Site icon InMarathi

शाहू महाराज आणि पेशव्यांचा इतिहास साताऱ्याजवळील या विहीरीच्या पोटात दडलाय!

satara well featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय स्थापत्यशैली ही अनेक स्थापत्यशैलींच्या संयोगाने विकसीत होत गेली आहे. असे अनेक ऐतिहासीक वास्तूनमुने आपल्याला आजही अनेक ठिकाणी पहायला मिळतात. महाराष्ट्रातही विकसित झालेल्या हेमाडपंथी शैलीतील मनमोहक रचना आपण पाहू शकतो.

अशीच एक हेमाडपंथी शैलीतील म्हणजे दगडांवर दगड रचून चुना, सिमेंट इ. चा वापर न करता बांधण्यात आलेली एक ऐतिहासिक वास्तूरचना आपल्याला पहायला मिळते सातारा जिल्ह्यातील ‘लिंब’ गावातील ‘बारा मोटांची विहीर’.

विहीर म्हंटल की नजरेसमोर येते एक गोलाकार कठड्यासहीत किंवा कठडे नसलेलं पाणी शेंदण्यासाठी रहाट बसवलेलं एक बांधकाम, पण ही बारा मोटांची विहीर जरा हटके आहे.

चक्क शिवलिंगाच्या आकारात ही विहीर बांधलेली असून मुख्य विहीर व दोन उपविहिरी अशा तीन ऐवजांसह एक आख्खा राजवाडा या विहिरीने आजवर आपल्या पोटात जपला आहे. कसा ते पाहूया..

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा प्राचीन भारताच्या ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या या अज्ञात गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

===

११० फूट खोल आणि ५० फुट रुंद असलेल्‍या विहिरीमध्‍ये तुम्‍ही कधी राजवाडा पाहिलाय? नाही ना! पण, अशी एक शिवकालीन विहिरी सातारा शहराजवळ असलेल्‍या लिंब नावाच्‍या गावात आहे.

सातारा शहराच्या उत्तरेस अगदी १३ किमी अंतरावर कृष्णा नदीच्या उजव्या तीरावर लिंब नावाचे गाव आहे. या गावात ही विहीर आहे. शिवकालीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणून ही विहीर आणि तिच्यावर बांधलेला महाल आजही प्रेरणा देणारा आहे.

या विहिरीचे बांधकाम शके १६४१-१६४५ या कालावधीत संभाजीपुत्र शाहू ( पहिले ) यांच्या पत्नी श्रीमंत विरुबाई भोसले यांनी केले आहे. शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणजे ही शेरी निंब गावची बारा मोटांची विहीर.

भवताली असलेल्या ३३०० आंब्यांच्या आमराईला व गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या या विहिरीवर पाणी उपसण्यासाठी तब्बल बारा मोटा लावल्या जात.

तशी ही पंधरा मोटा असलेली विहीर, पण नियमीतपणे वापरण्यासाठी बारा व दुरूस्ती देखभालीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन अशा एकूण पंधरा मोटांची थारोळी आजही विहिरीकडेन बघायला मिळतात.

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ने पुण्याहून साताऱ्याकडे जाताना लिंब गाव फाटा लागतो. लिंब गावापासून साधारण १ किमी.अंतरावर शेरी हे ठिकाण असून तेथे ही विहिर बांधण्यात आली आहे.

बारा मोटांनी पाणी उपशाची व्यवस्था एवढेच या विहिरीचे वैशिष्ट्य नसून, वरून पाहिली असता ही विहिर एका शिवलिंगाच्या आकारात दिसते. मुख्य विहीर आणि तिला जोडलेल्या दोन उपविहिरी असे जरी प्रथमदर्शनी बांधकाम दिसत असले तरी या तिन्ही विहिरींना जोडणारे बांधकाम म्हणजे चक्क एक राजमहाल आहे.

 

 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा राजमहाल पूर्णपणे वातानुकूलित असून प्रशस्त आहे. इतकेच नाही तर या विहीरीतून गावात गुप्तपणे ये-जा करण्यासाठी एक भुयारी रस्ता देखील एका उपविहिरीजवळून काढलेला आहे, जो सद्य स्थितीत बंद करण्यात आला आहे.

शाहूराजे तसेच पेशवे यांच्या अनेक खासगी मसलती या ठिकाणी होत असत. अनेक मोहिमांची आखणी तसेच फुरसतीचे काही क्षण ही राजघराण्यातल्या व्यक्तींकडून या ठिकाणी व्यतीत केले जात असे स्थानिक सांगतात.

तरीही ही विहिर प्रसिद्ध झाली ती तिच्या अष्टकोनी, हेमाडपंथी बांधकाम शैलीसाठी. संपूर्ण दगडातून हे कोरीव लेणं उभं केलं आहे. विहीरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या भिंतींवर कोरलेली व्याल आणि शरभ शिल्पे..व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचे शरीर.

