आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – स्वप्निल श्रोत्री
===
कोणत्याही देशाचा विकास आणि स्थैर्य हे त्या देशाचे शेजारील राष्ट्रांशी संबंध कसे आहेत ह्यावर अवलंबून असते. शेजारील राष्ट्रांशी राजकीय संबंध जर खराब असतील तर अनेक समस्या दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांच्या समोर येतात. परिणामी, देशाच्या अंतर्गत विकासावर नकारात्मक परिणाम होतो.
भारत – पाक द्विपक्षीय संबंध हा गेल्या सत्तर वर्षात जागतिक राजकारणात सर्वात जास्त चर्चिला गेलेला विषय आहे. दोन्ही देशांचे एकमेकांशी असलेल्या ‘मधुर’ संबंधांमुळे दक्षिण आशियाचा प्रदेश कायमच विकासापासून दूर राहिला.
स. न २०१९ मध्ये आलेली कोरोना महामारी अजून जायचे नाव घेत नाही अशा परिस्थितीत अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. आरोग्य सुविधांनी हात टेकले त्यातच दक्षिण आशियात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असल्यामुळे महामारीचा फटका येथील देशांना मोठ्या प्रमाणावर बसला.
त्यावर मार्ग काढण्यासाठी अनेक देश आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत भारत द्विपक्षीय संबंध हा त्यातलाच एक भाग होय.
गेल्या महिनाभरात भारत – पाकिस्तान विपक्ष संबंधात अनेक सकारात्मक घटना घडल्या.
स.न २००३ मध्ये एलओसी वर शांततेसाठी करण्यात आलेला करार पाकिस्तानने पुन्हा नव्याने केला, पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहून शुभेच्छा दिला व त्या पत्राचे इम्रान खान यांनी सकारात्मक उत्तर दिले.
इम्रान खान कोरोना संक्रमित झाल्यावर भारताच्या पंतप्रधानांनी खान यांच्या प्रकृती संबंधित विचारपूस केली, याशिवाय इम्रान खान यांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारताने आपली हवाई हद्द उघडी केली. तसेच इतर अनेक सकारात्मक घटना मध्यंतरी घडल्या.
===
हे ही वाचा – ‘मिल्क – टी अलायन्स’ हॉंगकॉंग चा जगावेगळा “स्वातंत्र्यलढा”!
===
दोन्ही देशांमधील राजकीय संबंध सुधारावेत यासाठी अनेक माध्यमांद्वारे दोन्हीकडून गेली अनेक महिने प्रयत्न सुरू होते त्याचाच हा सकारात्मक परिणाम आहे.
ट्रॅक २ डिप्लोमसीचा वापर
ट्रॅक २ डिप्लोमसी म्हणजे दोन्ही देशांचे प्रमुख किंवा मंत्री किंवा सरकारी सेवेत असलेले अधिकारी हे प्रत्यक्ष संबंध न साधता किंवा बैठकीस न बसता एक अशा व्यक्ती किंवा संस्था किंवा व्यक्ती समूहामार्गे बैठकीचे नियोजन व कामकाज पाहतात जी व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सरकारशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसते.
ट्रॅक २ डिप्लोमसीसाठी साधारणपणे नावाजलेले पत्रकार, उद्योगपती व परराष्ट्र धोरण तज्ञ किंवा बऱ्याच वेळा इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा आधार घेतला जातो.
यामुळे सरकारवर जनतेचा किंवा विरोधी पक्षांचा दबाव, मीडिया कव्हरेज आणि वैयक्तिक हेवे – दावे यांचा नकारात्मक परिणाम न होता बैठक आपल्या मूळ उद्देश पर्यंत पोचविणे शक्य होते.
भारत व पाकिस्तान दोघांसाठी सकारात्मक
भारत व पाकिस्तान द्विपक्षीय संबंधात सुरू असलेल्या सुधारणा दोन्ही देशासाठी सकारात्मक आणि भवितव्याच्या दृष्टीने फायद्याचे आहेत. भारताचा विचार केला तर …
१) भारताचे सध्या लगतच्या चीनशी संबंध बरेच कटू झाले आहेत. १५ जूनच्या गलवान खोऱ्यातील घटनेनंतर अनेकवेळा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी पाकिस्तान लगतची सीमा शांत असणे भारतासाठी आवश्यक आहे.
