आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
चौदा एप्रिल ही तारीख तमाम भारतीय बहुजनांच्या हृदयावर कोरलेली आहे. पिढ्या न पिढ्या दारिद्र्यात पिचलेल्या, शोषित-वंचित समाजाला निराशेच्या, आत्मवंचनेच्या गर्तेतून खेचून उज्वल वर्तमानाची व भविष्याची निळी पहाट दाखवणाऱ्या, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हा जन्मदिन.
परंतु ह्या सुदिनी, आजकाल, आंबेडकर जयंतीच्या उत्सव-मोर्चाच्या निमित्ताने अनेक जण टीका करत असतात. हीच का आंबेडकरांची शिकवण, “शिका-संघटित व्हा” असा संदेश देणाऱ्या आंबेडकरांना हे वर्तन आवडलं असतं का – असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातो. खरंतर अशी टीका गणेशोत्सव, शिव जयंती अश्या प्रसंगी देखील होते. टिळकांना, छत्रपती शिवरायांना, आंबेडकरांना…कुणाला असं वर्तन आवडेल बरं?!
परंतु मुद्दा हा आहे – की लोकांच्या अश्या वर्तनाने ह्या महापुरुषांवर बट्टा लागतो का, लावावा का? अर्थातच नाही…!
ह्याच विषयावर श्री राजेश कुलकर्णी ह्यांच्या एका रिक्षा चालकाशी संवाद झाला. हा संवाद त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला होता, तो आम्ही पुढे देत आहोत. आवर्जून वाचावा असा हा संवाद आहे.
===
“आता उद्या पहा, रस्ते कसे जाम होऊन जातात ते”, रिक्षावाल्याला गप्प बसवेना.
“गर्दीमुळे फार हळुहळु जावे लागते. सारखे थांबावे लागते. त्यामुळे मीटरचे रिडिंग वाढते. तेवढे गिर्हाईक टेंशनमध्ये येते ना!”
“ओ ते आंबेडकरांनी घटना स्वत: लिहिली का? आमचा दोस्त म्हणतो की त्यांनी कॉपी मारली. काय खरे आहे?”
“ही कॉपी मारणे म्हणजे परीक्षेतल्या कॉपीसारखे नव्हते. सगळे वाचून त्यातले आपल्या उपयोगाचे काय हे ठरवायचे. आपल्या म्हणजे आपल्या देशाच्या. देशातल्या सगळ्या जणांच्या उपयोगाचे. ते काही सोपे काम नाही.” मी म्हटले.
“पण हे साले रस्ते का अडवतात? डीजे कशाला आणतात? आंबेडकरने हे शिकवले का?”
“असे लोक सगळीकडेच असतात. एरवी शिवाजीच्या नावाने आणि गणपतीच्या नावाने काय चालते ते आपण बघतोच की.”
मी असे म्हटल्यामुळे त्याची पंचाईत झाली असावी. मग गाडी पुन्हा घटनेकडे वळली.
“पण एवढे सगळे त्याने एकट्याने लिहिले?”
अलीकडे शिवाजीच्या एकेरी उल्लेखावरून डाफरणारे वाढलेत. पुण्यतिथीला ढोल वाजवल्याने काही जणांच्या भावना दुखावतात हे काल प्रथमच कळले. तसाच हा एकेरी उल्लेखाचा प्रकार. येथे हा बाबासाहेबांचा तसा एकेरी उल्लेख करत होता.
त्याला सांगितले की सगळे नाही तरी बरेचसे काम त्यांनीच केले. कारण त्यांच्या जोडीला जे लोक दिले होते त्यांच्यातल्या काही जणांनी तोंडच दाखवले नाही , तर काही जण फारच म्हातारे होते. त्यांनी हात वर केले. त्यामुळे बरेच काम बाबासाहेबांनाच करावे लागले.
“पण याला एवढे डोक्यावर का चढवून ठेवले आहे?”
मला एक गोष्ट जाणवली. बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख करणारा मी तरी आजवर कोणी पाहिला नव्हता. हा तसे पुन्हापुन्हा करत होता. पण त्याच्या बोलण्यात तुसडेपणा नव्हता हे नक्की. आता कोठून सुरूवात करावी हा मलाच प्रश्न पडला. मोठमोठ्या गप्पा मारून कदाचित त्याला काही समजले नसते. मग म्हणले त्याला त्याचीच मात्रा द्यावी.
त्याला विचारले की आज रिक्षावाल्यांची स्थिती कोणामुळे सुधारली आहे? बाबा आढाव यांच्यामुळे ना? लगेच ‘हो’ म्हणाला. मग ही दिशा योग्य असल्याचे कळले. त्याला म्हटले की –
बाबा आढावांना काय नडले होते की दुसर्यांसाठी काही काम करावे? ते त्यांचे चांगले आयुष्य जगू शकले असते की. मग त्यांच्या प्रयत्नांमधून काही रिक्षावाल्यांनी आपले आयुष्य सुधरवले. तरीही काही रिक्षावाले मस्ती करताना दिसतातच ना?
त्याला हे उदाहरण एकदम पटले. मग त्याला म्हटले, “आता विचार करा. या दुसर्या बाबाने सगळ्या देशातल्या मागासलेल्या लोकांचा विचार केला. म्हणजे त्याचे काम किती मोठे असेल!”
एकूण ज्या पद्धतीने हे सारे बोलणे चालले होते ते पाहता मी जयभीमवाला असल्याचा त्याचा समज झाला असावा. नाहीतरी “हे कॅटॅगिरीतले असूनही किती चांगले बोलतात ना!” असे म्हणणार्या आपल्या शेजार्यांचा अनुभव डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितलाच आहे.
“ते संविधान म्हणजे काय असते?” याचा पुढचा प्रश्न. तेवढ्यात स्टेशन आले.
एकूण काहीही असले तरी मनात द्वेष न ठेवता तोंड उघडून बोलण्याची त्याची इच्छा होती. हे सर्वात महत्त्वाचे.
===
आपण सर्वांनी हा संवाद लक्षात ठेवावा, त्यातून शिकून इतरांशी असाच संवाद साधावा…!
जय भीम…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.