Site icon InMarathi

शंकर आणि विष्णूची एकत्रित पुजा होणाऱ्या या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशाला लाभलेला संस्कृती आणि मंदिरांचा वारसा हा अनमोल आहे. आपल्या देशात अशी कित्येक मंदिरं आणि त्यांची रहस्य आहेत जी अजूनही लोकांसमोर आलेली नाहीत.

देशातील प्रत्येक मंदिराला स्वतंत्र इतिहास आहे. त्यामागच्या कित्येक गोष्टी, दंतकथा आपण थोरामोठ्यांकडून बऱ्याचदा ऐकल्या असतील. भारत देश म्हणजे मंदिरांचा देश अशीही आपली ओळख आहे.

 

 

ओडीसामधील भुवनेश्वर येथे असणारं प्राचीन लिंगराज हे एकमेव असं मंदिर आहे जिथे शिव आणि हरी यांची एकत्रित उपासना केली जाते.

 

 

अकराव्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर सोमवंशी राजा जजाती केसरी यानं बांधलं असल्याचं सांगितलं जात असलं तरीही इतिहासकारांच्यामते या मंदिराचे संदर्भ सहाव्या आणि सातव्या शतकातील पांडुलिपीमधेही आढळतात.

===

हे ही वाचा छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या या मंदिरात रावण आणि त्याच्या पित्याने तपस्या केली होती!

===

हे एकमेव असं मंदिर आहे जिथे महादेव आणि विष्णू यांचं एकत्र वास्तव्य आहे. हिंदूंचं श्रध्दास्थान असलेल्या मंदिरात दरवर्षी लाखोंच्या संखेनं हिंदूधर्मिय याठिकाणी दर्शनाला येत असतात.

या मंदिराच्या आत केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. मात्र याचा अर्थ असा नाही की इतरधर्मीय शिवहरीचं दर्शन घेऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठीही चबुतरा बांधून दर्शनाची खास सोय करण्यात आलेली आहे.

 

 

लिंगराज मंदिर प्रांगणात जवळपास ५० छोटी छोटी मंदिरं आहेत. इतकंच नाही तर मंदिरात दररोज २२ सेवा पूजा केल्या जातात.

इतिहासकारांच्यामते हे मंदिर ११ व्या शतकात बांधण्यात आलं. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर सहाव्या आणि सातव्या शतकातलं असावं कारण सातव्या शतकातील काही संस्कृत लेखांत या मंदिराचे संदर्भ आढळतात.

या मंदिराची बांधणी अत्यंत देखणी असून प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राचं हे उत्तम उदाहरण आहे. कलिंग आणि उडिया अशा मिश्र शैलीतील हे बांधकाम आजही उत्तम स्थितीत आहे.

या मंदिर बांधणीसाठी बलुआ दगडाचा वापर केलेला आहे. मंदिराच्या कळसाचा आकार हा पिरॅमिडसारखा त्रिकोणी ठेवलेला असून त्याच्या माथ्यावर उलटी घंटी आणि कलश यांची स्थापना केलेली आहे.

अडीचलाख चौ.फ़ूट. इतक्या विस्तीर्ण परिसरात हे मंदिर बांधलं गेलं आहे. या मंदिराला बिंदूसागर जलाशयाचा सुंदर परिसर लाभलेला आहे.

 

 

पुराण कथांनुसार या जलाशयाची निर्मितीही भगवान शंकरांनी केलेली आहे. या मंदिराचं बाह्य भागातलं कोरीवकाम बघून विश्वास बसणं कठीण आहे की हे मानवनिर्मित आहे.

अत्यंत कोरीव आणि सफाईदार असं हे काम बघताना हरपून जायला होतं. या मंदिराची उंची ५५ मीटर आहे. मंदिरात चार मुख्य भाग आहेत. गर्भ गृह, यज्ञ शैलम, भोग मंडप आणि नाट्यशाळा!

===

 

या मंदिरात दर्शन घ्यायचं तर सर्वात आधी बिंदुसागर तलावात स्नान करावं लागतं. त्यानंतर गोपालनी देवी आणि नंदीची पूजा करावी लागते त्यानंतरच लिंगराजाच्या दर्शनाला पुढे जाता येतं.

