फ्रीक बनवलं
===
जेसिका अल्बा, हेली बेरी, इव्हा मेंडेज, रायन रेनॉल्ड्स, टॉम वेलींग सारख्या हॉलीवूड सेलिब्रेटींना फिटनेसचे धडे देऊन ‘रमोना ब्रेगेन्झा’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलं आहे. हॉलिवूडमध्ये फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘रमोना ब्रेगेन्झा’ने एकेकाळी अभिनेत्री होण्यासाठी कित्येक निर्माता, दिगदर्शक यांच्या ऑफिसमध्ये चकरा मारल्या होत्या, त्यावेळी तिला फक्त नकार ऐकावा लागला होता.
एक असा काळ आला होता जेव्हा ‘रमोना ब्रेगेन्झा’ यांना स्वतःचा राग येऊ लागला होता, कारण कोणीही काम देत नव्हतं. त्यांचा रंग, त्यांचं दिसणं, फिगर ही याची कारणं असू शकतील असं त्यांना नेहमी वाटायचं.
एक वेळ अशी आली आणि त्यांनी ठरवलं, की ‘आपण जसे आहोत तसं जगासमोर जायचं, जे आपल्याला चांगलं करता येतं तेच करायचं आणि महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं.’ या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या आणि त्यांनी इतरांकडून सुद्धा तसाच प्रतिसाद मिळू लागला.
५६ वर्षीय ‘रमोना ब्रेगेन्झा’ यांचे आई वडील हे मुंबईचे आहेत. ‘रमोना ब्रेगेन्झा’ यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता. रमोना यांचं वय ७ वर्षं असतांना त्यांचे पालक नोकरीसाठी कॅनडाला गेले.
वयाच्या २० व्या वर्षी रमोना या अभिनेत्री बनण्यासाठी कॅलिफोर्नियाला गेल्या आणि तिथे त्यांनी NFL टीमसोबत ‘चिअर लीडर’ म्हणून काम करायला सुरुवात केली.
नोकरी करत असताना त्यांनी गोल्ड जीम इथे ट्रेनर म्हणून सुद्धा काम सुरू केलं आणि शहरात होणाऱ्या विविध फिटनेस स्पर्धांमध्ये त्या सहभागी होऊ लागल्या.
एका स्पर्धेत त्यांची भेट जेसीका अल्बा या अभिनेत्री सोबत झाली आणि ‘रमोना ब्रेगेन्झा’ला ‘सेलिब्रिटी पर्सनल ट्रेनर’ होण्याचं पहिलं काम मिळालं.
जेसीका अल्बा यांना १२ वर्ष फिटनेसचे धडे दिल्यानंतर ‘रमोना ब्रेगेन्झा’ यांना इंग्रजी चॅनल MTV, VH1 वर फिटनेसचे शोज सादर करण्याचं काम मिळालं.
त्यांच्या सादरीकरणात हे वैशिष्ट्य आहे, की त्या मनोरंजन क्षेत्रातील लोकांना प्रशिक्षण देत असतानाच फिटनेसबद्दल ‘मेन्स हेल्थ’, ‘फिट प्रेग्नन्सी’, ‘वुमन्स वर्ल्ड’सारख्या मासिकांमधून सुद्धा फिटनेसबद्दल नियमितपणे लिहीत असतात. मायकेल वेथरली या हॉलीवूड कलाकाराच्या त्या ‘लाईफ लॉंग फिटनेस कोच’ म्हणून सुद्धा काम करतात.
===
हे ही वाचा – ८२ वर्षाच्या या आजींची कमाल पाहिलीत, तर तुम्हीही प्रेरित होऊन उद्यापासून ही गोष्ट कराल!
===
२० वर्षांपासून फिटनेस ट्रेनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या ‘रमोना ब्रेगेन्झा’ यांनी आपल्या करिअरची सुरुवात जिम्नॅस्टिक्समधून केली होती. काही वर्ष त्यांनी ‘चिअरगर्ल’ म्हणून सुद्धा काम केलं आहे. आज त्यांच्या नावाने फिटनेस डीव्हीडी, पुस्तकं जगभर लोकप्रिय झाली आहेत.
