Site icon InMarathi

जगातल्या प्रत्येक पुरुषाच्या मनातली दाढी करायची भीती घालवणारी “क्रांति”…!

gillette featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पुरुषांनी टापटीप दिसणं ही आजच्या कॉर्पोरेट जगाची गरज आहे. अव्यवस्थित दिसणारे लोक हे नेहमीच कामाच्या ठिकाणी मरगळ आणत असतात. स्वच्छ, कडक इस्त्री केलेला ड्रेस, व्यवस्थित केस, क्लीन शेव किंवा निगा राखलेली दाढी हा जॉब करणाऱ्या लोकांचा एक पॅटर्न मानला जातो.

भारतीय क्रिकेट खेळाडूंनी मधल्या काही काळात दाढी, स्टायलिश रहाण्याची इतकी क्रेझ निर्माण केली आहे की, पुरुषांच्या सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंचा खप प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

 

 

जावेद हबीब सारख्या लोकांमुळे ‘मेन ग्रुमिंग’ हे एक करिअरचं माध्यम असू शकतं हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे.

आजच्या पिढीला हे कदाचित माहीत नसेल की, एक काळ असा होता जेव्हा लोक दाढी करायला सुद्धा घाबरत होते. पहिल्यांदा दाढी करतांना चुकून ब्लेड लागलं, थोडं रक्त आलं की बरीच माणसं घरी दाढी करणं सोडून द्यायचे.

===

हे ही वाचा ब्रिटिशांनी चक्क दाढी करण्यापासून टोपी वापरण्यापर्यंत या ९ गोष्टींसाठी कर लावला होता!

===

ते दाढी करण्याचे दिवस ठरवायचे आणि न्हाव्याकडूनच दाढी करायचे. घरातील वयस्कर मंडळींसाठी न्हावी घरीच बोलावले जायचे. कुठे बोललं जायचं नाही, पण लोकांच्या मनात दाढी करण्या बद्दल एक भीती बसली होती.

ही भीती त्यावेळी निघून गेली जेव्हा ‘जिलेट’ म्हणजेच ‘Gillete’ कंपनीने बाजारात त्यांचे ‘रेझर’ आणले आणि या क्षेत्रात एक वेगळीच क्रांति घडवून आणली. ब्लेड बदलण्याची गरज नाही, ब्लेड लागण्याची भीती नाही अशी रचना असलेले जिलेटचे साहित्य फार कमी वेळात लोकप्रिय झाले.

 

 

कोण आहेत हे जिलेट? काय केल्याने त्यांच्या ‘Gillete’ ब्रँड वर लोकांचा इतका विश्वास बसला की, त्यांच्या वस्तू घराघरात पोहोचल्या? जाणून घेऊयात.

सुरुवात

‘किंग कॅम्प जिलेट’ हे जिलेट ग्रुपचे संस्थापक आहेत. त्यांचा जन्म ६ जानेवारी १८५५ मध्ये अमेरिकेतील विस्कॉईन या शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. या पूर्ण कुटुंबाला विविध विषयांमध्ये संशोधन करण्याची आवड होती.

किंग कॅम्प जिलेट ४ वर्षाचे असतांना त्यांचे वडील आणि परिवार शिकागोला स्थलांतरित झाले. तिथे त्यांनी मशिनरी आणि हार्डवेअरच्या वस्तूंचं दुकान सुरू केलं.

दुकानाच्या कामासाठी जिलेट हे नेहमीच वडिलांसोबत न्यूयॉर्कला जायचे आणि धातू, लोखंड सारख्या वस्तूंचा व्यापार करायला शिकले.

जिलेट यांनी वयाच्या १७ व्या वर्षी शाळा सोडली आणि सेल्समन म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरी करत असताना त्यांचं धातूच्या वस्तूंवर संशोधन सुरू होतं. कमी वेळातच त्यांनी स्वतःच्या नावावर ४ वस्तूंचं पेटंटची नोंद केली.

तरीही त्यांना अपेक्षित असं यश मिळत नव्हतं. जिलेट या संशोधन कार्यानंतर सुद्धा स्क्रॅप विकण्याचंच काम करत होते.

