आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आज लहानसहान कारणां वरून आत्महत्या करण्याचे प्रमाण फार वाढले आहे. खासकरून शेतकऱ्यांमध्ये तर फारच. या पार्श्वभूमीवर शिक्षण, पैसा, नातेवाईक सर्व बाजूने कोंडी झाल्यावर एका २८ वर्षीय सुस्वरूप विधवेने आपल्या दोन लहान मुलींना वाढवून शिकवून उभे करण्यासाठी घेतलेले प्रयत्न मला निश्चितच अधिक मोलाचे वाटतात. आत्महत्या हे परिस्थितीला शरण जाणे आहे, पण प्रवाहाविरुद्ध लढण्यात खरी मर्दुमकी आहे. सरकारी मदत, कर्ज, किंवा राजकारण्यांवर अवलंबून न राहता आपले आयुष्य आपल्या हातात घेणाऱ्या मर्दनीची अजब कहाणी.
आमची आजी (आईची आई)
लोक आपापल्या मोठमोठ्या पूर्वजांचे गोडवे गात असतात, अमक्याचे घराणे, तमक्याचा नातू, अमुक आंदोलनातील तमुक नावाच्या प्रमुख नेत्याचा नातवाचा नातू इत्यादी. माझी तशी कुठलीही ओळख नाही. मी कुठल्याही प्रथितयश, संपन्न, घराण्याशी संबंधित नाही. मी फक्त माझ्या आजीचा नातू आहे.
हो जिने आयुष्यभर मोलकरीण म्हणून दहा-बारा घरी स्वयंपाक, भांडे व धुण्याची कामे केली अश्या एका अतिसामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वाच्या एक स्त्रीचा मी नातू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
रामटेक चे प्रतिष्ठित धनकर हे तसे अतिशय देवभोळे अन संपन्न ब्राम्हण घराणे, अंबाळा तलावाच्या जवळच त्यांचा मोठा वाडा, त्याच वाड्यात आमची आजी पूर्वाश्रमीची मंजुळा धनकर हिचे बालपण अतिशय संपन्नतेत गेले. पण मुलींना शिकवायचे नाही या कर्मठपणातून आमची आजी अशिक्षितच राहिली. वयाच्या १० वर्षीच तिचा विवाह दिनकरराव काशीकर या १४ वर्षाच्या मुलाशी झाला, व मंजुळा धनकर हि सौ नलिनी काशीकर म्हणून ओळखल्या जावू लागली. प्रचलित समाज प्रथेनुसार विवाहानंतरही नलिनी आपल्या माहेरीच राहिली . दरम्यानच्या काळात दिनकररावांनी शिक्षण पूर्ण केले व आपल्या भावाच्या कुटुंबीया समवेत रामटेकहून नौकरीच्या शोधार्थ नागपूरला स्थायिक झाले.
गणितातील उत्तम गती आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांना त्याकाळातील नामांकित न्यू इंग्लिश शाळेत शिक्षकाच्या पदावर रुजू करून घेतले गेले. यथावकाश दिनकररावांनी नलिनीला नागपूरला आणून संसार सुरु केला.
दिवस जात होते अन संसार वेलीवर फुले उमलत होती, पहिली मुलगी दोन मुले व चौथी माझी आई. दोन मुले लहानपणीच दगावली. मधल्या काळात दिनकरराव व त्यांच्या बंधूंनी मिळून एक घर खरेदी केले व स्वतःच्या घरात संसार थाटला. घरातील एक भाग भाड्यावर दिला व एका भागात दोघे भाऊ एकोप्याने राहू लागले. नाही म्हणायला सर्व ठीक सुरु होते. संसार बहरत होता, मोठी १० वर्षाची तर छोटी ४ वर्षाची झाली अन आजीच्या जीवनाला आकस्मित कलाटणी मिळाली.
