आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
माणूस हा प्राणी समाजप्रिय असल्याचं आपण ऐकत आलो आहोत. मानसाला कळपानं रहाणं आवडतं, तो एकटा जगू शकत नाही. मात्र एका स्त्रीनं एका निर्जन बेटवर थोडी थोडकी नाही तर तब्बल अठरा वर्षं काढली. सोबत कुटुंब नाही की आप्त नाहीत. सगळेजण बेट सोडून गेले आणि ही एकटीच मागे राहिली, जगली.
ही सुरस गोष्ट आहे साधारण १८११ च्या आसपासची. कॅलिफोर्निया खाडीतल्या सॅन निकोलस बेटावर निकोलस जमातीच्या लोकांचं दहा हजारांहून जास्त वर्षं वास्तव्य होतं.
अत्यंत आनंदात आणि परस्पर सहकार्यात त्यांचं आयुष्य पिढ्यानपिढ्या चाललेलं होतं. स्थानिक लोकांपासून दूर एका एकाकी बेटावर आपलं एक वेगळं जग या जमातीनं निर्माण केलं होतं.
या जगात बाहेरच्या कोणालाही प्रवेश नव्हता आणि या जगातलं बाहेरच्या जगात कोणी जात नसे. हे सगळं आणखीन काही पिढ्या असंच चालू असतं जर रशियन आणि अलास्कन लोकांनी या बेटावर हल्ला केला नसता तर.
रशियन आणि अलास्कन शिकार्यांनी या बेटावर एक दिवस अचानकच हल्लाबोल केला. त्यांनी असं का केलं? याचं उत्तर आजही कोणाकडे नाही.
===
हे ही वाचा – बर्म्युडा ट्रँगलचं गुपित उलगडलं असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा! वाचा ‘खरं’ रहस्य…
===
हा हल्ला झाला तेंव्हा या बेटावर या जमातिचे साधारण तीनशे साडे तीनशे लोक रहात होते ज्यापैकी बहुतेकजण या हल्ल्यात मरण पावले, वाचलेले डझनभर लोक या बेटावरून हुसकवून लावण्यात आले. हे असं का केलं? याचंही उत्तर कधीच मिळू शकलं नाही.
कॅथलिक गुरुंच्या फतव्यामुळे या बेटावरुन निकोलेनो जमातिच्या लोकांना हकलून लावण्याची मोहिम राबवली गेली. हा फतवा नेमका कोणत्या कारणामुळे काढला? हे मात्र आजही एक कोडंच आहे. काही अफवा असं सांगतात की धर्मगुरुंना या सगळ्यांचं धर्मांतर करुन त्यांना आपल्या धर्मात घ्यायचं होतं.
संख्येनं छोटी असणार्या या जमातीला धर्माचं संरक्षक कवच हवंच असं त्यांचं मत असल्यानं हे पाऊल उचललं गेलं असं बोललं जातं.. मात्र याची सत्यासत्यता तपासायचा मार्ग नाही!
हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना तिथेच गाडून उरलेल्या डझनभर लोकांना एका बोटीत कोंबण्यात आलं. घरदार, गुरं ढोरं मागे ठेवून आकांत करत हे लोक बोटीत चढले. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आता त्या बेटावर उरणार नव्हत्या.
अर्थात असं त्यांना त्यावेळेस वाटलं. कारण ही डझनभर मंडळी बोटीतून अज्ञाताच्या प्रवासाला निघालेली असतानाच त्यांच्यातली एक स्त्री मागेच राहिली होती.
जीने या नंतर नामशेष झालेल्या जमातीला तब्बल अठरा वर्षं स्वत:ला जिवंत ठेवून जमात राखली. सगळे बोटीत कडेकोट बंदोबस्तात कोंबले जात असतानाच ही एकटीच कशी काय मागे राहिली हेही एक गुढच आहे.
काही जण म्हणतात की तिचं बाळ मागेच राहिल्यानं ती त्याला शोधायला परतली आणि तिथेच अडकली तर काहीजण म्हणतात की तिनं बोटीतून उडी मारली आणि पोहत जात पुन्हा बेट गाठलं. यातली कोणती कथा खरी?
