Site icon InMarathi

Accidentally Educated: परदेशी शिक्षण पद्धतीचा धांडोळा घेणारी सुरेख कादंबरी!

RV Dadhe's Accidentally Educated

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगण्याकडं आणि जगाकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतील, अशा अनेक गोष्टी आपल्या जगात अस्तित्वात असतात. दुर्दैवानं सर्वांनाच सर्व गोष्टी बघण्याचं सौभाग्य लाभत नाही. आपण जसं कोसाकोसावर भाषा बदलते म्हणतो त्याचप्रमाणे कोसाकोसावर कमी अधिक प्रमाणात वातावरण, जीवनपद्धती, राहणीमान आणि एकूणच जगणचं बदलत असतं. केवळ कोसाएवढ्या अंतरावर एवढं सारं बदलत असेल, तर देश बदलला तर किती बदल होत असतील?

शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने जगभरातील अनेक देशांना भेट दिलेले अनुभवसंपन्न प्रतिभावंत लेखक हृषीकेश दाढे यांच्या Accidentally Educated या नव्या कादंबरीत आपला परीघ सोडून गेल्यावर वाट्याला आलेल्या बदलांबद्दल, बदल कसे स्वीकारले जातात त्याबद्दल विवेचन केले आहे.

बदल स्वीकारल्यावर काय चांगले-वाईट परिणाम होतात याबद्दल अतिशय सविस्तरपणे भाष्य केलेले आहे. विशेष म्हणजे अप्रत्यक्षपणे भारतीय शिक्षणपद्धती आणि पाश्चिमात्य शिक्षणपद्धतीत असलेले बदल त्यांनी अगदी बारकाईने आणि मिश्किलपद्धतीने नोंदविले आहेत.

हृषीकेश दाढे हे पुणे विद्यापीठातून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग विषयातील पदवीधर. लिहिण्याची आणि गोष्ट सांगण्याची कला अवगत असल्याने ते मित्रपरिवारात स्टोरीटेलर म्हणून परिचित आहेत. तसेच पुस्तक प्रकाशन क्षेत्रातील सल्लागारही आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षात दाढे यांना कॅनडा विद्यापीठाच्या Ontario India Exchange Program (OIN) अंतर्गत शिष्यवृत्ती मिळाली. कठीण पातळ्यांची परीक्षा पार करणाऱ्या केवळ २५ भारतीय विद्यार्थ्यांचीच या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येते. त्यात दाढे यांचा क्रमांक होता.

Accidentally Educated ही कादंबरी या शिष्यवृत्तीपासून पुढील सर्व प्रवासाच्या वर्णनावर आधारित आहे.  विशेष म्हणजे जवळच्या दोन मित्रांनाही ही शिष्यवृत्ती मिळते आणि तिघे मिळून अत्यल्प काळासाठी का होईना पण थेट कॅनडात शिक्षणासाठी गेले. या संपूर्ण अनुभव लेखकाने कादंबरीच्या स्वरुपात सुरेखपणे गुंफले आहे.

शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय एक तरुण शिक्षणासाठी स्वत:चा देश सोडून बाहेरच्या देशात जातो. तिथं त्याची ओळख पार्थ आणि साहिल या दोन भारतीय सहकारी मित्रांशी होते. एकदम भारतीय व्यवस्थेतून परदेशी व्यवस्थेत गेल्यानंतर तिथल्या वातावरणात जुळवून घेताना या तिघांची धांदल उडते.

तिथली मुक्त शिक्षणपद्धती स्वीकारताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. पण हे सगळं ते तिघेही अगदी हसत, खेळत स्वीकारतात. त्यातून त्यांना जगण्याचा धडा मिळतो. हे सगळं काही लेखकाने अतिशय रंजक आणि वाचनीय स्वरुपात मांडलं आहे.