त्यामुळे बैठकीच्या माध्यमातून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवाद ह्यावर आळा बसण्यासाठी मदत होईल.
२) पाकिस्तानला पूर्वेकडील कोणत्याही राष्ट्राशी संबंध ठेवायचे असतील किंवा पाकिस्तानच्या प्रवास विमानांना पूर्वेकडील कोणत्याही देशात जायचे असेल तर सर्वात सोपा आणि कमी अंतर असलेला रस्ता भारतीय हवाई हद्दीतून जातो.
बालाकोट हल्यानंतर भारताने पाकिस्तानसाठी आपले सर्व हवाई रस्ते बंद केले आहेत.
परिणामी, पाकिस्तानच्या सरकारी आणि प्रवासी विमानांना भारतीय हद्द टाळून लांब पल्ल्याच्या अंतरावरून जावे लागते. त्यामुळे पाकचे इंधन आणि वेळ दोन्ही खर्ची पडतात शिवाय भारताला हवाई हद्दीत प्रवेश दिल्याने पाकिस्तान कडून मिळणाे परकीय चलनही बंद झाले आहे.
३) भारताचा पाकिस्तानशी असलेला व्यापार पूर्ण बंद आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक छोटे – मोठे उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. अशा वेळी पाकिस्तानशी व्यापार सुरू करून भारतातील पंजाब व राजस्थानमधील अर्थव्यवस्थेत सुधारणा आणणे शक्य आहे.
पाकिस्तानच्या बाजूने विचार केला तर …
१) गेल्या काही काळापासून आपल्या दहशतवादी कृत्यांमुळे पाकिस्तान आर्थिक कृती दलाच्या (फायनान्स ॲक्शन टास्क फोर्स) रडारवर आहे.
त्यातच कोरोना महामारी आणि डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशा तिहेरी संकटात पाकिस्तान सापडलेला असताना भारताशी संबंधात सुधारणा करून वरील संकटातून पाकिस्तान बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे.
===
हे ही वाचा – पाकिस्तान असो वा चीन : ‘हे’ आकडे सिद्ध करतात की युद्धाच्या तयारीत भारत सक्षमच!
===
२) पाकिस्तानला मानवतावादी दृष्टिकोनातून चीनने कोरोना लसींचे काही डोस दिले होते. परंतु, त्यातील अनेक लसींचे डोस हे बनावट निघाल्याने शिवाय त्यांची उपयुक्तता इतर जागतिक लसींच्या तुलनेत कमी असल्याने पाकमधील एक गट भारतीय लसीची मागणी करताना दिसत आहे.
अशा वेळी भारताशी असलेले शत्रू कमी करून भारतनिर्मित लस मिळविण्याच्या पाकिस्तान प्रयत्नात आहे.
३) भारत – पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्यापाराचा फायदा जसा भारताला होता तसाच फायदा पाकिस्तानला सुद्धा होतो. भारताशी पुन्हा एकदा व्यापारी संबंध प्रस्थापित करून पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल असे पाकिस्तानच्या सरकारचे म्हणणे आहे.
भारत द्विपक्षीय संबंधांचा इतिहास पाहता, भारताने जेव्हा – जेव्हा पाकिस्तान मधील लोकनियुक्त सरकारशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी पाकिस्तानच्या लष्कराने सीमेवर अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
परंतु, ह्यावेळेस चर्चा ही भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यामार्फत सुरू असल्याचे वृत्त आहे. परिणामी, सीमेवर शांतता राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा करणे गैर नाही.
भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे एकमेकांचे सख्खे शेजारी आहेत. त्यामुळे त्यांच्यात बंधुभाव राहणे आवश्यक आहे. दोन्ही देशांचा इतिहास, संस्कृती, लोकजीवन, सामाजिक बांधणी ह्यात अनेक बाबतीत साम्य आहे.
केवळ भारतव्देश करून किंवा भारतात दहशतवाद पसरवून आपण विकसित राष्ट्र होऊ शकत नाही हे पाकिस्तानला समजले तर दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.