आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – अखिलेश विवेक नेरलेकर
===
लोकांच्या सायकोलॉजीनुसार एखादी गोष्ट लोकांना प्रचंड आवडली की ती त्यांचं डोक्यात इतकी फिट्ट बसते की त्याच्या आसपास जाणारीसुद्धा कोणतीही दुसरी गोष्ट त्यांना फिकी वाटू लागते, सिनेमा नाटक यांच्याबाबतीतसुद्धा नेमकं तसंच आहे!
‘रिस्क है तो ईश्क है’ म्हणत कित्येक प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारा हर्षद मेहता लोकांच्या मनात इतकं घर करून असतानासुद्धा त्याच कथानकावर सिनेमा येतोय म्हंटल्यावर लोकांनी ट्रेलरपासूनच तुलना करायला सुरुवात केली!
स्कॅम १९९२ या रेकॉर्ड ब्रेकिंग वेबसिरीजनंतर ‘द बिग बुल’ नावाचा हर्षद मेहता स्कॅमवरच आधारीत अभिषेक बच्चनचा सिनेमा हॉटस्टारसारख्या प्लॅटफॉर्मवर आलेला आहे.
सहाजिक आहे दोन्ही कलाकृतींची तुलना होणार, कारण प्रतीक गांधीने साकारलेला हर्षद मेहता अजूनही कित्येकांच्या मनात घर करून आहे.
===
हे ही वाचा – शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी
===
शिवाय स्कॅम १९९२ ही वेबसिरिज असल्याने त्यात ज्या बारकाईने सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या गेल्या होत्या त्याचा आभाव तुम्हाला या सिनेमात जाणवू शकतो, पण हा सिनेमा तितकाही वाईट नाहीये जितका लोकांनी यांची तुलना मूळ वेबसिरीजशी केली आहे!
मुळात डिजिटल माध्यम आणि सिनेमा यांच्यात सर्टिफिकेशन बोर्डपासून कित्येक गोष्टीत तफावत आहे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण सगळेच सिनेमा आणि वेबसिरीज यांची तुलना करणं बंद करू शकतो.
असो तर स्कॅम सिरिज आणि हा बिग बुल सिनेमा यात साम्य काय? तर कथा, पात्र, आणि घटना. स्कॅममध्ये रियल लाईफ पात्र आणि घटना घेऊन आपल्यासमोर कथानक उलगडलं गेलं तर बिग बुल हा सिनेमा असल्याकारणाने ही एक काल्पनिक कथा आहे असं चित्रण आपल्यासमोर मांडलं गेलं!
या दोन गोष्टी सोडल्या तर या दोन्ही कलाकृति पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि आपल्यासारख्या सुजाण प्रेक्षकाने यांची तुलना न केलेलीच बरी!
कारण जरी तुम्ही स्कॅमसारखी अव्वल सिरिज पाहिली असली तरी बिग बुल बघताना सगळं माहीत असूनसुद्धा तुम्हाला हा सिनेमा नक्कीच बांधून ठेवेल.
इंटरनेटवर मिळणारं रेटिंग आणि लोकांच्या प्रतिक्रिया वाचत बसलात तर हा सिनेमा बघायचा नाही असा ग्रह करून बसाल पण एका Well-made कलाकृतीला मुकाल!
स्कॅम सिरिज ही अव्वल आहे आणि राहिलच यात वाद नाहीच पण हा सिनेमासुद्धा कुठल्याच बाबतीत तुम्हाला निराश करणार नाही!
वेबसिरीजसारखे बारकावे आणि डिटेलिंग तुम्हाला इथे मिळणार नाही, पण सिरिजमध्ये इतकं विस्तृतपणे सांगितल्यावर पुन्हा त्याच गोष्टी गिरवणं या सिनेमाच्या मेकर्सनी कटाक्षाने टाळलं असावं त्यामुळेच हा सिनेमा सिरीजपेक्षा बराच वेगळा ठरतो!
स्कॅम या सिरिजप्रमाणेच या सिनेमाची जान आहे ती म्हणजे बॅकग्राउंड म्युझिक, सुप्रसिद्ध यूट्यूबर कॅरीमिनाती याच्या ‘यलगार’ या गाण्याचे काही पिसेस या सिनेमात इतके चपखल बसले आहेत की स्कॅमची ट्यून आणि हे गाणं हमखास लोकांच्या ओठांवर येणार हे नक्की.
शिवाय स्कॅम या सिरिजमध्ये ज्या अव्वल दर्जाचं लिखाण आणि संवाद पाहायला मिळाले त्याच्या जवळपास जाणारं लिखाण तुम्हाला या सिनेमात नक्कीच अनुभवायला मिळेल.
अगदी स्कॅमसारखे ढासू डायलॉग नसले, तरी या सिनेमाचं लिखाण नक्कीच तुम्हाला इम्प्रेस करेल.
खासकरून जेव्हा हेमंत शहा एका मोठ्या युनियन लीडरला भेटायला जातो आणि इनसायडर ट्रेंडिंगसाठी टीप मागताना सोनं आणि पाणी यांची किंमत नेमकी काय हे समजावून सांगतो तेव्हा आपल्याला हे प्रकर्षाने जाणवतं की या सिनेमाच्या लिखाणावर बऱ्यापैकी काम केलेलं आहे!
