Site icon InMarathi

आजही श्रीकृष्ण इथे करतो रासलीला… वृंदावनातील एका अद्भुत जागेचं रहस्य!

radha krishna 2 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अलीकडेच होळी होऊन गेली. यावर्षी धुळवडीचे रंग फारसे खेळायला मिळाले नाहीत. तरी त्या काळात होळीची गाणी ऐकू येतातच. त्यातलंच एक गाणं म्हणजे , ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी!!’ या गाण्यात श्रीकृष्ण आणि राधा, गोपिका यांची होळी कशी चालत असेल याचं वर्णन आहे.

कृष्णाबरोबर होळी इतकीच रासलीलाही जोडली गेली आहे. श्रीकृष्ण जेव्हा मथुरेत होते तेव्हा ते राधा आणि त्यांच्या गोपिकांबरोबर रासलीला करायचे. रासलीला म्हणजे काय तर श्रीकृष्ण बासरी वाजवायचे, त्या संगीतावर राधा आणि गोपीका धुंद होऊन नृत्य करायच्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कृष्ण आणि राधा यामध्येच एकमेकांवर प्रेम व्यक्त करायचे. या रासलीलेमध्ये ते देहभान हरपून धुंद व्हायचे. मुळात श्रीकृष्ण बासरी वाजवत असल्यामुळे राधा आणि इतर गोपिका स्वतःला विसरून जायच्या. त्या बासरीची धून प्रचंड मोहित करणारी असायची.

 

 

तसंही, श्रीकृष्णाच्या प्रत्येक लीलेवर वृंदावन मोहित व्हायचंच. मग ते त्याचं लोणी चोरणं असेल, मडकी फोडणं असेल, गोपीकांचे कपडे पळवणं असेल, किंवा गाईंना लांब लांब चरायला नेणं असो.

वृंदावनातील प्रत्येकाला कृष्णाचा हा खोडकरपणा हवाहवासा वाटायचा आणि त्याची ती अमर बासरी सुद्धा…!!

त्या बासरीतून येणारं ते स्वर्गीय संगीत. कान्हा बासरी वाजवायला लागला, की केवळ लोकच नाहीत तर गाई, पशुपक्षी, झाडंझुडुपं देखील संमोहित झाल्यासारखी वागायची. आणि का नाही वागणार!! त्या बासरीला मुखस्पर्श होता तो कृष्णाचा.

त्यातून निघणारे सूर हे कृष्णाच्या हृदयातून निघायचे, म्हणूनच असेल कदाचित राधा कृष्णावर भाळली होती. राधा कृष्णाचे प्रेम कोणाला माहिती नाही!! अजूनही त्या दोघांचीच नावे जोडून घेतली जातात.

===

हे ही वाचा – राधा आणि कृष्ण यांच्या “अलौकिक” प्रेमकथेचा शेवट कसा झाला? वाचा…

===

 

 

कृष्णाची बासरी वाजायची ती त्याच्या राधेसाठी. पण त्या बासरीच्या सुरावटीत संपूर्ण वृंदावन न्हाऊन निघायचं.

आजही वृंदावनात श्रीकृष्ण जन्माष्टमीला रासलीला खेळली जाते. त्यादिवशी श्रीकृष्णाच्या आयुष्यातील वृंदावनातील दिवसांचे नाट्यरूपांतर केले जाते. राधा कृष्णाला विविध अलंकारांनी सजवलं जातं. संपूर्ण रात्रभर हा रासलीलेचा कार्यक्रम रंगतो. वृंदावनातील ही रासलीला पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात.

आताचा हा रासलीलेचा कार्यक्रम जर लोकांना आकर्षित करत असेल, तर श्रीकृष्णाची खरी रासलीला किती मंत्रमुग्ध करत असेल!! पण श्रीकृष्ण वृंदावनात दररोज घेऊन रासलीला करतो असं म्हटलं तर खरं वाटेल का?

नाहीच वाटणार… पण भारतात अनेक धार्मिक स्थळात काही ना काही रहस्यं अशी आहेत, की ज्यांचा उलगडा कधी झालाच नाही. ज्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला पण हाती काहीच लागलं नाही. वृंदावनातील श्रीकृष्णाची रासलीला देखील त्याला अपवाद नाही.

 

 

आजही वृंदावनात दररोज रात्री श्रीकृष्ण येतो आणि रासलीला करतो असं मानलं जातं. वृंदावनातल्या “निधीवन”मध्ये श्रीकृष्णाची रासलीला रोज होते असं म्हणतात.

दररोज रात्री सात वाजता निधीवनातल्या मंदिरात आरती होते आणि त्यानंतर तो परिसर बंद केला जातो. मंदिरात असलेले पुजारी, भक्त आणि इतरही लोक मंदिर सोडून जातात. अगदी असं मानलं जातं की दिवसभर दिसणारे पशुपक्षी, प्राणी देखील रात्री सात नंतर त्या परिसरात फिरकत नाहीत.

