घरच्यांचा विरोध न जुमानता टागोरांच्या सुनेने घरी का ठेवली होती एक मुस्लिम स्त्री?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एकोणिसाव्या शतकातील भारतीय महिलांचे फोटो पाहिले असतील, तर त्यांची साडी, साडीच्या प्लेट्स, खांद्यावरचा पदर, त्यांचा पूर्ण लांब बाह्यांचा ब्लाउज किंवा त्यावर स्वेटर ही त्या काळची फॅशन होती.
पूर्वी भारतात असा लांब बाह्याचा ब्लाऊज, खांद्यावरचा पदर घेतला जायचा नाही. मग ही फॅशन आली कुठून? कुणी आणली? तर याचे उत्तर आहे कलकत्त्यातल्या प्रसिद्ध टागोर कुटुंबातील मोठ्या सुनेने ‘ज्ञाननंदिनी’ देवी यांनी. त्या नंतर ज्ञानदा टागोर म्हणूनच ओळखला गेल्या.
कलकत्त्यात टागोर कुटुंबीय प्रसिद्ध आहेच. त्यात रवींद्रनाथ टागोर तर जगप्रसिद्ध. त्यांचे भाऊ, वडील हे कलकत्त्यातील बडी असामी. हे घर सगळ्या रूढी-परंपरा पाळणारे होते. पण या घरातली एक स्त्री मात्र थोड्याशा बंडखोर प्रवृत्तीची. नाविन्याची आवड असणारी, स्वतःचा आत्मसन्मान राखणारी, आणि म्हणूनच त्या काळातही वेगळेपणा जपणारी.
ती त्या कुटुंबात आली आणि तिने केवळ त्या घरातील स्त्रियांनाच नाही तर समाजातील इतर स्त्रियांनाही स्वतःची ओळख करून दिली.
१८५० मध्ये जन्मलेल्या ज्ञानदा जेव्हा सात वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांच्या त्यांचे लग्न सत्येंद्रनाथ टागोर यांच्याशी लावून देण्यात आले. म्हणजे त्या अर्थाने त्या बालिका वधू. आणि बंगालमध्ये एक पद्धत आहे ज्याचं नाव ‘अबरोध’. त्यानुसार त्या मुलीचं लग्न झाल्यावर ती एकदा घरात जाते, त्यानंतर केवळ तिचे पार्थिव शरीरच त्या घराच्या बाहेर येते.
मधल्या काळात तिला घराचा उंबरठा ओलांडायची परवानगी नव्हती. इतर पुरुषांच्या समोर जायची परवानगी नसायची. पुरुषांच्या खोलीत जायची परवानगी नसायची.
साडी देखील केवळ संपूर्ण शरीराभोवती गुंडाळून घ्यायची आणि त्याचा घुंगट घ्यायचा. हा घुंगट पूर्ण चेहरा झाकेल इतका खाली घ्यायचा. त्यात तुम्हाला समोरचे काही न का दिसेना, चालताना अडथळा का येईना, पण घुंगट वर जाता कामा नये.
===
हे ही वाचा – रामायण-महाभारत काळात नसलेली “पडदा”/”घुंघट” कुप्रथा भारतावर लादली जाण्याचा क्रूर इतिहास…
===
आता आशा घरात ज्ञानदा आल्या. पण सुरुवातीच्या अल्लडपणामुळे त्या घरात सगळीकडे वावरायच्या. सत्येंद्रनाथाना त्याचा काही त्रास नसायचा. पण ज्ञानदा यांचे सासरे म्हणजेच सत्येंद्रनाथ यांचे वडील देवेंद्रनाथ यांना मात्र ज्ञानदांचे हे वागणे आवडायचे नाही.
पुढे सत्येंद्रनाथ लंडनला आयसीएसच्या ट्रेनिंगसाठी गेले. इकडे घरात मात्र ज्ञानदा सगळीकडे खेळायची, पुरुषांबरोबर बोलायची. तिच्या तक्रारी सत्येंद्रनाथानपर्यंत लंडनला पोहोचल्या. त्यांनी तिला तिकडे पाठवा असे सांगितले. पण ज्ञानदा वयाने लहान आहे म्हणून त्यांना तिकडे पाठवण्यात आले नाही. पुढे सत्येंद्रनाथ कलकत्त्याला आले त्यावेळेस ज्ञानदा १४ वर्षांची झाली होती.
त्याच वेळेस सत्येंद्रनाथांची बदली मुंबईला जिल्हाधिकारी म्हणून झाली. यावेळेस मात्र सत्येंद्रनाथ यांनी ज्ञानदाला सोबत घेतले. मुंबईला आल्यानंतर मात्र ज्ञानदाला वेगळ्या जगाची ओळख झाली. इथे बायकांवरती फारशी बंधने त्यांना दिसून आली नाहीत.
तिथल्या इंग्रज आणि पारशी स्त्रिया तर पुरुषांच्या बरोबरीनेच सगळीकडे फिरतात हे पाहून त्यांना आश्चर्य वाटायचे. त्यांच्या हे लक्षात आले की या स्त्रियांचे राहणीमान देखील खूप वेगळे आणि छान आहे. मग त्यांनी हळूहळू आपल्या राहणीमानात बदल करायला सुरुवात केली.
