Site icon InMarathi

शनिवारची बोधकथा – भविष्याची चिंता करताय? मग ही कथा तुमचे डोळे उघडेल!

shanivarchi bodhkatha InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भविष्य जाणून घेण्यात रस नाही असा माणूस सापडणं दुर्मिळच! उद्या काय घडेल, माझं भविष्य कसं असेल? आणखी दहा वर्षांनी माझ्या आयुष्यात काय बदल झाला असेल? अशा अनेक प्रश्नांमागे प्रत्येक माणूस धावत असतो. म्हणूनच भविष्याची तरतुद करताना केलं जाणारं सेव्हिंग म्हणजेच भविष्यासाठी काहीतरी राखून ठेवण्याचे संस्कार भारतीयांवर लहानपणापासूनच केले जातात.

अर्थात भविष्यातील संकटं, आव्हान यांसाठी कायम सज्ज राहणं चांगलंच, मात्र हे करताना आपण वर्तमानात कितीकाळ जगतो? याचा कधी विचार केलाय का?

अनेकदा भुतकाळातील आठवणीच रमणं किंवा भविष्याची चिंता करणं यामध्ये वर्तमान मात्र जगण्याचा राहून जातो.

 

 

भविष्याची अतिरिक्त चिंता, टेन्शन यांमुळे वर्तमान अर्थात आजचा दिवस एन्जॉय करत नसाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकेल.  विश्वास बसत नाहीये? मग ही कथा तुम्हाला भविष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल.

गोष्ट एका लहानशा नगरातली, एका हुशार, प्रतिभावान जादुगाराची. लहानपणापासून ‘जादु’ या कलेलाच आपलं ध्येय मानणा-या एका कलाकाराची.

तर या जादुगाराने बालपणापासून शिकलेली ही कला मोठेपणी जपली, एव्हढचं नव्हे तर सराव आणि आपल्या कौशल्याने त्यात अनेक बदल केले आणि एक कुशल जादुगार म्हणून नावही कमावलं.

 

 

गावोगावी जादुचे प्रयोग करत असताना त्याची किर्ती ऐकून एका प्रसिद्ध राजाने त्याला आपल्या महालात आमंत्रण दिलं.

प्रत्यक्ष राजमहालात जादुचे प्रयोग करण्यासाठी आलेलं निमंत्रण पाहून जादुगार खुश झाला. आपली कला राजाला आवडली, तर प्रसिद्धी मिळेलच मात्र त्यासह मिळणा-या बक्षिसामुळे आपली आर्थिक विवंचनाही मिटेल या आशेने तो राजमहालात पोहोचला.

त्याची कला पहायला राजासह नगरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सगळ्यांना खुश करावं, आपली कला पाहून त्यांनी आश्चर्यचकित व्हावं या विचारांनी यावेळी राजाने काहीतरी भन्नाट कल्पना शोधून काढली होती.

आपल्या गुरुंनी शिकवलेली सगळी विद्या पणाला लावून त्याने प्रयोगाला सुरुवात केली आणि एकापेक्षा एक सरस जादु करत लोकांची वाहवा मिळवली. अखेरिस राजाला खुश करण्यासाठी त्याने एक प्रयोग सादर केला आणि कोणाच्याही लक्षात यायच्या आत जादुने राजाचा मुकुट गायब करून दाखवला.

 

 

हे आश्चर्य पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला मात्र राजा प्रचंड खवळला. प्रत्यक्षात राजाकडून कौतुक मिळवण्यासाठी जादुगाराने हा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा परिणाम भलताच झाला.

या अपमानासाठी राजाने जादुगाराला सात दिवसांच्या कोठडीची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर त्याला फाशी देण्यात येईल असेही फर्मान सोडले. राजाच्या आज्ञेप्रमाणे सेवकांनी निरपराध जादुगाला तुरुंगात डांबले.

 

 

सात दिवसांनी आपला मृत्यु अटळ आहे हे ठाऊक असूनही राजाच्या चेह-यावर कायम स्मितहास्य होते, राजाच्या परवानगीने दरदिवशी जादुगाराची पत्नी त्याला भेटायला कोठडीत यायची. मृत्यु समोर दिसत असूनही कायम सकारात्मक असलेल्या आपल्या पतीला पाहून आश्चर्य व्यक्त करायची. तिची चिंता, पतिच्या भविष्याबद्दलचे दुःख पाहून जादुगार तिला समजावत म्हणायचा, कशाला उद्याची बात? आजचा दिवस जगुयात, भविष्यात सगळं ठीक होईल.