 

 

१८९५ मध्ये म्हणजे वयाच्या ४० व्या वर्षी जिलेट यांनी आपल्या जन्मस्थळी विस्कॉईन इथे जाऊन एका प्लास्टिक कंपनीमध्ये सेल्सची नोकरी करायचं ठरवलं.

या कंपनीच्या मालकांनी जिलेट यांना लोकांच्या गरजेच्या वस्तूचा शोध लावण्याचं काम सांगितलं. ही वस्तू अशी असावी की, लोकांना सतत त्याची गरज असावी आणि सवय लागल्यावर लोकांनी ती वस्तू परत आपल्याकडूनच घ्यावी.

पिंटर या जिलेटच्या बॉस सोबत ते चर्चा करायचे. जिलेट हे संशोधन केलेल्या वस्तूंबद्दल सांगायचे आणि पिंटर त्यांच्या संशोधनाला नकार द्यायचे.

===

हे ही वाचा अनंत अडचणींमधून मार्ग काढत ३६ वर्ष टिकवला आईस्क्रीम ब्रँड – फक्त २ कारणांच्या जोरावर!

===

१९०१ मध्ये सहा वर्ष संशोधनाला दिल्यानंतर ‘रोज सहज दाढी करता येईल असं रेझर’ या संशोधनाला पिंटर यांनी हिरवा झेंडा दिला. लोकांना ही संकल्पना मान्य होईल की नाही? याबद्दल पिंटर आणि त्यांची कंपनी साशंक होते. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी आकर्षक जाहिराती करायचं ठरवलं.

पहिली जाहिरात :

एका लहान बाळाच्या चेहऱ्यावर फोम लावल्याचं चित्र वापरण्यात आलं. वर्तमानपत्रात आलेल्या या जाहिरातीखाली हे शीर्षक देण्यात आलं, “लवकर सुरुवात करा, स्वतः करायला सुरुवात करा.” या जाहिरातीने लोकांचं लक्ष वेधलं आणि लोकांनी रेझरला सुरक्षित दाढी करण्यासाठी आवश्यक वस्तू अशी मान्यता दिली.

 

 

जिलेटची पुढची युक्ती ही होती की, अमेरिकन आर्मीच्या प्रत्येक सैनिकाला एक रेझरचं पॅक देण्याचं जाहीर केलं. पहिल्या महायुद्धाचा तो काळ होता. जिलेट कंपनीने ही वेळ साध्य करून ‘वॉर रेडी पॅकेज’ ही टॅगलाईन वापरून ३५ लाख जिलेट रेझरची विक्री केली.

जिलेटने लोकांमध्ये ही संकल्पना रुजवण्यासाठी रोज वर्तमानपत्रात रेझर बद्दल लेख लिहिण्यास सुरुवात केली. जुन्या ब्लेड्सपासून कशी सुटका मिळवावी? ही जाहिरातीची पद्धत लोकांना खूप आवडली.

जाहिरातीमध्ये स्वतःला लोकांच्या समोर येणे:

२० व्या शतकाच्या सुरुवातीला जिलेटने हा नवीन पायंडा पाडला की, ते आपल्या एमडीएच मसालेच्या काकांसारखे स्वतः जाहिरातीत लोकांना दिसू लागले. रेझरच्या कव्हर वर त्यांचा फोटो ते लावू लागले.

आपला फोटो लावण्यामागे त्यांनी हे कारण सांगितलं की, “जर हे रेझर तुम्हाला आवडलं नाही तर मी तुम्हाला ते परत वापरण्यासाठी आग्रह करणार नाही.”

 

 

आपल्या प्रॉडक्ट, डिझाईन वर इतका विश्वास असलेले जिलेट हे स्वतः लोकांकडून त्यांच्या रेझरबद्दल अभिप्राय घ्यायचे. रेझरची ब्लेड पातळ असावी, सहज बदलता येईल अशी असावी आणि गंज पकडणारी नसावी.

हे साध्य करण्यासाठी त्यांनी ब्लॅकस्मिथ, विलियम आणि निक्सन सारख्या धातू आणि रसायनशास्त्रातील तज्ञांसोबत चर्चा केली. सहा वर्ष संशोधन केल्यानंतर त्यांनी अश्या प्रकारच्या ब्लेड्स स्वतःच तयार करण्याचा निर्णय घेतला.

