' सावधान! तुम्ही सिम स्वॅपचे शिकार तर नाही ना!!! वेळीच सावध व्हा आणि हे लक्षात ठेवा… – InMarathi

सावधान! तुम्ही सिम स्वॅपचे शिकार तर नाही ना!!! वेळीच सावध व्हा आणि हे लक्षात ठेवा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजच्या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. काही जणांचं उत्तर सोनं असेल, काहींचं प्रॉपर्टी तर काहींचं उत्तर बँकेतील ठेव, तर काहींचं उत्तर आरोग्य असेल.

हे सर्व तर महत्वाचं आहेच, पण तितकीच महत्वाची अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा ‘डेटा’ – तुमच्या मोबाईल मधील माहिती.

आज जगातील सर्व प्रमुख कंपन्यांचा, चोरांचा डोळा हा फक्त तुमच्या डेटावर आहे. तुमचा डेटा म्हणजे तुमच्या मोबाईल मधील नंबर्स, मोबाईलमध्येच असलेल्या तुमच्या इमेल मधील इमेल्स, बँकेचे आलेले मेसेजेस ह्या गोष्टी सध्या सतत भाव वाढत असलेल्या सोन्या इतक्याच महत्त्वाच्या आहेत.

प्रत्येक क्षेत्रात जशी प्रगती होत आहे तसं चोर सुद्धा ‘स्मार्ट’ होत आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही. बँक तुम्हाला कधीच कॉल करत नाही, तुमच्या कार्डचा CVV, OTP कोणाला सांगू नका हे आपण कित्येक वेळेस ऐकलं, वाचलं असेल. तरीसुद्धा घोटाळे होतच आहेत. लोकांचे पैसे ऑनलाईन पद्धतीने चोरले जात आहेत.

 

online fraud inmarathi

 

हे कसं शक्य होत आहे?

चोरांनी आता इतर कोणती छोटी माहिती घेण्यापेक्षा सरळ तुमच्या मोबाईलच्या सिम कार्डची कॉपी करण्याचं ‘सिम स्वॅप’ हे तंत्र शोधून काढलं आहे.

तुमच्या स्मार्टफोनचा आत्मा असलेल्या सिमची जर कोणी कॉपी केली तर ती व्यक्ती एक तासात काहीही करू शकते. सिम कार्डवर आपण कमीत कमी डेटा स्टोअर करत असलो तरीही जर का एखाद्याने तुमच्या नावाचं डुप्लिकेट सिम जर कंपनीच्या कस्टमर केअर कडे विनंती करून तयार करून घेतलं, तर त्याला तुमचा पूर्ण डेटा मिळू शकतो.

आधार कार्ड, हाताचे ठसे नसताना सुद्धा एखादा चोर तुमच्या नावाचं सिमकार्ड काढू शकतो हे मध्यंतरी समोर आलं आहे.

‘सिम स्वॅप’ कसं केलं जातं / होऊ शकतं ?

१. सर्व्हे कॉल

आपल्याला कित्येक सर्व्हे कॉल येत असतात ज्यामध्ये आपण किंवा घरातील इतर वयस्कर व्यक्ती नकळत काही महत्वपूर्ण माहिती सांगत असते. तुमच्या जन्माची तारीख, तुमच्या आईचं नाव, तुमच्या जन्माचं ठिकाण. चोर लोकांनी केलेल्या या कॉलमध्ये या प्रश्नांच्या उत्तराची नोंद केली जाते.

तुमच्या नावाने तुमच्या टेलिफोन ऑपरेटरला फोन केला जातो. तुमचं सिमकार्ड हरवलं आहे, खराब झालं आहे असं सांगितलं जातं. महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात आणि नवीन सिम मिळवलं जातं. तुम्हाला हे कळेपर्यंत चोरांनी त्यांचं काम केलेलं असतं.

 

sim card inmarathi

 

तुमचं सिम बंद होईल. कोणतीही टेलिफोन कंपनी हे काम मध्यरात्री करत असते. दुसऱ्या दिवशीची सकाळ ही तुमच्यावर बरीच संकटं घेऊन येणारी असते. तुमचे OTP तिकडे जातात आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहार केले जातात.

===

हे ही वाचा – मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

===

२. सोशल मीडिया

आपली सर्व माहिती उपलब्ध असलेल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तुमचा पासपोर्ट फोटो, घरातील सर्वांचे वाढदिवस हे शोधून काढणं चोरांना सहज शक्य आहे. यापैकी जरी तुमचा कोणता पासवर्ड असेल तरीही ती माहिती चोरांसाठी उपलब्ध आहे.

 

social-media-inmarathi

 

तुमच्या वैयक्तिक माहितीमधील जवळपास ५० गोष्टींचा डेटा समोर ठेवून चोर कस्टमर केअरला कॉल केलेला असतो. आधी तो तुमचं सुरू असलेलं सिमकार्ड ब्लॉक करतो आणि मग नव्या सिमची मागणी करत असतो.

३. नवीन अॅप

कोणतंही नवीन अॅप्लिकेशन डाउनलोड करताना आपण त्यांना मोबाईलमधील सगळ्या डेटा वाचण्याची परवानगी देत असतो. काही फ्रॉडअॅप आपली ही माहिती चोरांना विकत असतात.

