Site icon InMarathi

निंदा-नालस्ती, बोचऱ्या शब्दांमुळे हताश होण्याऐवजी त्यातूनच घ्या प्रेरणा; वाचा ९ कानमंत्र!

guru abhishek bachchan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“निंदकाचे घर असावे शेजारी” अशी एक म्हण आहे. ह्या म्हणीतून घ्यायचा बोध असा की कोणी जर तुमच्यातील नकारात्मक बाबी तुमच्या निदर्शनास आणून दिल्या तर त्याचा स्वीकार करा. याने तुम्हाला आणखी यश मिळवण्यात मदत होईल.

टीका, मग ती कोणीही केलेली असो, बॉसने किंवा कोण्या नातेवाईकाने, ती जिव्हारी लागतेच. काही लोकांचा अगदीच संताप संताप होतो. इगो दुखावल्यासारखे ते डूख धरून बसतात आणि समोरच्याला हानी पोचवण्याच्या संधी शोधत राहतात.

 

 

त्यांना हे मात्र जाणवत नाही, की जी ऊर्जा सत्कारणी लागली असती ती लोकांबद्दल नको नको ते विचार करण्यात, राग धरण्यात वाया जाते आणि त्या दिवसातील एकही काम व्यवस्थित होत नाही. शिवाय आपल्या जवळच्या लोकांवर सुद्धा चिडचिड करून आपण आपले नातेसंबंध खराब करून घेतो. ज्यामुळे फायदा काहीच होत नाही. खरंतर नुकसानच होत असतं.

नकारात्मक कॉमेंटवर, कोणी केलेल्या निंदेवर आपलं काय वागणं असलं पाहिजे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

===

हे ही वाचा – नात्यात सतत भांडणं होताहेत ? नातं फुलवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील

===

१) लक्षपूर्वक ऐका

समोरच्या व्यक्तीने तुमच्याबद्दल तुमच्या स्वभावाबद्दल, सवयीबद्दल जर काही नकारात्मक गोष्ट बोलून दाखवली असेल तर न चिडता, समोरच्याचे म्हणणे नीट ऐका.

त्याचे मुद्दे काय आहेत, आपण खरंच असंच वागतो का?, आपल्या चुकांमुळे दुसऱ्याला त्रास होतो आहे का? यावर विचारमंथन करा.

समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललंय याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करा. काही कमेंट न करता, प्रतिवाद न घालता नुसतं ऐकून घेतल्याने सुद्धा अनेक समस्या सोडवता येऊ शकतात.

 

 

२) स्वतःला प्रश्न विचारा

समोरच्या व्यक्तीने नकारात्मक टिप्पणी केल्यास, त्यामागे त्याचा उद्देश काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. हे केल्याने एखादी व्यक्ती आपल्याबद्दल कडवट मत का बनवते, आपण काय करायला हवं ज्याने हे टाळता येईल, काय केलं म्हणजे आपलं वागणं सुधारता येईल हे आपल्याला समजते.

निंदेमागचं कारण लक्षात येत नसल्यास, त्याने ही टिप्पणी का केली याबद्दल विचार करा.

 

 

३) कोणाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करू नका

कोणी कोणत्याही हेतू ने तुमच्या बद्दल वाईट टिप्पणी का केली असेना, त्यांना प्रत्युत्तर देऊ नका. शब्दाने शब्द वाढतो आणि वाद विकोपाला जाऊन नेहमीसाठीची ताटातूट होऊ शकते.

 

 

उलट शांतपणे ऐकून घ्या. ती व्यक्ती कशी चुकीची आहे हे सिद्ध करण्यात आपलाच बालिशपणा दिसून येतो. त्यामुळे ऐका आणि सोडून द्या.

४) वेळ घ्या

समोरच्याने काय टिप्पणी केली यावर राग धरून न बसता, त्यांना आपली चूक सुधारण्यासाठी वेळ मागा. थोडावेळ शांतपणे बसून स्वतःसोबतच वेळ घालवा.

 

 

याने आपण परिस्थितीवर पुनरावलोकन सुद्धा करू शकतो आणि काय वाईट काय बरोबर, कोण चुकतंय हे ही जाणून घेऊ शकतो.