दैवाचे खेळ निराळेच असतात, नागपूरच्या उन्हात दिनकरराव घराबाहेर पडले ते कधीही न येण्या साठीच. घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मारुतीच्या मंदिराजवळच उष्माघाता मुळे ते जे कोसळले ते सोबत आजीच्या स्वप्नांचे इमले घेवूनच. अवघी २८ वर्षांची आजी विधवा झाली. चार वर्षांची माझही आई व १० वर्षाची मावशी पोरकी झाली.
सगे सोयरे सासरची मंडळी आपल्याची कधी परकी झाली हे नलिनीला उमगलेच नाही. वादावादी धुसफूस रोजचीच, वादावादी अन अपमानाची परिसीमा इतकी वाढली कि एकदा आंघोळ करीत असतांना बाथरूम मधून थेट शेजार्यांच्या घरीच जावे लागले. संबंध इतके ताणले गेले कि स्वाभिमानी आजीने दिराला सांगितले, पडेल ते काम करीन पण तुझ्या दारात येणार नाही.
सासर तुटले, घर सुटले नशिबाने भाडेकरी चांगले होते व आजीच्या मालकीच्या जागेवरच राहत होते. त्यांनीच आश्रय दिला व काही दिवस तिथेच काढले. पैशाची निकड होतीच म्हणून स्वतःच घर भाड्यावरच ठेवल अन आंगणात एक खोपटं बांधलं. स्वतःची व मुलींची सोय त्यात केली, तुटपुंज्या भाड्यावर गुजराण सुरु झाली. पावसाळ्यात खोपट अस गाळायच कि रात्र कोपऱ्यात बसून काढावी लागायची.
आपल्या लाडाकोडात वाढलेल्या ताईला भेटायला रामटेक वरून भाऊ आला, त्याने गावी चलण्याचा आग्रह केला पण आजी ठाम होती लाचार बनून माहेरी यावयास तिने नकार दिला. भावाने आपले घर तिला नेहमीच उघडे असल्याचे सांगून धीर दिला. पण आजीने स्वाभिमान गुंडाळून माहेरी पडून राहण्यास नकार दिला. दिसावयास अतिशय सुस्वरूप असल्याने आलेले लग्नाच्या मागणीचे अनेक प्रस्तावही मुलींच्या खातर भविष्या तिने नाकारले.
घर तर चालवायचेच होते, समोरच्या विन्चुरे कुटुंबाने त्यांना गरज नसतांनाही भांड्याचे काम दिले, मग कोणाकडे भांडी तर कोण कडे स्वयंपाक असा पसारा सुरु झाला. मुलींना आत कोंडून आजी सकाळी ५ वाजताच घराबाहेर पडवयाची, मध्ये घरी येवून स्वयंपाक शाळेची तयारी पुन्हा काम. पण मुलींना कामावर कधीच नेले नाही. कोणी बोलले कि मदतीला मुलींना आण तर साफ नकार द्यायची. माझ्या मुली शिकणार हे काम करणार नाही. मुलींचे कपडेलत्ते, शिक्षण खाणेपिणे यात तिने स्वतःला पूर्ण गुंतवून घेतले. अख्ख तारुण्य, आपली आवड, आपल्या गरजा सर्व बाजूला ठेवून हि जगदंबा संकटांना भिडलेली. आजूबाजूचे काही लोक सोडले तर टवाळखोर अन समाज कंटाकांचा सामना एकटीने हिमतीने केला. मुलींकडे व तिच्या कडे वाकड्या नजरेन बघण्याची कोणाची ताब नव्हती. अंगातील सुशीलता अन आवाजातील माधुर्याची जागा कणखरता अन सडेतोड वृत्तीने घेतली.
इतकी गरिबी असूनहि मुलींना फी माफी वैगरेचा प्रश्नच नव्हता. आई सि पी अंड बेरार हायस्कूल मध्ये शिकत असतांना वर्षभराची फी १२०/- भरली नाही म्हणून ऐन परीक्षेच्या आधी श्री गोखले सरांनी “पैसे देता येत नाही तर शिक्षा कशाला”, असे बोलून आईला शाळेतून काढून टाकले, आई रडत रडत घरी आली, अर्थातच आजी घरी नव्हती. पण सख्खे शेजारी डॉक्टर श्री विन्चुरे यांनी ताबडतोब पैसे भरले व आईस शिक्षण बंदीपासून वाचवले. अर्थातच आजीने पैसे फेडले हे वेगळे सांगावयास नको.
