Site icon InMarathi

नक्षल्यांच्या हल्ल्याचा निषेध करताय? त्याबरोबर हे क्रूर वास्वव ही समजून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – राजेश कुलकर्णी

===

छत्तीसगडमधील अबुजमाड हा नक्षल्यांचा फार प्रभाव असलेला भाग. आपल्यकडील गडचिरोलीच्या कडेनेही हा भाग लागतो. तो भाग सुरू झाल्यानंतर बाहेरच्या रिंगपासून काही किमी अंतरापर्यंत सरकारी संस्थांचे, काही शाळांचे अस्तित्व दिसून येते. काही इमारती जाळल्या गेल्याच्या खुणा दिसतात. त्यापलीकडे मात्र आतल्या भागात जाणे अशक्य असते. या भागात सरकारी यंत्रणांचे अस्तित्वच नसते.

नारायणपूर जिल्ह्य‍ातील अबुजमाडच्या बाहेरच्या रिंगमध्ये गेलो होतो. तेथे या खुणा दिसत होत्या. अनेक स्वयंसेवी संस्था अबुजमाडच्या आतल्या भागात काम करतात. अगदी अडीच-तीन वर्षांच्या मुलांपासून मोठ्यांसाठी शाळांची सोय करणे, त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा पुरवणे ही त्यांची प्रमुख कामे. नक्षल्यांच्या दृष्टीने ही कामे त्यांच्यासाठी धोकादायक नसल्यामुळे ती चालवण्यास ‘परवानगी’ असते.

 

हे ही वाचा – नक्षली गटांना न जुमानता शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या ‘बस्तर’ मधील शिक्षिकेच्या जिद्दीची कथा!

सुट्ट्यांमध्येही या मुलांना कसल्या ना कसल्या निमित्ताने गुंतवून ठेवण्याकडे कल असतो. कारण ठराविक वयाच्या वरची मुले या काळात घरी गेली की हमखास नक्षल्यांच्या घेर्‍यात येतात. वैद्यकीय सेवांची तर तर्‍हाच न्यारी.

तेथील सुरक्षा दलांच्या पोस्टवरील एका जवानाची योगायोगाने भेट झाली. खरे तर तो त्या शाळेतील शिक्षक वाटला होता. मुलांना मल्लखांब शिकवत होता. काही मुले अगदी निष्णात होती. काहींमध्ये अद्याप सराईतपणा यायचा होता. तेथे चाललेला मल्लखांबाचा वर्ग पाहून खरे तर आश्चर्य वाटले होते.

मुलांचा सराव संपल्यावर त्याच्याशी बोललो. तर तो स्पेशल टास्क फोर्सचा जवान होता. स्वत:च्या फावल्या वेळात मुलांना शिकवण्यासाठी येई. प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून. त्याच्या कष्टांमुळे महाराष्ट्राच्या खालोखाल किंबहुना बरोबरीने त्याच्या विद्यार्थ्यांनी प्रगती केली होती. त्याचे विद्यार्थी टोक्यो ऑलिंपिकमध्ये मल्ल्खांबाच्या प्रदर्शनासाठी जाणार होते. मात्र कोविडमुळे त्यांची संधी हुकली.

किती तरी मुलांनी स्पर्धेसाठी देशाच्या विविध भागांमध्ये जाण्यासाठी आयुष्यात प्रथमच ट्रेन पाहिली आणि त्यातून प्रवास केला. आणि अशा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवणे त्यांच्यासाठी एव्हाना अतिशय सामान्य झाले आहे.

 

 

त्याच्याशी बोलण्याच्या निमित्ताने आणखी काही जवानांशी बोलणे होऊ शकले. त्यांना पुरवल्या जाणार्‍या सोयींचा विषय काढला. अर्थातच त्या सोयी उत्तम नसल्या तरी समाधानकारक तरी म्हणाव्यात का अशी चर्चा त्यांच्यात दिसली. पण सर्वांची एक तक्रार मात्र सामायिक होती. की आम्हाला सैन्यदलांच्या बरोबरीने वेतन मिळत नाही. आणि या अपेक्षेमागचा हेतुही त्यांच्यापैकी एकाने लगेचच सांगितला.