५) टिकांना सकारात्मकपणे सामोरे जा

तुमचे टिकाकारच तुमचे शुभचिंतक असतात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमच्याबद्दलची टीका जास्त आक्रमक नसते तोपर्यंत ती टीका का केली गेली आहे याचा विचार करा. स्वतःला सुधरवा.

 

===

हे ही वाचा – प्रेमासाठी स्वतःच्या या ८ गोष्टी बदलल्या तर नात्यात तुमचं अस्तित्व हरवून बसाल

===

६) उत्तर द्या

कामाच्या ठिकाणी, नाते संबंधांमध्ये कोणी इर्ष्ये पोटी तुमच्या बद्दल वाईट गोष्टी पसरवत असेल तर गप्प राहू नका. त्या व्यक्तीला वेळीच ओळखून जाब विचारा आणि सगळ्यांसमोर खरं खोटं करुन घ्या.

 

 

अशा व्यक्तींमुळे तुमच्या करियरचे नुकसान होऊ शकते, नाते संबंध खराब होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी बोला.

७) माफी मागा

तुम्ही जरी एखादी गोष्ट केली नसेल पण तुमच्या बद्दल तसे बोलले जात असेल आणि या सगळ्यामुळे वातावरण फार तापलेले असेल तर तुम्ही तात्पुरती माघार घेउन माफी मागा. याने वातावरण शांत होईल, भडकलेली डोकी शांत होतील.

 

 

शांत झाल्यावर, वाद थोडा निवळल्यावर नीट बसून समोरच्या व्यक्तीशी स्पष्ट बोला. काय त्रास आहे, आपली खरंच काही चूक आहे का हे विचारा आणि गैरसमज झाले असल्यास ते मिटवण्याचा प्रयत्न करा.

८) टिप्पण्या मागा

तुम्ही दर काही काळानंतर स्वतः बद्दल, स्वतःमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल आणि स्वतःच्या कामात होणाऱ्या बदलांबद्दल लोकांकडून प्रतिक्रिया मागा.

 

 

याने तुम्ही दुसऱ्यांना तुमच्याबद्दल काही गोष्टी पसरवण्याची संधी न देता स्वतः त्यांच्याकडून मतं जाणून घेऊन स्वतःची प्रगती किती होते आहे याबद्दल जाणून घेऊ शकता.

९) दुर्लक्ष करा

कितीही प्रयत्न केले, तुम्ही कितीही चांगले वागलात तरी जगात अशी कोणी ना कोणी व्यक्ती असेलच जिला तुम्ही संतुष्ट करू शकणार नाही.

त्यामुळे कोणी निंदा केली आणि पूर्ण प्रयत्न करूनही त्या व्यक्तीचे मत बदलणार नसेलच, तर दुर्लक्ष करणं योग्य ठरेल. याउलट, ती व्यक्ती अजून दुसऱ्या टोकाला जात असेल तर अशा व्यक्तीला समजावणं सोडून द्या. तिच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य ठरेल. उगाच अशा व्यक्तींना उत्तरे देण्यात आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका.

 

 

यापैकी कोणतीही टीप वापरली तरी ती उपयोगात येईल. टीका करणाऱ्या व्यक्तीची टीका ही बरेचदा आपण काय प्रतिक्रिया देतो यावर अवलंबून असते.

त्यामुळे समोरच्या व्यक्तीने निगेटिव्ह कमेंट केल्यावर तिला समजून घेऊन, अशा कमेंट मागची भावना आणि हेतू समजून घेऊन त्यानुसार कृती करणं आवश्यक असतं.

कोणती टीका गंभीरपणे घ्यायची आणि कोणती सोडून द्यायची हे ज्याला उमगलं तो जिंकला. कारण जमाना लाईक आणि कमेंट्सचा आहे. त्यात आपण स्वतःला कसे सांभाळतो यावर पूर्ण खेळ अवलंबून आहे.

===

हे ही वाचा – संसारात या १० बाबींची काळजी घ्या, नाही तर परिस्थिती घटस्फोटापर्यंत जाऊ शकते!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version