काशी विश्वेश्वराचं विमनस्क वास्तव : तो नंदी अजूनही आपल्या विश्वेश्वराची वाट बघतोय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – सौरभ वैशंपायन
===
९ एप्रिल १६६९, सूर्यग्रहण होते त्या दिवशी. काशी येथे ग्रहणकाळात गंगेत स्नान करण्यासाठी आणि काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती. अचानक काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. लोकांच्या किंकाळ्या उठू लागल्या. चारही बाजूंनी मुघली फौजेचे आक्रमण झाले.
“बुतशिकन” आणि “गाझी” म्हणवणारे काशी विश्वेश्वराच्या मंदिरात घुसले. बारा ज्योर्तीलिंगांपैकी एक अत्यंत पवित्र धर्मस्थळ. मंदिरावर घणाचे घाव पडू लागले. मंदिरातील मूर्ती फुटू लागल्या. काशी विश्वेश्वराचा भंग झाला, कळस खाली आला मंदिर पूर्ण उध्वस्त झाले. त्या ठिकाणी मशीद उभारण्याचा हुकूम झाला. दिल्लीत बसलेला औरंगजेब नावाचा राहू हिंदू धर्माच्या सूर्याला ग्रासायला दिवसेंदिवस मोठा आ वासू लागला.
–
हे ही वाचा – इस्लामी-आक्रमणापूर्वी चक्क एका रात्रीत बांधलं गेलेलं प्राचीन मंदिर…!!!
–
पाठोपाठ सोमनाथाचे मंदिर फुटले महादेवाचे दुसरे ज्योतिर्लिंग. इथेही मशीद उभी राहिली. काठेवाडातील पाठशाळा, मठ, आश्रम बंद झाले. धर्मपीठ बंद केले. होळी – दिवाळी वगैरे सण शहराबाहेर साजरी करण्याचा हुकूम पूर्ण मुघली राज्यात सुटला. तुमचे सण तुम्ही तुमच्या घरात साजरे करू शकत नाही.
औरंगजेबाने मोठमोठी मंदिरे उध्वस्त करायचा फतवा काढला. मथुरेत श्रीकेशवराजाचे प्रचंड मंदिर होते प्रचंड म्हणजे किती मोठे असावे? तर या मंदिराचे सोन्याने मढवलेले कळस आग्र्याहून दिसत … आग्रा मथुरा हे अंतर चाळीस मैलांचे आहे. यावरून ते मंदिर किती भव्य दिव्य असेल? हे मंदिर बुंदेला राजा नरसिंहदेवाने तब्बल तेहतीस लाख रुपये खर्चून बांधले होते.
१६७० च्या रमजानमध्ये हे मंदिर पाडायचा हुकूम सुटला. अब्दुन नबीखानाने मंदिर लुटले आणि मग जमीनदोस्त केले. केशवदेवाला उखडून आग्र्याला नेले आणि जहाँआराने बांधलेल्या मशिदीच्या पायाखाली पुरले. इतका राग का? तर दारा शुकोह याने त्या मंदिराला नवीन कठडे अर्पण केले होते. ही कृती इस्लामच्या विरुद्ध होती. मग मथुरेचे नाव इस्लामाबाद असे ठेवले.
औरंगजेबाने असदखानाला फर्मान पाठवले की मदीनापूर ते कटक या पट्ट्यात गेल्या दहा बारा वर्षात जितकी मंदिरे नव्याने बांधली ती पडून टाक. शेकडो मंदिरे उध्वस्त झाली. ढाक्यातील यशो-माधव मंदिर तोडण्याचा हुकूम बजावला गेला. राजपुतन्यातील खंडेला आणि सानुला परिसरातील मंदिरे दाराबखानाने फोडली.
खान-इ-जहान याने जोधपूरजवळील एक भव्य मंदीर तोडून तिथल्या मूर्ती आणि जवाहिर बादशहासमोर ठेवले. जवाहिर खजिन्यात घेऊन त्या मूर्ती जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली गाडल्या.
उदयपूरवर केलेल्या स्वारीत उदयसागर तलावाशेजारील तीन भव्य मंदीरे फोडली. उदयपूर परिसरातील १७२ लहान मोठी मंदिरे पाडल्याचे हसन अली खानाचे एक पत्र उपलब्ध आहे. पाठोपाठ चित्तोड मधील ६३ मंदिरे जमीनदोस्त करावी असा हुकूम औरंगजेबाने सोडला. हुकुमाची तालीम झाली.
ही यादी केवळ १६८० पर्यंतची आहे. अजून अशी किती मंदिरे सांगू?? औरंगजेबाने कुठल्याश्या चार मंदिरांना कशी देणगी दिली होती म्हणून कागद फडकविणारी थोर सेक्युलर लोकं या शेकडो उध्वस्त मंदिराच्याबाबत कधी बोलणार?
