आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
२०१४ नंतर विविध घटनांच्या निमित्ताने हिंदूंमधील कट्टरवाद सतत चर्चेत आला आहे. अर्थात, हा विषय चर्चेत आणणाऱ्यांचा हेतू वगैरे क्षणभर बाजूला ठेवला तरी हिंदूंमधील आक्रमक अंग कणाकणाने वाढत आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. परंतु, त्याचवेळी, ही आक्रमकता वाढण्यामागे कोणती कारणं आहेत ह्यावर स्पष्ट विचार देखील आवश्यक आहे. केवळ “कट्टरपणा वाईट आहे” असं म्हणून भागणार नाहीये. हिंदू चिडत का आहे, त्यामागे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कोण आहे हे डोळ्यासमोर आहे पण दिसत नाहीये असं आपण भासवत राहिलो तर प्रश्न अधिकाधिक गंभीर होत जाईल.
जगभरात इस्लामी कट्टरवाद उग्र रूप धारण करत असताना, भारतीय वैचारिक विश्व अजूनही ह्या प्रश्नाचं अस्तित्व मान्य करायला तयार नाही ही बाब गंभीर आहे. मुस्लिमांमध्ये कट्टर धार्मिक संस्कार होत आहेत, त्या कट्टरतेमुळे भारतीय समाज अधिकाधिक स्फोटक बनत आहे हे समजून घेऊन त्यावरील उपाययोजनांचा विचार सुरू करायला हवा. मुख्य म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी माध्यमांतून ही समस्या चर्चिली जायला हवी.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल प्रचंड जागरूक असलेले आपले विचारवंत एका वृत्तपत्राच्या कार्यालयावर मुस्लिम गटाकडून झालेल्या हल्ल्याबद्दल गप्प का बसतात? अलवारच्या घटनेने जेवढ्या तीव्र चर्चा करून जनमानस ढवळून काढलं जातं त्याच्या एक दशांशसुद्धा चर्चा मुस्लिम समुदायाने ट्रॉम्बे पोलीस स्थानकावर केलेल्या हल्ल्याच्या वेळी का होत नाहीत? इस्राईल-पॅलेस्टिनमधील वादामुळे इकडे आपल्या मुंबईतील आझाद मैदानावर अक्षरशः धिंगाणा घातला जातो, पोलिसांवर हात उचलला जातो. पण त्या हिंसेचा विरोध नं करता आपल्या माध्यमांतील लोक “आपण मुस्लिम मन समजून घेतलं पाहिजे” अशी री का ओढतात?
ह्या वर्तनाने आपण बहुसंख्य हिंदूंना कोणता संदेश देत आहोत? ह्या देशात मुस्लिमांनी काहीही केलं तरी चालतं – असा संदेश जर हिंदू तरूणांना दिला जात असेल तर त्यांनी हातात शस्त्र घेणं कितीही निंदनीय वाटलं तरी स्वाभाविक आहे, हे आपण मान्य करायलाच हवं.
सर्वात महत्वाचं म्हणजे वरील मुद्द्यावर आपण खुद्द मुस्लिमांच्या हिताच्या दृष्टीने सुद्धाविचार करायला हवा.
“तुम्ही चुकत आहात” हे मुस्लिमांना प्रेमाने, शांतपणे पण ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे. आपली तरुण पोरं कुणासोबत उठत बसत आहेत, त्यांना मदरशात काय शिकवलं जातंय ह्याकडे लक्ष द्यायला हवं – हे मुस्लिमांना पटवून देणं गरजेचं आहे. परंतु आपले प्रस्थापित विचारवंत ह्या मुद्द्याचं, प्रश्नाचं अस्तित्वच मान्य करायला तयार नाहीत. “मुस्लिमांच्या चुका दाखवणं म्हणजे मुस्लिमांचा द्वेष करणं” असं स्वतःच तयार केलेलं हे समीकरण आहे. हिंदूंच्या चुका दाखवताना तो द्वेष नसतो, ‘घरातील विषय, घरातील स्वच्छता’ असते परंतु मुस्लिमांबद्दल बोलताना मात्र तो द्वेष होतो – असं काहीसं हे आहे. हा “घरातील विषय” तर्क देखील भारतासाठी घातक आहे, हे ह्या निमित्ताने समजून घ्यायला हवं.
“माझ्या घरातल्या समस्या मी सोडवायला हव्यात आणि इतरांच्या घरघुती समस्यांमध्ये मी पडायला नको” हे योग्यच आहे. परंतु माझ्या शेजाऱ्याचा मुलगा रात्री अपरात्री अपेयपान करून येत असेल, मोठ्याने असभ्य शब्द बोलत असेल, येता जाता आमच्या घरावर नजर टाकत असेल तर हा प्रश्न त्या घरातील रहात नाही. हा माझ्या कुटुंबावर होणाऱ्या संस्कारांचा आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनतो. अश्यावेळी “आपल्याला काय करायचं” हा विचार करून मी थांबलो तर उद्या घडणाऱ्या अघटित घटनेस मी अप्रत्यक्ष जबाबदार असतो.
