Site icon InMarathi

अवघ्या ३००० जवानांनिशी पाकिस्तानच्या २,६४,००० सैनिकांना गुडघे टेकायला लावणारा भारतमातेचा वीर सुपुत्र!

modi-gen-jfr-jacob Feature Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

१९४७ साली भारताला जुलमी ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हाच झालेल्या देशाच्या फाळणीतून मिळाली एक अखंड भळभळणारी जखम! अखंड धगधगत असलेले काश्मीर खोरे आणि कट्टर शत्रू पाकिस्तान! जेव्हापासून पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासूनच भारत पाकिस्तानचे संबंध शत्रुत्वाचेच राहिले आहेत.

पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नेहमी सीमेवर अशांतता राहावी या उद्देशाने कारवाया करीत असते आणि काश्मीर खोऱ्यात दहशतवादी पाठवून काश्मीर खोरे देखील कसे सतत अशांत राहील ह्याची व्यवस्था करीत असते.

म्हणजे एकूणच पाकिस्तानने भारतावर सतत युद्धाचा प्रसंग आणला आहे आणि छोट्या मोठ्या घटनांसह १९४७ पासून ते १९६५, १९७१ ते १९९९ साली सीमेवर युद्ध पुकारले आहे.

 

quora.com

१९६५ च्या युद्धामध्ये खरं तर कोणाचा विजय झाला हा एक वादाचा विषय आहे, कारण दोन्ही देशांकडे स्वतःचे पुरावे आहेत. १९९९ साली तर पाकिस्तानने भारतात घुसखोरी केली त्यामुळे युद्ध झाले. ह्यात भारताला विजय मिळाला म्हणजे भारताने स्वतःची भूमी परत मिळवली व पाकड्यांना हाकलून लावले.

ह्या युद्धात भारताला स्वतःच्याच भूमीसाठी पाकिस्तानशी लढावे लागले होते आणि १९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती.

ह्या युद्धात भारताने पाकिस्तानला स्वतःच्याच भूमीवर शरणागती पत्करण्यास भाग पाडले होते आणि ह्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेशची निर्मिती झाली.

१९७१ च्या ह्या युद्धात अशा अनेक शूर सैनिकांनी पाकिस्तानला भारतापुढे गुढगे टेकण्यास भाग पाडले होते.

ह्यातील आपल्याला माहित असलेले सेनेचे वीर म्हणजे सेनेचे माजी सरसेनापती सॅम मानेकशॉ आणि जनरल जगजीत अरोडा!

 

 

पण ह्यांच्यासह आणखी एक व्यक्ती आहे ज्यांच्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानाला पराभव बघावा लागला होता. ह्या युद्धाच्या विजयाचे श्रेय बऱ्याच वेळी फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ व जनरल जगजीत अरोडा ह्यांना दिले जाते आणि तिसरे नाव जनरल जेकब ह्यांचे घेतले जाते.

जरनल जेकब ह्यांनी दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ब्रिटीश सैन्यात आपला पराक्रम गाजवला होता आणि त्यानंतर ते भारतीय सैन्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत होते.

जनरल जेकब ह्यांना युद्धाचा मोठा अनुभव होता तरीही हे युद्ध त्यांच्यासाठी वेगळे होते कारण हे युद्ध त्यांना कमीत कमी वेळात जिंकायचे होते आणि त्याशिवाय पूर्व पाकिस्तानमधील अंतर्गत प्रश्न, आणि चीन व अमेरिकेच्या राजनैतिक शक्तींशी सुद्धा लढा द्यायचा होता.

 

फिल्ड मार्शल मानेकशॉ व जगजीत अरोडा ह्यांना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच पुढील धोका ओळखून ते भारत चीन सीमेवर सेनेला तैनात ठेवू इच्छित होते. पण ह्या युद्धात सैनिकांचे संख्याबळ कमी असल्याने लेफ्टनंट जनरल जेकब एका तुकडीला स्वत:सह घेऊन गेले.

ह्या घटनेचा उल्लेख त्यांनी स्वतः आपल्या दोन पुस्तकांमध्ये केला आहे. त्यांनी जशी आधी रणनीती ठरवल्या गेली होती तसे न करता ‘खुलना’ व ‘चटगाव’ ही दोन गावे ताब्यात मिळवली आणि त्याकाळच्या पूर्व पाकिस्तानचे मुख्य शहर ढाका सुद्धा भारतीय नियंत्रणाखाली आणले.

पाकिस्तानच्या हमुदुर्रहमान आयोगात असे नमूद केले आहे की तेव्हा ढाका येथे २,६४,००० इतके पाकिस्तानी सैनिक उपस्थित होते.

पण लेफ्टनंट जनरल जेकब ह्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केवळ ३००० सैनिकांच्या तुकडीने पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडले…!

