Site icon InMarathi

शनिवारची बोधकथा: अचानक आलेल्या संकटावर मात करायला शिकवणारी कथा…

chanakya inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एखादं छोटंसं संकट समोर आलं, तरी अनेकदा आपण हातपाय गाळतो. त्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करायचा सोडून, आता यातून बाहेर पडणं शक्यच नाही अशी धारणा करून घेतो. पण नेहमीच असा विचार करणं बरोबर ठरत नाही.

जीवावर बेतलेल्या संकटावर सुद्धा मात करता येते आणि त्यातून अगदी सहजरित्या बाहेर पडत येऊ शकतं. अशावेळी घाबरून अथवा गांगरून न जाता कुठल्या मार्गाने संकटावर मात करता येईल याचा  विचार करणं गरजेचं असतं.

याचीच शिकवण देणारी ही एक कथा… ही कथा वाचून, शांत डोक्याने संकटावर मात करणं शक्य आहे, यावर तुमचा विश्वास बसेल.

===

ही कथा आहे, आर्यक आणि चतुरक यांची. हे दोघे युवक, योजना रचण्यात सर्वात हुशार मानल्या जाणाऱ्या चाणक्यांचे शिष्य होते. केवळ शिष्यच नाही तर अत्यंत हुशार आणि गुणी सेवक सुद्धा होते.

 

 

या दोघांची गुरुनिष्ठा आणि कर्तृत्व बघून चाणक्य यांनी त्या दोघांनाही एका मोठया कामगिरीवर पाठवलं होतं. ग्रीक साम्राज्यात हेरगिरी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

आपण गुप्तहेर आहोत हे लक्षात येऊ न देता त्या प्रदेशात राहून तिथली इत्यंभूत माहिती मिळवण्याचं काम हे दोघेही अगदी उत्तमरित्या पार पाडत होते.

एक दिवस मात्र दुर्दैवाने ते पकडले गेले. ते साम्राज्यातील नागरिक नसून गुप्तहेर आहेत, हे लक्षात येताच सैनिकांनी त्यांना बंदी बनवून राजासमोर हजर केलं. या दोन्ही तरुणांना राजाने मृत्युदंड घोषित केला.

===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ सांगणारी ही कथा वाचायलाच हवी

===

हे तरुण घाबरून जातील अशी त्याची अपेक्षा होती. मात्र असे काहीही झाले नाही. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर मृत्यूचे भय दिसत नव्हते. हे बघून राजा आश्चर्यचकित झाला. ‘तुम्हाला मृत्यूचे भय वाटत नाही का?’ असा थेट सवाल त्याने आर्यक आणि चतुरक यांना केला.

चेहऱ्यावर भीतीचे कुठलेही भाव येऊ न देता अत्यंत आत्मविश्वासाने चतुरक याने राजाला उत्तर दिलं, की ‘मला मृत्यूचे अजिबातच भय वाटत नाही. मात्र मी गेल्यानंतर, मी शिकलेली एक दुर्मिळ कला माझ्यासोबतच नष्ट होईल, याचं वाईट नक्कीच वाटतंय.’

हे ऐकून राजा अधिकच चक्रावून गेला. त्याने या कलेबद्दल अधिक विचारणा केली. दरबारातील मंडळी सुद्धा या अनोख्या कलेबद्दल ऐकण्यास उत्सुक होती.

 

 

कुठलेही आढेवेढे न घेता चतुरकाने त्याच्या कलेबद्दल सांगायला सुरुवात केली. घोड्यांना एक विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षण देण्याची कला त्याला अवगत असल्याचं त्याने सांगितलं. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर, घोडे अधिक वेगाने पळू शकतात आणि १० ते १२ फुटांपर्यंत उंच उड्यासुद्धा मारू शकतात.

हे ऐकल्यावर दरबारातील सगळेच जण आश्चर्यचकित झाले. राजा सुद्धा हे ऐकून खूपच खुश झाला आणि त्याने मृत्यूदंडाची शिक्षा सशर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या राज्यातील उमद्या घोड्यांना हे प्रशिक्षण देण्यासाठी किती काळ लागले असा प्रश्न त्याने चतुरकाला केला.

चतुरकाने ६ महिन्यांचा कालावधी मागून घेतला. कडक पहाऱ्याखाली त्यांना बंदी म्हणून ठेवण्यात आलं, मात्र राज्याच्या ताफ्यातील महत्त्वाच्या सगळ्या घोड्यांची जबाबदारी आर्यक आणि चतुरकाकडे सोपवण्यात आली.

 

===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा: चिंता करणं सहजपणे सोडायला शिकवणारी गोष्ट…

===

खरंतर चतुरकाचं बोलणं ऐकून आर्यकही हैराण झाला होता. अशी कुठलीही कला अवगत असल्याचं चतुरकाने आपल्याला का सांगितलं नाही, का प्रश्न त्याला सतावत होता.

त्याबद्दल चतुरकाकडे विचारणा केल्यावर, त्याने थाप मारली असल्याचं आर्यकाला सांगितलं. ‘मी असं बोललो नसतो, तर आज आपला मृत्यू निश्चित होता. हे खोटं बोलल्यामुळे आपल्याला सहा महिन्यांचा काळ मिळाला आहे, त्याकाळात इथून वाचण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.’ असं चतुरक म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून आर्यक प्रभावित झाला. त्याने स्वतःची बुद्धिमत्ता वापरून पळून जाण्याची योजना शोधण्यास चतुरकाला मदत केली. अचानक राजाच्या समोर उभं केलं गेलं असतानाही, आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करत जीव वाचवणाऱ्या चतुरकाने आर्यकाच्या मदतीने अवघ्या काही दिवसातच तिथून पोबारा केला.

 

 

एवढंच नाही, तर त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आलेले घोडे सुद्धा त्यांनी स्वतःसोबत पळवून नेले. हे घोडे परत करण्याचा मोबदला म्हणून राजाकडून मोठी रक्कम सुद्धा मिळवली.

आर्यक आणि चतुरकाने संकटाला धीराने तोंड देत, स्वतःचा जीव तर वाचवलाच उलट मोठा फायदाही करून घेतला.

बोध

कुठलेही संकट आले म्हणून घाबरून जाऊ नये. शांतपणे आणि धीराने त्याचा सामना करावा. बुद्धीचा वापर करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.

===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : निरोगी आयुष्य सहज जगता येतं, हे पटवून देणारी गोष्ट!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version