===

हे ही वाचा – आसमंत मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रीकृष्णाला ‘बासरी’ कोणी दिली माहितेय? वाचा, यामागची कथा

===

निधीवनाच्या परिसरामध्ये एक राजवाडा आहे, ज्याला रंगमहल म्हटलं जातं. तिथल्या एका खोलीमध्ये चंदनाचा पलंग ठेवलेला आहे. रोज रात्री श्रीकृष्ण रासलीला केल्यावर त्या पलंगावर विश्रांती घेतात असं मानलं जातं.

दररोज रात्री तो परिसर बंद व्हायच्या आधी त्या खोलीतील पलंगावर नवीन आच्छादन घातलं जातं. शेजारी पाण्याने भरलेला तांब्या ठेवला जातो. प्रसाद म्हणून लोणी साखर ठेवलं जातं. खायच्या पानाचा विडा ठेवला जातो. तसंच दात घासण्यासाठी कडूलिंबाची काडी ठेवली जाते.

तसंच त्या खोलीत राधा-कृष्णाच्या शृंगारासाठी अनेक दाग दागिने ही ठेवले जातात. असं म्हणतात की कृष्ण स्वतः राधेचा शृंगार करतो.

 

 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जेव्हा ती खोली उघडली जाते. त्यावेळेस खोलीतल्या वस्तू कोणीतरी वापरल्या आहेत हे कळतं. म्हणजे पलंगावर कुणीतरी झोपून उठले आहे, हे पलंगावरचे अच्छादन पाहून कळतं. तांब्यातील पाणी संपलेलं असतं, प्रसाद आणि पान खाल्लेलं असतं. तर कडुलिंबाची काडी ओली लागते.

निधीवनात असलेली झाडंदेखील निराळीच आहेत. इतर झाडांच्या मानाने ही झाडं खुजी वाटतात. तिथं असणारी तुळशीची झाडं ही नेहमीच्या तुळशीच्या झाडांपेक्षा उंच आहेत आणि त्याच्या फांद्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. शिवाय तुळशीची झाडंही जोडीने उभी आहेत.

असं मानलं जातं की रात्री ही झाडं गोपिका बनतात, आणि रासलीलेमध्ये सहभागी होतात. पहाट होते आणि सूर्य उगवायच्या आत परत त्यांचे रूपांतर झाडात होतं. (असंही म्हणलं म्हणलं जातं की निधीवनात १६ हजार झाडे आहेत आणि ही झाडे म्हणजेच श्रीकृष्णाच्या 16000 पत्नी.)

 तिथे अशी सुद्धा मान्यता आहे, की तुळशीची पानं किंवा मंजुळा देखील कोणालाही घरी घेऊन जाता येत नाहीत. कुणी असा प्रयत्न केला आहे त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले आहे.

श्रीकृष्ण दररोज रात्री निधीवनात खरोखरंच येतात का आणि तिथे रासलीला करतात का? हे पाहण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. दार बंद होताना लपून-छपून रात्री तिथे राहिले. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली. अनेकांना वेड लागले, शिवाय रात्रीचं त्यांना काहीच आठवलं नाही. त्यामुळेच कृष्ण दररोज येतो की नाही हे जगाला अजूनपर्यंत तरी कळलं नाही.

 

 

तसं पाहिलं तर निधीवनाच्याच आसपास घरंही आहेत. त्या घरांमधून तो परिसरही दिसतो. पण रात्री आरती झाल्यावर त्या घरातील लोक त्या बाजूच्या खिडक्या बंद करतात. कारण ज्यांनी खिडकीतून देखील बाहेरचं दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनाही वेड लागणे, दृष्टी जाणे, मुकेपण येणे, बहिरेपण येणे असे प्रकार घडले आहेत.

कुणालाही तिथे दिसलेल्या दृश्याचं वर्णन करता येऊ नये, म्हणून असं होत असल्याचं मानलं जातं.

श्रीकृष्ण दररोज येतो की नाही हे कदाचित तिथे असलेल्या कडक नियमांमुळे कधीच कळणार नाही. पण आयुष्यात एकदा तरी वृंदावनाला, निधीवनाला भेट द्यायला हवी, तिथल्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

लोकांच्या भाबड्या श्रद्धेची खिल्ली न उडवता अशा गोष्टींकडे बघायला हवं. कारण अशा श्रध्दांमुळेच त्या ठिकाणांचे पावित्र्य, माहात्म्य जपलं जातं.

निधीवनातली वेगळ्या प्रकारची झाडं त्यामुळेच टिकून आहेत. कधीकधी देवापेक्षाही माणसांचे अनुभव देखील खूप चांगले असतात. काय सांगावं एखाद्या माणसाच्या रूपात श्रीकृष्ण भेटेल.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी पाण्यात का बुडाली? वाचा ही रंजक कथा

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version