Site icon InMarathi

हे मंदिर बंद असतानाही यातून होणारा प्रचंड घंटानाद जगाला बुचकळ्यात टाकतो…

maihar mata mandir inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत, भारतीय संस्कृती, ज्ञान,भाषा, स्थापत्य, इतिहास या साऱ्या गोष्टींबद्दल पाश्चात्य जगाला कुतूहल आहे. या कुतूहलापोटी अनेक पाश्चात्य स्थापत्यकार, लेखक, इतिहास संशोधक भारतात येतात.

भारतातील प्राचीन वास्तू, परंपरा त्यामागील ज्ञात-अज्ञात रहस्ये यांचाही अभ्यास करतात. काहींचे गुढ उकलते तर काही तशाच आपली रहस्यमयता जपत राहतात.

अशाच काही रहस्यांच्या शोधात आलेल्या एका प्रसिद्ध पाश्चात्य इतिहासतज्ञ ए. कनिंग्घम यांनी भारतातील काही रहस्यमय इतिहास असलेल्या मंदिरांचा अभ्यास केला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मध्यप्रदेशातील सतना तालुक्यातील त्रिकूट पर्वतावरील मैहर, शारदा माता मंदिर हे ही असेच एक रहस्य जपणारे मंदिर. काय आहे या मंदिराचे रहस्य?

 

 

स्थानिक आख्यायिकेनुसार दक्ष यज्ञात जेव्हा माता सतीने आत्मसमर्पण केले तेव्हा त्या घटनेने उद्विग्न झालेले महादेव सतीचा देह खांद्यावर घेऊन तांडव नृत्य करू लागले. त्यावेळी निर्माण झालेल्या उष्णतेने सतीचा देह वितळू लागला, आणि त्याचे एकेक करून अवयव गळू लागले.

त्यामध्ये माता सतीच्या आभुषणांचाही समावेश होता. तेव्हा भगवान विष्णू यांनी सतीच्या उर्वरीत देहाचे बावन्न भाग केले. तीच बावन्न मूळ पिठे म्हणून मानली जातात.

===

हे ही वाचा – इस्लामी-आक्रमणापूर्वी चक्क एका रात्रीत बांधलं गेलेलं प्राचीन मंदिर…!!!

===

इतर शक्तीस्थळे धरून एकूण १०८ शक्तीपिठे उत्पन्न झाली. या शक्तीपिठांमध्ये मैहरचा समावेश होतो. देवी ही मातास्वरूप असल्याने तिला माई असेही म्हणतात आणि सतीमातेचा हार जिथे पडला ते शक्तीपिठ माई-हार; ‘मैहर’ या नावाने उदयाला आले.

 

 

दुसरी आख्यायिका अशी आहे की, बुंदेलखंडातील प्रसिद्ध योद्धा आल्हा व उदैल हे या देवीची उपासना करत. देवीच्या मंदिरामागेच त्यांच्या स्नानाचा तलाव व युद्धसरावासाठीचा त्यांचा आखाडा देखील आहे.

नाथपंथीय गुरू गोरक्षनाथ यांच्या आदेशाने आल्हा यांनी देवी मंदिरात बारा वर्षे तपसाधना केली होती. आल्हा देवी मातेला शारदा माँ म्हणत असत. म्हणून मैहर माता शारदा माँ या नावाने ओळखली जाऊ लागली. आजही मातेच्या मंदिर परिसरात अनेक ऐतिहासिक अवशेष बघायला मिळतात.

भारतीय संस्कृतीमध्ये महादेव शिवाची उपासना करणारे शैव पंथीय व माता शक्तीची उपासना करणारे शाक्त पंथीय म्हणवले जातात.

 

 

मैहर माता मंदिर या शाक्त पंथियांच्या म्हणजेच तंत्रविद्येने उपासना करणाऱ्यांच्या साधनेचे महत्वाचे ठिकाण आहे. अनेक सिद्धींची उपासना करण्यासाठी शारदा माँची भक्ती केली जाते.

पूर्वी देवीला अजबली द्यायची प्रथा होती पण बाराव्या शतकात सतनाचे राजा ब्रजनाथ जूदेन यांनी या पशूबली प्रथेला प्रतिबंध केला.

मैहर आणि शारदा माता मंदिराचा व मैहर पर्वत यांचा पहिला उल्लेख प्राचीन ग्रंथ ‘महेंद्र’ यामध्ये झाला आहे. त्यानंतर ९/१० शतकात आदी शंकराचार्य यांनी देवीची पूजा-अर्चना केल्याचा इतिहासात उल्लेख आहे.

