Site icon InMarathi

मायदेशात दुर्लक्षिलेल्या ‘भारतीय एडिसनची’ खऱ्या ‘एडिसननेसुद्धा’ दखल घेतली होती!

shanakar bhise inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शास्त्रज्ञ असा व्यक्ती होतो ज्याचा डावा मेंदू टेक्निकली उजव्या मेंदूच्या वरचढ असतो. जो तांत्रिकदृष्टीने विचार करतो. गायकाचं पोर सुरात रडतं ही म्हण शास्त्रज्ञांसाठी लागू नाही.

शास्त्रज्ञ समाजातील कोणत्याही थरात जन्माला येऊ शकतात. ते तुमच्या आमच्यासारखेच असतात. मग त्यांच्या आपल्यातील वेगळेपण काय? तर त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर असलेली चौकस बुद्धी.

ही बुद्धीची चमक आणि नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती त्यांना आपल्यापासून वेगळं बनवते. तसंच जोवर आपण पँकींग मशीन, प्रिंटींग मशीन बघत नाही तोवर आपल्याला डॉ. शंकर आबाजी भिसे हे कोण हे माहिती असण्याचं काही कारण नाही.

 

===

हे ही वाचा जखम झाल्यास नुसती हळद न लावता करा हा उपाय… भारतीय शास्त्रज्ञाचा भन्नाट शोध!

===

पण, खरंच कोण होते हे शंकर आबाजी भिसे? ज्यांना दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय या विभूतींनी सतत प्रोत्साहन दिलं. चला तर जाणून घेऊ त्यांच्याविषयी.

डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात, २९ एप्रिल १८६७ मधे मुंबईत झाला. त्यांचे वडील धुळे येथे मॅजिस्ट्रेट होते. इतर शैक्षणिक विषयांपेक्षा डॉ. भिसे यांना विज्ञान आणि यंत्रनिर्मितीमधे रुची आहे हे पाहून त्यांच्या वडिल़ांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले.

याचाच परिपाक म्हणजे भिसे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी घरच्या घरी तयार केलेले कोळशापासून गॅस बनवण्याचे उपकरण होय. सन १८९० ते ९५ या काळात त्यांनी ऑप्टिकल इल्युजन अर्थात प्रकाशीय भ्रम या संकल्पनेवर काम केले.

त्याचदरम्यान ‘इन्व्हेंटर रिव्ह्यू अँन्ड सायंटिफीक रेकॉर्ड’ या मासिकाने स्वयंमापन मशीन तयार करण्याची एक स्पर्धा आयजित केली होती जी भिसे यांनी रेखांकित करून पाठवलेल्या डिझाईनने जिंकली.

ही भिसे यांच्या शास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दीला वलय देणारी घटना होती. त्यानंतर मँचेस्टर येथे त्यांनी एका ठोस पदार्थाला दुसऱ्या ठोस पदार्थात रुपांतरीत करता येते हा सिद्धांत मांडला व त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले, जे त्याकाळच्या युरोपातील अनेक प्रयोग, सिद्धांत यांपेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे होते.

यासाठी भिसे यांना आल्फ्रेड वेब या शास्त्रज्ञाने सुवर्ण पदकाने सन्मानित करून गौरव केला. भिसे यांच्या कारकिर्दीला झळाळी मिळण्यास सुरवात झाली.

 

 

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत भिसे यांनी जवळपास २०० च्या आसपास शोध लावलै. त्यापैकी ४० शोधांचे त्यांनी पेटंट घेतले होते. टाईप सी कास्टिंग आणि कंपोजिंग मशीन हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध अविष्कार आहे त्याचबरोबर स्वयंचलीत मापन व पँकींग मशीन हा ही त्यांचा सर्वोत्तम अविष्कार आहे.

‘ऑटोमिडीन’ या त्यांनी शोधलेल्या अँटीसेप्टीक औषधाचा वापर पहिल्या विश्वयुद्धात जखमी सैनिकांसाठी केला गेला. ज्याचे पेटंट भिसे यांनी एका अमेरीकन औषध कंपनीला विकले.

१९०० साली मद्रास येथे भरलेल्या ‘इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते. दी सांयटिफीक सोसायटी नावाचा क्लब त्यांनी मुंबईत सुरू केला त्याद्वारे विज्ञानावर आधारीत मँगझझिन्स ते प्रसिद्ध करत.

त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाईप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये घेतले.

नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंटे घेतली.

 

 

या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली.

१९१६ साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाईप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, आणि अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले.

भारतात मात्र हा शास्त्रज्ञ दुर्लक्षित राहीला आणि स्वातंत्र्योत्तर काळात झाकोळला गेला. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने भिसे यांना डी.एस्‌सी. ही पदवी दिली.

भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी दादाभाई नौरोजींच्या साहाय्याने १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.

सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.

===

हे ही वाचा पेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या मराठी माणसाबद्दल जरूर वाचा!

===

जागतिक दर्जाच्या ‘हू’ज हू’ या संदर्भग्रंथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. खऱ्या थॉमस अल्व्हा एडिसननेही भिसे यांची २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती.

 

 

२९ एप्रिल १९२७ रोजी, म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.

मात्र त्यापूर्वीच म्हणजे १९०८ सालापासूनच अमेरिकन वृत्तपत्रे भिसे यांचा भारताचे एडिसन म्हणून उल्लेख करीत होती.

अशा या जगभर नावाजलेल्या पण खुद्द मायभूमीत उपेक्षित राहिलेल्या भारतीय एडीसनच्या नावाचे टपालतिकीट काढण्यासाठी आजही पाठपुरावा केला जात आहे.

७ एप्रिल १९३५ साली ह्रदय विकाराने या महान शास्त्रज्ञाचे निधन झाले. स्वयंचलित वजन व पँकींग मशीन तसेच कंपोजिंग मशीनच्या माध्यमातून हा लिजंड अजरामर झाला आहे.

===

हे ही वाचा नोबेल पासून वंचित ठेवली गेलेली पहिली भारतीय शास्त्रज्ञ आजही मायदेशात दुर्लक्षितच आहे…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version