देव आनंदचा पहिला रंगीत सिनेमा जो हिंदी आणि इंग्रजीत बनूनही फ्लॉप ठरला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आर के नारायण यांचं नाव देश विदेशात प्रचंड गाजत असतानाचा तो काळ होता. त्यांच्या कादंबर्यांनी जगभरातल्या वाचकांना मोहिनी घातली होती. त्यांची विवाहबाह्य संबंधांवरची काळाच्या पुढचा विषय असलेली कादंबरी वाचकांनी डोक्यावर घेतलेली.
या कादंबरीला साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कारही लाभला आणि कोणीतरी या कादंबरीवर चित्रपट बनवण्याविषयी देव आनंदला सुचवलं.
देव आनंदनं कादंबरी विकत घेऊन वाचली आणि यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र लेखक आर.के. नारायण यांना आपल्या कादंबरीवर चित्रपट बनावा असं वाटत नव्हतं. ते फारसे उत्सुक नव्हते. या कादंबरीचं नाव होतं, ’द गाईड’
हिंदी चित्रपटांचा तो सुवर्णकाळ होता आणि राज-दिलीप-देव ही त्रिमूर्ती चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांवर राज्य करत होती. एक से बढकर एक चित्रपट या त्रयीनं दिले. या तिघांपैकी देव आणि राज हे निर्माते म्हणूनही उत्तम कारकीर्द घडवत होते. तो काळच उत्तम अभिनय आणि दर्जेदार विषयांचा होता.
===
हे ही वाचा – रस्त्यावर सँडविच विकून बनला बॉलिवूडचा ट्रॅजेडी किंग – वाचा थक्क करणारा प्रवास!
===
दुसरीकडे आर.के. नारायण हे नाव साहित्यविश्र्वात दबदबा निर्माण करत होतं. त्यांचं साहित्य भारताबाहेरही लोकप्रिय होऊ लागलं होतं. ’द गाईड’ ही कादंबरी खळबळ माजवत होती कारण याचा विषयच विवाहबाह्य संबंध हा होता.
आजही विवाहबाह्य संबंधांकडे पाप म्हणूनच बघितलं जातं तिथे सत्तर एक वर्षांपूर्वी अशा विवाहबाह्य संबंधाला सामाजिक प्रतिष्ठा देण्याच्या दृष्टीकोनातून, याला पाप न समजण्याच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या कथेवर चित्रपट बनवणं हेच धाडसाचं पाऊल होतं.
द गाईडचं नाव कोणीतरी देव आनंदला सुचविलं. त्यानं ती कादंबरी वाचली आणि तो राजू गाईड आणि रोजीच्या प्रेमात पडला. यावर चित्रपट बनवायचाच हे ते त्यानं पक्कं केलं.
मात्र स्वत: आर के नारायण या कल्पनेच्या फ़ारसे बाजूनं नव्हते. आपली पात्रं पडद्यावर कशी उतरतील ही धास्ती होतीच शिवाय विषयच अत्यंत संवेदनशील होता.
देव आनंदने ही कथा तेंव्हा नवोदित मात्र अत्यंत गुणी अशा दिग्दर्शकाला, विजय आनंदला ऐकवली आणि यावर आपण चित्रपट करायचा आहे सांगितल्यावर विजय आनंदही चकीत झाला.
अत्यंत बोल्ड कथा आणि पात्रं भारतीय प्रेक्षक स्विकारणार नाहीत आणि देव आनंदचं करियर या भूमिकेमुळे धुळीला मिळेल, त्याची प्रतिमा खराब होईल असं त्याचं मत होतं. इतकंच नाही तर भारताबाहेर देशाची प्रतिमाही या चित्रपटामुळे खराब होईल असं त्याचं मत होतं.
दोघात घमासान चर्चा झाली. देव आनंदला काहीही झालं तरी ही कथा हातातून जाऊ द्यायची नव्हती आणि विजय आनंदला ही कथा कितपत पचनी पडेल याची शंका होती.
इतकंच नाही तर हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत बनवण्याचा देव आनंदचा निर्णय होता. अखेरीस विजय आनंद तयार झाले मात्र त्यांनी एक अट घातली.
त्यांनी सांगितलं की इंग्लिश चित्रपट तुम्हाला हवा तसा बनवा मी त्यात लक्ष घालणार नाही मात्र हिदीतल्या चित्रपटाचं शूटिंग तेंव्हाच सुरू होईल जेंव्हा मी याचा नवा स्क्रिन प्ले लिहिन.
हा चित्रपट देव बंधूंच्या बॅनरखाली बनणार होता. मात्र याच कथेवरून चेतन आनंद यांच्याशीही देव आनंदचे क्रिएटिव्ह वाद झाल्यानं त्यांनी आधीच हा चित्रपट सोडला होता आता विजय आनंद यांनीही चित्रपटातून माघार घ्यावी हे देव आनंदना परवडणारं नव्हतं. या कारणासाठी त्यांनी विजय आनंद यांच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली.
चित्रपटाचं शुटींग सुरू झाल्यावर अनेक किस्से घडत गेले आणि चित्रपट निर्मितीपासूनच चर्चेत राहिला. याच चित्रपटाच्या क्लायमॅक्सचा किस्सा तर फारच गंमतीशिर आहे.
या चित्रपटाच्या क्लायमॅक्समधे राजू गाईड मरतो आणि हा सिन करायला देव आनंद अजिबात तयार होत नव्हता.
===
हे ही वाचा – स्मरण चित्र -देव आनंद!