पोलिस स्थानक ही केवळ सार्वजनिक मालमत्ता किंवा यंत्रणा नव्हे. पोलिस नावाची यंत्रणा भारतीय प्रजासत्ताकाची प्रतिनिधी आहे. एक लोकप्रिय, प्रसिद्ध वृत्तपत्र म्हणजे नफ्यासाठी चालणारी खाजगी कंपनी नव्हे. ते भारतीय विचारविश्वाचं महत्वाचं अंग आहे. ह्या सर्वांवर जेव्हा एक समूह हल्ला चढवतो – आणि अश्या घटना जेव्हा एका मागे एक घडत रहातात तेव्हा हा विषय त्या ठिकाणचा, त्या वेळेचा, त्या यंत्रणेचा विषय रहात नाही. हा भारतीय व्यवस्थेचा आणि त्या व्यवस्थेवरील विश्वासाचा विषय होतो. त्यामुळे अश्या प्रसंगांतून शिकून, भारतीय मुस्लिम समुदाय कुठल्या दिशेने जात आहे हे ओळखून – हा सुद्धा आपल्याच घरातील विषय आहे – हे मान्य करून जबाबदारीने ह्या समस्येशी दोन हात करणं क्रमप्राप्त आहे.
परंतु भारतीय विचारविश्वाची शोकांतिका ही आहे की हा विषय पुरोगामी धर्मनिरपेक्ष क्षितिजावर आढळत नाही. केवळ हिंदुत्ववादी वर्तुळात ह्याला वाचा फुटते आणि मग हिंदू तरुण तिकडे वळतो. हा विषय केवळ हिंदुत्ववादी लोकच उचलत राहिले तर हिंदूंचं तिकडे आकृष्ट होणं चूक कसं?
ज्या विचारी, निष्पक्ष लोकांनी ह्या समस्या वेळीच उचलून त्यांच्या निराकरणाकडे आपल्या समाजाला नेलं नाही – त्या लोकांच्या माथी ह्या वाढत्या कट्टर हिंदुत्वाचं पाप नव्हे काय? भारतीय हिंदूंची वाईट गत अशी झाली आहे की ज्यांनी ह्या प्रश्नांवर समाधान द्यायला हवं होतं ते तिकडे ढुंकूनही बघत नाही आणि ज्या हिंदू संघटनांनी हे प्रश्न उचलले आहेत ते हे प्रश्न सोडवण्यापेक्षा अधिक चिघळवण्यात धन्यता मानत आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांकडून “मुस्लिम कट्टरवादावर उपाय काय?” ह्याचं लोकशाहीस शोभेल असं कुठलंच उत्तर मिळत नाही. तरूणांना केवळ “जागं व्हा! उठा!” अशी आवाहनं केलेली आढळतात. जागं व्हायचं, उठायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर हातात लाठ्या काठ्या घ्यायच्या! स्वतः शस्त्र घ्यायचे. सुदैवाने सुज्ञ भारतीय समाज अजूनही ह्या आवाहनांना फारसा भीक घालत नाही. परंतु जर वेळीच समस्येच्या मुळावर समाधान निघालं नाही तर आज नाहीतर उद्या प्रतिक्रियात्मक कट्टरता वाढणारच आहे.
मुस्लिमांनी भारतीय प्रवाहात येणं आवश्यक आहे. त्यासाठी मुस्लिमांचं प्रेमपूर्वक परंतु स्पष्ट आणि सतत प्रोबधन आवश्यक आहे. त्यांच्यावर होणारे कट्टर धार्मिक संस्कार थांबवले पाहिजेत. केवळ उत्तम शिक्षण देऊन भागणार नाही. मुस्लिम तरूणांना इतर धर्मांचं अस्तित्व मान्य करण्याची सवय लावणं आणि त्याहून अधिक – भारतीय कायदा हातात नं घेण्याची सवय लावणं आवश्यक आहे. त्यांच्यातील गुन्हेगारी अंगांना पिंजून काढून वेगळं केलं पाहिजे. हे करण्यासाठी पोलीस आणि न्याय यंत्रणांना सक्षम करायला हवं.
परंतु आपल्याकडे राजकीय समीकरणांपोटी पोलीसदेखील व्यवस्थित काम करू शकत नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. अर्थात, ह्या गोष्टी हिंदुत्ववादी लोक बोलताना दिसत नाहीत. धर्मनिरपेक्ष पुरोगामी मंडळींनी ह्यावर जोर द्यायला हवा.
अर्थात, हे लिहिणं-बोलणं सोपं आहे. करणं अत्यंत कठीण. परंतु हा आणि ह्या दिशेने जाणारे इतर मार्गच योग्य आहेत. सामाजिक माध्यमांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या प्रिय-अप्रिय घटना सर्वदूर पोहोचत आहेत. ह्या घटनांच्या बातम्यांसोबत घटनेला साजेसा संदेश देखील जात असतो. सध्याचं भारतीय जनमानस अत्यंत सहिष्णू आहे. कट्टर हिंदूंच्या हिंसेच्या घटना अत्यंत तुरळक आहेत. परंतु जर वेळीच मूळ समस्या सोडवली नाही तर येत्या दशकांत-शतकांत चित्र बदलू शकेल. ते जर बदलायला नको असेल तर आजच कम्बर कसायला हवी.
हिंदूंमधील वाढत्या प्रतिक्रियात्मक कट्टर गुंत्याची उकल हळुवार करायला हवी. हिंदूंसाठी आणि मुस्लिमांसाठीही. सर्वांसाठी. भारतासाठी. आणि ही उकल निष्पक्ष, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष व्यासपीठांद्वारेच होऊ शकते.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.