ही शिल्पे मराठा साम्राज्याच्या समृद्धी आणि पराक्रमाचे प्रतिक आहेत. विहिरीच्या दक्षिण बाजूला चार हत्तींच्या मस्तकांवर आरूढ झालेल्या वाघाचे शिल्प आहे जे दक्षिणेतील आदिलशाही,निजामशाही, बेदरशाही व कुतुबशाही या चारही मुघल शाह्यांवरील मराठ्यांच्या वर्चस्वाचे प्रतिक आहेत.

उत्तरेकडे झेपावणारी व्याघ्र शिल्प, उत्तरेकडील पुढच्या भावी साम्राज्य विस्ताराचे प्रतिक आहेत. आठ कोन असलेल्या या विहिरीच्या प्रत्येक कोनाड्यात एक नागदेवता स्थापित आहे जी संपत्तीचे द्योतक आहे.

===

हे ही वाचा भारतातल्या या सूर्य मंदिरात, सूर्याचीच पूजा करणं आहे निषिद्ध

===

विहिरीत उतरण्यासाठी एक प्रशस्त जिना आणि कमान असलेला भक्कम दरवाजा आहे. या प्रवेशद्वाराजवळच मोडी लिपीत कोरलेला एक शिलालेख व विहिरीच्या बांधकामासाठी ज्या गाड्यातून दगड आणले गेले त्या गाड्याचे चाक आपल्याला पहाण्यास मिळते.

मुख्य विहीर आणि तिला जोडलेल्या उपविहिरी यांमधील जागेत महालाचे बांधकाम आहे जे दुमजली आहे. विहिरीत उतरण्यासाठी चोरवाटाही आहेत. मुख्य जिना उतरून खाली आलं की आपण महालाच्या तळमजल्यावर पोचतो.

 

 

इथे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूने, एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल असे चिंचोळे जिने आहेत. त्यांचा आकार इंग्रजी ‘एल’ या अक्षरासारखा आहे. या जिन्याने वर जाताच आपण खाशांच्या विश्रांतीस्थळी येतो.

वातानुकूलित असलेल्या या मजल्यावरील कोरीवकाम सुंदर आहे. या बैठकीच्या महालाच्या मध्यभागी चार खांब आहेत.

बैठकीतील खांबांवर कमळ, गणपती, हत्ती,मारुती आणि त्याखाली गजारूढ, अश्वारूढ अशी शिवछत्रपतींची कोरीव शिल्पे आहेत. तसेच फुलांची नक्षीदार कलाकुसरही कोरलेली आहे. महालाच्या गवाक्षाजवळ पडदे लावण्यासाठी असलेल्या कड्या आजही सुस्थितीत आहेत.

या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिले असता तेथील कमानीच्या आतील बाजूस कोरलेली दोन शिल्पे दिसतात. महालाच्या छतावर सिंहासन व बैठक व्यवस्था आणि सभेसाठीची बैठक व्यवस्था केलेली दिसते.

 

 

कृष्णा नदीचा काठ लाभलेल्या या गावात अगस्त्य, गौतम, परशुराम अशा विभुतींच्या वास्तव्याचेही दाखले मिळतात. रामेश्वर, कोटेश्वर, भार्गवराम मंदिर या गावातील इतर मंदिरांचीही स्थापत्यशैली देखणी आहे.

इस. १७१९ साली बांधलेल्या या विहिरीचे पाणी आजवर एकदाही कमी झाले नाही की आटलेले नाही हे विशेष! देशविदेशातील अनेक पर्यटक आणि स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक मोठ्या संख्येने याठिकाणी भेट देतात.

पुण्यापासून साधारण १०० किमी अंतरावर लिंब फाटा असून पुढे २ किमी अंतरावर लिंब गाव लागते. तेथून पुन्हा उजवीकडील बाजूस ऊस, हळद यांची शेतं पार करत गेलं की १ किमी अंतरावर शेरी हे ठिकाण लागते जिथे ही विहीर आहे.

एका महत्वाच्या ऐतिहासीक वारशाला जपणाऱ्या, छत्रपती शाहू व पेशवे यांच्या मसलतींची साक्षिदार असलेल्या, मराठा स्थापत्यशैलीचा उत्क्रुष्ठ नमुना असलेल्या बारा मोटांच्या विहिरीस अवश्य भेट देऊन तिथल्या इतिहासाला, पराक्रमाला, तेथील व्यूहरचनेला आणि मराठा साम्राज्याच्या गतवैभवाला अनुभवलेच पाहिजे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी पाण्यात का बुडाली? वाचा ही रंजक कथा

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version