आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पुण्यात भलेही समुद्र नसेल, पण सारसबाग आहे..पुळ्याचा गणपती नसेल पण पर्वतीवरचा देवदेवेश्वर आहे तसेच भलेही एखादे क्रॉफर्ड मार्केट नसेल पण ‘हक्काची’ जगप्रसिद्ध तुळशीबाग आहे.
आता तुम्ही म्हणाल, साधी तुळशीची बाग त्यात विशेष ते काय? इथेच तर खरी मेख आहे. तुळशीबाग हे पुणेकरांच्या अभिमानाचं ठिकाण आहे.
तिथलं राममंदिर असो की मानाचा गणपती, नाहीतर शेजारची महात्मा फुले मंडई किंवा कावरे आईस्क्रीम व मस्तानी आणि काका हलवाई सारी आपापली वैशिष्ट्ये टिकवून आहेत.
पुणेकर कोणीही असो इथे जन्मलेला किंवा बाहेरून येवून वसलेला सारसबाग, पेशवे उद्यान, पर्वती आणि तुळशीबाग हे त्याचे खास जिव्हाळ्याचे आणि अस्मितेचे विषय.
===
- गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ११ ठिकाणे
- शनिवारवाडा आणि पर्वती म्हणजेच पुण्यात भ्रमंती! या १२ स्थळांमुळे ‘गैरसमज’ दूर होईल.
===
त्यातील तुळशीबाग ही लहान थोरांच्या मुख्यतः महिलांच्या आपुलकीची जागा. कारणही तसेच आहे त्यामागे. चिमुरडीच्या भातुकलीपासून नवविवाहितेच्या नव्या संसारापर्यंत आणि छोट्या क्लिप पासून सोन्याच्या सरीपर्यंत सारंकाही मिळतं तुळशीबागेत.
पुणे दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांचे पुणे दर्शन तुळशीबागेला भेट दिल्याशिवाय अपूर्ण रहात असावे. नॉव्हेल्टीज, कपडे, चपला, पर्सेस, मेकप किटस् , सजावटीच्या वस्तू किती आणि कायकाय खरेदी करावं तेवढं थोडचं.
खुल जा सिमसिम म्हणून तुळशीबागेच्या मायाजालात शिरावं आणि दोन/चार पिशव्या भरून नाहीतर गेला बाजार एखादं गाळणं खरेदी करून भरभरून घेतलेल्या नेत्रसुखानं बाहेर पडावं तर कावरे मस्तानी किंवा काका हलवाई आपली वाटच पहात असतात.
अशावेळी तुळशीबाग म्हणजे मरुद्यान असल्याचा भास होणे क्रमप्राप्त आहे. तुळशीबागेची ही एवढीच ओळख नाही तर दोनशे ते अडीचशे वर्षांची सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा तुळशीबाग आणि त्यातील राम मंदिराला आहे.
तुळशीबागेच्या निर्मितीमागची कथा अशी आहे की, साताऱ्याजवळच्या पाडळीचे आप्पाजी खिरे हे मोठा कुटूंब खटला असलेले वतनदार. नारायण त्यांचा धाकटा मुलगा. धाकटा असल्याने सर्वांचा लाडका आणि तितकाच हट्टी.
या हट्टीपणासाठी एक दिवस त्याची आई त्याला रागावली. तर रुसलेल्या नारायणाने काहीतरी कर्तबगारी करून दाखवायचीच अशा हट्टाने तडक पुणे गाठले.
पण नवे शहर, नवे लोक, वय लहान अशा परिस्थितीत तो पोरं दिवसभर पुण्यात भटकल्यावर थकून गेलं आणि आंबिल ओढ्याकाठच्या रामेश्वराच्या मंदिरात विश्रांतीसाठी थांबला. दिवसभराच्या थकावटीने त्याला झोप लागली.
वेळ संध्याकाळची असल्याने अनेक जण सायंपुजेसाठी मंदिरात येत होते पण कोणाचेच लक्ष त्या पोराकडे गेले नाही..पेशव्यांचे सरदार खाजगीवाले हे देखील या मंदिरात दर्शनासाठी येत.
नियमानुसार ते दर्शनासाठी आले असता त्यांनी मंदिराच्या कोपऱ्यात मुटकुळे करून झोपलेल्या नारायणाला पाहिले आणि त्याला जागे करून त्याची चौकशी केली.
चांगल्या घरातला पोरगा म्हणून त्यांनी नारायणाला आपल्या घरात आश्रय दिला व लहान वय पाहून त्याला पुजेसाठीची तुळस व फुले जमा करण्याचे काम दिले.
खाजगीवाल्यांनी गावाबाहेर एक एकरात स्वतःच्या मालकीची फुलबाग रुजवली होती. ज्यात तुळशीची देखील बरीच रोपे होती तीच ही तुळशीबाग..
पुढे नारायणाची हुषारी आणि त्याची गणितातील समज पाहून खाजगीवाले यांनी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली व यथावकाश पेशवे दप्तरात रुजू करून घेतले. तेथेही आपल्या प्रामाणिकपणा व हुषारीच्या जोरावर नारायणाने पेशव्यांचेही मन जिंकत अनेक उच्चपदे स्वकर्तुत्वावर मिळवली.
