आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आजवर आपण अनेक देवी, देवता, साधू-संत, ऋषी आणि त्यांचा तऱ्हेवाईकपणा यांच्या कथा पुराणांमधून वाचल्या आहेत किंवा अनेक किर्तने, प्रवचने यांतून ऐकल्या आहेत.
या कथांमधून आपल्याला मानवी मनाची जडणघडण आणि मानसिकतेचे कंगोरे देखील पहायला मिळतात. अशीच एक कथा आहे भगवंत आणि त्याच्या भक्ताची. ज्या भक्ताने आपल्या आराध्यदेवतेलाच शाप दिला आणि आपल्या प्रिय पत्नीचा विरह सहन करायला लावला. कोण होता तो भक्त आणि काय घडलं होतं हे जाणून घेऊया कथेच्या माध्यमातून.
नारदमुनी, जे देवांचे दूत तर होतेच पण त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट तिखट-मिठ लावून सांगण्यात, भांडणे लावण्यातही कुशल होते. त्यामुळे अनेक वादविवाद आणि घडणाऱ्या घटनांच्या मुळाशी या नारदमुनींनी फिरवलेली कळच असे. म्हणून यांना कळीचा नारद असेही म्हणतात.
नारदांच्या तप
एकदा भगवान शंकरांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या खास अशा तपोभूमीत तप करण्याची नारदांना परवानगी दिली. त्याने प्रसन्न होऊन नारद त्या तपोभूमीत तप करण्यास बसले. अगदी एकाग्र होऊन लीन झाले.
त्यांच्या या वाढत्या तपःसामर्थ्याचा प्रभाव सर्वदूर पसरला. नारदांच्या वाढत्या प्रभावाने देवराज इंद्र अस्वस्थ झाला. नारदांच्या तपात विघ्न आणण्याच्या दृष्टीने इंद्राने अनुक्रमे अग्नी, वरूण, वायू आणि कामदेव यांना नारदांकडे पाठवले. यांपैकी कोणतीही दैवी शक्ती नारदांची तपसाधना भंग करू शकली नाही. सगळ्यांना अपयशी होऊनच परतावे लागले.
===
हे ही वाचा – एका शापामुळे सुरू झाली तुळशीविवाहाची प्रथा! वाचा, यामागची पौराणिक कथा
===
केवळ शिवाच्या आशिर्वादाने नाही तर आपल्या दृढ निश्चयाच्या जोरावर नारदांची तपसाधना सफल झाली होती. तप पूर्ण झाल्यावर नारद पुन्हा शंकरांकडे गेले आणि घडलेला प्रसंग सांगून आपलेच कौतुक आपण करू लागले.
नारदांना झालेल्या गर्वाचे शंकरांना लगेच आकलन झाले व त्यांनी घडलेली गोष्ट श्रीविष्णूंना सांगू नये असे नारदांना सुचवले. नारदच ते! त्यांना काही राहवेना. आपला मोठेपणा श्रीविष्णूंना सांगितलाच पाहिजे असा विचार करून नारद श्रीविष्णूंकडे निघाले.
श्रीविष्णूंकडे जाऊन त्यांनी सारी हकीकत तिखटमीठ लावून अगदी रसभरीत वर्णन करून सांगितली. यावर ‘ठीक आहे. लक्ष असू दे’. असे नारदांना विष्णू म्हणाले. यामुळे नारद इतके खुश झाले की श्रीविष्णूंच्या मनात काय चाललेय याची त्यांना काहीच कल्पना आली नाही.
परतीच्या वाटेवर ते राजा शिलानिधी याला भेटले. तिथे त्यांना समजले की राजाची एकुलती एक कन्या राजकन्या श्रीमती हिचे स्वयंवर आयोजित करण्यात येणार आहे.
नारदांना असेही भविष्य कळले, की राजकन्येशी जो कोणी विवाह करेल तो तिन्ही लोकांचा राजा होईल. हे ऐकल्यावर आणि राजकन्या श्रीनिधीला पाहिल्यावर तिच्याशी लग्न करण्याची तीव्र इच्छा नारदांच्या मनात उपजली. नारद ठरले बालब्रह्मचारी.
===
हे ही वाचा – प्रेमाचं प्रतिक ठरलेल्या कृष्ण-राधेचा विवाह झाला होता का? प्रचलित कथा काय सांगतात?
