Site icon InMarathi

हिंदू-मुस्लिम ऐक्य साध्य करण्यासाठी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ह्या आधीच्या लेखात, हिंदुत्ववादी कट्टरवाद हा मुस्लिम कट्टरवादाची प्रतिक्रिया आहे, हे मांडण्याच्या प्रयत्न केला होता. ह्या लेखात त्यापुढे जाण्याचा प्रयत्न करतोय.

“सर्व धर्म सारखेच चांगले आणि सारखेच वाईट असतात” – असा ठाम विश्वास भारतीय जनमानसात आढळून येतो. ह्या “सर्व-धर्म-समान” असण्याची प्रामाणिक (अंध)श्रद्धा बाळगण्यात – अनेक देव, अनेक ग्रंथ, अनेक परंपरा असलेला, अनेक छोट्या छोट्या धर्मांचा/आस्थांचा गुंता बनून उभा राहिलेला हिंदू समाज, अव्वल आहे. ते स्वाभाविकही आहे.

आधीपासूनच “आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो, तो दुसऱ्याला वाटेलच असं नाही.” असं प्रबोधन कळत-नकळत आमच्यावर होत जातं. ३३ कोटी देव आहेत. नाना तर्हेचे उपासना प्रकार. कुणी शाकाहारी आहेत कुणी अगदी दुग्धजन्य पदार्थदेखील टाळणारे तर कुणी मांसाहार देखील हिंदू धर्मशास्त्र संमत आहेत असं हिरीरीने मांडणारे. कारण कुणाला राम आवडेल तर कुणाला शाम. कुणी विष्णू उपासक तर कुणी शिव भक्त. इतिहासात एकमेकांच्या मुळावर उठलेले हे संप्रदाय हळूहळू हिंदू नावाच्या महासागरात विलीन झाले. त्यामुळे “ते ही आपलेच आणि ते ही चांगलेच” हा भाव आपसूकच निर्माण झाला/होतो/होत राहील.

भारतीय मनामध्ये सर्वधर्मसमभाव आहे तो असा – सर्व धर्म चांगले – ह्या अर्थाचा.

 

स्रोत- sachbharat.org

भारतात हिंदू-मुस्लिम ऐक्य व्हावं अशी इच्छा जेव्हा गैर मुस्लिम व्यक्त करतात, तेव्हा त्या मागे ही “सर्व-धर्म-समान” असण्याची प्रामाणिक (अंध)श्रद्धा असते. आणि ते ठीकच आहे. त्यावर आपण काही करू शकत नाही आणि करू ही नये. ही श्रद्धा भारताचा सोशल फॅब्रिक मजबूत ठेवते. त्यामुळे सामान्य जनांमधील हा विश्वास अंध जरी असला तरी हितकारक आहे.

पण – विवेकवादी, बुद्धिवादी, समाजसेवक आणि मुख्यतः पॉलिसी मेकिंगवर प्रभाव पाडू शकतील – अश्यांनी मुस्लिमेतर आणि मुस्लिम समाजांमधील फरक आणि फरकाची कारणं ओळखू नयेत हे फारच आश्चर्यजनक आहे.

“आम्हाला आमचा धर्म सर्वश्रेष्ठ वाटतो” ही भावना मुस्लिम लोक जेवढ्या प्रबळपणे बाळगतात, त्या भावनेपोटी इतरांवर प्रभाव पडण्याची कृती जेवढ्या हिरीरीने करतात आणि “आम्हाला मुस्लिम धर्म संमत कायदाच हवा आहे” हा हट्ट जेवढ्या इरेस पेटून करतात – तेवढी प्रबळ भावना इतर कुणीही व्यक्त करत नाही. एखाद्या समुदायाद्वारे कायदा बाह्य कृती करताना, अ-भारतीय प्रश्नांबद्दल भारतात वादंग पेटवताना जर त्याचा धर्मावरील विश्वास कारणीभूत ठरत असेल तर त्या धर्माची शिकवण कट्टरता पेरण्यात कमालीची यशस्वी ठरत आहे आणि त्या यशामागे मोठी यंत्रणा आहे – हे ओळखणं कितीसं अवघड आहे?

 

ukmadarsaboard.org.in/

मी ह्याच अंधश्रद्धेतून कित्येक वर्ष गेलो आहे. मुस्लिम वर्तनातील अनेक गोष्टी खटकत असूनही “हा त्या धर्माचा किंवा सरसकट सर्व मुस्लिमांचा दोष नाही – काही मोजक्याच कुजक्या टाळक्यांचा दोष आहे” — असा ठाम विश्वास होता मनात. एका हिंदुत्ववादी वाटणाऱ्या (पण प्रत्यक्षात १००% सेक्युलर असणाऱ्या! पूर्वी मुस्लिमांच्या चुका दाखवणारा प्रत्येक इसम हिंदुत्ववादी वाटत असे!) माणसाबरोबर, समोरासमोर चर्चा करताना त्याच्यासमोर हा विषय काढला. मी उत्तेजित होऊन म्हणालो –

तुम्ही मुस्लिमांना एवढी नावं ठेवता…तुमचं म्हणणं काय आहे? मारून टाकायचं का सर्व मुस्लिमांना?

