आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
चलो मन गंगा जमना तीर.. पायो जी मैंने राम रतन धन पायो..ठुमक चलत रामचंद्र ही लोकप्रिय भजनं ऐकली आहेत का? साधारणपणे जुन्या पिढीतील लोकांनी या आणि अशा अनेक भजनांचा मनमुराद आनंद लुटला तो आकाशवाणीच्या माध्यमातून.
कारण तेव्हा केवळ आकाशवाणी हेच एकमेव मनोरंजनाचे साधन होते आणि त्यावर प्रसारीत होणारे कार्यक्रम सुद्धा दर्जेदार असत. या अशा सुंदर भजनांनी लोकांना भक्तीरसात न्हाऊ घालणारा हा सुंदर आवाज होता विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा.
गांधीजींच्या सभांच्या वेळी स्टेजवर जी रामधून वाजे ती पलुस्करांनीच म्हटलेली आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला लोकप्रिय करण्यात पलुस्करांचा खूप मोठा वाटा आहे. इतकंच नव्हे तर त्यावेळी असलेल्या धूनींचा स्वरलिपी म्हणजे नोटेशन्स बनवून ठेवून त्यांनी पुढील पिढ्यांसाठी कितीतरी मोलाचं काम करुन ठेवलं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लाहोर येथे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय स्थापन करणारा मराठी माणूस म्हणजे विष्णू दिगंबर पलुस्कर.
काळाची गती किती तीव्र असते बघा. नव्या पिढीला विष्णू दिगंबर पलुस्कर हे नांव केवळ भजनांपुरतंच माहिती आहे. पण याहूनही कितीतरी मोठा आलेख आहे त्यांचा!
विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड या गावी १८ आॅगस्ट १८७२ साली झाला. पुढं डोळ्याजवळ फटाका उडाल्याने त्यांची दृष्टी गेली.उपचारांसाठी जवळच असलेल्या मिरज या ठिकाणी ते गेले. तरीही त्यांना संगीत शिकायचं होतं.
मिरजेतील बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे धडे गिरवले. बारा वर्षं संगीताची तालीम घेतली. कठोर साधनेने ते खरोखरच चांगले गायक झाले पण बुवांशी काही कारणाने वाद झाले.
पुढै पुढे त्यांना जाणवलं, एकंदरीत भारतात गायकीचे धडे देणारी विविध घराणी आहेत आणि त्यांचे मतभेदही आहेत. आगरा, इंदौर, जयपूर, किराणा आणि पटियाला, ही वेगवेगळी घराणी. यात असलेले वाद विवाद, घराण्याच्या गुरुंची संकुचित वृत्ती हे पाहून पलुस्करांना खूप वाईट वाटलं. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा उद्धार करण्यासाठी यात्रा आरंभली.
–
हे ही वाचा – बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!
–
या यात्रेत त्यांना खूप काही नवं शिकायला मिळालं. याचवेळी मथुरेत राहून ध्रुपद गायकी आत्मसात केली. केवळ ती शिकण्यासाठी त्यांनी मथुरेची ब्रज बोलीपण शिकून घेतली. कारण बऱ्याच बंदिशी ब्रज भाषेत लिहीलेल्या आहेत.
पुढे ते पंजाब मधून लाहोरला गेले. १९०१ साली लाहोरमध्ये त्यांनी गांधर्व विद्यालयाची स्थापना केली. या स्थापनेचा उद्देश होता भारतीय शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहोचावं आणि जास्तीत जास्त गायक तयार व्हावेत. त्यांनी त्यासाठी जाहीर कार्यक्रम पण केले. पलुस्कर हे पहिले गायक होते ज्यांनी शास्त्रीय संगीताचे असे सार्वजनिक कार्यक्रम केले.
त्याकाळी संगीत शिकणं इतकं सोपंही नव्हतं. एक तर विविध गायकी घराण्यांतील तेढ, गुरुंची संकुचित वृत्ती यामुळे संगीत शिकण्याची इच्छा असली तरी शिकायला फार वणवण करावी लागे. सहजासहजी कुणीही संगीत शिकवायला तयार होत नसत. हीच गोष्ट लक्षात घेतली आणि पलुस्करांनी गांधर्व महाविद्यालय स्थापन केले.
विविध स्तरांवरील संगीत परीक्षांच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा म्हणून काम करणाऱ्या भारतातील अग्रगण्य संस्थांपैकी एक म्हणजे भारतीय गांधर्व महाविद्यालय. या महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगले गायक तयार केले.
या शिष्यांमध्ये पं.ओंकारनाथ ठाकूर, पं.विनायकराव पटवर्धन, पं. नारायण राव आणि त्यांचे चिरंजीव डी.व्ही. पलुस्कर ही दिग्गज मंडळी आहेत.
लाहोर येथे भारतीय गांधर्व महाविद्यालय स्थापन करणारा हा मराठी माणूस. या महाविद्यालयाच्या स्थापनेची इतकी ओढ होती त्यांना की ते उभारण्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं. असं म्हणतात की गिरनार पर्वतावर जाऊन त्यांनी दत्तगुरुंचा आशीर्वाद घेतला होता आणि त्यांच्या आदेशानुसार हे महाविद्यालय स्थापन केलं.
मुंबईत पण त्याची शाखा सुरू केली. ती फारशी चालली नाही. तर त्या कर्जापायी त्यांच्या मालमत्तेवर टाच आणली पण त्यांचं संगीत विद्यालयाचं प्रेम काही कमी झालं नाही.
आपलं वंदे मातरम् हे पण पलुस्करांनीच स्वरबद्ध केलं आहे. रघुपती राघव राजाराम हे भजन, रामचरित मानस वर संगीतमय प्रवचने, हे सारं कधी सशुल्क कधी निःशुल्क करुन लोकांत संगीताची आवड निर्माण केली. संगीत परिषदांचे आयोजन करुन विविध प्रदेशांतील प्रादेशिक संगीताचा प्रसार करण्याचे काम पलुस्करांनी केले.
तुलसीदास, सूरदास, कबिर या संतांच्या रचना त्यांनी वेगवेगळ्या शैलीत गाण्याचे प्रयोग केले आणि ठुमरी, शृंगार, या शैलीप्रमाणे भजन ही शैली विकसित केली. भारतीय संगीत सामान्य माणसाला समजावं यासाठी तळमळीने कार्य करणारे पलुस्कर २१ आॅगस्ट १९३१ रोजी हे जग सोडून गेले.
पण त्यांच्या माघारी त्यांचं कार्य त्यांच्या अनेक शिष्यांनी सुरू ठेवले. गांधर्व महाविद्यालयाच्या अनेक ठिकाणी शाखा सुरू केल्या आणि अनेक गाण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना गायनाने समृद्ध केले.
आजही अनेक विद्यार्थी संगीत शिकायला गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देतात विशारद होतात. आणि यासाठी अभिमानाने सांगावेसे वाटते की लाहोर येथे गांधर्व महाविद्यालय स्थापन करणारा, सगळ्या भारताला भक्तीरसात न्हाऊ घालणारा अवलिया महाराष्ट्रात जन्मला होता. खरोखर असे अनेक गंधर्व तयार करण्याची इच्छा बाळगलेला एक गंधर्व जणू महाराष्ट्रात जन्मला होता.
===
हे ही वाचा – त्यांनी बियरच्या बाटलीत फुंकर मारून संगीत बनवलंय, ज्यावर येणाऱ्या पिढ्याही फिदा होत राहतील..
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.