पुढे त्यांना मुले झाली तेव्हा त्यांनी मुलांचा सांभाळ करण्यासाठी एका मुस्लिम नर्सला आपल्या घरी ठेवले. यावरून देखील त्यांच्या कुटुंबात त्यावेळी कल्लोळ माजला. पण ज्ञानदा मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. सत्येंद्रनाथ तसे त्यांच्या कामात व्यस्त असायचे आणि ज्ञानदांवर फारसे बंधन त्यांनी घातले नाही.
अचानक एकदा सत्येंद्रनाथांबरोबर ज्ञानदाचे भांडण झाले. त्यावेळी ज्ञानदा चौथ्यांदा गरोदर होत्या. पण भांडण झाल्यामुळे आपल्या तीन मुलांना सोबत घेऊन त्यांनी जहाजाद्वारे लंडन गाठले. ज्या काळात लंडनमध्ये देखील तिथल्या स्त्रिया एकट्या फिरायच्या नाहीत तिथे ज्ञानदा आपल्या मुलांना घेऊन गेल्या.
त्यांच्या या कृतीमुळे लंडनमधील त्यांचे नातेवाईक देखील हैराण झाले. पण लंडनमध्ये राहून ज्ञानदा वेगळ्याच जगाच्या सान्निध्यात गेल्या. त्यावेळेस रवींद्रनाथ टागोर देखील लंडनमध्ये होते. रवींद्रनाथांना मात्र ज्ञानदांचे विचार पटले. त्या दोघांनी त्यावेळी अनेक विषयांवर चर्चा केल्या.
पुढे ज्ञानदा परत कलकत्त्याला आल्या आणि आपल्या घरी राहू लागल्या. यावेळी परतलेल्या ज्ञानदा पूर्ण वेगळ्या होत्या. त्या स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण होत्या. त्यांची विचार करण्याची स्वतंत्र वृत्ती, परिपक्वता ही त्यावेळेस त्यांच्या घरातील लोकांना जाणवली. त्यानंतर मात्र त्यांच्याविषयीचा आदर वाढला.
त्यावेळेस तिथल्या महिलांची ती साडी नेसण्याची पद्धत पाहून त्यांनी त्यावेळेसच्या बंगाली पेपरात जाहिरात दिली, की ‘नवीन प्रकारची साडी कोणाला नेसायची असेल त्यांनी माझ्याकडे या मी तुम्हाला शिकवते.’ त्यांच्या या कृतीला घरातून विरोध झाला आणि कोणीही साडी शिकण्यासाठी येणार नाही असेही म्हटले गेले.
===
हे ही वाचा – अहिल्याबाई होळकरांच्या जबरदस्त न्यायनिवाड्यांची अज्ञात माहिती स्त्रीत्वाचं नवं दर्शन घडविते
===
आश्चर्य म्हणजे त्यावेळेस कलकत्तामधील अनेक स्त्रिया त्यांच्याकडे साडी कशी नेसायची हे शिकण्यासाठी येऊ लागल्या. त्यामध्ये अनेक सरकारी ऑफिसर्सच्या पत्नी, व्यापाऱ्यांच्या पत्नी, मुली यांचा समावेश होता. त्यांच्या या साडी नेसण्याच्या पद्धतीला ब्रह्मिका साडी असे म्हटले गेले.
ब्राह्मो समाजातील स्त्रियांनी त्यांची ही साडी नेसण्याची पद्धत स्वीकारली. त्यांनी बंगाली स्त्रियांना कमीज, ब्लाउज, जॅकेट या संकल्पनांची ओळख करून दिली. ज्याचा उपयोग स्त्रियांना थंडीतही झाला.
आता आपण आपल्या बर्थडेची पार्टी करतो किंवा मित्र-मैत्रिणींच्या बर्थडेला जातो. आता आपल्यासाठी ही एक एन्जॉयमेंटची गोष्ट आहे. पण असा बर्थडे असतो आणि त्याची पार्टी असते याची सुरुवात ज्ञानदा यांनी केली. वाढदिवसाची पार्टी घरामध्ये सुरू केली. त्यात जवळच्या मित्र-मैत्रिणींना बोलवणे चालू केले.
घरामध्ये त्यांनी ब्रेकफास्ट क्लब चालू केला. ज्यात घरातल्या सगळ्या व्यक्तींनी एकाच वेळेस ब्रेकफास्ट घ्यायचा आणि एकमेकांशी बोलायचे, ही पद्धत चालू केली. त्यामुळे कोणाला समस्या असतील तर त्या समजायच्या.
पुढे संध्याकाळी चहाची पार्टी देखील त्यांनी चालू केली त्यामध्ये आपल्या मैत्रिणींना त्या घरी बोलवायच्या. एकमेकींची सुख दुःख जाणून घ्यायच्या. चांगल्या गोष्टी शेअर करायच्या. त्यातूनच पुढे मग भिशी सारखी संकल्पना देखील स्त्रियांमध्ये रुजू झाली.