याठिकाणी आठ फ़ूट रुंद आणि एक फ़ूट उंच असं स्वयंभू शिवलिंग आहे. हे शिवलिंग ग्रॅनाईटचं असून असं मानलं जातं की, भारतात जी द्वादश ज्योतिर्लिंग आहेत त्या सर्वांचा अंश या लिंगात आहे. म्हणूनच याला लिंगराज असं संबोधलं जातं.

आश्चर्याची बाब म्हणजे, याठिकाणी शिवलिंगाच्या मधोमध चांदीचा शाळीग्राम आहे. जसं काही भगवान शंकरांच्या हृदयात भगवान विष्णू विसावले आहेत. इथले क्षेत्रपती अनंत वासुदेव असल्यानं त्यांच्या पूजेनंतर लिंगराजाची पूजा करण्याचा प्रघात आहे.

 

 

या मंदिराशी संबंधीत एक कथा सांगितली जाते, या कथेचा संदर्भ पुराणातही आढळतो. कथा अशी आहे की, एकदा भगवान शंकरांनी माता पार्वतिंशी भुवनेश्वर शहराची चर्चा केली. मात्र ते नेमकं कोठे आहे हे सांगितलं नाही.

पार्वतीमातानी निश्चय केला की त्या हे शहर शोधूनच परततील आणि मंदिराच्या शोधात त्या निघाल्या. गायीचं रुप धारण करून त्या भुवनेश्वर शोधायला बाहेर पडल्या.

कृती आणि वासा या नावाचे दोन राक्षस गायरुपी पार्वतीमातेला भेटले आणि ते तिच्यावर लुब्ध झाले. तिच्यासमोर त्यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. माता पार्वतिंनी या प्रस्तावाला विरोध करूनही राक्षसांनी त्यांचा पिच्छा काही सोडला नाही.

अखेरीस माता पार्वतींनी या दोघांचा नाश केला. या युद्धानंतर माता पार्वती यांना तहान लागली आणि भगवान शंकर अवतरले.

 

 

त्यांनी एक विस्तिर्ण पात्र बनवून त्यात सर्व पवित्र नद्यांना आगमन करायला सांगितलं. भगवान शंकरांच्या आदेशानुसार सर्व नद्या या पात्रात अवतरल्या आणि निर्मिती झाली, बिंदू सरस तलावाची.

यानंतर भुवनेश्वर शहराची निर्मिती झाली. असं सांगितलं जातं की या शहराच्या निर्मितीनंतर भगवान शिव आणि पार्वतीमाता यांचं याठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य होतं. या शहराचं नावही माता पार्वतींवरून पडलं आहे कारण भगवान शिव यांची पत्नी याठिकाणी भुवनेश्र्वरी या नावानं परिचित आहे.

असं सांगितलं जातं की, मध्ययुगात याठिकाणी सात हजाराहून अधिक मंदिरं होती. आता यापैकी केवळ पाचशे शिल्लक आहेत.

सुरुवातीच्या काळात भगवान शंकरांची पूजा कीर्तिवास रूपात केली जात असे. त्यानंतर हरिहर या नावानं त्यांची पूजा केली जाऊ लागली. या मंदिरात महाशिवरात्र मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते.

श्रावणात हजारो भक्त महानदीतून पाणी भरून आणून पिंडीवर अभिषेक करतात. भाद्रपद महिन्यात सुनियन दिवसाचं आयोजन केलं जातं. या दिवशी मंदिरातील सेवक, शेतकरी आणि इतर भक्त लिंगराजाला निष्ठा आणि श्रध्दांजली अर्पण करतात.

 

 

याशिवाय मंदिरात २२ दिवस चालणारा चंदन यात्रा सणही मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. या मंदिरात मिळणारा महाप्रसाद लोकप्रिय आहे. मातीच्या भांड्यात पुजारी वर्गाकडूनच हा प्रसाद बनविला जातो.

बिंदूसागर तलावात स्नान केल्यानं पापमुक्ती होते अशी श्रध्दा असल्यानं दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक याठिकाणी येत असतात.

===

 या मंदिरातील देवीची मूर्ती बघण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका, नाहीतर…!

विचित्र वाटेल, पण घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलांना हे मंदिर देतं आश्रय….!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version