“तीर्थक्षेत्रे मोडीली। ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली।
सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला॥”
पण मग ही मंदिरे पाडली तेव्हा काहीच प्रतिकार झाला नाही का? तर काही ठसठशीत उदाहरणे मिळतात.
शाही हुकूमानुसार सोरोनमधले सीताराम मंदिर फोडले व तिथल्या पुजाऱ्यांची मुंडकी मारली. आता वजीरखानाने गाडा बेग याला ४०० सैनिकांसह उज्जैन भोवती मंदिरे होती ती पाडायला पाठवले. पण तिथल्या एका जमीनदाराने आपल्या लहानश्या तुकडीसह तिखट प्रतिकार करून गाडा बेग याला त्याच्या १२१ सैनिकांसह ७२ हुरांजवळ पाठवून दिले.
केशवदेवाचे मंदिर पडणारा अब्दुन नबीखान तीन चार महिन्यांनी आग्र्याच्या आजूबाजूला हिंदूंकडून जबरदस्तीने जकात वसूल करायला गेला असताना तिलपतमधील गोकला नावाच्या एका जाट नेत्याने बंड पुकारले आणि अब्दुन नबीखानाला ठार केले. बाजूचा सदबादचा परगणा लुटला पार आग्र्याच्या परिसरात येऊन लुटालूट सुरू केली.
अखेर हसनअली खानाने तोफखाना नेऊन जाटांवर आक्रमण केले. तब्बल बावीस हजार जाट गोकलाच्या अधिपत्याखाली लढाईला जमले. जोहार करण्याआधी कित्येक जाटांनी आपल्यानंतर मुघलांनी अब्रू लुटू नये म्हणून आपल्या बायकामुलांना स्वहस्ते ठार केले आणि मग ते तोफखान्यावर तुटून पडले हजारो जाट लाही भाजली जावी तसे भाजले गेले त्यांनी पाच हजार मुघल मारले. गोकला जिवंत हाती सापडला. त्याचा एक एक अवयव तोडून हाल-हाल करून ठार मारले.
दिल्लीच्या ईशान्येस ७५ मैलांवरील नरनौलजवळ सतानामी लोकांनी उठाव केला. ५००० सतानामी लोकांनी बादशाही सैन्याची लांडगेतोड सुरू केली. बादशाही फौज सर्वत्र मार खाऊ लागली. प्रतिशोध म्हणून नारनौलमधील बऱ्याच मशिदी पाडल्या.
विश्वेश्वराच्या विध्वंसाने दुखवलेले एक तपोराशी पंडित काशीहुन उठून दख्खनेत आले. उभ्या भारतात हिंदूंचा त्राता कोण? हिंदूंची ढाल कोण? तुर्कांचा काळ कोण? त्यांना एकच सिंहपुरुष दिसला – “या नावास छत्रसिंहासन हवे! म्हणजे जसा सभेत शिशुपाल नष्ट झाला तद्वत सगळेच गप्प होतील!” रायगडावर त्यांनी श्री शिवछत्रपतींना राज्याभिषेक केला. औरंगजेबाच्या छाताडावर हिंदूंचे सिंहासन उभे केले.
“बुडाला औरंग्या पापी। आनंदवनभुवनी।।”
पुढचा दैदीप्यमान इतिहास मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध आपण जाणतोच. मराठ्यांनी एक एक करत अटक ते कटक जम बसवला. या काळात काशी, मथुरा आणि अयोध्या सोडविण्याबद्दल नानासाहेब पेशव्यांची पानिपताआधीची काही पत्रं वाचण्यासारखी आहेत.
पुढे मल्हारराव, अहिल्याबाई होळकर किंवा महादजी शिंदे यांनी ही स्थळे सोडविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या मनात शतकानुशतकांच्या कत्तलीची इतकी भीती बसली होती की स्थानिकांनी मराठ्यांना मशिद पाडून मंदिर उभे करू दिले नाही. तुम्ही आत्ता आहात उद्या तुम्ही निघून गेलात की दुआबात बसलेले पठाण इथे येऊन सैतान लाजेल असा नंगानाच करतील.
नादिरशहाने वृंदावनात वडाच्या पारंब्यांना माणसे आणि गायीची शेकडो मुंडकी कशी लटकवली होती ते अनुभवले होते. मग लोकांच्या हट्टापुढे नाईलाजाने मशिदीच्या पलीकडे नवीन मंदिर बांधले पण मशिदीसमोरचा उध्वस्त न करता आलेला तो सात-आठ फुटी नंदी? तो मात्र आपल्या विश्वेश्वराची वाट बघत तिथेच भक्कम मांड ठोकून बसला कदाचित त्याची साधना आता फळाला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
===
हे ही वाचा – बाबरीचा बदला म्हणून पाडलेल्या, हिंदू संस्कृतीचा वारसा असलेल्या पाकिस्तानातील मंदिराची गोष्ट
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.