नशेडी गर्दुल्ले लागले श्रीकृष्ण भजनी; अल्पावधीत जगभरात पसरली आगळीवेगली मोहीम!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सत्तरच्या दशकात देव आनंदनचा एक चित्रपट आला होता, हरे रामा हरे कृष्णा. यात हिप्पी संस्कृती दाखविण्यात आली होती. धुराची वलयं हवेत सोडत, हरे रामा हरे कृष्णाच्या गजरात तल्लीन झालेली, खरंतर चरसी नशेत हरवलेली ही हिप्पी मंडळी भारतातल्या आम जनतेला पहिल्यांदाच माहित झाली.
या हिप्पींचा, त्यांच्या नशेत धुत असण्याचा आणि इस्कॉनच्या हरेकृष्णा चळवळीचा संबंध लावला जाऊन एकूणच इस्कॉनकडे आम जनतेचा बघण्याचा दृष्टीकोन गढूळ राहिला.
गंमतीचा विरोधाभास हा की जेंव्हा अमेरिकेत याची चळवळ सुरू झाली तेंव्हा ड्रग्ज, दारू, खून, मारामार्या यात रुतलेल्या युवकांना वेगळी वाट दाखविण्यासाठी, अध्यात्मिक नशा काय असते हे दाखवून देण्यासाठी चळवळीचा हिस्सा बनवलं गेलं. आश्चर्याची गोष्ट ही की ड्रग्ज, दारूशिवाय श्र्वासही घेऊ न शकणार्या मुलांना हरेकृष्णाच्या जपाची अशी नशा चढली की इस्कॉनचा प्रसार झपाट्यानं झाला.
नेमकं आहे हे इस्कॉन प्रकरण?
या सगळ्याची सुरवात केली श्रीमूर्ती श्री अभयचरणार्विन्द भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी यांनी. १९६६ साली प्रभुपादजी यांनी अमेरिकेत इंटरनॅशनल सोसायटी फ़ॉर कृष्णा कांशसनेस म्हणजेच इस्कॉनची (ISKCON) स्थापना केली.
स्वामी प्रभुपादजी यांचा जन्म कोलकता येथे १ सप्टेंबर १८९६ रोजी झाला. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि जगभरात हरे रामा हरे कृष्णाचा प्रसार केला. पाश्चिमात्य देशांत फ़िरून त्यांनी भगवत गीतेचा प्रचार केला. यातले विचार अभारतियांपर्यंत पोहोचविले. १९६५ साली स्वामीजी एका कार्गो शिपमधून अमेरिकेला गेले.
१९६६ मध्ये त्यांनी आपल्या सोबतच्या मोजक्या अनुयायांसोबत इस्कॉनची स्थापना केली. न्यूयॉर्क सिटीमधून त्यांनी या चळवळीला सुरवात केली.
साधारणपणे सर्व अध्यात्मिक, धार्मिक गुरू अमेरिकेतल्या न्युयॉर्कमधील उच्चभ्रू भागात रहात असत. मात्र स्वामीजींनी न्युयॉर्कचा थोडा बकाल भाग यासाठी निवडला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिप्पी रहात असत. चित्रविचित्र कपडे, केस आणि नशेत गुंग अशी ही माणसं हेच स्वामीजींचे पहिले अनुयायी होते.
हे हिप्पी ड्रग्ज घेऊन नशेत धुंद रहात असत स्वामीजींनी त्यांना ड्रग्जची नशा सकाळ झाली की उतरते मात्र अध्यात्माची नशा आयुष्यभर, कायम मनावर रहाते हे पटवून दिलं. स्वामीजी या तरुणांना किर्तनासाठी बोलवत असत, किर्तनाबरोबरच त्यांना प्रवचन देत असत आणि नंतर चविष्ट प्रसादही देत असत.
या किर्तनांची, त्या तालासुराची एक वेगळीच नशा तरूणाईला जाणवू लागली होती. या सगळ्यांनी आपले चित्रविचित्र कपडे त्यागले आणि धोतर कुर्ता हा भारतीय वेष परिधान करायला सुरवात करून वेदिक संस्कृतीचं आचरण करायला सुरवात केली. प्रभुपाद कौतुकानं म्हणत असत की माझ्या हिप्पीना कृष्णभक्तीची वाट दाखवून मी हिप्पीचे हॅप्पी बनवून टाकलं आहे.
या तरूणातले अनेकजण प्रभुपाद स्वामीजींचे कायमचे स्वयंसेवक बनले. या स्वयंसेवकांना मग विविध ठिकाणी प्रसारासाठी पाठविण्यात आलं. लॉस एंजेलिस, व्हॅनक्युअर, लंडन अशा ठिकाणी जाऊन या स्वयंसेवकांनी इस्कॉनची केंद्र उभारली. प्रभुपाद स्वामी या केंद्रांत जाऊन प्रवचन देऊन स्वयंसेवकांची नविन फळी उभी करत असत. अशा रितिनं अल्पावधीतच इस्कॉनची १०८ केंद्रं उभी करण्यात आली.
१९६६ ते १९७७ या दरम्यान जगभर १२ वेळा प्रवास करून स्वामीजिंनी इस्कॉनचा प्रसार केला. आजच्या घडीला जवळपास प्रत्येक शहरात एक तरी इस्कॉन केंद्र आढळेल.
भारतातील वृंदावनमध्ये इस्कॉनचं पहिलं मोठं आणि सुंदर मंदिर आहे.दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला जगभरातून कृष्णभक्त या ठिकाणी येतात आणि मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करतात. यामधे लाखो परदेशी भक्त असतात ज्यांनी हिंदू धर्म आपलासा केलेला आहे.