 

mobile in hand inmarathi

 

४. सिम क्लोन

जर तुम्ही तुमचा फोन कुठे विसरलात, फोन हरवला आणि तो तुम्हाला काही दिवसांनी परत मिळाला, तर तुमच्या सिमचा क्लोन तयार करणं सहज शक्य आहे.

MOBILedit नावाच्या सॉफ्टवेअरला जर तुमचं सिम कनेक्ट केलं, तर ते सॉफ्टवेअर तुमच्या सिमचा पूर्ण डेटा काही क्षणात काढून देईल आणि नवीन सिममध्ये तो डेटा कॉपी करून घेतला जाईल.

 

sim card inmarathi

 

ट्विटरचा सीईओ जॅक डोर्सी यांच्या सिम कार्डचं क्लोन काही चोरट्यांनी मध्यंतरी तयार केलं होतं. इतक्या मोठ्या माणसा सोबत असं होऊ शकतं म्हणजे हे शक्य आहे हे मानायला हरकत नसावी. 

‘सिम स्वॅप’ पासून वाचण्यासाठी काय उपाय करता येतील?

१. तुमच्या मोबाईलवर मागील कित्येक दिवसात एकही मेसेज आला नसेल, तर एकदा ऑपरेटरला फोन करून सिम चालू असल्याची खात्री करून घ्या. व्हॉट्सअॅपच्या नादात मोबाईलमध्ये येणाऱ्या मुख्य मेसेजेसला बगल देऊ नका. ते सुद्धा मेसेज लक्ष देऊन वाचत चला.

२. मोबाईलमध्ये सुद्धा ‘अँटीव्हायरस’, ‘अँटिफिशिंग’सारखे अॅप इन्स्टॉल करून घ्या. तुमच्या बँकेच्या व्यवहारासाठी इमेल आणि फोन मेसेज असे दोन्ही पर्याय सुरू ठेवा. तुमच्या जवळ फोन नसेल, तर इमेलवर तुम्हाला प्रत्येक व्यवहाराचा तपशील मिळत राहील.

३. कोणत्याही इमेल, मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करणं बंद करा. लिंक पाठवणारी व्यक्ती तुमच्या परिचयाची आणि विश्वासार्ह असेल तरच त्या लिंकवर क्लिक करा.

 

fake link inmarathi

 

४. तुमचा फोन अनिश्चित काळासाठी बंद ठेवू नका आणि बंद झाला असेल तर ते जगजाहीर करू नका.

तुमचा फोन बंद आहे हे लक्षात आल्यावर काही चोर लगेच कंपनीला फोन करून सांगतात आणि तुमच्या नावाच्या दुसऱ्या सिमची मागणी करतात. यासाठी ते कंपनीच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून मोबाईल चोरीची माहिती सांगत असतात.

५. दोन इमेल आय डी असू द्या. तुमच्या पासवर्ड ची रिकव्हरी साठी प्रत्येक ठिकाणी सिम चा पर्याय न देता काही ठिकाणी दुसऱ्या इमेल चा पर्याय निवडा. हा इमेल आय डी तुमच्या फोन मध्ये लिंक नसेल तर अधिकच चांगलं, म्हणजे तुमच्या नवीन पासवर्ड ची माहिती चोरापर्यंत पोहोचणार नाही.

६. तुमच्या ऑपरेटर ला फोन करून तुम्ही सिम बद्दल कोणतीही कारवाई करण्यासाठी एक पासवर्ड सेट करू शकतात. मोबाईल मधील सिम कार्ड सेक्शन साठी तुम्ही पासवर्ड सेट करू शकतात.

===

हे ही वाचा – तुम्ही बनावट ॲप्लिकेशन्स तर वापरत नाही ना? वेळीच सावध व्हा, नाहीतर…

===

‘सिम स्वॅप’ झालं आहे हे कसं कळणार?

१. तुमच्या मोबाईलमधून जर फोन, मेसेज जात नसेल तर वाट बघत बसू नका. टेलिफोन ऑपरेटर कंपनीचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याबद्दल कंपनी आधी किंवा त्या दिवशी स्वतःहून देत असते. फोन जात नाही, मेसेज जात नाही म्हणजे तुमचं सिम कोणीतरी बंद केलं आहे त्याचा असा अर्थ असू शकतो.

२. तुमचं अकाउंट दुसऱ्या मोबाईल, लॅपटॉपवरून हाताळण्यात आल्याचा मेसेज येत असतो. त्याबद्दल त्वरित इमेलने तक्रार करा.

 

sim card in mobile inmarathi

 

३. मोबाईल सुरू आहे, फक्त बँकेच्या अॅपला जर तुम्हाला हाताळता येत नसेल तर ती सुद्धा धोक्याची घंटा आहे. बँकेला त्वरित त्याबद्दल कळवा.

तुमच्या फोनमध्ये मोबाईल ऑपरेटरच्या कस्टमर केअरचा नंबर एक कॉन्टॅक्ट म्हणून सेव्ह करून ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही सिमकार्ड बंद झाल्यावर कमी वेळात त्यांना निदान इतरांच्या फोनवरून फोन करू शकता.

आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीप्रमाणे मोबाईलची सुद्धा काळजी घ्या. ५ – ६ इंच जागा व्यापणाऱ्या या वस्तूमध्ये जग सामावण्याची शक्ती आहे. आपण त्याची काळजी घेतली तर तो आपली काळजी घेईल.

===

हे ही वाचा – इंटेरनेटच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करताना ‘ह्या’ गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?