शिष्यवृत्तीद्वारे जरी त्यांना कॅनडा येथील विद्यापीठात शिकण्याची संधी मिळाली असली तरीही त्यांना खूप स्वातंत्र्य होतं. अगदी दररोज वर्गात जाऊन बसणंही अनिवार्य नव्हतं. मात्र, यातून तासिका बुडणे, अभ्यासक्रमाचे क्रेडिट पूर्ण न होण्याचा तसेच अनावश्यक आणि खोट्या पार्ट्या करण्यामध्येच जास्त वेळ जाण्याचा धोका होता.

या सर्व परिस्थितीवर या तिघांनी कशा पद्धतीने मात केली, याबद्दल प्रस्तूत कांदबरीत अतिशय व्यवस्थित आणि रंजक मांडणी केली आहे.

भारतीय व्यवस्थेत शिक्षणाचा उपयोग बहुतांशी केवळ अर्थार्जनासाठी केला जातो, असा समज आहे. मात्र, पाश्चिमात्य देशात शिक्षणाचा उपयोग खरोखरच नव्या गोष्टी शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि आयुष्य समृद्ध करण्यासाठीच होतो. हा मुख्य फरक, बदल या तिन्ही तरुणांच्या आयुष्यावर आयुष्यभरासाठी मोठा परिणाम करून गेला.

आम्ही पहिल्यांदा आमच्या वर्गात बसलो, तेव्हा (भारताच्या तुलनेत) वर्गाच्या संस्कृतीत खूप बदल दिसले. बर्‍याच विद्यार्थ्यांनी वर्गात कॉफी आणि स्नॅक्स आणले होते.  म्हणजे मी ही लहानपणी वर्गात खाऊ न्यायचे आणि गुपचूपपणे खायचो. इथं मात्र तसं काही नव्हतं; समोर शिक्षक शिकवत असताना विद्यार्थी कॉफी पित होते, स्नॅक्स खात होते.  अगदी माझ्या शेजारच्या विद्यार्थ्याचा स्नॅक्स खातानाच आवाजही मला येत होता. शिक्षकाचा तास सुरु असताना काही विद्यार्थी कोणतीही परवानगी न घेता वर्गाबाहेर जात होते. पुन्हा वर्गात येत होते.  शिक्षक काहीच आक्षेप घेत नव्हते. लहानपणी लघुशंकेला जाण्यासाठीही शिक्षकांची परवानगी घ्यावी लागायची आणि शिक्षक ते नेहमीच नाकारायचे.

अशा पद्धतीने पहिल्या दिवसाचा अनुभव लेखकाने लिहिला आहे. अशाच रंजक आणि प्रत्येक वेळी भारतीय व्यवस्थेशी तुलना करण्याचा प्रयत्न केल्याने वाचकाला त्या सर्व घटना स्वत: अनुभवत असल्याचं वाटतं.

‘अपघानाने शिक्षित’ अशा आशयाचं शिर्षक असलेल्या या पुस्तकातून पाश्चिमात्य शिक्षण संस्कृती, व्यावहारिक शिक्षणपद्धती, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं नातं, प्रचंड मुक्त वातावरण या सर्वांवर अतिशय मार्मिक, कल्पक आणि लालित्यपूर्ण पद्धतीने प्रकाश टाकला आहे. ज्यामुळे वाचक या पुस्तकाशी एकरूप केव्हा होतो, ते समजतही नाही.

लेखकाने आपली आत्मकथा फुलवत नेऊन अनेक गोष्टींचा सहज-सुलभपणे उलगडा केला आहे.

ज्या ज्या विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि सर्वसामान्यांनाही शिक्षणाचा उपयोग केवळ अर्थार्जनासाठी न करता आयुष्याला समृद्ध करण्यासाठीही करता येतो, हे समजून घ्यायचं आहे आणि एक चांगली कादंबरी वाचायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचायलाच हवं!

ही कादंबरी ॲमेझॉनवर किंडल बुक आणि प्रिंट स्वरुपात खरेदीसाठी उपलब्ध आहे. खरेदीसाठी येथे क्लिक करा.

पुस्तकाचे नावAccidentally Educated
प्रकाशक : आर. व्ही. दाढे
पृष्ठे : 194
मूल्य : Rs. 250/-

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version