इतक्या गरीबीतही शेजार्यांकडे जेवणाच्या वेळी जावयाचे नाही, कोणाला काही मागावयाचे नाही इत्यादी अनेक स्वाभिमानी गुण तिने मुलींना लावले. कित्येक वेळा उपाशी झोपायची वेळ तिघींवर आली पण कोणाकडे हात पसरला नाही.मुली मोठ्या झाल्यावर चांगले स्थळ बघून लग्न लावून दिली. तिची स्वतःची वर्तणूक इतकी बाणेदार अन स्वाभिमानी होती कि ती करत असलेले काम तिच्या मुलींच्या लग्नाच्या आड आले नाही.
शेजारच्या वाड्यात संघचे मा गो वैद्य राहायचे, ते हे सर्व बघत होते , एक दिवस सोबत संघाच्या काही मुलांना घेवून घरी आले. हि मुले संघाच्या महिन्याभराच्या क्याम्प साठी नागपूरला आली होती. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावयास सांगितली व सोबत महिन्याभराचा शिधापण दिला. अश्या पद्धतीने खानावळ सुरु झाली. त्या मुलांमधील एक म्हणजे लाखांदुरचे खासदार कै. नामदेवराव दिवटे (हे १५ भाजपा आमदार व ५ वर्षे खासदार) खानावळीत येत. आजीला ते सर्व आईच म्हणत. या लोकांनी संबंध जपले, पडेल तशी मदतही केली. त्यांचा संबंध आजीशी मरे पर्यंत होता व आजी गेल्यावरही ते स्वतः जाई पर्यंत होता.. साहजिकच आम्ही त्यांना मामा म्हणायचो . असे आणखी दोन गृहस्थ अतिशय सज्जन त्यांनी मरे पर्यंत आमच्याशी संबंध ठेवला व भावाचे कर्तव्य निभावले. जिथ सख्ख्यांनी घराबाहेर काढल तिथ या अनोळखी चेहऱ्याच्या, सर्व जाती जमातीतील व्यक्तींनी जमेल तशी मदतहि केली.
आमची मावशी, आजीच्या संस्कारामुळे पुढे जाऊन विदर्भातील एक प्रथितयश कीर्तनकार सौ शोभाताई पंधे म्हणून नावारूपाला आली, त्यांची बरीच कीर्तने आकाशवाणी व इतरत्र व्हायची. आमची आई अध्यात्मिक क्षेत्रात उच्च दर्जाची आहे व अतिशय उत्तम कवियित्री पण प्रसिद्धी पराड्मुख आहे. तिचे दासबोध प्रवचनाचे कार्य अव्याहत सुरु असते. सज्जनगड येथून चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात ती परीक्षक म्हणूनही अत्यंत व्यस्त असते.
आमच्या आजीचा विस्कटलेला संसार तिने मोठ्या हिमतीने पुन्हा उभा केला, आज ती ह्यात नाही, पण तिने उभ्या केलेल्या वृक्षाची मुळ बरीच खोलवर रुजली आहेत. तिचा एक पणतू आज प्रथितयश गायक(सारेगम विजेता अनिरुद्ध जोशी) म्हणून समोर येत आहे तर नातवंड अतिशय उच्च स्तरावर विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. आज तो लढा आमची आजी लढली नसती तर आज आम्ही कदाचित नसतोच.
आमच्या पैकी प्रत्येकाला आमच्या आजीचा अभिमान आहे. आज समाजात सारख्या सारख्या होणार्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचल्यावर, धैर्य गमावणाऱ्या ह्या लोकांकडे बघितल्यावर तिच्या लढ्याचे मोल अधिकच जाणवते. न जाणो कदाचित हे वाचून एकाला जरी लढण्याची उमेद मिळाली तरी आजीच्या लढयाच सार्थकच होईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.