विंध्य पर्वतशृंखला किंवा कौलगिरी पर्वत श्रेणीतील पिरँमिड आकाराच्या त्रिकूट पर्वत शिखरावर, जमिनीपासून ६०० फूट उंचीवर आहे. हे शारदा मातेचे स्थान असून विक्रमसंवत ५५९ ( ५२२ इ.स.पूर्व ) चैत्र कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी नृपल देव राजाने या देवीची सामवेदी स्थापना केली असा उल्लेख आहे.

देवीच्या मुर्तीखाली पाचव्या शतकातील शिलालेख असून त्यामध्ये सरस्वतीपुत्र दामोदर हाच महर्षी व्यास म्हणून जन्मास आला असा उल्लेख आहे.

 

===

हे ही वाचा – या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!

===

बुंदेल खंडाचे प्रसिद्ध योद्धा बंधू आल्हा व उदल हे देवीचे परम भक्त होते. ते महोबाचे वीर योद्धे असून परमार राजवंशाचे सामंत होते. परमार राजाच्या दरबारातील कवी जगनिक यांनी ‘आल्हाखंड’ या त्यांनी रचलेल्या काव्यसंग्रहात या दोन्ही भावांनी केलेल्या ५२ युद्धांचे वर्णन आहे.

शेवटचे युद्ध त्यांनी पृथ्वीराज चौहान यांच्याशी केले. ज्यात शारदा मातेच्या आल्हाला मिळालेल्या वरदानामुळे पिछेहाट झाली. तेव्हा मातेच्या सांगण्यावरून आल्हा यांनी पृथ्वीराज चौहान यांना जीवदान दिले.

त्यानंतर आपली साग ( शस्त्र, तलवार ) देवीला अर्पण करून आल्हा यांनी पुढे युद्ध न करण्याचा निश्चय केला व आपल्या तलवारीचे टोक वळवून ठेवले जे आजवर कोणीही सरळ करू शकला नाही.\

आल्हा आणि पृथ्वीराज यांच्या युद्धाचे अवशेष आजही मंदिर परिसरात पाहता येतात. अशा या देवीभक्त आल्हा यांना शारदा मातेने अमरत्वाचे वरदान दिले होते अशी मान्यता आहे.

खरी कथा पुढेच आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा असलेले हे मंदिर आजही एक रहस्य बाळगून आहे, ज्याचा आजवर उलगडा होऊ शकला नाही.

काय आहे बरे ते रहस्य?

गोष्ट अशी आहे, की रात्री आठ वाजता पुजाऱ्यांनी मंदिराचे दरवाजे बंद केल्यानंतरही मंदिरातून घंटेचा व आरतीचा आवाज ऐकू येतो. इतकेच नाही तर पहाटे ब्राह्म मुहूर्तावर जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा मातेची साग्रसंगीत पुजा झालेली आढळून येते.

अनेकांनी हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला जो अपयशी ठरला. अनेक इतिहासतज्ञ, वैज्ञानिक यांनीही हे रहस्य उकलण्याचा प्रयत्न केला पण आजवर हे रहस्य उलगडले गेले नाही. कोण करत असेल घंटानाद? कोण करत असेल पूजा-अर्चा?

मंदिराचे पुजारी आणि स्थानिक आख्यायिकेनुसार माता भक्त आल्हा व उदल हेच रोज देवीमातेची आरती व पूजा करून जातात. रोज पहाटे मंदिराचा दरवाजा उघडल्यानंतर दिसणारी, देवीची झालेली पूजा हे त्याचे प्रमाण मानले जाते.

देवी शारदा माँ व तिच्या निस्सिम भक्तांमधील नात्याची ही कहाणी आजही न उलगडलेले रहस्य आहे.

 

 

मंदिराकडे जाण्यासाठी खडकात खोदलेल्या जवळपास १०६३ पायऱ्या असून आता अलिकडच्या काळात ‘रोप वे’ची ही सोय केली आहे. शारदा मातेच्या मंदिराबरोबरच शाक्त पंथाची इतर उपास्यदैवते जसे की काली, दुर्गा,श्री गौरीशंकर, कालभैरवी, फुलमती, नरसिंह भगवान, शेषनाग, ब्रह्मदेव व जलापा देवी यांचीही मंदिरे परीसरात आहेत.

मंदिराच्या मागे आल्हातलाव व आखाडा आहे. मैहर सिटीतून साधारण पाच किलोमीटरवर हा त्रिकूट पर्वत आहे. स्थानिक खाजगी वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध आहे.

मैहरच्या त्रिकूट पर्वतावरील शारदामातेच्या मंदिरातील या रहस्यासारखी भारतीय संस्कृती आणि इथली परंपरा अशी अनेक रहस्ये आजही बाळगून आहे जी इतिहास आणि वर्तमानात आजही उलगडण्याच्या प्रतिक्षेत कुलूपबंद आहेत..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – या मंदिराच्या खांबांतून येतो आवाज. प्राचीन स्थापत्यशास्त्राचा अनोखा आविष्कार!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version