 

blogs.timesofindia.indiatimes.com

जनरल जॅक फार्ज राफेल जेकब ह्यांचा जन्म १९२३ साली कोलकाता येथे एका पारंपारिक बघदादी ज्यू परिवारात झाला. १८व्या शतकात त्यांचे पूर्वज इराकहून बंगाल मध्ये स्थलांतरित झाले होते. जेकब ह्यांनी पश्चिम बंगालच्या कुर्सियांग गावातील व्हिक्टोरिया स्कूल मधून शिक्षण घेतले. ती शाळा बोर्डिंग स्कूल असल्याने ते फक्त सुटीमध्ये घरी येत असत. तरुण असताना जेकब ह्यांना युद्धाविषयक कवितांमध्ये त्यांना रस वाटू लागला.

वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी ब्रिटीश आर्मी जॉईन केली. त्यांचे आर्मी जॉईन करण्याचे कारण नाझींशी लढा देणे हे होते. सुरुवातीला त्यांच्या ह्या निर्णयाला त्यांच्या वडिलांचा विरोध होता पण नंतर त्यांनी जेकब ह्यांच्या निर्णय स्वीकारला.

१९४२ साली महू येथील ऑफिसर ट्रेनिंग स्कूल मधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेकब ह्यांनी उत्तर इराक, उत्तर आफ्रिका , म्यानमार आणि सुमात्रा येथे जाऊन दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश आर्मी तर्फे भाग घेतला.

दुसरे महायुद्ध संपल्यावर पुढचे ट्रेनिंग घेण्यासाठी ते अमेरिका आणि इंग्लंड येथील Artillery School ला गेले. तेथे त्यांनी तोफ व मिसाईल ह्याविषयी अद्यावत ट्रेनिंग घेतले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला व तब्बल ३७ वर्ष मातृभूमीची सेवा केली. १९६३ साली ते ब्रिगेडियर झाले. १९६५ साली त्यांनी भारत पाकिस्तान युद्धात भाग घेतला होता. आणि नंतर १९६७ साली त्यांना बढती मिळून ते मेजर जनरल झाले.

 

त्यानंतर १९७१ साली भारत -पाक युद्धा दरम्यान भारतीय सेनेच्या पूर्व विभागाचे नेतृत्व त्यांनी केले. ह्या युद्धा दरम्यान संपूर्ण पूर्व पाकिस्तान आणि ढाका शहर सुद्धा ताब्यात घ्यायचा प्लान त्यांचाच होता. ह्या साठी त्यांनी मधली शहरे सोडून ढाका येथे पोचण्यासाठी सेकंडरी मार्गाचा उपयोग केला. हे सर्व केवळ १५ दिवसात घडवून आणून त्यांनी ढाका शहर भारतीय सेनेच्या ताब्यात घेतले.

१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी आर्मी कमांडर ले.जनरल ए.ए.के. नियाझी ह्यांच्याकडून सरेंडर मिळवण्यासाठी जनरल जेकब ह्यांनाच पाठवण्यात आले होते.

त्यासाठी ते फक्त एका सहकाऱ्याला बरोबर घेऊन गेले होते. ते ही निशस्त्र! त्यांनी त्यांच्याकडे असलेले सरेंडरचे दस्तऐवज नियाझींना दिले व फक्त ३० मिनिटात निर्णय घेण्यास सांगितले. त्यानंतर नियाझींनी भारतीय सैन्याच्या अटी स्वीकारून सरेंडर केले आणि बांगलादेशचा जन्म झाला.

१९७८ साली सैन्यातून निवृत्ती मिळाल्यानंतर ते गोव्याचे व नंतर पंजाबचे राज्यपाल झाले. त्यांनी त्यांच्या सैन्याच्या कार्यकाळातील अनुभवकथन म्हणून Surrender at Dacca: Birth of a Nation आणि An Odyssey in War and Peace: An Autobiography Lt Gen. J.F.R. Jacob ही २ पुस्तकेही लिहिली.

 

आयुष्याच्या उत्तरार्धात ते नवी दिल्ली येथे सेटल झाले.ते जन्मभर अविवाहित राहिले पण देशातील सर्व तरुण तरुणींना ते आपली मुले मानत असत. लेफ्टनंट जनरल जेकब ह्यांच्या पराक्रमामुळे त्यांचा आदर केवळ भारतातीलच लोक नाही तर पाकिस्तान व इजराईल येथील लोक सुद्धा करतात.  १३ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी वयाच्या ९३व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली.

इजराइल येथील एका म्युजियम मध्ये ले. जनरल जेकब ह्यांनी युद्धात वापरलेली बंदूक व इतर शस्त्रे आजही संरक्षित स्वरुपात ठेवलेली आहेत.

 

भारतमातेच्या ह्या वीर सुपुत्राला शतश: नमन!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version