जिलेट यांनी या ब्लेड्सच्या संशोधन आणि ब्लेड्स तयार करण्याच्या प्रक्रियेवर इतका खर्च केला की, एक वेळ अशी आली त्यांच्यासमोर प्रचंड कर्जाचं डोंगर उभं राहिलं. लोकांनी त्यांच्या ब्लेडच्या डिझाईनला नाकारलं होतं.

मार्केट मधून पैसे येणं बंद झालं होतं. कर्ज फेडण्यासाठी जिलेट यांनी असमर्थता म्हणजेच ‘बँकरपसी’ घोषित केली होती. या परिस्थितीतसुद्धा जिलेट यांनी हार मानली नाही आणि अमेरिकन सरकारने सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला.

१९०७ मध्ये गोष्टी बदलल्या. जिलेटचे ‘शेवर्स’ आणि रेझर दोन्हीचा जागतिक पातळीवर खप वाढला. या एकाच वर्षात कंपनीने जगभरात ९०,००० शेवर्स आणि १.२ करोड ब्लेड्सची विक्री केली.

जिलेटने सर्व कर्ज फेडले. ‘शेविंग जेल’ सारख्या वस्तूंवर संशोधन केलं आणि १९१० मध्ये कंपनीने आपल्या प्रॉडक्टची फौज उभी केली आणि प्रत्येक दुकान, रिटेल शेल्फवर आपलं अढळ स्थान निर्माण केलं.

१९१५ पर्यंत जिलेट यांनी स्वतः कंपनीच्या कारभाराची धुरा सांभाळली. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी कंपनीचे शेअर्स विकून कॅलिफोर्नियाला जाऊन संत्र्याची शेती करण्याचा निर्णय घेतला.

१९२५ मध्ये जिलेट कंपनी ने ‘सेफ्टी रेझर’ बाजारात आणलं. त्वचेला कमीत कमी त्रास होईल याची काळजी कंपनीने यावेळी अधिक घेतली होती. सतत संशोधन सुरू ठेवणाऱ्या जिलेट कंपनी ने १९५७ मध्ये ‘रेझर’ ची रचना बदलली, रेझरची उंची लोकांना ठरवता येईल अशी सोय केली.

 

 

एक रेझर ४-५ वेळेस वापरता येईल अशी त्यांची रचना केली. १९७१ मध्ये कंपनीने २ ब्लेड्स असलेल्या रेझरची सुरुवात केली. त्वचेला त्रास होणार नाही आणि रेझर वर चांगली पकड बसेल हा जिलेटच्या येणाऱ्या प्रत्येक संशोधनाचा गाभा होता.

हे साध्य करत असतांना जिलेटने या मार्केट वर सुद्धा आपली पकड घट्ट केली याचं विशेष कौतुक झालं. ‘किंग कॅम्प जिलेट’ यांनी निवृत्ती नंतरही आपलं संशोधन कार्य सुरू ठेवलं होतं. त्यांनी तेलावर संशोधन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यामध्ये यश आलं नाही.

आपल्या मुलाला शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न पण ते पूर्ण करू शकले नाहीत आणि या धक्क्याने त्यांचा ९ जुलै १९३२ रोजी वयाच्या ७७ वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

जिलेट हे जगाला सोडून गेले. पण, कंपनीचा प्रवास अजिबात थांबला नाही. आज जिलेट ही रेझर, ब्लेड्सची जगातील सर्वाधिक विक्री करणारी कंपनी आहे.

===

हे ही वाचा हे ब्रॅण्ड्स तुम्हाला “भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत!

===

 

एका सर्वेक्षणानुसार, जेव्हा इतर ब्लेड्स तयार करणाऱ्या कंपनीची १ ब्लेड विकली जाते, तितक्याच वेळात जिलेटच्या ५ ब्लेड्स विकलेल्या असतात. २००५ मध्ये जिलेटच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रॉक्टर आणि गॅंबल म्हणजेच P&G या ग्रुप मध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला.

आज जिलेटचे शेविंग किट हे जगभरात आणि अंतरळवीरांमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय आहे. लोकांना एका प्रकारे दाढी करण्यास आणि सोबतच त्वचेची काळजी घ्यायला शिकवण्याबद्दल आपण Gillete चे आभार मानले पाहिजेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version