===
खरं तर विजय आनंद हा एक अत्यंत हुशार आणि कलाकारांकडून दर्जेदार काम करवून घेणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जात असे. त्याला कोणीही कलाकार कधीच विरोध करत नसत. उलट कलाकारांचा अत्यंत लाडका असा हा दिग्दर्शक होता, भूमिकेला साजेसा अभिनय कलाकारांकडून करवून घेण्याची त्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती.
इथे गाईडच्या क्लायमॅक्समधे मात्र घोडं अडकलं होतं. सेट लागला होता, कलाकार हजर होते, कॅमेरा लाईट सज्ज होते आणि देव आनंद सिन करणार नाही म्हणून अडून बसलेला. विजय आनंदने परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला मात्र देव आनंद मरायला अजिबात तयार नव्हते.
माझ्या चाहत्यांना माझं मरण बघवणार नाही आणि चित्रपट सपशेल फ्लॉप होईल असं त्याचं मत होतं. मात्र कथेची गरज असल्यानं राजू म्हणजेच देव आनंदला मरावंच लागणार यावर विजय आनंदही अडून होते. सेटवर चिंतेचं वातावरण पसरलं. अखेर विजय आनंद प्रचंड संतापले आणि शूट रद्द करायची घोषणा केली.
या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर होते, फ़ैली मिस्त्री. यांचं नाव इंडस्ट्रित अत्यंत आदरानं घेतलं जात असे. वातावरणातला तणाव बघून आणि या दोघांच्या वादात चित्रपटाच्या क्रिएटिव्हिटीशी काही छेडछाड व्हायला नको म्हणून शेवटी फ़ैलीनी विजयला सांगितलं की शूट रद्द करू नको मी एकदा देवशी बोलतो.
विजय याला तयार झाला. फ़ैली देवकडे गेले आणि शांतपणे समोर बसून अनेक तास त्याला या सिनचं चित्रपटातलं महत्व समजावून सांगितलं. देवला आपलं मरण चाहते स्विकारणार नाहीत ही धास्ती होती तरीही फ़ैलींचे सर्व मुद्देही मनापासून पटत होते.
अखेर तो राजी झाला आणि स्वत:चं डोकं बंद करून विजयला हवा तसाच सिन शूट केला. हाच सिन आज भारतीय चित्रपटांच्या इतिहासातल्या काही मोजक्या अप्रतिम सिनपैकी एक आहे.
असाच एक गमतीशिर फसवणुकीचा किस्सा आहे. करण जोहरचे वडील यश जोहर यांचा. यश जोहर तेंव्हा नवकेतन फिल्म्समधे प्रोडक्शन कंट्रोलर होते आणि त्याचबरोबर विजय आनंदचे सहाय्यक दिग्दर्शकही.
गाईडचं काही शूटिंग हिमाचलमधे रोहतांग पासला होणार होतं. मोठाले कॅमेरे आणि लाईटस वगैरे वागवत क्रूला लोकेशनवर जाण्यासाठी अडचणी येत होत्या. अखेर युनिटच्यावतीनं यश जोहरनी देवच्या कानावर ही गोष्ट घातली.
मात्र देवला रोहतांगलाच हे शूट करायचं होतं. क्रू पुढे होता आणि देव आनंद बराच मागे. वाटेत एके ठिकाणी क्रू थोडावेळ आराम करण्यासाठी थांबला असता युनिटमधल्या एकानं यशजींना सांगून तिथल्या मैलाच्या दगडावर रोहतांग शून्य किमी असं रंगवायला सांगितलं. मागून आलेल्या देव आनंदनं या “रोहतांगलाच” ठरलेलं शूटिंग केलं.
चित्रपटाची गाणी अजरामर झाली असली तरिही यातली गाणी हसरत जयपूरी लिहित होते. मात्र एका गाण्याच्या एका ओळीवर मामला फिस्कटला. हसरतना त्यांनी लिहिलेली ओळ बदण्याविषयी सूचवलं गेलं कारण देव आनंदला ती ओळ आवडली नव्हती.
हसरत हे आपल्या लेखनाबद्दल फारच संवेदनशिल मानले जात. त्यांनी ओळ बदलायला नकार दिला आणि चक्क चित्रपटच सोडला.
त्यानंतर शैलेंद्र यांना साईन करण्यात आलं. मात्र शैलेंद्र यांना जेंव्हा कळलं की या चित्रपटाच्या गीतांसाठी ते पहिली पसंती नव्हते त्यांनी हा चित्रपट सोडण्यासाठी किंबहुना हा चित्रपट मिळूच नये म्हणून प्रचंड मोठी रक्कम साईनिंग अमाऊंटसाठी सांगितली.
मात्र मौके की नजाकत देखते हुए त्यांची ही अवास्तव मागणी चक्क मान्य झाली आणि चित्रपटाची सर्व गाणी शैलेंद्र यांनी लिहिली.
इंग्लिशमधला गाईड कधी आला आणि गेला कळलंही नाही मात्र हिंदी गाईड पुढे जाऊन कल्ट बनला मात्र पहिल्या प्रदर्शनाला फ्लॉपही ठरला होता. हळूहळू त्याची प्रसिध्दी होत गेली.
===
हे ही वाचा – लतादीदीं सोबत काम न करता संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणारा ‘अनोखा’ संगीतकार!
===
यातली गाणी लोकांना खूप आवडली आणि देव-वहिदाच्या अभिनयालाही चाहत्यांनी दाद दिली. काळाच्या पुढचा असला तरीही हळूहळू हा विषय प्रेक्षकांनी पचवला आणि भारतीय चित्रपट तसेच देव आनंदच्या फिल्मी कारकीर्दीतला मैलाचा दगड बनला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.