कात्रज तलावाचे बांधकाम, मुख्य रस्त्यांवरील वृक्षलागवड, सारावसुलीची नवी पद्धत यांमुळे तो पेशवाईत कर्तबगार म्हणून प्रसिद्ध झाला. नारायणाला खाजगीवाले प्रेमाने नारो म्हणत पुढे त्याचे तेच नाव रूढ झाले आणि तो नारो आप्पाजी या नावाने ओळखला जाऊ लागला.
दप्तरातील कामाची पद्धत, प्रामाणिकपणा, निष्ठा यांमुळे नारो आप्पाजी छत्रपती शाहू व पुढे बाजीराव पेशव्यांचे लाडके बनले. छत्रपती शाहूंच्या सेवेत असताना त्यांना इंदापूर परगण्याचे मुतालिक ही बनवले गेले.
पुण्याच्या नगरविकासाचे स्वप्न पाहणाऱ्या नानासाहेब पेशव्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात नारो आप्पाजींचा महत्वाचा सहभाग होता इतकेच नाही तर हैदरने पुण्यावर केलेल्या स्वारीच्या वेळी पुणे रक्षणाच्या कामगिरीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या या कर्तबगारी व स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन नानासाहेबांनी त्यांना पालखीचा मान दिला होता.
नारो आप्पाजींचे उपास्य दैवत श्रीराम हे होते. आपल्या उपास्याचे मंदिर बांधण्याची त्यांची तिव्र इच्छा होती. त्यामुळे जेव्हा त्यांनी खाजगीवाले यांच्याकडून तुळशीबाग खरेदी केली तेव्हा त्या बागेतच राममंदिर बांंधावे असे त्यांना वाटले.
म्हणून पेशव्याच्या परवानगीने त्यांनी तुळशीबागेत राम सीता लक्ष्मण यांचे मंदिर बांधले तेच हे तुळशीबागेतले राममंदिर. तुळशीबागेचे मालक झाल्याने सर्वजण नारो आप्पाजींना तुळशीबागवाले म्हणून ओळखू लागले.
ऐतिहासीक महत्वाइतकेच तुळशीबागेचे सांस्कृतिक महत्व देखील आहे. सुधीर फडकेंच्या गीत रामायणापासून ते भिमसेनजींच्या सुरेल मैफलींपर्यतची रागदारी राममंदिराच्या सभामंडपाने अनुभवली आहे.
अनेक ख्यातीचे व्याख्याते आणि किर्तनकार यांनी इथे सादरीकरण केले आहे. आजही काकडा आरती, तिन्ही वेळचा नगारा या राममंदिराच्या परंपरा चालू आहेत.
इथल्या मंदिरातील मुर्तींचे वैशिष्ट्य हे, की या तीनही मुर्ती संगमरवरी असून वल्कले धारण केलेल्या आहेत. सीतामाईच्या हातात कमंंडलू व कमळ आहे. या तिन्ही मुर्तींच्या बनावटीमध्ये सुक्ष्म फरक असल्याचे सांगितले जाते.
मंदिराचा मुख्य कळस सोन्याचा असून इतर जवळपास शंभराच्या आसपास उपकळस व कोनाडे आहेत. या कोनाड्यांमध्ये पेशवेकालीन कर्तबगार पुरुषांच्या मुर्ती स्थानापन्न आहेत.
मंदिराचा ट्रस्ट असून रामजन्मोत्सव, दसरा आदी विशेष दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मंदिराच्या कडेने असलेल्या वाड्यात आजही काही जुनी कुटूंबे वास्तव्यास आहेत.
शहरीकरणाच्या रेट्यात त्यांची पुढची पिढी बाजूच्या उपनगरांत विसावली तरी ही जुनी खोडे आजही मुळ धरून आहेत.
हेच ते तुळशीबागेतील राममंदिर व कडेनं वसलेली तुळशीबाग. मंदिराची स्थापना झाल्यावर काही व्यापाऱ्यांना मंदिराच्या भवतीने पुजा सामग्री आणि फुले यांची विक्री करायची परवानगी देण्यात आली. कालांतराने याच दुकानांचा विस्तार होत होत आजचे मॉडर्न तुळशीबाग मार्केट विकसीत झाले.
तरीही तिथे मिळणारी पितळी भातुकली, वेगवेगळी तांब्यापितळेची भांडी, तबके, नक्षीदार दिवे, गौरींचे झोपाळे आणि पितळी मुखवटे यांची क्रेझ आजही टिकून आहे. पुण्यातील कोणत्याही स्तरातील युवती किंवा महिला असो तिचा खरेदीसाठीचा ओढा तुळशीबागेकडेच कललेला असतो.
नगर रचनेच्या नव्या नियमांनुसार आणि स्मार्ट सिटीच्या दिवास्वप्नांत तुळशीबागेचे भवितव्य गुलदस्त्यात असले तरी संसाराच्या अथ पासून इतिपर्यंत सारंकाही मिळणाऱ्या तुळशीबागेचं गारूड आजही टिकून आहे हे मात्र तितकेच खरे!
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.