Site icon InMarathi

शनिवारची बोधकथा: इतरांच्या वेदनांची जाणीव करून देणारी एक हृदयस्पर्शी कथा!

bodhkatha featured inmarathi 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस हा एकमेव असा जीव आहे जो आपली सुख-दुःख बोलून मोकळा होतो. आपल्याला काही त्रास होत असेल, तर तो आपण आपल्या जवळच्या लोकांना सांगतो. कुठे काही दुखल खुपलं की आपण डॉक्टरकडे जाऊन मलमपट्टी करतो, आपल्या हितचिंतकांशी चर्चा करून आपण ती वेळ मारून नेतो.

सुखाच्या क्षणीसुद्धा आपण कधीच एकटे नसतो. त्या आनंदाच्या क्षणी आपल्या आजूबाजूला आपली माणसं हवीत असं सतत आपल्याला वाटत असतं. हे झालं आपल्याबद्दलचं. आपल्याला होणारा त्रास, वेदना आपण समजू शकतो, पण हेच इतरांच्या बाबतीत होतं का हो?

सध्याच्या कोविड परिस्थितीचं उदाहरण घ्या ना, आपल्या ओळखीत बऱ्याच लोकांना कोविड होऊन गेला असेल. त्यांच्याशी आपण बोलताना आपण त्यांना सतत सांगत असतो काळजी घ्या. टेन्शन घेऊ नका सगळं बरं होईल वगैरे वगैरे!

===

हे ही वाचा शनिवारची बोधकथा : आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ सांगणारी ही कथा वाचायलाच हवी

===

 

ती समोरची व्यक्ती नेमक्या कोणत्या त्रासातून जात असते याचा मात्र आपण अंदाज लावू शकतो का? तर नाही! कारण आपण त्यांच्या जागी राहून विचार करत नाही म्हणून.

आपल्या जवळच्यापैकी कुणाचं निधन झालं की आपण त्यांच्या घरच्यांचं सांत्वन करायला जातो आणि “तुमचं दुख आम्ही समजू शकतो” असं नेहमीचं टिपिकल वाक्य म्हणून मोकळे होतो!

पण खरंच आपण ते दुःख अनुभवलंही नसताना आपण ते सहज म्हणतो कारण आपण त्या परिस्थितीतून गेलेलो नसतो म्हणूनच. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या जागी आपण स्वतःला ठेवून जेव्हा विचार करायला शिकू तेव्हाच आपण आपल्यातलं माणूसपण सिद्ध करू!

याच भावनेवर आधारित नवीन बोधकथा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

एका शहरातल्या एका मोठ्या सिनेमागृहाबाहेर बरीच गर्दी जमली होती. कोणत्या मोठ्या स्टारचा सिनेमा रिलीज झाला नव्हता का कसलंही प्रमोशन नव्हतं. थिएटरच्या मालकाने एक वेगळीच युक्ती केली होती!

 

 

सिनेमा सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटांची एक उत्कृष्ट अवॉर्ड वीनिंग शॉर्टफिल्म दाखवायचा निर्णय थिएटरच्या मालकाने घेतला होता. त्यामुळे सिनेमापेक्षाही त्या आधी दाखवल्या जाणाऱ्या शॉर्टफिल्मसाठीच लोक उत्सुक होते.

सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता नेमकी काय फिल्म असेल, त्यातून काय नवीन बघायला मिळेल? अखेरीस सिनेमाच्या शो टायमिंगच्या बरोबर १५ मिनिटं आधी लोकांना आत सोडण्यात आलं!

===

हे ही वाचा शनिवारची बोधकथा: चिंता करणं सहजपणे सोडायला शिकवणारी गोष्ट…

===

कसलीही गडबड गर्दी न करता ५ मिनिटांत लोक आपापल्या जागेवर जाऊन स्थिरावलेसुद्धा. हळू हळू लाइट्स बंद झाले, काही क्षणातच सिनेमगृहात अगदी पिनड्रॉप सायलेन्स झाला!

 

 

पडद्यावर एक फ्रेम अवतरली. या फ्रेममध्ये फक्त सीलिंग (एखाद्या खोलीचं छत) दिसत होतं, बराच वेळ झाला ही फ्रेम काही हलायला तयार नाही. ५ मिनिटं झाली तरीही पडद्यावरचं छत हटायला तयार नाही!

लोक आता वैतागायला लागले होते. तब्बल ९ मिनिटं ती फ्रेम तशीच होती, आता मात्र लोकांच्या संयमाचा बांध फुटला. लोक थिएटरमध्ये आरडाओरड करायला लागले, फसवणूक झाल्याची भावना प्रत्येकाच्या चिडलेल्या चेहऱ्यावर दिसत होती.

 

 

या सगळ्या गोंधळात पडद्यावरची फ्रेम बदलली आणि एका हॉस्पिटलमधल्या एका खोलीतली फ्रेम समोर आली.

त्या खोलीत एका मोठ्या बेडवर एक माणूस झोपून होता. त्याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाली असल्याने तो कोमात आहे, त्याचं एक मोठं ऑपरेशन झालं आहे आणि यापुढचं सगळं आयुष्य त्याला या बेडवरच काढावं लागणार आहे!

या काही सेकंदाच्या फ्रेमनंतर पुन्हा पडद्यावर सीलिंग दाखवणारी पहिली फ्रेम आली आणि त्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं होतं की –

“आम्ही तर तुम्हाला या माणसाच्या उर्वरित आयुष्यातली फक्त ९ मिनिटं दाखवली तर तुम्ही इतके सैरभैर झालात, त्या बेडवर पडलेल्या माणसाचा विचार करा त्याला राहिलेलं सगळं आयुष्य या छताकडे बघूनच घालवायचं आहे!”

 

 

आपल्याला देवाने जे धडधाकट शरीर दिलंय, खायला प्यायला चांगलं अन्न दिलंय, कपडा लत्ता दिलाय, राहायला घर दिलंय, चांगले आई वडील दिलेत याचे आभार माना आणि स्वतःला नशीबवान माना!

तात्पर्य:

या जगात अशी बरीच लोकं आहेत ज्यांना हे सगळं मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या जागी राहून कधीतरी विचार करा आणि आपल्याला आयुष्यात जे मिळालं आहे त्याचं समाधान माना, कारण लोकांच्या वेदना तोवर आपल्याला कळत नाहीत जोवर आपल्यावर तशी परिस्थिती उद्भवत नाही!

===

हे ही वाचा शनिवारची बोधकथा: बुद्धांची ही गोष्ट वाचून तुमच्या सगळ्या अडचणींवर मार्ग सापडेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version