‘माय होम फिटनेस’ या नावाने सुरू केलेल्या या संकल्पनेला भारतात सुद्धा चांगली मान्यता मिळताना दिसत आहे.
‘माय होम फिटनेस’
‘रमोना ब्रेगेन्झा’ यांच्या फिटनेस कार्यक्रमाची खासियत म्हणजे त्या विविध देशांप्रमाणे आपल्या व्यायामाचा प्रकार बदलत असतात. भारतात आल्यावर त्या योगा आणि ध्यान धारणेचं महत्त्व सांगतांना आढळतात.
शरीराची लवचिकता आणि शक्ती वाढवण्यासाठी योगा महत्वाचा आहे हे आपल्या ऑनलाईन क्लासद्वारे त्या सर्वांना सांगत आहेत.
लोकांना व्यायाम कसा करायचा? हे शिकवण्यासाठी त्यांनी काही शिक्षक तयार केले आहेत, जे लोकांना घरोघरी जाऊन व्यायाम करायला लावतील. हे शिक्षक तुम्हाला फक्त व्यायामच नाही तर योग्य झोप, पाण्याचं प्रमाण, मन शांत ठेवणे याची सुद्धा महिती देतील.
भारतात मॅरेथॉन रनर्स, ज्येष्ठ नागरिक, आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाला खाण्यावर खूप नियंत्रण ठेवावं लागतं. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला रमोना ब्रेगेन्झा एक डाएट प्लॅन सुद्धा देत असतात. ३ वेळेस जेवण आणि २ वेळेस स्नॅक्स ही त्यांची संतुलित आहाराची व्याख्या आहे. ताजं अन्न खावं, प्रोटिनयुक्त गोष्टींचा आहारात समावेश असावा आणि हे सर्व योग्य प्रमाणात असावं.
ब्रेगेन्झा यांचं एक स्वप्न आहे; त्यांना ‘बहामा’ येथे समुद्रकिनारी एक घर बांधायचं आहे ज्यासाठी त्यांनी तिथे जागा सुद्धा विकत घेऊन ठेवली आहे. फिटनेस ट्रेनिंगसाठी जगभर फिरत असतांना त्या नेहमीच व्यायामासाठी लागतील असे कपडे, शुज वापरत असतात.
कुठेही फिरतांना त्यांचं पेडोमीटर हे त्यांच्या सोबतच असतं. प्रवासात असतांना काहीच व्यायाम करता आला नाही, तरी त्या एखादं पार्क शोधून तिथे जाऊन व्यायाम करतात.
कोणत्याही देशातील हॉटेल निवडतांना त्या हॉटेल मध्ये जीम आहे की नाही? हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर डोंगर चढाई, लंडनमध्ये गेल्यावर डान्स क्लास, भारतात आल्यावर योगा असं त्यांनी व्यायाम हेच ध्येय आणि उपजीविकेचं साधन म्हणून निवडलं आहे.
===
हे ही वाचा – जिम न लावता घरच्या घरी वजन आटोक्यात आणायच्या या पद्धती वापरून बघाच!
===
प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी ३० मिनिटं रोज चाललं पाहिजे आणि असं आठवड्यातून कमीत कमी ४ दिवस केलं पाहिजे असा सल्ला ब्रेगेन्झा नेहमीच देत असतात. लहानपणी डान्सर बनण्याचं ध्येय ठेवणाऱ्या ब्रेगेन्झा यांनी फिटनेस क्षेत्रात केलेली प्रगती आणि त्याद्वारे इतरांना दिलेली करिअरची दिशा, लोकांमध्ये निर्माण केलेली व्यायामाची आवड ही कौतुकास्पद आहे.
मनासारखी शरीरयष्टी मिळवण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट कोणती आहे ? या प्रश्नाचं उत्तर देतांना त्या म्हणतात, की ‘सर्वात आधी तुमच्या इच्छाशक्तीवर काम करा. ती जर का चांगली असेल तर काहीही करणं शक्य आहे.’
आपल्या जीवनशैलीत सुद्धा आपण त्यांनी दिलेल्या या टिप्स वापरून सुडौल शरीरयष्टी नक्कीच मिळवू शकतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.