आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
केदारनाथ हे हिमालयात असलेलं शंकराचं अतिशय प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे केदारनाथ. चार धाम यात्रा आपल्याकडे अतिशय पवित्र मानली जाते. देवशयनी एकादशीला चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासात देवही झोपतात अशी मान्यता आहे.
त्यानंतर साधारण भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी हे मंदिर सर्वसामान्य लोकांना दर्शनासाठी बंद केलं जातं. याचे कारण आहे तिकडे असलेली भयंकर थंडी. नंतर वैशाखी म्हणजे साधारण गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हे मंदिर पुन्हा उघडलं जातं.
हे देवस्थान उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. ऋषभ कुलाचा मूळ पुरुष जनमेजय याने हे केदारनाथाचं मंदिर बांधलं असं म्हटलं जातं.
या देवालयाच्या बाबतीत दंतकथा सांगितली जाते ती अशी, नर आणि नारायण या ऋषींनी तपश्चर्या करून शंकराकडून वरदान मागून घेतले आणि तिथे वास करावा अशी प्रार्थना केली. ही कथा प्रचलित आहे.
याच बरोबर आणखी एक दंतकथा सुद्धा सांगितली जाते जी थेट महाभारताशी संबंधित आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – भारतात एक नाही तर पाच केदार आहेत, या पंचकेदाराची यात्रा प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहिजे!
===
मंदिराचा महाभारताशी संबंध
कौरव पांडवांच्या दरम्यान जे युद्ध झाले ते धर्माविरुद्ध अधर्माचे होते. भगवान कृष्ण पांडवांच्या बाजूने होता, तर कृष्णाचे अठरा अक्षौहिणी सैन्य दुर्योधनाने मागून घेतले.
अठरा दिवस चाललेलं हे युद्ध इतकं भयंकर होतं, की कुरुक्षेत्रावर रक्तामांसाचा चिखल झाला होता. भयंकर नरसंहार झाला. सारे कौरव मारले गेले. एक युयुत्सु तेवढा वाचला.
या युद्धानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर हे पण वानप्रस्थाश्रमाला गेले आणि जंगलातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कृष्ण द्वारकेला निघून गेला आणि एका पारध्याने मारलेला बाण लागून त्यानेही अवतार संपवला.
या महायुद्धानंतर युधिष्ठिराने चाळीस वर्षे हस्तीनापुरचा राजा म्हणून राज्य केले. आता कृष्णाचा अवतार संपला म्हटल्यावर त्यालाही राज्यकारभारात रस वाटेना.
या मोठ्या युद्धात त्यांच्याकडून पांडवांचे भाऊ कौरव, गुरु द्रोणाचार्य यांची हत्या झाली होती. त्यामुळे भ्रातृहत्त्या म्हणजे भावांचा वध आणि ब्रम्हहत्त्या, गुरुहत्त्या अशी मोठी पातकं पांडवांच्या शिरावर होती. कृष्णाने त्यांना महादेवाला शरण जा, या पापांपासून मुक्ती मिळेल असे सांगितले होते. मग पांडव शंकराला प्रसन्न करण्यासाठी काशीला गेले.
===
हे ही वाचा – पांडवांचं शंकराशी झालेलं युद्ध – महाभारतातील एक अपरिचित पैलू…!!
===
महादेव पांडवांवर खूप नाराज होते. पांडव येत आहेत असं समजताच त्यांनी काशी सोडून हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केले. आणि केदारमध्ये जाऊन थांबले. पांडव सुद्धा त्यांच्या निश्चयावर ठाम होते. त्यांनी महादेवाचा पाठलाग केला आणि तेदेखील केदारमध्ये पोहोचले.
आता कुठे जायचं ते महादेवांना समजेना. त्यांनी बैलाचं रूप धारण केलं आणि एका कळपात घुसले. भीमाला शंका आली. भीमानं आपलं विशाल रुप धारण केलं आणि दोन्ही पाय पहाडावर पसरले. बाकी सगळी जनावरं त्याच्या पायाखालून गेली. पण बैलाचं रूप घेतलेले महादेव काही त्याच्या पायाखालून जायला तयार झाले नाहीत.
त्याबरोबर भीमानं बैलाच्या रुपात असलेल्या महादेवांना ओळखलं आणि त्यांना पकडलं. त्या बैलासोबत युद्ध करायला सुरुवात केली. दरम्यान बैलाने त्याचं डोकं खडकांमध्ये लपवलं. भीमाने त्याची शेपटी ओढली, तेव्हा बैलाचं डोकं धडापासून वेगळं झालं आणि त्याबरोबर महादेव अंतर्धान पावले. पण बैलाच्या पाठीवर जो उंचवटा असतो, ज्याला आपण वशिंड असं म्हणतो ते वशिंड भीमाच्या हातात सापडलं.
महादेवही पांडवांचा निश्चय, भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि तात्काळ त्यांनी पांडवांना दर्शन दिलं. ब्रम्हहत्त्या आणि भ्रातृहत्त्या या दोन्ही पापातून त्यांना मुक्त केलं. आजही त्या वशिंडाची शिवलिंग मानून पूजा केली जाते.
या घटनेनंतर आपला सगळा कारभार परिक्षिताला देऊन पांडवांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारायचं ठरवलं. केदारनाथजवळ येऊन त्यांनी महादेवाची प्रार्थना केली. शंभू महादेव प्रकट झाले. त्यांनी स्वर्गाचा रस्ता पांडवांना दाखवला. आणि केदारनाथवरुनच पांडव स्वर्गास रवाना झाले.
त्यामुळे आजही अशी श्रद्धा आहे, जो केदारनाथला जायचा संकल्प करतो आणि जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला तर तो मनुष्य स्वर्गात जातो. जन्म मरणाच्या चक्रातून त्याची सुटका होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – महाभारतातील एका थरारक प्रसंगाची साक्ष देत हे गाव आजही उभं आहे!
===
हिंदू धर्मात असणाऱ्या मान्यतांनुसार अनेक श्रद्धा आहेत आणि खूपदा त्या श्रद्धांना बळकटी देणारे दाखलेही मिळतात. अगदी केदारनाथाचं मंदिर बंद करताना जो दिवा गाभाऱ्यात लावला जातो तो मंदिर उघडल्यानंतरही जळत असतो. सहा महिने हा दिवा जळत असतो हेदेखील एक आश्चर्य आहे.
श्रद्धा आणि भक्ती यांच्या जोरावर अनेक कठीण प्रसंगात माणसं तरुन जातात.. फक्त ही श्रद्धा डोळस हवी.. आंधळी नसावी. नाही का?
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.