Site icon InMarathi

मुलगी जन्मल्यावर या गावात घडतं काहीतरी फारच वेगळं… विचारात टाकणारं असंही एक गाव

pilantri village featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मुलगी झाली हो! असं ऐकलं की नाकं मुरडली जातात आजही! हो हे अगदी खरं आहे. मुलगी ही देणेकऱ्याचे देणं समजली जाते. मुलगी म्हणजे जबाबदारीच.. परिणामी मुलगी नकोच असा सूर आजही आळवला जातो.

ती इतकी नकोशी होते की तिचं नाव नकुशी ठेवण्यापासून आईच्या गर्भातच तिला मारण्यापर्यंत पावले उचलली जातात. स्त्रीभ्रूणहत्या कायद्याने गुन्हा असूनही समाजातल्या सर्वच स्तरांवर हे कृत्य केले जाते.

यामुळे मुलींचा जनन दर खूप खालावला असून काही वर्षांनी लग्नासाठी मुलगी हवी म्हणून मारामाऱ्या होतील अशी परिस्थिती आहे..यालाही काही अपवाद आहेतच. जे जाणतात मुलगी होण्याचे महत्व आणि स्वागत करतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचे..एक अभिनव परंपरा जपून.

कोण आहेत हे लोक? कोणती परंपरा यांनी सुरू केली? चला तर जाणून घेऊयात.

राजस्थानच्या राजसमांड जिल्ह्यातील पिपलांत्री गाव. जे आज जगाच्या नकाशावर ‘इको-फेमिनिस्ट’ गाव म्हणून स्वतःची ओळख मिळवून आहे. त्याच गावात, गावातील प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर १११ झाडांचे वृक्षारोपण केले जाते.

 

 

भारतासारख्या विकसनशील देशात मुलीचा जन्म हा तिच्या माता-पित्यासाठी जबाबदारीचे ओझे मानला जातो. पण पिपलांत्री गावच्या लोकांनी मात्र मुलीचा जन्म हा आनंदोत्सव मानून साजरा करायला सुरवात केली ती २००६ पासून.

===

हे ही वाचा दहा झाडे लावा आणि बंदुकीचं लायसन मिळवा. काय आहे हा प्रकार?

===

झालं असं की गावचे त्यावेळचे सरपंच शामसुंदर पालिवाल यांची लाडकी कन्या किरण हीचा डिहायड्रेशनने मृत्यू झाला. शोकाकूल पालिवाल परिवाराने तिच्या स्मृतीप्रित्यर्थ गावाच्या वेशीजवळ एक झाड लावले.

त्यानंतर शामसुंदर पालिवाल यांच्या मनात कल्पना आली की गावातील प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर हे असे वृक्षारोपण केले तर उत्तमच होईल. साऱ्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन या परंपरेला २००७ मध्ये सुरवात झाली. आज जवळपास एक हजार हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण झाले आहे.

पालिवाल सांगतात जेव्हा ते २००५ मध्ये सरपंच झाले तेव्हा साऱ्या परिसरात संंगमरवरासाठीचे खाणकाम चालू होते. या खाणींमुळे आजूबाजूचे डोंगर, परिसर उजाड झाला होता. पर्यावरणाचे नुकसान होत होते. आधीच कमी असलेल्या पाण्याची टंचाई अजूनच जाणवत होती.

पाण्याअभावी गावचा विकास रखडला होता त्यातच राजस्थानातील इतर गावांप्रमाणे बालविवाह, मुलींना हीन वागणूक या गोष्टीही गावात होत्या. यामुली देखील कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून लहान वयातच मजूरी सारखी कामे करू लागत ज्यामुळे त्या अशक्तच रहात व लहान वयातच मृत्यू पावत.

त्यातच २००७ मध्ये पालिवाल यांची मुलगी डिहायड्रेशनने मृत्यू पावली. हीच घटना एक नवीन वळण देणारी ठरली. त्याप्रमाणे आता गावात मुलीचा जन्म झाला की हिंदूंमध्ये शुभ मानल्या गेलेल्या संख्येइतकी म्हणजे १११ झाडे लावतात.

 

 

यामुळे मुलीच्या जन्माचा आनंद तर साजरा होतोच पण पर्यावरणपुरकता ही वाढते. या संपूर्ण परिसरात आता जवळपास ३,५०,००० झाडे आहेत. ज्यात आंबा, उंंबर, चंदन, पिंपळ, बांबू, नीम यांसारखी पर्याववरणपूरक झाडे आहेत. या झाडांमुळे कधीकाळी उजाड,बंजर माळरान झालेली जमिन आज सदाहरीत बनली आहे.

मुलीच्या जन्माप्रित्यर्थ जरी वर्षभर वृक्ष लागवड होत असली तरी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात एका खास उत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यात त्या वर्षभरात जन्मलेल्या मुलींच्या हस्ते वृक्षारोपण होते.

५५०० लोकवस्ती असलेल्या या गावात दरवर्षी सरासरी ६० मुली जन्माला येतात. या मुली आपल्या नावाने लावलेल्या प्रत्येक झाडाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतात. इथे झाडांनाही आपल्या कुटूंबातील घटक समजतात.