भगवत गीतेचं तत्वज्ञान मनापासून आपलसं केलेलं आहे. तुम्ही जगातल्या कोणत्याही इस्कॉन मंदिरात जा, तुम्हाला त्याच्या बाह्य रूपापासून अंतर्गत रचनेमधे साम्य आढळेल. स्वामीजींनी ठरवून दिलेल्या डिझाईननुसारच या सर्व मंदिरांची रचना करण्यात आलेली आहे.
–
हे ही वाचा – आजही श्रीकृष्ण इथे करतो रासलीला… वृंदावनातील एका अद्भुत जागेचं रहस्य!
–
इतकंच नाही तर आरती, प्रसाद यांच्या वेळा, चव, मेनू सर्व काही एकसारखंच असतं. या मंदिरातील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला खूप सुंदर सजविलं जातं. या मूर्तीसोबतच स्वामी प्रभुपादजींचिही मूर्ती असते.
सध्याच्या घडीला जगभरात साधारण चारशेहून जास्त इस्कॉन मंदिरं आहेत. बेंगलोर येथील १९९७ साली उभारण्यात आलेलं इस्कॉन मंदिर हे जगातल्या सर्व इस्कॉन मंदिरात सर्वात मोठं मंदिर मानलं जातं.
न्यूयॉर्कमधे चालू झालेली ही चळवळ झपाट्याने सर्वत्र पसरली अनेक देशातील अनेक शहरं कृष्ण भक्तीत तल्लीन होऊ लागली आणि इतर धर्मियांच्या पायाखालची जमिन सरकायला सुरवात झाली. याचाच परिणाम म्हणून इस्कॉनच्या विरोधातील चळवळ जोर धरू लागली. इस्कॉनमधे अंमली पदार्थ विक्री आणि देवाण घेवाण होते असाही प्रचार करण्यात आला.
परदेशातच नाही तर भारतातही इस्कॉनविरोधात मोठी चळवळ उभी राहिली. तरुणांचा ब्रेनवॉश करून त्यांना संन्यास घ्यायला लावणारी चळवळ अशी प्रतिमा बनविली गेली. अखेर इस्कॉनवर चौकशी बसविली गेली आणि प्रदीर्घ चौकशीअंती यात तथ्य नसल्याचं समोर आलं.
भारताच्या बाबतीत बोलायचं तर शंकराचार्यानीही यावर आर्थिक उलाढालीवर प्रश्न उपस्थित केले. इस्कॉन ही अमेरिकेने रचलेलं शड्यंत्र आहे असा प्रचार करण्यात आला. जगभरातून इस्कॉनमंदिरात दान पेटीत जाणारे लाखो करोडो रुपये अमेरिकेला जातात असा प्रवाद होता. याचं कारण इस्कॉन ही अमेरिकेत नोंदणीकृत आहे असं सांगितलं गेलं.
हरे रामा हरे कृष्णा चित्रपटात दाखविल्याप्रमाणे या केंद्रांमध्ये अजिबातच नशापाणी वगैरे होत नाही. उलट अनेकांना माहितही नाही की इस्कॉन मंदिरात दारू, सिगरेट, चहा, कॉफ़ी हे सगळं वर्ज्य आहे. याचे अनुयायी चार गोष्टींचं पालन करतात किंबहुना त्यांना पालन करावं लागतं.
१- तामसिक भोजनाचा त्याग. एकदा का तुम्ही इस्कॉनवासी झालात की मसाल्यांचा जेवणातून त्याग करावा लागतो. यात कांदा, लसूण, मिरची, मसाले, मांस-मटण, मद्य या सगळ्यापासून दूर रहावं लागतं.
२- अनैतिक आचरणापासून दुर रहावं लागतं. जुगार, पब्ज, बार, वेश्यावस्ती अशा ठिकाणी जाण्यासही बंदी आहे.
३- दिवस भरातून एक तास सलग शास्त्राध्यन करावं लागतं. यामधे गीता आणि भारतीय धर्म-इतिहास यांच्याशी संबंधीत अभ्यास असतो.
४- हरे कृष्णा या जपाची १६ वेळा माळ जपावी लागते.
कृष्णाटेरियन- तुम्हाला मांसाहार, शाकाहार, मत्स्याहार माहितच असेल मात्र इस्कॉनच्या “कृष्णाटेरियन” विषयी फ़ार कमी जणांना माहिती आहे. इस्कॉनच्या अनुयायानी त्यांची स्वत:ची आहारपध्दतीची निर्मिती केलेली आहे. ज्याला कृष्णाटेरियन असं म्हणलं जातं.
इस्कॉन केंद्रात भाविकांना प्रसाद दिला जायचा तो याच कृष्णाटेरियनचा असायचा. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाला कढी पूरी आणि पातळ भाजी याव्यतिरिक्त आठ प्रकारची मिष्टान्नं प्रिय आहेत.
यात खीर, शिरा किंवा रव्याचा लाडू, शेवया, पुरणपोळी, मालपुआ, केशरीभात, केळं आणि सर्व गोड फ़ळं, कलाकंद. म्हणूनच श्रीकृष्णाच्या प्रसादात यापैकी एकाचा किंवा सगळ्याचा समावेश असतो. याव्यतिरिक्त ओलं खोबरं, लोणी, पंचामृत, सुकामेवा यांचाही प्रसादासाठी वापर होतो.
===
हे ही वाचा – युरोपातील ‘या’ समुदायाची हिंदू धर्मावर असलेली भक्ती पाहून नक्कीच थक्क व्हाल!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.