हे पडताळायला काहीच मार्ग नव्हता कारण ती जी भाषा बोलत होती ती बोलणारं कोणी अस्तित्वातच उरलं नव्हतं. खुप प्रयत्न करूनही तिच्या भाषेचं डिकोडिंग करणं कोणालाच जमलं नाही.
बोटावरची गणती केल्यानंतर लक्षात आलं की एकजण कमी आहे. हे एक कोण? याचा शोध चालू झाला. १८१४ साली ज्या जहाजातून या लोकांना हलविण्यात आलं त्याच जहाजाचे कप्तान असणार्या जॉर्ज निडव्हर यांच्यावर या मागे राहिलेल्या स्त्रीचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
अनेक वर्षांच्या शोध मोहिमेनंतर याच निर्जन, एकाकी बेटावर १८३५ साली जॉर्जना एक स्त्री सापडली. शोध गटाला ती सापडली तेंव्हा ती व्हेल माशाचं कातडं शिवण्यात मग्न होती. हत्यारबंद माणसांना बघून ती अजिबात घाबरली नाही.
उलट त्यांना बघून ती छानसं हसली. तिच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केला मात्र ती काय सांगतेय हे त्या गटातल्या कोणाला कळत नव्हतं. मात्र ती सापडल्यावर तिला लगेचच परत न आणता ती इतकी वर्षं आणि तेही एकटी नेमकी कशी जगली?
हे कुतुहल असल्यानं या गटानं तिचं निरिक्षण चालूच ठेवलं तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की माशांच्या आणि प्राण्यांच्या कातडीपासून तिनं घर (तंबू) आणि तिचे कपडे शिवले होते.
कधी कधी बदल म्हणून ती जवळच्याच गुहेतही रहायला जात होती. वन्य प्राण्यांपासून वाचण्यासाठी तिची अशी काही हत्यारं होती. या सगळ्याचं वर्णन जॉर्ज यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेलं आहे.
===
हे ही वाचा – जगात अस्तित्वातच नसलेल्या देशातून जपानच्या विमानतळावर ‘तो’ अवतरला होता!
===
साधारण पन्नाशीतली धडधाकट स्त्री जॉर्जना त्या एकाकी बेटावर सापडली. ती एकटी असली तरीही आनंदात दिसत होती आणि या शोध गटाशी अगम्य भाषेत बोलतही होती.
सील मासे आणि बदक यांची शिकार करुन ती पोट भरत होती. तिला नंतर सॅन गॅब्रिएल मिशनमधे हलविण्यात आले. जिथे पूर्वी तिच्यासोबतच्या बाराजणांना ठेवण्यात आलं होतं. या सगळ्यांना या मिशनमधे आणल्यावर संसर्ग झाला आणि त्यातच सगळेच्या सगळे मरण पावले.
तिलासुद्धा मिशनमधे ठेवल्यावर पोटाचे आणि पचनाचे त्रास चालू झाले. तिचं सापडणं एखाद्या सुरस कथेसारखंच होतं त्यामुळे तिला बघायला म्हणून दूरदूरवरून लोक येत होते. जंगली बाई असाच तिचा उल्लेख बातम्यांतही होत होता.
अखेर धर्मगुरूंनीच तिला वाआना मारिया हे नाव दिलं. तिच्या परवानगी विनाच तिचं धर्मांतरही करण्यात आलं.
अर्थात तिची परवानगी मिळविण्याचा प्रश्नच नव्हता कारण ती काय बोलत आहे हेदेखील कोणाला समजत नव्हतं की तिला कसं सांगायचं हेही कळत नव्हतं. त्यामुळे तिचं धर्मांतर हे तिच्या मर्जींनं होण्याचा प्रश्नच नव्हता.
तिचं अस्तित्व काल्पनिक कादंबरीत शोभण्यासारखंच होतं. स्कॉट ओडेल या लेखकानं तिच्यावर आइसलॅण्ड ऑफ ब्ल्यू डॉल्फिन्स ही कादंबरी लिहिली आणि ती जगभारत गाजली.
मात्र अनेक वर्षं अनेकांना कल्पनाही नव्हती की या कादंबरीतली “ती” खरोखरच अस्तित्वात असलेली एक स्त्री होती. जुआनाचं आयुष्य एक सुरस कथा बनून राहिलं आहे. कायमचंच!
===
हे ही वाचा – भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.