Site icon InMarathi

राज्याच्या नव्या गृहमंत्र्यांनी खुद्द शरद पवार यांना शिस्तीचे धडे दिले होते

sharad pawar

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात घोंगावणाऱ्या वादळाने अखेर काल आपला मार्ग बदलला. अंबानींच्या घरासमोरील संशयित गाडीत स्फोटके सापडली तेंव्हा या सगळ्याचा परिणाम राज्याच्या मंत्रीमंडळावर होईल याची कुणाला सुतराम कल्पनाही नव्हती.

संशयित गाडीचा मालक मनुसख हिरन यांची हत्या, त्या हत्येच्या चक्रव्ह्युहात गोवलं गेलेलं सचिन वाझे हे नाव आणि या नावावरून सुरु झालेला राजकीय गदारोळ या सगळ्या प्रकरणाला काल अर्धविराम मिळाला तो राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याने. सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर पदावर राहणं योग्य नसल्याचे सांगत त्यांनी राजीनामा दिला.

 

 

संबंधित प्रकरणातात राज्याच्या गृहमंत्र्याचे नाव समोर येताच विरोधकांना आयतं कोलित मिळालं आणि महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला. वनमंत्री संजय राठोड नंतर अवघ्या सव्वामहिन्यात आघाडी सरकारमधील दुसरी विकेट पडल्याने “आता या सरकारचं नेमकं कसं होणार” या चर्चा घराघरात रंगु लागल्या.

मात्र अशा वादग्रस्त परिस्थितीत राज्याच्या गृहमंत्रीपदाची धुरा राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आणि पवार – वळसे पाटील यांच्या जुन्या किस्सांना उधाण आलं.

पवारांचा उजवा हात, राजकाराणातील शिष्य, मित्राचा लेक अशा वेगवेगळ्या नात्यात बांधल्या गेलेल्या पवार आणि वळसे पाटील याा जोडीचा असाच एक किस्से…

दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात खुद्द पवारांनीच मान्य केलं होतं की, दिलीप नसता तर मला राज्याचा दौरा करणं शक्य झालं नसतं.

 

 

हा तो काळ होता जेंव्हा विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या राष्ट्रवादीला गळती लागली होती. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी राज्याचा दौरा करण्याचं शरद पवारांनी ठरवलं.

त्यावेळी आजकालसारखी कोणतीच प्रगत साधनं नव्हती. ना फोन, ना इंटरनेट, नेत्यांकडे स्वतःची विमानसेवा, त्यामुळे नेत्यांसाठीही ‘दौरा’ ही बाब तितकीशी सोपी नव्हती.

तर पवारांच्या या दौ-याची सगळी जबाबदारी राष्ट्रवादीचे अरुण मेहता आणि दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली.

भामरागडपासून सुरु झालेल्या या दौऱ्यात राज्यातील प्रत्येक जिल्हा, लहानशा तालुक्याचाही समावेश व्हावा अशी दौऱ्याची आखणी वळसे पाटील यांनी केली होती. संगणासारख्या सोई नसल्याने प्रत्येक मार्ग, दौ-याच्या वेळा, प्रवासाच्या सोयी या सगळ्याच्या कागदी नोंदी वळसे पाटील यांनी अत्यंत बारकाईने जपल्या होत्या.

विदर्भा, मराठवाडा ओलांडत दौऱ्याचा शेवट सावंतवाडी येथे होणार होता. संपूर्ण दौऱ्यात पवारांच्या मागे सावलीसारखे उभे असलेल्या वळसे पाटील यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दौऱ्याच्या नियोजनात त्यांनी जपलेली शिस्त!

 

 

 

राजकारणात मुरलेल्या शरद पवारांना राज्याचा दौरा ही बाब नवी नसली, तरी रणरणतं ऊन, खाण्यापिण्याची, झोपण्याचीही सवड नाही यांमुळे अनेक दौ-यांनंतर पवारांची तब्बेत बिघडायची.

याचीच काळजी घेऊन दिलीप वळसे पाटील यांनी या दौ-याचं इतकं शिस्तबद्ध नियोजन केलं की राजकारणात रमलेल्या पवारांच्या तब्बेतीचीही त्यांनी काळजी घेतली.

हा किस्सा सांगताना पवार म्हणाले होते, मी कॉंग्रेस संस्कृतीत वाढलो, त्यामुळे गबाळेपणा हा स्थायीभाव आहे. व्यवस्थितपणा, नियोजन हे आम्हाला जमत नव्हतं. मात्र दिलीपने याचीही काळजी घेतली. दौ-यात जेवण काय असावं, डब्यातील पदार्थ कमी तिखट, कमी तेलकट असावे, अगदी एवढ्या लहानसहान गोष्टींचं त्याचं नियोजन नसतं, तर माझा दौरा यशस्वी झाला नसता.

 

हे ही वाचा –  जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!

एकंदरित त्याच्या कडक शिस्तीमुळे तो दौरा यशस्वी झाल्यानंतर मला शिस्तीचं महत्व पटलं, किंबहूना दौ-याच्या नियोजनात, वागण्यात, खाण्यापिण्यात त्यानी मला शिस्त लावली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पवारांनी हा किस्से जेव्हा साांगितला त्यावेळी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते, त्यावेळी पवार आपल्या खोचक शैलीत म्हणाले, मी काही संघी वातावरणात शिकलो नाही, त्यामुळे शिस्तप्रियता, दौ-यातील नियोजन या सगळ्याचे संस्कार माझ्यावर झाले नाहीत.

फडणवीस. गडकरी ही मंडळी खूप भाग्यवान आहेत की ते या शिस्तप्रिय वातावरणात घडले.

 

 

 

पवारांच्या राजकारणासह त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणारे, त्यांच्या प्रत्येक बाबतीत शिस्तीने नियोजन करणा-या दिलीप वळसे पाटीलांवर आता संपुर्ण राज्याच्या नियोजनाची जबाबदारी आली आहे.

 

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तडकाफडकीचा राजीनामा, पोलिस यंत्रणेतील अस्वस्थता, अधिका-यांच्या बदल्या, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अशा अनेक आघाड्यांवर नवे गृहमंत्री कसे लढतात, आपल्या शिस्तीने यंत्रणेला वठणीवर आणतात का ? याची उत्तरं येणारा काळ देईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version