अखेर सहाव्या दिवशी, अर्थात फाशीच्या एक दिवस आधी जादुगाराची पत्नी त्याला भेटायला आली. कोठडीतही रमलेला, जवळील साहित्याच्या आधारे जादुचे नवे प्रयोग करणा-या आपल्या पतीला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला, मात्र आपल्या पत्नीला रडताना पाहून पुन्हा तो हेच म्हणाला, “दुःख कशाला करतेस? प्रत्येकाला केंव्हातरी जायचंंय. मी या सात दिवसात कोठडीतही खूप काही शिकलो, तु धीर सोडू नकोस”.

अखेर त्याच्या फाशीचा दिवस उजाडला. फाशीपुर्वी राजा जादुगाराला भेटायला कोठडीत गेला, तेंव्हा जादुगार त्यावेळीही आपल्या प्रयोगांमध्ये रमला होता. गोंधळात पडलेल्या राजाला जादुगार म्हणाला, मला मृत्युचे भय नाही की दुःख नाही, मात्र दुःख या गोष्टीचे वाटते की वर्षानुवर्षाचे माझा प्रयत्न अपूर्ण राहणार. माझ्या गुरुने मला एक खास विद्या शिकवली होती, त्यानुसार मी उडणारा घोडा बनवण्याचा प्रयत्न करत होतो, केवळ एका वर्षात माझा हा प्रयोग पूर्ण होणार होता, मात्र फाशीने माझं हे स्वप्न पूर्ण होणार नाही.

हे ऐकून राजा विचारात पडला. खरंच या जादुगाराने उडणारा घोडा बनवला तर त्याचा फायदा राज्याला होईल, त्या घोड्याच्या बळावर मी अनेक युद्ध जिंकू शकेन. या विचाराने राजानेे जादुगाराच्या फाशीची शिक्षा रद्द केली आणि त्याला एका वर्षाची मुदतवाढ दिली.

पुढील वर्षी त्याने हा अविष्कार तयार केल्यानंतर त्याला जुन्या अपराधासाठी फाशी देऊ असा विचार मनात करत राजा निघून गेला.

जादुगार घरी परतला मात्र त्याच्या घरी याबाबत काहीच कल्पना नसल्याने त्याच्या फाशीचा विचार करत कुटुंबिय शोक करत होते. जादुगाराला जिवंत पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना.

जादुगार पुन्हा एकदा हिरीरीने कामाला लागला. नवे नवे प्रयोग करत होता. सकारात्मकतेने प्रत्येक दिवस साजरा करत होता. त्याची पत्नी मात्र भविष्यातील त्याच्या फाशीच्या भितीने दररोज अश्रु ढाळत होती.

 

भविष्याची चिंता न करता जादुगाराने आपले परिश्रम कायम ठेवले. त्यातून त्याने अनेक नवे अविष्कार घडवले.

 

 

वर्षभराने पुन्हा एकदा तो राजदरबारात दाखल झाला. राजासमोर त्याने अनेक नवे प्रयोग सादर केले, यावेळी ‘उडणारा घोडा’ काही साकारता आला नाही मात्र त्याहूनही थक्क करणारे अविष्कार त्याने राजाला करून दाखवले.

त्याचे कौशल्य पाहून राजा थक्क झाला. त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा आपण त्याला देत असल्याची चूक राजाच्या लक्षात आली. त्याने जादुगाराची माफी मात त्याचा सन्मान केला,

जादुगार म्हणाला, हे सारं शक्य झालं ते केवळ मेहनतीच्या बळावर, अर्थात इतरांप्रमाणे मी देखील भविष्यात येणा-या संकटातची भिती बाळगून निष्क्रिय राहिलो असतो, तर माझे परिश्रम खुंटले असते, परिणामी आज मला हे नवे जीवनही सापडले नसते. उडणा-या घोड्याबाबत जरी मी खोटं बोललो असलो, तरी ती फसवणूक नसून केवळ राजाच्या चुकीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी लढवलेली शक्कल होती.

जादुगाराने राजाला त्याची चुक शब्दांतून नव्हे तर कृतीतून समजावून दिली. एकीकडे भविष्यात मृत्युसारख्या भीषण संकटाची भिती असूनही वर्तमानात सकारात्मक राहिलेल्या जादुगाराने जसे मृत्युचेही संकट परतवून लावले तसेच आपणही भविष्याची चिंता न करता वर्तमानात क्रियाशील राहिलो तर येणारा भविष्यकाळ निश्चित सोपा आणि अधिक यशस्वी असेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version