ज्ञानदा यांना साहित्य, कला, संस्कृतीमध्ये देखील तितकीच रुची होती. मुळात टागोर कुटुंबीयच अत्यंत सर्जनशील होतं. संगीत, नाटक, पुस्तक हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. रवींद्रनाथ जी नाटके लिहायचे, कथा लिहायचे त्यात काही बदल हवा असल्यास ज्ञानदा त्यांना सांगायच्या. त्यांनी घरामध्येच नाटकांचे प्रयोग करायला सुरुवात केली. त्याचं दिग्दर्शन, नेपथ्य त्या स्वतः करायच्या.
सुरुवातीला नाटकातील स्त्री भूमिका सुद्धा पुरुषच करायचे. पुढे पुढे ज्ञानदा ती स्त्री भूमिका स्वतःच करू लागल्या. इथपर्यंत घरातले वातावरण ठीक होते. पण पुढे त्यांनी त्यांच्या नाटकाचे प्रयोग मोठ्या स्टेजवर केले. आणि त्यांनी स्वतः त्यामध्ये भूमिका केली. ज्यामुळे देवेन्द्रनाथ चिडले त्यांना ज्ञानदांचे हे वागणे आवडले नाही.
त्यातच कलकत्त्याला व्हाइसरॉयने दिलेल्या पार्टीलादेखील ज्ञानदा गेल्या. यामुळे घरातील वातावरण खूप बिघडले.
शेवटी ज्ञानदा आपला पती आणि मुलांसह घराच्या बाहेर पडल्या. तिथल्याच स्ट्रीट पार्कजवळ त्यांनी एक बंगला घेतला आणि त्या तिथे राहू लागल्या. म्हणजे एका अर्थाने “न्यूक्लियर फॅमिली” ही संकल्पना देखील ज्ञानदा यांनी पहिल्यांदा भारतात आणली.
स्त्रियांना घराच्या उंबरठ्याबाहेर आणण्याचे काम खरंतर ज्ञानदा यांनी केले आहे. आता कदाचित या गोष्टीचे इतके महत्त्व वाटणार नाही पण हा काळ जर आपण पाहिला तर ती १९०० च्या शतकाची सुरुवात होती. त्या काळात इतका धाडसी निर्णय घेणे किती कठीण गेले असेल!!
तिथे राहून ज्ञानदा सामाजिक कार्यात आपले जीवन व्यतीत करू लागल्या. त्यावेळेस कलकत्त्यातल्या अनेक मासिकांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये ज्ञानदा आपले लेख लिहायच्या.
त्यांचे लेख हे मुख्यतः स्वातंत्र्य, देशभक्ती, राष्ट्रवाद यावर प्रेरित असायचे. अनेकदा स्त्रियांना त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध एकत्र येण्याचे आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
रवींद्रनाथांच्या शांतीनिकेतन मध्येदेखील ज्ञानदा यांनी आपले योगदान दिले आहे. साहित्य, कला या क्षेत्रातले देखील त्यांचे योगदान मोठे आहे.
अनेक स्त्रियांना त्यांनी सामाजिक कार्यामध्ये घेतले. शिक्षणाची कवाडे खुली केली. बंगाल मधील मुलींना, स्त्रियांना घराबाहेरच जग ज्ञानदा यांनी दाखवलं. मुलींसाठी अनेक प्रकारच्या शिक्षण पद्धती त्यांनी अस्तित्वात आणल्या, रवींद्रनाथांनी त्यांच्या शांतिनिकेतनमध्ये त्या राबवल्या. 91 वर्षांचा आयुष्य त्या जगल्या आणि शेवटपर्यंत सामाजिक कार्यात कार्यरत राहिल्या.
म्हणतात ना मोठ्या वृक्षाच्या छायेत इतर रोपटी दिसून येत नाहीत, तेच ज्ञानदा यांच्या बाबतीतही झाले. टागोर कुटुंब हे मुळातच बंगालमधील एक मोठे प्रस्थ होते. त्यात त्यांचे सासरे स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी होते. त्यांचे पती एक उच्चपदस्थ अधिकारी होते.
त्यावेळी भारतातली मोजके लोक आयसीएस होते. सत्येंद्रनाथ हे तर पहिले भारतीय आयसीएस होते.
रवींद्रनाथांचे कार्य तर सगळ्यांना माहीतच आहे. त्यांची जगभर कीर्ती झाली. पण या सगळ्यात ज्ञानदा यांनी समाजासाठी काय केले हे मात्र दुर्लक्षिले गेले.
===
हे ही वाचा – टागोरांच्या प्रेरणेने राष्ट्रगीत लिहिणाऱ्याचा सरकारने घेतला बळी! एक अस्वस्थ करणारी कथा
===
आधुनिक बंगाली स्त्रियांचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे कधीच पाहिले गेले नाही. आपली कुणी दखल घेतली नाही याचे शल्य, त्यांना कधीही वाटले नाही. आज तर त्यांचा विसरच संपूर्ण समाजाला पडला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.