त्याचे म्हणणे असे की देशाच्या काहीच सीमांवरील परिस्थिती सदैव अस्थिर असते. म्हणजे तेथे तैनात सैन्यदलाच्या तुकडीला केव्हा शत्रूच्या गोळीबाराचा सामना करावा लागेल याची शाश्वती नसते. इतर सीमांवर बहुतेक वेळा शांतता नांदते. त्या मानाने आम्हाला नेहमीच नक्षली हल्ल्याच्या सावटाखाली रहावे लागते. आणि तरीही आमची म्हणावी तशी कदर केली जात नाही.

या सुरक्षा दलांच्या जवानांच्या धैर्याचे जाऊ दे, कोणामध्ये थोडेसे धाडस असेल तर जगदलपूरहून दंतेवाडाला जातानाच्या जंगलातील रस्त्याच्या शॉर्टकटने जाऊन दाखवावे. त्यातच या रस्त्यावर घाटाचा रस्ताही आहे. स्वत:च्या गाडीतून प्रवास करायचा अनुभव अत्यंत भयावह आहे.

 

 

महिला कसला अनुभव घेत असतील ते त्या जाणे. त्यातल्या त्यात बसने गेले तर जीवात जीव येतो. कारण मग आपण एकटे नसतो. आपण बाहेरचे म्हणून अधिक भाडे आकारले जाण्याची शक्यताही असते; पण ते वेगळे.

आदिवासींवरील अन्याय हा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे. याचे कारण म्हणजे नक्षल्यांनी या अन्यायाचे सुरूवातीला भांडवल करत आपले बस्तान बसवले, त्यांचा खरा हेतु वेगळाच असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.

या भागांमध्ये विकास होऊ न देणे, शाळा जाळून मुलांनी शिक्षण देण्यात अडथळे आणणे हे नक्षल्यांचे उद्योग त्यांना साफ उघडे पाडतात. आणि अशा नक्षल्य‍ांसाठी जगणारे कोबाड घांडीसारखे आणि वरवरा रावसारख्यांना मानवाधिकार कार्यकर्ते समजणारे एक तर भोळे असतात किंवा या नक्षलसमर्थकांनी पढवलेले असतात.

 

 

एकवेळ स्थानिक नक्षल सुरक्षा दलांसमोर शरण येतील; पण हे शहरी नक्षल जीवाची भीती असल्यामुळे आपली भूमिका बदलण्यास तयार नसतात. या शहरी नक्षल्यांचे समर्थन करणारे तर येथे समाजमाध्यमांमध्ये सर्रास दिसतात.

म्हटले तसे त्यातले काही जण केवळ आपल्या भाजपविरोधापोटी अजाणतेपणाने नक्षल्यांचे वा अर्बन नक्षल्यांचे समर्थन करताना दिसतात आणि ते हे अर्बन नक्षल समर्थकांच्या अड्ड्यावर म्हणजे वॉलवर करताना दिसतात.

समाजमाध्यमांमधील अशा अर्बन नक्षल समर्थकांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. कोबाड घांडी असो की वरवरा राव, काही काळ कायद्याच्या कचाट्यात सापडले किंवा त्यातून निसटले म्हणून निर्दोष ठरत नाहीत.

भारताचे संविधान उलथवून टाकणे, येथे हिंसाचार घडवणे हे त्यांचे देशघातकी हेतु त्यांच्या वेळोवेळच्या वक्तव्यांमधून स्पष्टपणे दिसत असतात. आणि तरीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणार्‍यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी.

निरपराध आदिवासी आणि सुरक्षा दलाच्या जवानांचे व अधिकार्‍यांचे वेळोवेळी रक्त सांडले जाण्यास हे त्यांचे समाजमाध्यमांमधील पाठीराखेदेखील अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत, हे त्यांना सदैव दाखवत रहायला हवे.

===

हे ही वाचा – इथून, तिथून शेवटी मिथुन भाजपमध्ये: नक्षलवादी ते नेता, वाचा एक भन्नाट राजकीय प्रवास

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version