===
हे ही वाचा – ‘वेगळ्या वळणाचा’ नायक ते हर्षद मेहता : मध्यमवर्गीय इंजिनिअरची अशीही कथा
===
असे छोटे मोठे संवाद आणि सीन्स तुम्हाला सिनेमाशी आणि त्या कथानकाशी बांधून ठेवायला नक्कीच मदत करतात. शिवाय ९० ची मुंबई चित्रित करतानासुद्धा कुठेच हात आखडता घेतलेला दिसणार नाही.
जितकी मेहनत लिखाणावर घेतली तितकीच मेहनत कॅमेरा, एडिटिंग, स्पेशल इफेक्टस यावरसुद्धा घेतलेली दिसते, आणि त्यामुळेच कदाचित हा सिनेमा कुठेही नकली वाटत नाही!
अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सौरभ शुक्ल, सोहम शहा, निकिता दत्ता, सुप्रिया पाठक शहा, महेश मांजरेकर, राम कपूर अशा दिग्गजांनी उत्तम काम केलं आहे.
इलेआना डिक्रुज हिचे काही उच्चार खटकतात खरे पण सुचेता दलालचं पात्र तिने तिच्यापरीने उत्कृष्टरित्या निभावलंय. सौरभ शुक्ल सारख्या सीनियर अॅक्टरला आणखीन थोडा मोठा रोल मिळाला असता तर अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली असती.
आता बोलूया हेमंत शहा हे पात्र साकारणाऱ्या अभिषेक बच्चनबद्दल. जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च केला गेला तेव्हापासून सगळ्यांनीच अगदी मीसुद्धा अभिषेक आणि प्रतीक गांधी यांच्यात तुलना करायला सुरुवात केली, आणि तिथेच आपण चुकलो!
प्रतीक गांधीने जो बेंचमार्क सेट केला आहे त्याचा उल्लेख न करता स्वतंत्र अभिषेकच्या कामविषयी बोलावसं वाटतं तिथेच अभिषेकने अर्धी लढाई जिंकली आहे असं मला वाटतं!
काही काही सीन्समध्ये त्याची टिपिकल गुरुकांत देसाईची झाक दिसत असली तरी अभिषेकने स्वतःचं एक स्टँडर्ड सेट केलं आहे हे नक्की. प्रतीक गांधीचा हर्षद मेहता इतकाच अभिषेकचा हर्षद मेहतादेखील तितकाच रिलेटेबल वाटतो.
मुळात इथे अभिषेकने कुठेच कॉपी केलेली नाही, त्याला जो रोल दिला गेला त्याने तो त्याच्या परीने उत्तम साकारायचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश मिळालं आहे.
त्याचं ते एक विचकट हास्यच जरा सिनेमात खटकतं बाकी सिनेमातला त्याचा हर्षद मेहता म्हणून वावर अगदी सहज होता आणि तो लोकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे!
===
हे ही वाचा – एका शापित राजपुत्राची गोष्ट
===
मुळात हर्षद मेहता हा खरोखरच एक स्कॅमस्टर होता का हीरो हे शोधण्याच्या नादात हा सिनेमासुद्धा काही अंशी हर्षद मेहताच्या गुन्ह्याला व्हाईटवॉश करायचा प्रयत्न करतो, पण सिरिजमध्येदेखील त्याच्याप्रती आपल्या मनात सहानुभूति निर्माण करण्यात हंसल मेहता यांना यश आलं होतंच की!
हा एक बँकिंग फ्रॉड जरी असला तरी त्या वेळच्या काही लुपहोल्सचा वापर करून हर्षद मेहता याने मार्केटमध्ये जो फुगवटा आणला होता तो तर खराच होता की, त्यावेळेस तसे कायदे नव्हते म्हणून ते शक्य झालं!
पण याचा अर्थ असा नाही ना की हर्षद मेहता जे करायचा ते योग्यच होतं, भले त्याच्यामुळे आपल्या देशातल्या अर्थचक्राला वेग मिळाला, कित्येक मिडलक्लास लोकांनी त्याच्यामुळे पैसे कमावले, पण शेवटी हे सगळं शक्य झालं ते आपल्या सिस्टिममधल्या लुपहोल्समुळेच!
शेवट जेव्हा स्कॅम उघड होऊ लागला आणि मार्केट कोसळू लागलं तेव्हा याच मिडलक्लास माणसाचं नुकसानही झालं की!
त्यामुळे स्कॅमसारख्या सिरिजमधून किंवा बिग बुल सारख्या सिनेमातून हर्षद मेहता आणि त्याच्या स्कॅमला कितीही कुणीही गलोरीफाय केलं तरी त्याचा गुन्हा लपत नाही हे समजून घेतलं पाहिजे!
ही सिरिज काय किंवा हा सिनेमा काय त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून बघून त्यातून जे शिकण्याच्या लायकीचं आहे तेच आपण शिकलं पाहिजे!
बाकी सिरिजशी तुलना न करता तुम्ही या सिनेमाकडे स्वतंत्रपणे बघू शकता, नक्कीच तुमची निराशा होणार नाही, हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहता येईल, जरूर बघा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.