===
यात श्रीविष्णूंचे सहाय्य मागण्याचे ठरवून ते तडक माघारी विष्णूंकडे गेले आणि सारी हकीकत त्यांना सांगून राजकन्या श्रीमती हिच्याशी विवाह करण्यासाठी विष्णूंच्या सर्वांगसुंदर हरिरूपासारखे रूप आपल्याला देण्यासाठी त्यांनी विष्णूंकडे हट्ट धरला.
यावर तथास्तू असे म्हणून श्रीविष्णूंनी आपले हरिरूप नारदांना देण्याचे मान्य केले.
स्वयंवरात काय घडलं?
स्वयंवराचा दिवस उजाडला. नारद अगदी शाही पोषाखात स्वयंवराच्या ठिकाणी आले. प्रत्येक जण नारदांकडेच पहात होता. नारद भलतेच खुश झाले. तेवढ्यात राजकन्या तिथे आली. हातात वरमाला घेऊन ती प्रत्येकाच्या समोरून पुढे पुढे जात होती. तशी नारदांकडे न बघता ती त्यांच्या समोरून पुढे गेली आणि पुढे असलेल्या श्रीविष्णूंच्या गळ्यात तिने वरमाला घातली.
यावर रागावलेले नारद तिच्याकडे गेले व त्यांनी तिला न वरण्याचे कारण विचारले. त्यावर हसून चेष्टेच्या सूरात तिने नारदांना स्वतःचा चेहरा पाहून यायला सांगितले. त्याच तिरमिरीत जाऊन नारदांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहिला तर काय, त्यांच्या चेहऱ्याच्या जागी माकडाचा चेहरा दिसत होता.
नारदांना श्रीविष्णूंची खेळी लक्षात आली. ‘हरि’ चा दुसरा अर्थ ‘माकड’ असा ही होतो. म्हणून विष्णूंनी नारदांचा चेहरा मर्कटरुपी केला होता.
नारद संतापले ते तडक विष्णूंकडे गेले आणि त्यांनी या फसवणुकीचे कारण विचारले. तसेच तुमच्यामुळे मला माझे प्रेम मिळाले नाही, तेव्हा तुम्हाला देखील आपल्या प्रेमाचा, आपल्या प्रिय पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शापही श्रीविष्णूंना दिला.
समुद्रमंथनाची कथा
समुद्रमंथनावेळी एका घटना घडली आणि त्यावेळी क्रोधीत होऊन नारद मुनींनी शाप दिला असंही म्हटलं जातं. ही दुसरी दंतकथा सुद्धा रंजक आहे.
असं म्हटलं जातं, की समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या लक्ष्मीला पाहून नारद मोहित झाले व तिच्याशी लग्न करण्याच्या इच्छेने ते विष्णूंकडे गेले आणि त्यांचे विलोभनीय असे हरिरूप देण्याची त्यांनी विष्णूंना विनंती केली जी विष्णूंंनी मान्य केली.
पुढे लक्ष्मी स्वयंवरात लक्ष्मीने विष्णूंना वरले असता निराश होऊन परतणाऱ्या नारदांनी तळ्याच्या पाण्यात स्वतःचा मर्कटरूपी चेहरा पाहिला आणि विष्णूंच्या फसवणूकीने व्यथित होऊन पत्नीपासून ताटातूट होण्याचा शाप त्यांनी विष्णूंना दिला.
तसेच पत्नीला पुन्हा भेटण्यासाठी विष्णूंना माकडांचीच मदत घ्यावी लागेल हे ही बजावले. याच कारणाने जेव्हा श्रीविष्णूंनी राम अवतारात जन्म घेतला तेव्हा रावणाने हरण केल्यामुळे आणि नंतर सीतेला एकटीला वनवासात पाठवावे लागल्याने त्यांना त्यांच्या प्रिय पत्नीचा विरह सहन करावा लागला आणि दोन्हीवेळा पत्नीला भेटण्यासाठी त्यांना माकडांची मदत घ्यावी लागली.
ही कथा स्वामी तुलसीदास यांच्या वाल्मिकी रामायणात आहे. धन्य तो भक्त ज्याने अधिकारवाणीने भगवंताला शाप दिला आणि धन्य तो भगवंत ज्याने तो शाप भक्ताचा शब्द रहावा म्हणून स्विकार केला.
पुराणातल्या अशा अनेक कथांमधून आपल्याला आयुष्याची शिकवण मिळते ती ही अशी!
===
हे ही वाचा – रामायणातील फारश्या माहित नसलेल्या या १२ गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.