इतकेच नाही तर ज्यांना मुली नाहीत असे लोक ही आपल्या पुढच्या पिढीत येवू घातलेल्या मुलींसाठी वृक्षारोपण करतात. हा बदल नक्कीच सुखावह आणि सकारात्मक आहे.

 

 

येणारा नवीन सरपंच आणि इतर अधिकारी वर्ग यांना वडाच्या झाडाच्या साक्षीने ही परंपरा पुढे चालू ठेवण्याची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

” राजस्थान हा योद्ध्यांचा देश आहे. पूर्वीच्या विरांनी परकीय आक्रमणं थोपवली आणि आम्ही रोगराई आणि प्रदुषण यांच्याविरूद्ध लढतो आहोत.” पालिवाल सांगतात.

गेल्या काही वर्षांत पालिवाल यांच्या या योजनेने पर्यावरणपूरक आणि स्त्रीवादी चळवळीचे व्याप्त रूप घेतले आहे. वृक्षारोपणाबरोबरच नवजात मुलीच्या पालकांना एका शपथपत्रावर सही करावी लागते.

===

हे ही वाचा “रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान? वाचा याचं शास्त्रीय उत्तर

===

ज्यात आमच्या मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणार नाही तसेच तिचे शिक्षण ही पूर्ण करू अशा अटी समाविष्ट असतात. याबरोबरच मुलीच्या पालकांकडून १०,००० रूपये व उर्वरीत गावातील लोकांच्या जमा वर्गणीतून अशी प्रत्येकी ३१००० रूपयांची दामदुप्पट ठेव पावती प्रत्येक मुलीच्या नावावर ठेवली जाते.

मुलगी १८ वर्षांची झाली की ही जमा रक्कम मुलीच्या लग्नासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी दिली जाते. यामुळे स्त्रीभ्रुणहत्या, बालमजूरी,बालविवाह या वाईट गोष्टींना आळा बसला तर आहेच पण गावातील मुली चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होण्याची स्वप्नं बघत आहेत.

पिपलांत्री गावात रुजलेल्या आणि वाढलेल्या या सदाहरीत जंगलामुळे आता भुजलाच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. खाणकामामुळे उजाड बनलेल्या जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. झाडांमुळे वेगवेगळे पक्षी,प्राणी पिपलांत्रीमधे दिसतात. पायातून बागडणारे ससे किंवा दिवसा रस्त्यांवर फिरणारे मोर किंवा वेगवेगळ्या जातींचे पक्षी पिपलांत्रीमध्ये सहज दिसतात.

 

 

ह्या सांस्कृतिक बदलामुळे स्त्रीयांचेही जीवनमान उंचावले आहे. तुम्ही जर सतत काम करत राहिलात तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतातच आणि इतरही त्याच्याशी जोडले जातात हा पालिवाल यांचा अनुभव आहे.

मुलींचा सन्मान व पर्यावरणाचे रक्षण इतकाच या जंगलांच्या निर्मितीमागचा उद्देश नसून त्यातून स्थानिक लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा हाही हेतू होता. प्रत्येकालाच उद्योग किंवा कारखान्यांमध्ये नोकरी मिळेल हे शक्य नाही त्यामुळे स्वयंरोजगार निर्मिती हाच आमचा उद्देश होता, असं पालिवाल सांगतात.

यात त्यांनी महिलांचे सहकारी बचतगट स्थापन करून त्याद्वारे महिलांना घरगुती पदार्थांचे उत्पादन आणि विक्री यांना प्रोत्साहन दिले जाते. एखाद्याचा मृत्यू झाला तरी ११ झाडांचे वृक्षारोपण केले जाते. या सर्व झाडांची लागवड गावाबाहेरील माळरान व रीकाम्या जागेत केली जाते.

पिपलांत्रीमध्ये वॉटर हार्वेस्टिंग बरोबरच, बंधारे बांधणे त्यांचे रूंदीकरण तसेच शेततळ्यांची निर्मिती यांचीही कामे केली जातात. जर सरकारी योजनांचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर एकटा माणूस ही किती मोठा बदल करू शकतो याचे पिपलांत्री हे उदाहरण आहे.

आज इको-फेमिनिस्ट म्हणून ओळख मिळवलेल्या या गावाला अनेक जण भेट देतात. तसेच पिपलांत्री पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठीही येतात. गावात लग्न होवून आलेल्या मुली,स्त्रीया ही दुरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून उच्चशिक्षित होतात.

 

 

राज्यसरकारने पिपलांत्री मॉडेलच्या अभ्यासासाठी गावात एक ट्रेनिंग सेंटरही उभारले आहे तसेच राहण्याचीही व्यवस्था केली आहे. गावाच्या या कार्याबद्दल गावाचा राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.

१११ झाडांच्या लागवडीने सुरू झालेली ही चळवळ आज पर्यावरणपूर्वक जंगलांच्या निर्मितीत बदलली आहे.

जेव्हा परंपरांच्या माध्यमातून एखाद्या उदात्त कार्याची सुरवात होते तेव्हा ते नक्की यशस्वी होते. बदल होतो फक्त तो होण्याच्या इच्छेने कामाला सुरवात केली पाहीजे. ह्या शामसुंदर पालिवाल यांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.

===

हे ही वाचा १,०८,००० झाडं लावून भूतान ने साजरा केला राजकुमाराचा जन्म

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version