तो माणूस शांतपणे डोळ्याला डोळे भिडवून म्हणाला –

नाही. मुस्लिमांमधील इस्लाम संपवायचा.

मी थंडगार झालो.

धर्म वाईट असू शकतो? इतका?!

मग शेषराव मोरेंचं “मुस्लिम मनाचा शोध” वाचलं आणि डोळे खाडकन उघडले.

अर्थात, “इस्लाम संपवणे” हे अजूनही फार टोकाचं वाक्य वाटतं. इस्लाम मधील शिकवणी कट्टरपणे उचलण्याची प्रेरणा देणारी व्यवस्था संपवता आली आणि त्याद्वारे –

“हे जे लिहिलंय, सांगितलंय…ते ठीके…प्रेषितांनी त्या काळी दिलेला हा संदेश आहे…पण आज मी माझी मतं इतरांवर लादणार नाही आणि लोकशाही व्यवस्थेचा अंगीकार करून त्या व्यवस्थेला साजेश्या प्रकारेच माझा धर्म पाळेन…माझे पारलौकिक हितसंबंध दूर कुठेतरी रहाणाऱ्या मुस्लिमांशी जरी असले तरी इहलोकात माझी भूमी, भूमीवरील समाज म्हणजे भारत आणि भारतीय हेच आहेत…मी त्यांची प्रतारणा करणं अयोग्य आहे…”

– अशी मानसिकता मुस्लिमांमध्ये रुळवळी तरी काम भागणार आहे.

आणि म्हणूनच ज्यांना हा प्रश्न पटला आहे, समजला आहे – त्यांनी केवळ “मुस्लिम अमुक-इस्लाम तमुक” असं नं बोलता “तर काय करायचं” ह्यावर बोलणं सुरू करायला हवं. हा प्रश्न भांडण्यासाठी, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वापरण्याचा एक मुद्दा बनून राहतोय. अश्याने समस्या सुटणार नाही, वाढत जाईल.

मुस्लिमांमध्ये सर्वसमावेशकता कशी रूळवता येईल हे पॉलिसी मेकर्स नी ठरवायला हवं. त्यासाठी शिक्षण आणि रोजगार पुरवणं पुरेसं नाही. मुस्लिम समुदायावर होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कार शुद्ध करावे लागणार. ते करण्यासाठी आक्रमक संस्कार देणारी व्यवस्था मोडून काढावी लागणार. हे घडण्यासाठी प्रश्न मुळातून समजून घ्यायला हवा. तो मान्य करायला हवा. मान्य झाल्यानंतर मदरसे, मुल्ला-मौलवी ह्यांच्या मुसक्या आवळायला हव्यात. इस्लाम मध्ये सोशलिज्म आहे असं भाबडं तत्वज्ञान तरूणांच्या गळी उतरवणाऱ्या विचारवंतांनादेखील कंट्रोल करायला हवं. भारतीय गुप्तहेर यंत्रणेकडे अश्या इतरही अनेक धाग्यादोऱ्यांची इत्यंभूत माहिती असणारच. त्या सर्वांवर सर्वांक्ष उपाययोजना व्हायला हवी. परंतु हे घडवून आणण्यासाठी विचारवंत, माध्यमं, विरोधी पक्ष आणि खुद्द सत्ताधारी पक्षाची हा प्रश्न सोडवण्याबद्दल बांधिलकी हवी. त्या बांधिलकीतून ही प्रक्रिया घडून येईल. ती बांधिलकी निर्माण करणं आपल्या हातात आहे…”योग्य प्रकारे” हे मुद्दे चर्चेत ठेवून आपण ते साध्य करून शकतो.

भारतात हिंदू-मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करायचं असेल तर हिंदूंमधील प्रतिक्रियात्मक कट्टरता संपवावी लागणारच.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हातात शस्त्र घेऊन मुस्लिमांना मारणारे फार कमी आहेत. परंतु “मुस्लिम लोक एका समस्येचा भाग आहेत” असं वाटणारे हिंदू कित्येक पट अधिक आहेत. ह्या हिंदूंच्या मनातील मुस्लिमांची भीती नजरेआड करून हिंदू-मुस्लिम ऐक्याची स्वप्नं बघणं स्वप्नरंजन ठरेल. ह्या भीतीवर आपले समाजविघातक हेतू पूर्ण करून घेणारे कट्टरवादी हिंदू संघटन जर निष्प्रभ करायचे असतील तर हिंदू मनातील ही भीती संबोधित करणं आवश्यक आहे – जे गेल्या लेखात मांडलं होतंच. परंतु ते संबोधित करणं वरवरचं ठरेल – जर मूळ प्रश्न सोडवला नाही तर.

सर्व धर्म सारखेच चांगले आणि सारखेच वाईट – असं समजून चालणार नाही. काही धर्म कमी उपद्रवी व्यवस्था निर्माण करतात तर काही अधिक – हे सत्य उमजून घेऊन त्यानुसार प्राथमिकता ठरवावीच लागणार आहे. सध्या भारताची प्राथमिकता मुस्लिम समुदायाला भारतीयत्वात रूळवणे ही असायला हवी. त्यात भारताचं भलं तर आहेच…खुद्द मुस्लिमांचा उत्कर्ष देखील त्यातच आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version